अमेरिकेने पाठिंबा दिला नाही तरी आम्ही युद्ध सुरूच ठेवू असे नेतान्याहू म्हणतात. पण अमेरिकेची आर्थिक-लष्करी-राजनैतिक मदत हा इस्रायलचा प्राणवायू आहे..

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत इस्रायल-हमास यांच्यातील युद्धात शस्त्रसंधीची मागणी करणारा ठराव अखेर एकमुखाने मंजूर झाला. यात ‘अखेर’ असे म्हणायचे कारण याआधी किमान तीन वेळा अशा ठरावांवर अमेरिकेने आपला नकाराधिकाराचा खोडा घालून ते पराभूत केले. या वेळी अमेरिकेने या ठरावावर मतदान केले नाही. ती तटस्थ राहिली. त्यामुळे शस्त्रसंधीची मागणी १४ विरुद्ध शून्य अशा मतांनी मंजूर झाली. याचा फार मोठा धक्का इस्रायलला नक्कीच बसला. आपण काहीही करावे आणि अमेरिकेने आंतरराष्ट्रीय मंचावर आपली पाठराखण करत राहावे याची इतकी चटक इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना लागलेली आहे की त्यांना कोणी अडवणारा राहिलेला नाही. याचा परिणाम नेतान्याहू सोकावण्यात झाला. आधीच हा गृहस्थ कमालीचा बेमुर्वतखोर, आढयताखोर आणि त्यात भ्रष्ट. या अशा नेत्याचे भूत आणि वर्तमान लक्षात घेता अमेरिकेने ही ब्याद सांभाळण्याची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याची काहीही गरज नव्हती. इस्रायलच्या जन्मापासून अमेरिका ही त्या देशाची राखणकर्ती राहिलेली आहे. मग ते पंतप्रधान गोल्डा मायर यांच्या काळात अरब देशांनी इस्रायलवर संयुक्तपणे केलेला हल्ला असो वा योम किप्पुर किंवा आताचे हमासविरोधातील युद्ध असो. अमेरिकेकडून इस्रायलची होणारी आंधळी पाठराखण अजिबात लपून राहिलेली नाही. यामागे अमेरिकेचे यहुद्यांबाबतचे प्रेम उतू जाते, असे अजिबात नाही. पण तरीही अमेरिका सतत इस्रायलचे सारे अपराध पोटात घेते. याचे कारण अमेरिकेच्या समाजजीवनात प्रचंड सामर्थ्यवान असलेला यहुदी दबावगट. वित्तसेवा, प्रशासन ते राजकारण वा माध्यमे/ मनोरंजन अशा अमेरिकेच्या सर्व क्षेत्रांत यहुदी व्यक्ती मोठया प्रमाणावर आहेत आणि त्या अमेरिकेच्या प्रशासनावर इस्रायलच्या वतीने सातत्याने दबाव आणत असतात. हा दबाव झुगारून देण्यात अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांस तितकेसे यश इतके दिवस येत नव्हते. त्यामुळे इस्रायलचे फारच फावले. परंतु अखेर बायडेन यांची मंदावलेली सहनशीलता संपली आणि त्यांच्या प्रशासनाने शस्त्रसंधीच्या मागणीस विरोध केला नाही. या घटनेस अनेक अर्थ आहेत आणि तिचे पडसादही अनेक.

हेही वाचा >>> अग्रलेख : आपले ‘आप’शी कसले नाते?

त्यातील पहिला लगेच दिसून आला. अमेरिकेने शस्त्रसंधीस विरोध केला नाही हे जाहीर झाल्या झाल्या पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी आपला अमेरिकेचा दौराच रद्द केला. या दौऱ्यात ते अध्यक्ष बायडेन यांच्याशी गाझा युद्धातील आगामी पावलांविषयी चर्चा करणार होते. पण अमेरिकेच्या या ‘बदलत्या’ भूमिकेमुळे रागावून त्यांनी आपली अमेरिका भेट रद्द केली. घरातील अतिलाडामुळे जास्तच शेफारून गेलेल्या लाडावलेल्या चिरंजीवाने कशास ‘नाही’ म्हटल्यावर फुरंगटून बसावे तसे हे झाले. इतकेच नाही, तर  नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या या बदललेल्या भूमिकेचा निषेध केला आणि त्यामुळे हमाससारख्या दहशतवादी संघटनेचे फावेल, अशा अर्थाचे मत व्यक्त केले. प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. अमेरिकेच्या आजवरच्या बोटचेप्या भूमिकेमुळे उलट नेतान्याहू यांचेच फावले असून देशांतर्गत राजकारणातील वाद टाळण्यासाठी प्रत्यक्षात ते गाझा युद्धाचा वापर करताना दिसतात. युद्ध थांबले की नेतान्याहू यांचा भ्रष्टाचार आणि भ्रष्ट राजकारण या विषयाच्या चर्चेस तोंड फुटेल आणि अनेक आघाडयांवर या पंतप्रधानांस विरोधकांचा सामना करावा लागेल. तेव्हा ही परिस्थिती टाळण्याचा एकमेव, राष्ट्रप्रेमी मार्ग म्हणजे युद्ध लांबवणे. देशांतर्गत राजकारणात संकटग्रस्त ठरलेल्या राजकारण्यांस परकीय आक्रमक, आक्रमणाची भीती इत्यादी मुद्दे नेहमीच हात देतात. देश संकटात आहे अशी हाळी सर्वोच्च सत्ताधीशानेच दिली की इतरांना आपसूक सत्ताधीशांच्या मागे उभे राहावे लागते. पंतप्रधान नेतान्याहू याचाच फायदा घेताना दिसतात. म्हणूनच त्यांना कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावे असे वाटत नाही. स्वत:ची खुर्ची वाचावी यासाठी अश्रापांचे प्राण घेण्यात या राजकारण्यांस काहीही वाटत नसेल तर हा इसम किती निर्ढावलेला आहे याची प्रचीती येईल. हा संघर्ष गेले सुमारे पाच महिने सुरू असून त्यात आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक गाझावासीयांचे प्राण गेले आहेत आणि त्यापैकी दोनतृतीयांश तर केवळ महिला आणि बालके आहेत. तेव्हा हा नरसंहार थांबवणे अत्यावश्यक.

हेही वाचा >>> अग्रलेख: टंचाईचे लाभार्थी..

पण तेच नेतान्याहू यांस नको. हमास या दहशतवादी संघटनेने अकारण केलेला दहशतवादी हल्ला हे केवळ निमित्त. त्या हल्ल्याने समग्र गाझा, पॅलेस्टाईनादी परिसर बेचिराख करण्याची संधीच युद्धखोर नेतान्याहू यांस मिळाली. त्या दहशतवादी हल्ल्यामुळे खुद्द नेतान्याहू यांचे पॅलेस्टिनी भूमीतील उद्योग दुर्लक्षित राहिले आणि ज्यांच्या भूमीत इस्रायली बेकायदा घुसखोरी करत होते त्याच भूमीत अधिकृतपणे घुसून सामान्यांचा जीव घेण्यास वाव नेतान्याहू यांस मिळाला. आताही ते ‘हमास’चा पुरता बीमोड केल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही अशा वल्गना करतात. पण म्हणजे काय, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. हमास ही त्या परिसरात सर्वव्यापी आहे आणि तिचे काही एक कार्यालय आहे, अधिकृत यंत्रणा आहे असे नाही. त्यामुळे कोणाही गाझावासीयांस इस्रायली सैनिक मारतात आणि हमास सदस्यास ठार केल्याचा दावा करतात. या कथित हमासवासीयांच्या शोधासाठी इस्रायली जवानांनी रुग्णालये, युद्धकालीन आसरा केंद्रे, मदत छावण्या यातील काही म्हणून सोडले नाही. युद्धकाळात कशाकशांवर हल्ला करावयाचा नाही, याचे काही संकेत असतात. संयुक्त राष्ट्रांचे मदत कार्यकर्ते, रेडक्रॉसचे स्वयंसेवक वा बातमीदार यांस अपाय केला जात नाही. नेतान्याहू यांनी हे सारे संकेत सहज धाब्यावर बसवले. परिणामी अर्धा डझनहून अधिक पत्रकार आणि संयुक्त राष्ट्रांचे कार्यकर्ते आतापर्यंत या युद्धात मरण पावले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर की त्यामुळे युद्धग्रस्तांच्या मदतीस, त्यांचे अश्रू पुसण्यास जायला कोणी तयार नाही. गाझा पट्टी हा एक अत्यंत चिंचोळा भूभाग. सर्व बाजूंनी इस्रायल आणि एका बाजूने समुद्र अशी रचना. त्यामुळे गाझावासीयांच्या हालास पारावार उरलेला नाही. परिणामी समुद्रमार्गे आणि विमानातून मदत टाकण्याची वेळ अमेरिकादी देशांवर आली. अशा मदत-वाटपावरही इस्रायलने गोळीबार केल्याच्या तक्रारी आहेत.

 इतकी अमानुषता इस्रायल दाखवू शकतो ती केवळ पाठीशी अमेरिका आहे म्हणून. आता अमेरिकेने पाठिंबा दिला नाही तरी आम्ही युद्ध सुरूच ठेवू असे नेतान्याहू म्हणतात. पण त्या फुकाच्या वल्गना. अमेरिकेची आर्थिक-लष्करी-राजनैतिक मदत हा इस्रायलचा प्राणवायू आहे. इस्रायलने काहीही करावे आणि अमेरिकेने त्याकडे डोळेझाक करावी असे त्या देशाच्या जन्मापासूनच चालत आलेले आहे. अमेरिकेच्या इतिहासात एखादा डेमॉक्रेटिक बराक ओबामांचा अपवाद वगळता अन्य सारे नेते इस्रायल खूश ठेवण्यात धन्यता मानतात. त्यात आता तर अमेरिकी निवडणुकांचा काळ. अत्यंत संघटित अमेरिकावासी यहुदींची मते या लढाईत निर्णायक. त्यासाठी माजी अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलचे वाटेल तितके लांगूलचालन करण्यास तयार आहेत आणि त्यांनी तसे ते अनेकदा केलेही आहे. त्यामानाने डेमॉक्रेटिक पक्षीय इतका ताळतंत्र सोडत नाहीत. त्यामुळे इतके दिवस इस्रायलची मनमानी डेमॉक्रेटिक बायडेन कसे काय सहन करत होते हा प्रश्न होता. अखेर ही निष्क्रियता फारच अंगाशी येते हे पाहिल्यावर बायडेन यांनाही पर्याय राहिला नाही. त्यांनी इस्रायलची तळी उचलणे थांबवले. पण तितक्याने भागणारे नाही. इस्रायलला रुळावर ठेवायचे असेल तर अमेरिकेने त्या देशास पुरवलेला पांगुळगाडा आधी काढावा. इतके कोणास शेफारून ठेवणे योग्य नव्हे. तसे करणे अंतिमत: अंगाशीच येते.