खेळाच्या मैदानावर पंच नियामक असतो, हा नियम डिकी बर्ड कधीही विसरले नाहीत. खेळाडू प्रेक्षकांच्या नात्यात आपल्या नियमांचा गुंता नको हे भान त्यांनी कायम राखले.

हेरॉल्ड ‘डिकी’ बर्ड आज हयात असते नि क्रिकेटच्या मैदानावर सक्रिय पंचगिरी करते, तर त्यांनी परवा भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना परस्परांशी हस्तांदोलन करण्यास भाग पाडले असते. त्यांचा दरारा आणि त्यांच्याविषयीचे प्रेम आजही तितकेच असते, तर त्यांचा हा विनंतीवजा आदेश शिरसावंद्या मानून हस्तांदोलनाचे सोपस्कार पार पडलेही असते. किंबहुना, ‘डिकी बर्ड पंच आहेत’ या जाणिवेतून संबंधित नाट्यच घडले नसते. आज क्रिकेटच्या मैदानावर डिकी बर्ड नाहीत, आता तर ते हयातही नाहीत. जे कोणी सज्जन प्रस्तुत आशिया चषकात पंचगिरीसाठी उभे आहेत त्यांची नावेही बहुतांना ठाऊक नाहीत.

कदाचित लवकरच सदेह, सजीव पंचांची गरजही उरणार नाही. ती जबाबदारीही ‘एआय’कडे सरकवली जाईल. बिनचेहऱ्याचे, बिनकण्याचे, बिनमहत्त्वाचे पंच हे बदलत्या क्रिकेटचे वास्तव ठरू लागले आहे. हे सारे चित्र डिकी बर्ड यांच्यासमोर बदलत गेले. त्यामुळे ९२ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यातील उत्तरार्ध कदाचित त्यांच्यासाठी कष्टप्रद ठरला असू शकतो. त्यांनी ती उदास जाणीव कधी प्रकट मात्र केली नाही. जवळपास पाव शतकाचा आंतरराष्ट्रीय पंचगिरीचा त्यांचा पटच इतका खणखणीत, ठाशीव होता, ज्यापुढे पंचरूपी नियामकाचे विद्यामान परिप्रेक्ष्यातील अवमूल्यन त्यांनी कदाचित दुर्लक्षित केले असेल.

१९७०, १९८० आणि १९९० या दशकांमध्ये डिकी बर्ड पंच म्हणून उभे राहिले. या काळात त्यांना जी लोकप्रियता, रसिकप्रियता लाभली ती त्यांच्यापूर्वी किंवा नंतरही कोणा पंचाच्या वाट्याला आलेली दिसत नाही. डिकी बर्ड एकीकडे कडक शिस्तीचे हेडमास्तर होते. मैदानावर नियमांशी वेडेवाकडे चाळे केलेले त्यांनी खपवून घेतले नाहीत. मैदानात कुणी वेळकाढूपणा करत असेल, मैदानावर खेळाडूंना त्रास होईल अशा प्रकारे कुणी प्रेक्षागारात वागत असेल, फलंदाजांना दहशत बसावी याच हेतूने त्यांच्यावर शरीरवेधी गोलंदाजीचा मारा गोलंदाजांकडून होत असेल, दोन षटकांच्या मध्ये एखादा आळशी फलंदाज वारंवार पाणीबिणी मागत असेल, तर कान पिळायला बर्ड मास्तर सदैव तत्पर. पण हा त्यांचा एकमेव पैलू नव्हे.

क्रिकेटच्या किंवा कोणत्याही खेळाच्या मैदानावर पंचांची भूमिका ही नियामकाची असते, हा नियम डिकी बर्ड कधीही विसरले नाहीत. खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यातील नात्याच्या धाग्यात आपल्या नियमदंडेलीचा गुंता नको हे भान त्यांनी अखेरपर्यंत राखले. ते केवळ कर्तव्यकठोर असते, तर कदाचित रसिकप्रिय झाले असते पण खेळाडूंच्या मर्जीतून उतरले असते. तशी परिस्थिती अजिबातच नव्हती. हे नाते काय होते ते शब्दांत सांगण्यापेक्षा काही मासल्यांतून जाणून घेणे अधिक योग्य.

विक्रमवीर सुनील गावस्कर त्यांच्या तरुणपणी म्हणजे १९७४ मध्ये इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळत होते. वारा भरपूर होता, त्यामुळे गावस्करांच्या नजरेस त्यांच्याच केसांचा अडथळा होत होता! गावस्कर त्या सामन्यात पंच असलेले डिकी बर्ड यांच्याकडे गेले. बर्ड यांनी आपुलकीने खिशातून कात्री काढली आणि अडथळा आणणारे केस कापले. गावस्करांनी त्या डावात शतक झळकावले! त्यांच्या कठोर स्वभावामध्ये स्नेहाचा ओलावाही होता हे क्रिकेटपटू जाणून होते. त्यामुळे त्यांची फिरकीही घेतली जाई.

डेनिस लिली यांनी त्यांना आपला स्वेटर सोपवताना त्यात रबरी साप दडवला होता! अॅलन लॅम्ब एकदा ‘चुकून’ मैदानात तत्कालीन भलामोठा मोबाइल फोन खिशात घेऊन आले, मग तो रीतसर बर्ड यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यानंतर ड्रेसिंगरूममधून इयन बोथम वारंवार त्या क्रमांकावर फोन करत होते! एकदा पाकिस्तान-इंग्लंड सामना सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला नि मैदानावर पळापळ झाली. साठी ओलांडलेले डिकी बर्डही दुडुदुडु पळू लागले, त्या वेळी जावेद मियाँदाद यांनी त्यांना स्वत:च्या पाठीवरून पॅव्हेलियनपर्यंत नेण्याची प्रेमळ विनंती केली. बर्ड यांनी ती मान्यही केली.

पायचीत निर्णयाच्या बाबतीत बर्ड कमालीचे नियमनिष्ठ होते आणि सहसा फलंदाजाला बाद द्यायचेच नाहीत. फलंदाजाला शिवीगाळ करणाऱ्या तेज गोलंदाजांना काही वेळा खडे बोल सुनवायचे. तरीही बहुतेक तेज गोलंदाजांशी त्यांचे संबंध सलोख्याचेच होते. कारण कधी दोन चेंडूंमध्ये, कधी दोन षटकांदरम्यान खेळाडूंशी संवाद साधणे ही त्यांची आणखी एक खुबी होती. त्यामुळे खेळाडू आणि त्यांच्यात एक नाते निर्माण झाले. हे नाते, हा स्नेह सध्याच्या यशोभिमुख युगात लुप्त होत आहे. क्रिकेट हा खेळ फुटबॉलपेक्षा वेगळा मानला जाई, कारण यात खिलाडूवृत्तीला (स्पिरिट ऑफ क्रिकेट) अनन्यसाधारण स्थान कधी काळी होते. हे ‘स्पिरिट’ जपणाऱ्या जागल्यांमध्ये डिकी बर्ड हे नाव अग्रस्थानी घ्यावे लागते.

त्यांचे जाणे आणखीही एका बाबतीत खंतावणारे ठरते. कोणाचा कोणास पायपोस न राहिलेल्या या जगामध्ये ‘नियामक’ ही संस्थाच नामशेष ठरू लागल्याचे वास्तव डिकी बर्ड यांच्या नसण्याने अधिकच गहिरे ठरते. ज्या दिवशी ते गेले, त्याच दरम्यान तिकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच संघटनेबद्दल अगाध ज्ञानमूलक मुक्ताफळे उधळली. संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्रांचा मानवी हक्क आयोग अशा सर्व आंतरराष्ट्रीय नियामकांविषयी ट्रम्प यांना तिटकारा आहे. हा तिटकारा त्यांच्यापुरता सीमित नाही, तर व्यापक प्रमाणात झिरपत चालला आहे हा खरा धोका.

आपल्याकडेही घटनात्मक नियामक संस्थांविषयी सार्वत्रिक तुच्छता वाढीस लागली आहे हा योगायोग नाही. काही बाबतीत अशी तुच्छता मूळ नियामकच कणाहीन आणि सत्ताधीश-मिंधे झाल्यामुळेही प्रकट होते. ट्रम्पसारख्या सत्ताधीशांना नियामक हवेत, पण त्यांची मर्जी नि हितसंबंध सांभाळणारे. यातून मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. नियामकाचे काम नियमनाचे, ट्रम्पसारख्यांना रस असतो तो नियंत्रणामध्ये. आज असे ‘ट्रम्प’ केवळ अमेरिकेत नाही, तर आजूबाजूला समाजात विविध स्तरांमध्ये फोफावू लागले आहेत.

सामाजिक, जागतिक घडी विस्कटू लागली आहे याचे मूळ कारण हेच. स्वत:पलीकडे पाहण्याची सवय नाही नि गरजही नाही अशा मानसिकतेच्या मंडळींकडे नियामकाच्या दोऱ्या नि तिजोऱ्या आल्या आहेत. यातून एक वर्ग शिरजोर नि बाकीचे कमजोर होणारच. डिकी बर्ड हे क्रिकेटच्या मैदानावरील अस्सल नि जुन्या पिढीतले नियामक होते. ते कधी नियंत्रणाच्या भानगडीत पडले नाहीत. ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’चे भान खेळाडू राखतात की नाही हे तपासण्यासाठी प्रथम नियामकांना ते आकळले पाहिजे हे त्यांनी संधी मिळेल त्या व्यासपीठावर आग्रहाने मांडले.

या नियमनाची मांड ब्रिटिश मूल्यव्यवस्थेने पक्की केली होती आणि तिचा आदर आधीच्या पिढीतल्या, खऱ्याखुऱ्या ‘जण्टलमेन’ मानल्या गेलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनी सर्वाधिक राखला हेही नमूद केले पाहिजे. त्यामुळेच भारतीय क्रिकेटपटूंना बर्ड यांच्या हृदयात विशेष स्थान होते. या पार्श्वभूमीवर आजच्या बहिष्कारप्रेमी भारतीय क्रिकेटपटूंना त्यांनी अधिकारवाणीने काही ऐकवताना ‘त्या’ क्रिकेटपटूंचा दाखला दिला असता.

आज डिकी बर्ड आपल्यात नाहीत, सध्याच्या मानसिकतेत तर त्यांच्या ‘स्पिरिट’चा मुद्दाही गौण, गैरलागू ठरतो. हस्तांदोलन हे नियमात कुठे दाखवलेले नाही असे सांगून एक संघ त्यास नकार देतो, समोरचा संघ पुढे त्याचाच कित्ता गिरवतो. हे थांबवण्याची इच्छा, क्षमता असलेले नियामक तर दिसतही नाहीत. आज फक्त क्रिकेटच्याच नव्हे, तर जगण्याच्या सर्वच मैदानांवरचा खिलाडूपणा हरवत चालला आहे. हे सगळीकडच्या हेडमास्तरांचे हरपणे सर्व खेळ विस्कटून टाकणारे आहे. डिकी बर्ड यांचे निधन हे त्याचे प्रतीक. या खिलाडू नियामकास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे श्रद्धांजली.