अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचे आणि त्यापेक्षाही अधिक कमला हॅरिस यांच्या पराजयाचे कवित्व आणखी बराच काळ राहील. या निकालाचे वेगवेगळे अन्वयार्थ काढले जात असून तेही आणखी काही काळ सुरू राहील. तसे होणे नैसर्गिक. ट्रम्प यांच्यासारखी अ-लोकशाहीवादी, बेमुर्वतखोर आणि सर्व व्यवस्थांना खुंटीवर टांगणारी व्यक्ती जेव्हा प्रामाणिक लोकशाहीवादी, मुर्वतखोर आणि व्यवस्थांचा आदर करणाऱ्या देशात सर्वोच्च सत्तापदी निवडून येते तेव्हा सर्वांचे सैरभैर होणे नैसर्गिक ठरते. त्यातही पराभव झाला म्हणून समर्थकांस चेतवून कॅपिटॉल हिलवर हल्ला करण्यापर्यंत ज्याची मजल गेली आणि माध्यमांतील खोटेपणासाठी ज्यास दंड झाला असा इसम परत अध्यक्षपदी निवडून द्यावा असे अमेरिकी जनतेस वाटलेच कसे, या प्रश्नाचा भुंगा अनेकांच्या डोक्यात प्रदीर्घ काळ घोंघावत राहणे हेही नैसर्गिक. अशा अवस्थेत आपणास हव्या त्या उमेदवाराच्या पराजयाची आणि नको वाटत होता त्या उमेदवाराच्या विजयाची कारणे समोर मांडली जाणेही साहजिक. तरीही लोकशाही प्रक्रियेचा आदर करून ट्रम्प यांचा विजय सर्वांस गोड मानून घ्यावा लागेल. अशा वेळी ‘हे’ निवडून का आले यापेक्षा ‘यांना’ निवडून द्यावे असे जनतेस का वाटले नाही, या प्रश्नास भिडणे अधिक प्रामाणिकपणाचे ठरेल. कमला हॅरिस यांस जगातील अनेक सहिष्णू, उदारमतवादी अशा बुद्धिमंतांचा पाठिंबा होता. अनेक नामांकित, अभ्यासू माध्यमकर्मी, समूहांनी आपला कौल कमलाबाईंच्या बाजूने दिला होता. तरीही त्या हरल्या. तेव्हा या सगळ्याची कारणमीमांसा होणार आणि तशी ती व्हायलाही हवी. यातूनच इतरांस काही बोध मिळू शकतो. अर्थात तो घ्यावयाचा असेल तर. तेव्हा यातील पहिला मुद्दा म्हणजे कमला हॅरिस या हरल्याच कशा?

हा प्रश्न ‘‘अयोध्येत भाजपचा पराभव झालाच कसा’’, या प्रश्नाशी समांतर जातो आणि त्याचे उत्तरही त्या प्रश्नाच्या उत्तराशी समांतर आहे. कमला हॅरिस यांच्या पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या वचनाचा आधार घ्यावयाचा झाल्यास या प्रश्नाचे उत्तर ‘इट्स इकॉनॉमी, स्ट्युपिड’ असे एका वाक्यात देता येईल. अर्थव्यवस्थेतील नाराजी ही राजकीय प्रक्रियेतून व्यक्त होते असा त्याचा अर्थ. यानंतर प्रश्न असा की जगातील सर्वात धनाढ्य देशातील नागरिकांस मुळात आर्थिक विवंचना भेडसावतात कशा आणि कोणत्या? अमेरिकेत सुदैवाने बेरोजगारीची समस्या नाही. तथापि चलनवाढीचे आव्हान मात्र तीव्र आहे. म्हणजे भाववाढ. हाती येणारे उत्पन्न तितकेच किंवा अत्यल्प वाढणार आणि त्याच वेळी याच उत्पन्नात भागवावयाचा खर्च मात्र वाढत जाणार असे हे वास्तव. वेतन स्तब्धता आणि त्याच वेळी खर्च मात्र वाढते ही परिस्थिती. उच्चवर्गीय, उच्चवर्णीय अभिजनवर्गास हे प्रश्न भेडसावत नाहीत. या प्रश्नाचा दाह ज्यांस हातातोंडाची गाठ घालणे जड जाते त्यांस अधिक कळतो. हा वर्ग मोठ्या प्रमाणावर कमलाबाईंच्या विरोधात गेला त्याचे हे कारण. अयोध्येत भव्य राम मंदिर आणि त्याभोवतीच्या परिसरासाठी अनेकांच्या पोटावर पाय आला, त्यांना विस्थापित व्हावे लागले आणि त्यांची ही वेदना मतपेट्यांतून व्यक्त झाल्यावरच इतरांस कळली. तसेच हे. अमेरिकेत माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या काळात मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर अॅलन ग्रीनस्पॅन यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला. त्याचा इतका सुळसुळाट झाला की गरजशून्यांनाही कर्जे दिली गेली. त्यातून २००८ चे जागतिक आर्थिक संकट उद्भवले. बँकांचा लंबक दुसऱ्या दिशेला गेला. त्यातून आलेल्या नियमनातून अमेरिकी मध्यमवर्गाच्या पोटास चिमटा बसू लागला. हा वर्ग सत्ताधाऱ्यांवर नाराज होता. निवडणुकीत या वर्गास देण्यासाठी कमला हॅरिस यांच्याकडे काय होते?

गर्भपात हक्क, समलैंगिकांस समान संधी आणि स्थलांतरितांस औदार्य इत्यादी. हे तीनही विषय अभिजनवादी वाटू शकतात हे नाकारणे अप्रामाणिकपणाचे ठरेल. यातील गर्भपाताचा हक्क आणि समलैंगिकांप्रति समानता हे वैयक्तिक जीवनशैलीसंबंधित मुद्दे आहेत. वैयक्तिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची बरोबरी व्यापक समुदायासमोरील आव्हानाशी करणे अयोग्य. आपल्याकडेही हा प्रयत्न होतो. विशेषत: समलैंगिकांबाबत अधिक. गर्भपात करावयाचा की गर्भ वाढू द्यावयाचा हा सर्वस्वी संबंधित स्त्रीचा अधिकार. ज्यांना काहीही सहन करावे लागत नाही त्यांनी मातृत्वाच्या कथित उदात्ततेविषयी कढ खुशाल काढावेत. याबाबत दुमत नाही. पण अमेरिकेत अतिरेक झाला तो दुसऱ्या विषयाचा. भिन्नलिंगी, समलिंगी व्यक्तींस अन्यांइतकाच जगण्याचा अधिकार आहे आणि सर्वांस मिळणाऱ्या सेवांवर त्यांचाही तितकाच हक्क आहे, हे मान्य. त्यांना तो अधिकार मिळायलाच हवा आणि त्यासाठी अन्यांनी प्रयत्न करायला हवेत हेही मान्य. परंतु त्यांच्या या हक्कांचे पुरस्कर्ते त्याबाबत प्रचाराचा इतका अतिरेक करतात की भिन्नलिंगी लोकांस आपण समलिंगी नाही याबाबत गंड निर्माण व्हावा! पुरोगामित्वाचा अस्थानी अतिरेक हा प्रतिगामींस अधिक बळ देणारा असतो याचे मोठे उदाहरण भारताइतके अन्यत्र कोठेही नव्हते. या निवडणुकीने अमेरिकेस ते मिळाले. पुरोगामित्वाचा पुरस्कार करण्याआधी काहीएक किमान गरजा भागवण्याची हमी हवी. ती देण्यात हॅरिस नि:संशय कमी पडल्या. त्यामुळे हॅरिस यांचे पुरोगामित्व हेच सर्व समस्यांचे मूळ आहे हे ट्रम्प यांचे अतिरेकी कथानक अमेरिकी जनतेने सहज स्वीकारले. हॅरिस यांच्यावर ट्रम्प यांनी ‘अर्बन नक्षल’ असल्याचा आरोप केला नाही, इतकेच. बाकी सारे तेच आणि तसेच.

तीच बाब स्थलांतरितांविषयी. आज जगातील बहुसंख्य देशांस बेकायदा स्थलांतरितांची समस्या भेडसावत आहे. ती खरी नाही, असे म्हणणे हा आणखी एक अप्रामाणिकपणा. आपापल्या देशांत कमालीची हलाखी सहन करणारे हजारो अभागी जगण्यासाठी मायदेशाचा त्याग करतात आणि मिळेल तेथे आसरा घेऊ पाहतात. त्यात त्यांचा दोष नाही. तथापि त्यांना जेथे आसरा मिळतो तेथील समाजजीवनावर त्याचा अतोनात ताण येतो हे सत्य दुर्लक्षित करता येणारे नाही. या स्थलांतरितांकडे मानवतेच्या- आणि ते रास्तच आहे- दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांकडे या तणावावर उत्तर नाही. यांच्या हक्कांची भाषा बोलणारेही प्राधान्याने अभिजनवादी असतात. या स्थलांतरितांच्या प्रश्नावरच ‘ब्रेग्झिट’ घडते आणि त्यातूनच ट्रम्प यांच्यासारख्यांचा उदय होतो. अशा वेळी काही एक मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न हॅरिस यांनी करणे गरजेचे होते. सर्वसामान्य जनतेस आपल्या समस्यांचे खापर स्थलांतरितांसारख्या असहायांवर फोडणे आवडते. म्हणून तसे करणारे ट्रम्प यांच्यासारखे लोकप्रिय होतात. स्वत: अत्यंत आलिशान अभिजन आयुष्य जगणारे ट्रम्प यांच्यासारखे राजकारणी सामान्यांची भाषा बोलत जनसामान्यांना सहज भडकावू शकतात आणि हे त्यांचे भडकणे योग्य की अयोग्य या चर्चेत बुद्धिवंत मग्न राहतात. कमला हॅरिस यांचे असे झाले. निष्प्रभ, निष्क्रिय जो बायडेन यांच्या तुलनेत वाटेल त्या वल्गना करणारे अर्वाच्य ट्रम्प सामान्यांना जवळचे वाटले आणि सभ्य-सहिष्णू हॅरिस यांना मतदारांनी दूर लोटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा राजकीय बदल घडवू पाहणाऱ्यांनी आधी सामान्यांच्या अर्थकारणाचा विचार करावा आणि त्याप्रमाणे स्वत:चा राजकीय कार्यक्रम सादर करावा. जनसामान्यांसाठी त्यांच्या जगण्यातील आजची आव्हाने ही बुद्धिवंतांच्या चर्चेतील उद्याच्या समस्यांपेक्षा अधिक महत्त्वाची असतात. हे लक्षात घेतल्यास ट्रम्प यांच्यासारख्यांच्या निवडीमुळे अनर्थ झाला असे वाटत असले तरी या अनर्थामागील अर्थ समजून घेता येईल.