आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा अनेक क्षेत्रांत देशास एकेकाळी नेतृत्व देणारा महाराष्ट्र आज त्या पुतळ्याप्रमाणे किरकोळ वाऱ्यांत उन्मळून पडलेला दिसतो…

नव्या संसदेचे छत का गळते? नव्या मंदिरात पाणी का टपकते? नवा भुयारी मार्ग पाण्याखाली जातो कसा? याच मालिकेत नवा कोरा पुतळा पायांपासून उखडला जातोच कसा, असा प्रश्न विचारता येईल. हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या प्रांतातील घटनांसंदर्भात असले तरी त्या सगळ्यांचे उत्तर एकच एक आहे. ते ‘मी’, ‘माझ्या हस्ते’ आणि ‘माझ्या कारकीर्दीत’ या तीन ‘मीं’भोवती फिरते. गेले काही महिने वा वर्षांत जे जे ‘अपघात’ घडले त्यामागील कारणांचा विचार या ‘मी’कारांच्या अनुषंगाने केल्यास त्यातील तथ्यांश जाणवेल. जे काही करावयाचे ते माझ्या कारकीर्दीत आणि माझ्या हस्ते ही अलीकडच्या काळात अनेक सत्ताधीशांची विचारधारा. मग तो मुद्दा वस्तू-सेवा कराच्या अंमलबजावणीचा असो वा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उभारणीचा वा अटल सेतूचा वा संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वा राम मंदिराचा असो! देश हा कालातीत असतो आणि त्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली व्यक्ती कितीही देदीप्यमान, दैवी वगैरे असली तरी तिच्या कार्यकालास कालमर्यादा असतात. कोणताही मानव मर्त्य असतो आणि देश अनादी-अनंत. अशा वेळी आपल्या आधी कित्येक वर्षे आणि आपल्यानंतरही कित्येक वर्षे सुखासमाधानाने अस्तित्व टिकवून असलेल्या या देशाच्या कार्यकालावर आपली प्रतिमा निर्माण करण्याचा, छाप सोडण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या यशास मर्यादा आहेत. असतात. याचे भान सुटले की नव्या संसदेचे छत गळते, मंदिरात पाणी टपकते, नवा भुयारी मार्ग पाण्याखाली जातो आणि याच दुर्दैवी मालिकेत हिंदवी स्वराज्याचे पहिले, एकमेव संस्थापक क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला जातो. यातील अन्य सगळ्यांपेक्षा छत्रपती अधिक दुर्दैवी. ज्यांनी मुघल, आदिलशाही, निजामशाही अशी अनेक ‘शाही’ वादळे लीलया परतवली, त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अवघ्या ४५ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी पाडले, असे हा पुतळा उभारणारे म्हणतात. इतकेच नाही तर ज्या रयत शिक्षणास छत्रपतींनी प्राधान्य दिले त्या शिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणारे म्हणतात : वाईटातून काही चांगले होणार असेल म्हणून हा पुतळा अपघात घडला!

हेही वाचा : पुतळा प्रजासत्ताक

म्हणजे या शहाण्यांच्या मते चांगले काही व्हावे यासाठी छत्रपतींच्या पुतळ्यास पडणेच जणू आवश्यक होते. पण या युक्तिवादाने समाधान होणे नाही. कारण भारतीय जनता तितकी सुदैवी नाही. अलीकडच्या काळात वाईटानंतर काही चांगले होत नाही. अतिवाईट होते. म्हणजे सुश्री स्मृती इराणी विदुषी बऱ्या वाटाव्यात असे कंगना राणावत आल्यावर वाटते तसे. याच मालिकेतील आगामी धोका आपल्या शिक्षणमंत्रीमहोदयांनीच बोलून दाखवला. पडलेला पुतळा ३५ फुटी होता. त्याजागी आपण १०० फुटी पुतळा उभारूया असे हे महाशय म्हणतात. म्हणजे ३५ फुटांचे जे काही झाले त्याने यांचे समाधान झालेले नाही. खरे तर ज्यांनी कोणी मालवणचा पुतळा पाहिला असेल त्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असू नये हे ध्यानात आले असेल. महाराज समुद्राच्या वादळी वाऱ्यास अंगावर घेत उभे आहेत. अशी वादळे अंगावर घेणारी महाराजांसारखी छोट्या चणीची पण भव्य व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती कशी उभी राहील, त्यांच्या दोन पायांतील अंतर किती असेल, वाऱ्याने अंगावरील वस्त्रांच्या चुण्या कशा असतील आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावर एरवीपेक्षा अधिक करारी भाव कसे असतील इत्यादी काही विचार या कथित शिल्पकाराने केला असावा असे दिसले नाही. हा पुतळा त्यांनी म्हणे तीन आठवड्यांत उभारला. अलीकडेपर्यंत दहावीच्या परीक्षेसाठी अपेक्षित प्रश्नसंच दिले जात. त्यातील उत्तरे पाठ केली की कु. विद्यार्थी विद्वान असल्याचा भास यशस्वीपणे निर्माण होत असे. महाराजांच्या पुतळ्यास आडवे करणारा कथित शिल्पकारही बहुधा अपेक्षित प्रश्नसंचग्रस्त पिढीतलच असावा. कसलेच काहीही ज्ञान नाही; पण तरी सुशिक्षित आणि सुविद्या. या कथित शिल्पकाराची ही पिढी आणि या पिढीच्या परीक्षा घेणारे वाईटातून चांगले कसे होते हे सांगणारे शिक्षणमंत्री, असा हा समसमा संगम. तेव्हा पुतळा पडणे अपरिहार्यच.

पुतळे उभारणी आणि पायाभूत सोयीसुविधा ही अलीकडच्या सत्ताधीशांची हौस. पुतळ्यात महत्त्वाची फक्त उंची आणि पायाभूत सोयीसुविधांत महत्त्वाचा कंत्राटांचा आकार. या दोन्हीत ना सौंदर्यदृष्टी ना भविष्य कवेत घेण्याचा आवाका. याच देशात होऊन गेलेले आणि आता परकीय वाटतील असे जेआरडी टाटा म्हणत ‘‘ध्यास सर्वोत्कृष्टतेचा हवा. तुमची इच्छाच चांगल्या कामाची असेल तर हातून घडणारे काम ‘बरे’ या दर्जाचे असेल’’. जेआरडी मागच्या पिढीचे. म्हणून ते मनीषा ‘चांगली’ असे म्हणाले. आता ते असते तर या मंडळींचे लक्ष्यच ‘बरे’ काम करणे असे असते, हे ध्यानात येऊन जेआरडींस रस्त्यांवरच्या विवरांचा आणि कोसळत्या पुतळ्यांचा अर्थ गवसता. सौंदर्यदृष्टीचा अभाव हे आपले दिल्लीपासून मालवणपर्यंत दिसून येणारे वास्तव. काहीतरी करायचे, कंत्राटे द्यायची इतकेच काय ते उद्दिष्ट. पण आपले काहीतरी हे काहीतरीच आहे याची ना यांना जाणीव, ना ते समजून घेण्याची गरज. ती असती तर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे इतके सुंदर पुतळे आहेत की ते पाहून त्यांच्या जवळपास जाणारे काही उभे करावेसे यांस वाटले असते. प्रतापगड येथील वा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती पुतळ्यांच्या दर्शनानेही अभिमानाची भावना दाटून येते. त्या दोन्ही ठिकाणच्या छत्रपतींचे घोडे, त्यांच्या मांडीच्या टरारलेल्या शिरा सारेच शौर्यभावना जागे करणारे. त्या तुलनेत मालवण पुतळा! बरे ज्याने तो शिल्पिला त्यांस तितके काही लक्षात आले नसेल, तीन आठवड्यांत तो उभा करायचा होता वगैरे सबबी या संदर्भात असतीलही. पण ज्यांच्या हस्ते त्याचे अनावरण झाले त्यांना तरी आपण कोणाच्या ‘कशा’ पुतळ्याचे अनावरण करीत आहोत याची जाण नसावी? की आणखी एक कोनशिला आपल्या नावे लागली यातच त्यांना धन्यता! सगळा रस केवळ संख्येत. कंत्राटांच्या आणि कोनशिलांच्या!

हेही वाचा : अग्रलेख: सुधारणांची निवृत्ती!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा, कर्तृत्वाचा अपमान करणारे आहे. महाराज उणीपुरी ५० वर्षे जगले. पण सामान्यांस त्यांच्या आधी पाचशे वर्षांत जे जमले नाही, ते त्यांनी अवघ्या ५० वर्षांत करून दाखवले. महाराजांच्या जन्माआधी हा महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण दख्खन निश्चेष्ट होऊन पडली होती आणि माणसे आपणास पाठीचा कणा असतो हे विसरून गेलेली. या गतप्राण समाजात प्राण फुंकण्याचे आणि समग्र जनतेचा पाठीचा कणा सरळ करण्याचे अतुलनीय कार्य महाराजांनी केले. त्यांनी जे उभारले ते आजही तितकेच बुलंद आहे. पण त्यांच्या स्मरणार्थ उभे राहणारे हे असे पोकळ निघाले त्यास काय म्हणावे? एकेकाळी शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा देशाचे नेतृत्व करीत असे आणि शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीचा प्रारंभ असलेले पुणे ही देशाची जणू राजकीय राजधानी असे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा अनेक क्षेत्रात देशास एकेकाळी नेतृत्व देणारा महाराष्ट्र आज त्या पुतळ्याप्रमाणे किरकोळ वाऱ्यात उन्मळून पडलेला दिसतो. पुतळा पुन्हा त्वरेने- कदाचित विधानसभा निवडणुकांआधी- उभा राहीलही; पण महाराष्ट्राचे काय हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला पुतळा विचारत असेल. शक्यता ही की पुन्हा उभ्या राहणाऱ्या पुतळ्याखाली आणि स्वानंद चित्कारांत हा प्रश्नही गाडला जाईल!