वाहतूक कोंडीच्या नावाने शिव्यांच्या लाखोल्या वाहत त्या गर्दीच्या लोटात स्वत:ला लोटून देणारे नागरिक ही दिवाळीची खूणगाठ ठरली आहे..

पाऊस आहे, महागाईच्या बातम्या आहेत आणि आकडेही आहेत.. ऑनलाइन खरेदी कधीही होऊ शकते, तरीही दिवाळीचे अप्रूप मात्र टिकून आहे..

जगण्यावरचा विश्वासच उडून जात असताना.. नातेवाईक, शेजारी यांचा अकस्मात मृत्यू पाहताना.. मनाची उभारी कशीबशी टिकवून ठेवताना गेल्या दोन वर्षांत करोनाखाली दबून गेलेल्या आनंदाच्या सगळय़ा प्रेरणा

या वर्षीच्या दिवाळीत पुन्हा एकदा उमलून येऊ लागलेल्या दिसत आहेत.. या आनंदाला महागाईची, जागतिक मंदीच्या सावटाची, कशाकशाचीही तमा यंदा तरी नाही!  भूतकाळातील सारे क्लेश आणि वेदना दूर सारत पुन्हा नव्या उत्साहाने आणि आनंदाने यंदाच्या दिवाळीला आपण सामोरे जात आहोत. दिवाळीपूर्वीच्या खरेदीचा उत्साह हेच तर दाखवतो आहे. कोणतेही धार्मिक कर्मकांड नसलेला असा हा देशभरातील सण.  गेल्या दोन वर्षांत ना खरेदी करावीशी वाटली, ना फराळ करावासा वाटला. शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे आणि नातेवाईकांकडे जावे लागले, ते सांत्वनासाठी किंवा दु:ख वाटून घेण्यासाठी. करोनाच्या लाटेत बुडालेल्या, क्षतिग्रस्त झालेल्या अशा अनेकांसाठी यंदाची दिवाळी पुन्हा एकदा आनंदाकडे झेपावणारी ठरते आहे. देशातील सगळेच सण रस्त्यावर येऊन, गर्दी करत साजरे करण्याची नवी मानसिकता गेल्या काही दशकांत निर्माण होऊ लागली आहे. दिवाळीचा आनंद असा रस्त्यावर येऊन साजरा करायची गरजच नसते. तो प्रत्येकाच्या अंतर्मनाच्या गाभ्यात साठवून ठेवायचा असतो. आता हेही हळहळू बदलू लागले.. पहाटे उठून नववस्त्र परिधान करून लगबगीने सांस्कृतिक कार्यक्रमांना जाण्याची नवी लाट आता स्थिरस्थावर होऊ लागली आहे.

सुख आणि समाधान यांमधला फरक जाणवणारा हा एकमेव सण. वर्षांत क्वचित मिळणारा फराळ, कपडय़ांची वार्षिक खरेदी, गोडधोड खाणे अशा अप्रूपाचा हा सण. आनंद साजरा करण्यासाठी गरीब -श्रीमंत अशी वर्गवारी न करणारा आणि सगळय़ांच्या नजरेत समाधानाचे थेंब साठवणारा, साध्या साध्या गोष्टीतही मनाला सुखावणारा हा सण म्हणूनच प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा आणि वाट पाहायला लावणारा. शरीराला होणाऱ्या संवेदनांमुळे सुख मिळते आणि मनाला स्पर्श करणाऱ्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीही समाधानाचे माप पदरात टाकतात. जरा नीट न्याहाळले, तर एरवी सतत दुर्मुखलेल्यांच्या डोळय़ांत हे पैशांपलीकडचे समाधान कसे तरळत असते, हे पाहण्यातही कमालीची उभारी देणारे असते. आता दिवाळीत मिळणाऱ्या सुटीत कौटुंबिक सहली निघतात. हॉटेले आणि रिसॉर्ट सहा सहा महिने आधीपासूनच ‘बुक’ होतात. कुटुंबासह एवढा काळ घालवायला कुठे मिळतो आजकाल? काहीच न करता केवळ मौजमजा करण्याची चाकरमान्यांची गरज गेल्या काही वर्षांतील वाढत्या गुंतागुंतीमुळे वाढतच चालली आहे. सततचा ताण, उद्दिष्टपूर्तीची धडपड, त्यासाठी करावे लागणारे अहोरात्रीचे कष्ट यातून चार घटका दूर जाण्याची संधी देणारा दिवाळी हा सण ही प्रत्येकाची गरज होऊन बसली आहे. बाजारपेठेतून हिंडताना काचेच्या मागे असलेल्या अनेक वस्तुंकडे हावऱ्या नजरेने पाहणाऱ्यांना दुकानात शिरण्याची संधी दिवाळी देते. वस्तू हाताळून त्यांना स्वप्नात नेण्याची सोय दिवाळीत होते. आंतरजालावर वर्षभर खरेदीचा सपाटा लावणाऱ्यांना केवळ फोटो पाहूनच निर्णय घ्यावा लागतो. घरपोच मिळणाऱ्या वस्तूंमुळे खरेदीचा आनंदही मावळत असतानाही गेल्या काही दिवसात सगळीकडे बाजार फुलल्याचे दिसणारे चित्र अधिक समाधानाचे. वाहतूक कोंडीच्या नावाने शिव्यांच्या लाखोल्या वाहत त्या गर्दीच्या लोटात स्वत:ला लोटून देणारे नागरिक ही दिवाळीची खूणगाठ.

हे खरे की यंदाची दिवाळी आणखीच निराळी आहे. एरवी वातावरणातच दिवाळीचा उल्हास भरून  वाहात असतो. थंडीचे आगमन होत असते आणि त्याचा आल्हाद मनालाही शिवत असतो. अशा वेळी केवळ मौज करणे, ही मानवी मनाच्या आरोग्यासाठीची आवश्यक गोष्ट. यंदा मात्र अवेळीच पाऊस आणि दिवसा ऑक्टोबरचे ऊन अशी स्थिती. सकाळ उजाडते ती शहरांत तरी धुरकटलेली. तरीही संध्याकाळ हा खरेदीचा काळ ही खूणगाठ मात्र कायम राहिली आहे. एरवी दिवाळीतच खायला मिळणाऱ्या खाद्यपदार्थाची गंमत आता राहिली नाही. लाडू, चिवडा, चकली, अनारसे, शेव या फराळीय पदार्थाचे सेवन बारा महिने होत असल्याने त्याचे अप्रूप संपले आहे. कपडेलत्तेही वर्षभर खरेदी होतच असतात. गोडाधोडाला आता निमित्त लागत नाही. वस्तूंच्या खरेदीसाठी दिवाळीचाच मुहूर्त लागत नाही. नवे संकल्प या सणाला करायचे नसल्याने, केलेल्या संकल्पांचे काय झाले, याची उजळणी करण्याचीही आवश्यकता वाटत नाही. वातावरणात भरून राहिलेला उत्साह आणि त्याला मनातून मिळणारा प्रतिसाद हे या सणाचे खरे वैशिष्टय़. मनातील तमाची काजळी दूर करण्यासाठी, बदललेल्या निसर्गचक्राने निर्माण केलेल्या अडचणींवरही मात करता येतेच. पावसाच्या भीतीने गळाठून गेलेल्या वातावरणातही दिवाळी असतेच. ती आधी मनात निर्माण व्हायला हवी. त्यासाठी मन शुद्ध करायला हवे. ते झाले की तमाच्या तळाशी दिवे लागतात, उत्साह संचारतो, जगण्याचे नवे बळ एकवटता येते, नव्या भरारीची स्वप्ने पडू लागतात.

गेल्या वर्षीची दिवाळी भीतीच्या वातावरणातच साजरी झाली. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, या काळजीने दिवाळी फक्त ‘साजरी’ झाली. आरोग्य व्यवस्थेवरील खर्चाच्या ताणाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेवरही ताण आला. साठवून ठेवलेले पैसे दिवाळीत खर्च करायलाही हात घाबरत होते. ‘असू देत ते, पुढे उपयोगाला येतील’ अशा काजळीने सगळे मनानेच थकले होते. आता ती काजळी सरलेली दिसते. आर्थिक मंदीने झाकोळलेल्या जगातील अनेक देशांच्या तुलनेत भारताची स्थिती अगदीच वाईट नाही, हा दिलासाच बाजारपेठेतील गर्दीने दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२२-२३ या वर्षांसाठी भारताच्या विकास निर्देशांकांचे भाकीत ७.४ टक्क्यांवरून ६.८ टक्के एवढे कमी केले होते.  तरीही ‘जी २०’ देशांच्या तुलनेत (सौदी अरेबिया वगळता) भारताचा विकास दर अधिकच होता. अनेक जागतिक संस्थांनी हा विकास निर्देशांक ६ टक्क्यांपर्यंत खाली आणला असला तरीही तो वेग अन्य देशांच्या तुलनेत अधिक मानला जातो. खिशातले पैसे खर्च करण्यातील सढळ हातामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला उजळा मिळण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. भारतीय मानसिकतेतील हा बदल उत्साहवर्धक म्हटला पाहिजे. बाजारात पैसा खेळू लागला की उद्योगांनाही चालना मिळते. करोनापूर्व स्थितीत देश पोहोचू लागल्याचे हे निदर्शक. उद्योगांना बळ देणारे हे वातावरण दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळणे हा वेगळाच सुखद अनुभव. सुख मानण्यावर असते, तेव्हा डॉलरकडे पाहायचे नाही.. आपण खर्च करायचा, हे जणू नोकरदार मध्यमवर्गीयांना आपसूक उमगले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे सुख असेच राहो, पुढील वर्ष केवळ नोकरदारांनाच नव्हे तर साऱ्यांना सुखाचे आणि समाधानाचे जावो, यासाठी वाचक, हितचिंतकांना शुभेच्छा!