ज्या सहजतेने रशियाच्या हद्दीत कित्येक किलोमीटर आत युक्रेनच्या फौजा जाऊ शकल्या, ते पाहता अशा आणखीही कारवाया घडू शकतात…
एखाद्या युरोपीय देशाने दुसऱ्या युरोपीय देशावर हल्ला करण्याची दुसऱ्या महायुद्धानंतरची पहिली घटना २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली. त्या दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी त्या देशाने शेजारील युक्रेनमध्ये फौजा धाडल्या. त्याच रशियावर आता नाझी आक्रमणानंतर प्रथमच युक्रेनच्या रूपात एखाद्या देशाने हल्ला केला आहे. युक्रेनचा हा हल्ला खऱ्या अर्थाने ‘बचावात्मक प्रतिहल्ला’ आहे. वास्तविक याच स्वरूपाचा दावा पुतिन यांनी रशियन हल्ल्याच्या समर्थनार्थ केला होता. त्यांच्या दृष्टीने युक्रेनच्या आग्नेयेकडील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क हे रशियाचेच भूभाग आहेत आणि युक्रेनच्या समावेशातून ‘नाटो’ देशांचा विस्तार रोखण्यासाठी बचावात्मक कारवाई आवश्यक होती. त्या वेळी या कारवाईचे समर्थन कोणत्याही लोकशाहीप्रेमी देशाने केले नव्हते. पण युक्रेनच्या बाबतीत मात्र असे घडणार नाही. बहुतेक देश ताज्या युक्रेनी प्रतिहल्ल्याचे समर्थनच करतील. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नाझी भस्मासुराला रोखायचे कसे यावर दोस्तराष्ट्रांमध्ये खल सुरू होता. त्या वेळी ‘आपणही नाझी जर्मनीवर हल्ले करावे’ या व्यूहरचनेवर कालौघात मतैक्य झाले आणि नाझी विस्तारवाद रोखण्याच्या प्रयत्नांना निर्णायक कलाटणी मिळाली. परंतु त्या वेळी दोस्तराष्ट्रांची एक फळी होती आणि त्यांची एकत्रित ताकद जर्मनीपेक्षा अधिक होती. युक्रेनच्या बाबतीत तशी परिस्थिती नाही. युक्रेनच्या तिप्पट-चौपट सैन्य आणि सामग्री रशियाकडे आहे. तरीदेखील थेट रशियाच्या हद्दीत घुसून तेथील भूभाग ताब्याखाली आणण्याचे धोरण युक्रेनने गेल्या आठवड्यात अंगीकारले. त्या देशाचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या धैर्याला याबद्दल दाद द्यावी लागेल. युक्रेनच्या या अनपेक्षित हल्ल्याविषयी रशियन फौजा, पुतिन सरकार आणि रशियाच्या सुपरिचित गुप्तहेर यंत्रणेला कोणतीही खबर नसावी हे युक्रेनचे पहिले यश. सहा ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या कारवाईला थोपवणे रशियाला अजूनही शक्य झालेले नाही. उलट ज्या ठिकाणी युक्रेनचा हल्ला झाला, त्या आणि आजूबाजूच्या प्रदेशांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी रशियन प्रशासनाची धावपळ सुरू आहे. किमान दोन प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर झाली. हे युक्रेनचे दुसरे यश. पण ही यशोमालिका आणखी किती किलोमीटर आणि किती दिवस सुरू राहणार, यावर कदाचित युद्धाची आगामी दिशाही ठरू शकेल.
या प्रतिहल्ल्याचे वर्णन शूर, धाडसी, देदीप्यमान वगैरे बिरुदांनी होत असले, तरी तो प्रत्यक्षात अगतिकतेतून झालेला आहे हे वास्तव विस्मरणात जाऊ नये. युक्रेनचा १८ टक्के भूभाग सध्या रशियन आक्रमकांनी व्यापला आहे. यात दहा वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेल्या क्रायमिया प्रांताचाही समावेश आहे. क्रायमियाचा घास रशियाने विनासायास घेतला, त्या वेळी युक्रेनचे मित्र म्हणवणारे पाश्चिमात्य देश बहुतांश गप्पच बसले. अमेरिकेने फार तर रशियावर निर्बंध लादले आणि निषेध व्यक्त केला. या अनास्थेतून बोध घेऊन, दुसऱ्यांदा रशियाचे आक्रमण झाले त्या वेळी मात्र युक्रेन पाश्चिमात्य मित्रांच्या साहाय्यासाठी वाट बघत बसला नाही. झेलेन्स्की यांनी रशियाला कडवा प्रतिकार केला. दोन्ही देशांतील सैनिकी संख्याबळाची तफावत पाहता युक्रेन फार तर सहा महिने टिकाव धरू शकेल असाच बहुतेक विश्लेषकांचा होरा होता. तसे काही घडले नाही. युक्रेनने चिवट प्रतिकार केला आणि अद्यापही करतो आहे. बराचसा स्वत:च्या हिकमतीवर आणि काही प्रमाणात अमेरिकादी पाश्चिमात्य मित्रांच्या मदतीवर. परंतु हा आवेश किती काळ टिकेल यास मर्यादा आहेत. अनेकविध निर्बंध लादले गेले आणि या युद्धात अपरिमित हानी झाली तरी रशियाची अर्थव्यवस्था आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. कारण रशियाचा अनेक देशांशी व्यापार सुरू आहे. भारत हा रशियन खनिज तेलाचा सर्वांत मोठा खरेदीदार आहेच. त्याहीपेक्षा चीन, उत्तर कोरिया आणि इराणकडून दारूगोळा आणि इतर सामग्री रशियाला मिळत आहे. शिवाय युद्धातील मनुष्यहानीविषयी या देशाने नेहमीच ऐतिहासिक असंवेदनशीलता आणि अनास्था दाखवलेली आहे. त्यामुळे असल्या युद्धांमध्ये रक्तबंबाळ होऊन शस्त्रे खाली ठेवण्याची या देशाची परंपरा नाही.
युक्रेनचे तसे नाही. दररोज या देशामध्ये मनुष्यहानीचा – रणांगणावर आणि शहरांमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमुळे – हिशेब मांडावा लागतो. युक्रेनची अर्थव्यवस्था डबघाईला गेलेली असून, पाश्चिमात्य देशांच्या मदतीवर तगून आहे. त्यात पुन्हा अमेरिकेसारख्या देशामध्ये सत्तांतर झाल्यास आणि ‘त्यांचे त्यांनी बघून घ्यावे, आम्ही मदतीस बांधील नाही’ या विचारांचे डोनाल्ड ट्रम्प महोदय अध्यक्षपदी विराजमान झाल्यास तेथून मदतीचा ओघ थांबणार हे नक्की. युरोपमध्येही काही देशांत पुतिन समर्थक सरकारे आहेत आणि युरोपीय समुदाय किंवा नाटो या संघटनांच्या छत्राखाली राहूनही युक्रेनला मदत पुरवण्याबाबत ही सरकारे नाराजी व्यक्त करतात. युक्रेनला अधिक विध्वंसक आणि लांब पल्ल्याची शस्त्रास्त्रे देण्याची इच्छा असूनही अमेरिका किंवा जर्मनीला ती देता येत नाहीत. कारण यास या दोन्ही देशांचा युद्धातील थेट सहभाग मानून अधिक तीव्रतेने हल्ले करण्याची किंवा युद्धाची व्याप्ती वाढवण्याची धमकी पुतिन यांनी पूर्वीच दिली आहे. अशा वेळी ‘जैसे थे’ परिस्थतीत लढत राहणे इतकेच झेलेन्स्की यांच्याहाती उरते. पण ‘जैसे थे’ म्हणजे युक्रेनसाठी धिम्या मृत्यूस सामोरे जाण्यासारखे. तेव्हा काही करणे आवश्यक होते.
यातूनच युक्रेनच्या ईशान्येकडील कुर्स्क या रशियन प्रांतामध्ये शिरण्याची योजना आकारास आली. कुर्स्क प्रांतामध्ये जवळपास एक हजार चौरस किलोमीटरचा भूभाग युक्रेनच्या ताब्यात आल्याचा दावा त्या देशाचे लष्करी कमांडर करत आहेत. रशियाने त्या भागातून ७६ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याविषयी पुतिन केवळ चरफड व्यक्त करत आहेत आणि युक्रेनच्या पाश्चिमात्य मित्रदेशांवर आगपाखड करत आहेत. म्हणजे या हल्ल्यामुळे तेही चकित झाले हे उघड आहे. हल्ल्यामागे युक्रेनचे दोन हेतू असल्याचे बोलले जाते. युक्रेनच्या पूर्वेस रशियाच्या सैन्याची जमवाजमव मोठी आहे. तेथून काही फौजा कुर्क्सच्या रक्षणासाठी पाठवल्या जातील आणि रशियाचा डॉनेत्स्कसारख्या प्रांतांमधील दबाव कमी होईल, हा पहिला हेतू. कुर्स्कमध्ये रशियाचे अनेक सैनिक व नागरिक युक्रेनच्या ताब्यात आले आहेत. त्यांना ओलीस ठेवून रशियाशी युक्रेनच्या युद्धकैद्यांच्या मुक्ततेविषयी वाटाघाटी आरंभणे हा दुसरा हेतू. याशिवाय कुर्स्कला लागून असलेल्या सीमेवर एक प्रकारे ‘बफर’ क्षेत्र निर्माण करणे हाही एक दीर्घकालीन हेतू. याचा दृश्य परिणाम म्हणजे रशियाने डॉनेत्स्कमधून कुर्स्ककडे काही कुमक रवाना करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, युक्रेनला अपेक्षित आहे त्यानुसार डॉनेत्स्कमधील रशियाची फळी अद्याप कमकुवत वगैरे झालेली नाही. तरीही कुर्स्क हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा रशियाचे युद्धनैपुण्य आणि युद्धसिद्धतेतल्या मर्यादा उघड झाल्या. ज्या सहजतेने रशियाच्या हद्दीत कित्येक किलोमीटर आत युक्रेनच्या फौजा जाऊ शकल्या, ते पाहता युक्रेन आणखी काही आघाड्यांवर अशा कारवाया करू शकतो.
आज हे युद्ध युक्रेनने अनपेक्षितपणे रशियन भूमीवर वळवले आहे. या परिस्थितीत सुरुवातीस बावचळलेला रशिया सावरल्यानंतर काय करतो, यावर पुढील युद्धाची दिशा ठरू शकते. शत्रू आपल्याही भूमीत धडकू शकतो ही जाणीव इतर कोणत्याही देशाप्रमाणे रशियालाही अस्वस्थ करणारी ठरणार. या हल्ल्याद्वारे युक्रेनने त्याच्या मित्रदेशांनाही संदेश दिला आहे. आमच्याकडे क्षमता नसूनही इच्छाशक्ती आहे. तुमच्याकडे क्षमता आहे, तर इच्छाशक्तीही दाखवावी हा तो संदेश. यातून संबंधित देश काय बोध घेतील तो घेतील. पण युक्रेनचा इरादा स्पष्ट आहे. त्यामुळेच शत्रू अशक्त नाही, तो आपल्यापेक्षा बलवान आहे, हे दिसत असूनही ‘घर में घुसके मारेंगे’ ही रणनीती स्वच्छपणे कृतीत उतरवणाऱ्या युक्रेनची दखल क्रमप्राप्त.