साधे मेळावेही जे विना-अपघात आयोजित करू शकत नाहीत त्यांच्या क्षमतेबाबत भलता भ्रम बाळगण्याचे कारण नाही…
एक समाज म्हणून आपण किती अप्रगत, असभ्य आणि असंस्कारी आहोत याचे ताजे उदाहरण म्हणजे तमिळनाडूतील करूरनजीक घडलेली चेंगराचेंगरीची घटना. कोणा विजय नामे तमिळ चित्रकलाकाराच्या धडपडत्या राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या मेळाव्यात अपेक्षेपेक्षा जवळपास पाचपट गर्दी जमली आणि तिला न आवरता आल्याने हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीने जवळपास ४० जणांचा बळी घेतला. हे असले प्रकार आपल्या देशात कधीच नवे नसतात आणि तरी नवनव्याने होतच असतात. गेल्या वर्षी हाथरस येथे भोले बाबा याच्या सत्संगात सुमारे १२१ जण थेट स्वर्गात गेले. त्याच वर्षी कुंभमेळ्यातही अनेकांस अशीच मुक्ती मिळाली. याबाबत ‘अनेकांस’ असा शब्दप्रयोग करायचा कारण या धर्मस्थळीच्या चेंगराचेंगरीतील मुक्ती-जिवांची नक्की संख्या माहीत नाही. पण ती (किमान) ३० असावी. सुमारे दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रातील मांढरदेवीच्या जत्रेतील चेंगराचेंगरीत ३४० जणांचे जीव गेले. तसेच २००८ साली राजस्थानातील चामुंडा देवीसमोरील गर्दीत २५० आणि त्याच वर्षी हिमाचलातील नैना देवी येथील मानवी कोंडीत १६२ जणांनी शेवटचा श्वास घेतला. हे सर्व दूरगावी होते असे नाही. देशाच्या राजधानीतील रेल्वेस्थानकावरील चेंगराचेंगरीने दीड डझनांचे प्राण घेतले. या अशा चेंगराचेंगरीच्या घटनांसाठी आपणास काही भव्य कारणही लागत नाही. गतसाली एक टिनपाट क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या संघातील ‘महान’ खेळाडूंच्या सत्कारार्थ जमलेल्या गर्दीने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी इत्यादी असलेल्या आधुनिक बेंगळूरु शहरात ११ जण घुसमटून गेले. आताची घटनादेखील दक्षिण भारतातील. उत्तर असो वा दक्षिण, पूर्व वा पश्चिम – आपल्याकडे रिकामटेकड्यांची वानवा नाही आणि त्यामुळे त्यांच्या गर्दीची ददात नाही. उत्तरेकडे धर्म-नायक हे गर्दीचे कारण असतात तर दक्षिणेकडे चित्रपटाच्या पडद्यावरच्या नायकांभोवती गर्दी होते. तमिळनाडूतील ताजी चेंगराचेंगरीची घटना ही अशाच नायकाभोवतीची.
म्हणून अधिक आक्षेपार्ह. एरव्ही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आघाड्यांवर प्रगतीची निरनिराळी शिखरे काबीज करणारे तमिळींचे चित्रपट नायक-नायिकांचे प्रेम विकृतीच्या पातळीवर जाणारे आहे. एमजी रामचंद्रन, के. करुणानिधी, जे जयललिता हे तमिळनाडूतील राजकीय नायक/नायिका मुदलात चित्रपटाच्या पडद्यावर गाजलेले नायक/नायिका होते. यांची लोकप्रियता इतकी अफाट होती की एमजीआर यांच्या निधनानंतर काहींनी आत्महत्या केल्या तर जयललिता यांची मंदिरे उभी राहिली. या खेरीज कमल हासन, विजयकांत, चिरंजिवी, सरथकुमार, उपेंद्र, देवेन, रजनीकांत आणि आता हा विजय चंद्रशेखर असा हा तमिळी तारेतारकांच्या राजकीय मुशाफिरीचा इतिहास. तो जितका कौतुकास्पद आहे त्यापेक्षा अधिक लज्जास्पद म्हणावा असा आहे. कारण फार फार तीन तास ज्यांस पडद्यावर सहन करायचे त्याच्या हाती आपल्या प्रदेशाचे भवितव्य द्यावे असे या राज्यातील जनतेस वाटते. यात एमजीआर, जयललिता असे काही मोजके अपवाद सोडले तर राजकारणाच्या विशाल पडद्यावर हे सर्वच नायक पार आपटले. तरीही त्यांची प्रभावजादू काही कमी होताना दिसत नाही. विजय चंद्रशेखर याची ताजी यात्रा हे त्याचे प्रतीक. हा विजय त्या राज्यातील सत्ताधारी द्रमुक आणि आव्हानवीर भाजप या दोहोंस पर्याय देऊ पाहातो. त्या राज्यातील राजकारण गेली किमान चार-पाच दशके द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोहोंभोवतीच फिरले. यातील अण्णाद्रमुकला भाजपने आपल्या मिठीत घेऊन निष्प्रभ केले. इतिहासात भाजप आणि द्रमुक हेदेखील परस्परांच्या बाहुपाशात काही काळ होते. पण द्रमुक नेत्यांस लवकर भान आले आणि त्यांनी भाजपच्या मिठीतून आपली सुटका करून घेतली. अण्णाद्रमुकला ते जमले नाही. तेव्हा हा कोणी विजय नामे चित्रपट पडद्यावरील नरपुंगव या दोहोंस पर्याय म्हणून उभा ठाकू पाहातो. आपला राजकीय इतिहास आणि वर्तमान असे की राज्यस्तरावर असा पर्याय देण्याची भाषा करणाऱ्यांस प्रत्यक्षात केंद्रातील भाजपचा आतून पाठिंबा असतो. तशा भाजप-जीवी पर्यायवीरांची अनेक उदाहरणे देता येतील. त्यात या विजय-पक्षाचा सहभाग नाही असे मानणे दुधखुळेपणाचे ठरेल. विशेषत: या जीवघेण्या मेळाव्यानंतर ज्या प्रकारे भाजप व्यक्त झाला आणि ज्या प्रकारे विजय यांच्या पक्षाने यामागे राज्यस्तरीय कटकारस्थानाचे सूतोवाच केले ते पाहता असा संशय घेणे अस्थानी नाही. त्यापेक्षाही अक्षम्य आहे ती ही घटना.
हा विजय एका चित्रपटासाठी अडीचशे-तीनशे कोटी रु इतका कचकचीत मेहनताना घेतो. तसेच तो स्वत: गोटीबंद सुरक्षारक्षकांच्या गराड्यात बारा महिने चोवीस तास राहणे पसंत करतो. कलाकार-राजकारणी असूनही खरा राजकारणी वाटावा इतक्या तुटकपणे तो समाज, माध्यमे आदींपासून दूर राहातो. तरीही अशा व्यक्तीच्या मागे तमिळ जनता जात असेल तर त्या समाजाच्या सामूहिक शहाणपणाबाबतच प्रश्न निर्माण होतो. इतक्या धनाढ्य अभिनेत्याला गर्दीच्या नियमनासाठीही सुरक्षारक्षक तैनात करावे असे वाटले नाही? खेरीज ही स्वारी प्रत्यक्ष घटनास्थळी तब्बल आठ तास विलंबाने अवतरली. त्याच्या दर्शनार्थ दुपारी १२ वाजल्यापासून जमलेल्या हजारो जणांस रात्री पावणेआठपर्यंत खोळंबून राहावे लागले. हे असे इतका काळ वेळ घालवणारे मूर्ख आपणासाठी तिष्ठत बसण्यास तयार आहेत याचा अंदाज असलेल्या या विजयने त्यांच्या वेळेची मुळात फिकीर करावीच का, असा प्रश्न यावर उपस्थित होईल. तो गैर नाही. कारण आपापले कामधाम सोडून चाळीस-पन्नास हजार नागरिक एखादा कामाचा दिवस वाया घालवण्यास तयार असतील तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेविषयीच मुदलात प्रश्न निर्माण होतो. पण राजकारण करू पाहणाऱ्या व्यक्तीस इतक्या साऱ्या तिष्ठणाऱ्या जमावाविषयी काडीचीही सहानुभूती वाटत नसेल तर त्यातून त्या व्यक्तीच्या राजकारणाचा पोत कसा असेल याचा अंदाज येतो. आपणासाठी किती प्रचंड जमाव तिष्ठत बसलेला आहे हे इतरांना दिसावे यासाठी हे विजयराव घटनास्थळी विलंबाने आले; असे म्हणतात. ते खरे असेल तर आयोजक या नात्याने या विजयवरच खटला भरायला हवा. हे झाले भूतकाळाविषयी. त्याबाबत आणखी काही करता येण्यासारखे नाही. जे गेले ते गेले. पण असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी काही एक ठोस धोरण आखले जाणे आवश्यक. त्यासाठी एक साधा निर्णयदेखील पुरेसा ठरेल.
तो म्हणजे ज्या व्यक्तीच्या आयोजनात ही अशी जीवघेणी चेंगराचेंगरी होईल त्या व्यक्तीस सार्वजनिक जीवनात त्यापुढे वावरण्यावर गदा आणणे. मग ही व्यक्ती एखाद्या कोणा पीठ/संस्थानाचे बाबा/ बापू/ बाई असोत की राजकीय नेते. जे कोणी चेंगराचेंगरी विरहित मेळावेही आयोजित करू शकत नाहीत त्यांच्या सार्वजनिक जीवन सहभागाचा दर्जा काय असणार ? तो कितीही आश्वासक वाटला तरी साधे मेळावेही जे विना-अपघात आयोजित करू शकत नाहीत त्यांच्या क्षमतेबाबत भलता भ्रम बाळगण्याचे कारण नाही. यावर असे काही घडल्यास त्यामागे ‘राजकीय विरोधक’ असण्याचा खरा/ खोटा आरोप होणार हे उघड असले तरी अशी संधी विरोधकांस मिळू नये यासाठी संबंधितांस अधिक खबरदारी दाखवावी लागेल.
त्यात काहीही गैर नाही. कारण इतक्या लाजिरवाण्या जीवितहानीनंतर या अशा गर्दी-खेचक आयोजकांवर ना कसली कारवाई होते ना परिस्थिती बदलण्यासाठी काही उपाय योजले जातात. त्यामुळे युद्धातही जेवढे जीव आपण घालवत नाही त्यापेक्षा अधिक माणसे अपघात आणि चेंगराचेंगरीत मरू देतो. हिंदीत ‘गुंडागर्दी’ असा जोडशब्द आहे. त्याचा क्रम बदलून या गर्दी-गुंडांस रोखायला हवे.