विद्यार्थी समाजमाध्यमे आणि ‘एआय’मध्ये गुंतलेले, कनिष्ठ महाविद्यालयांपुढे अनेक प्रश्न अशात बारावीचा निकाल घटणे हे सुचिन्ह मानता येणार नाही…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालात गुणवत्ता यादी देणे बंद झाले त्याला आता काही वर्षे उलटून गेली. अनावश्यक स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ताणाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, या उद्देशाने हे केले गेले. तरीही या दोन्ही परीक्षा आणि निकाल यांची ‘हवा’ कमी झाली, असे झालेले नाही. हे; मंत्री लाल दिव्याच्या गाड्यांतून यापुढे हिंडणार नाहीत, या घोषणेसारखे झाले. लाल दिवा गेला; पण बाकीचा झोक तसाच. तसेच बारावी गुणवत्ता यादीचे. दहावीनंतर पुढील करिअरच्या दृष्टीने करावी लागणारी शाखानिवड आणि आता बारावीनंतरच्याही अनेक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आवश्यक ठरत असलेले बारावीचे गुण, यामुळे दोन्ही परीक्षा आणि त्यांचे निकाल विद्यार्थी आणि पालकांसाठी आपापले महत्त्व अद्याप राखून आहेत. यंदा बारावीचा निकाल जाहीर झाला आणि तो गेल्या वर्षीपेक्षा घटल्याचे दिसले. त्यामुळे त्याची आणखी चर्चा होणार, हे ओघाने आलेच. एकूण निकाल दीड टक्क्याने घटताना, कला शाखेचा निकाल तब्बल पाच टक्क्यांनी घटला, ही त्यातील ठळक बाब. बारावीनंतरच्या ज्या पदवी अभ्यासक्रमांना अलीकडे बारावीचे गुण आवश्यक ठरू लागले आहेत, त्यात बरेचसे कला शाखेचे अभ्यासक्रम आहेत. विशेषत: अनेक प्रतिष्ठित स्वायत्त महाविद्यालयांत देशभरातून विद्यार्थी येत असल्याने बारावीचे गुण हा प्रवेशासाठी महत्त्वाचा निकष ठरू लागला आहे. त्यामुळे बारावीच्या एकूण निकालात आणि त्यातही कला शाखेच्या निकालात मोठी घट झालेली असल्याने याच्या कारणांचा ऊहापोह होणे आवश्यक.

यंदा बारावीचा एकूण निकाल घटण्यात राज्य शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाचा मोठा वाटा असल्याचा निष्कर्ष काढण्यास वाव आहे. मंडळाने यंदा अनेक उपाययोजना करून कॉपी रोखण्यासाठी पावले उचलली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. कॉपी होण्याची शक्यता असलेल्या केंद्रांवर विशेष खबरदारी घेऊन ज्या शाळेत परीक्षा केंद्र असेल, तेथे शक्यतो इतर शाळांतील शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नेमले गेले. भरारी पथकांच्या अकस्मात भेटींची संख्याही यंदा वाढवण्यात आली. यामुळे कॉपीला आळा बसल्याचे दिसले आणि कॉपी होऊ शकणारी आणखीही केंद्रे शोधून काढली जाऊ शकली. अशा केंद्रांची मान्यता रद्द करण्याची कारवाई यामुळे शक्य होणार आहे. याचा परिणाम कॉपी कमी होण्याखेरीज निकालावरही दिसतो आहे.

पण एवढ्यावर निकालाचे विश्लेषण पूर्ण होत नाही. कारण, ८०-९० टक्के वा त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्यांची संख्याही निकालासारखीच खूप घटली आहे, असे झालेले नाही. एकूण उत्तीर्णांच्या तुलनेत त्यांचा ‘टक्का’ अजूनही टिकून आहे. मात्र त्या परिघाबाहेर असलेले बहुसंख्य अभ्यासात का मागे पडत आहेत, विशेषत: कला शाखेच्या अध्ययन-अध्यापन पद्धतीत काही बदल आवश्यक आहेत का, समाजमाध्यमांमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष उडाले आहे का, कृत्रिम प्रज्ञेसारख्या साधनांचा वापर स्व-अभ्यास करण्यापासून मुलांना परावृत्त करतो आहे का, एकूणच करिअर/ पुढील वाटचाल याचा ताणही अभ्यासावर जाणवतो आहे का हे प्रश्न विश्लेषणासाठी महत्त्वाचे ठरतात.

कोविडकाळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन वर्ग भरत होते. त्याचे अनेक दुष्परिणाम नंतरच्या वर्षांत दिसले. परीक्षांच्या बाबतीतील एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांची एकूणच दीर्घ लिखाणाची सवय तुटली. परीक्षा बहुपर्यायी उत्तरांच्या असल्याने उत्तरासाठी एक पर्याय निवडून भागू लागले. वर्णनात्मक उत्तरे लिहिणे, निबंधासारख्या प्रश्नात स्वत:चा विचार मांडणे, उतारे वाचून त्यावरील प्रश्न लिहिताना आवश्यक असलेले आकलन आदींचा सरावच या काळात जवळपास बंद झाला. यंदा ज्यांनी बारावीची परीक्षा दिली, ते सगळे कोविडकाळात सातवी-आठवी इयत्तांत होते, जेव्हा अशा दीर्घोत्तरी प्रश्नांचा अधिक सराव सुरू होतो. पुढे दहावीला अजूनही असलेला पाठांतरावर भर आणि अकरावीला विश्रांती वर्ष मानले गेल्याने या सरावाची उजळणी- विशेषत: कला शाखेच्या विद्यार्थ्यांत कमी पडते, हे निकालावरून दिसते. गेल्या चार वर्षांत कला शाखेचा निकाल क्रमाक्रमाने घसरून, चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी कमी झाला, हा त्याचाच परिपाक.

याउलट गेल्या चार वर्षांत विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या निकालात फार मोठी वाढ-घट नोंदवली गेलेली नाही. विज्ञान शाखेचे बरेचसे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांवर अधिक भर देत असले, तरी त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना बारावीच्या किमान गुणांचा निकष अजूनही असल्याने तेथे अनुत्तीर्णतेचे प्रमाण वाढल्याचे दिसत नाही. असे असले तरी विज्ञान विषय समजून घेऊन उत्तरे लिहिली जात नाहीत, असे शिक्षकांचे निरीक्षण आहेच. वाणिज्य शाखेतही सीए, सीएस वा तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तयारीची सुरुवात अकरावीतच होत असल्याने प्रत्यक्षात वाणिज्य शाखेच्या अकरावी-बारावीला किती महत्त्व दिले जात आहे, हा संशोधनाचाच विषय ठरावा. याला अध्यापन, अध्ययन आणि अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत अध्यापकांच्या असलेल्या अनेक रिक्त जागा असेही पैलू आहेत. घोकंपट्टी, पाठांतर आणि आकलन यांतील फरकापासून ते ‘शिकायचे कशासाठी?’ या मूलभूत प्रश्नापर्यंत या पैलूंचा पल्ला जातो.

करोनाकाळाने विद्यार्थ्यांचे आणखी एका पातळीवर खूप मोठे नुकसान केले, ते म्हणजे खूप लहान वयात त्यांच्या हातात स्मार्टफोन खेळू लागले. ऑनलाइन शाळेची गरज म्हणून हाती आलेल्या स्मार्टफोनच्या वापराला करोनापश्चातही पालक आणि शिक्षक मर्यादा घालू शकलेले नाहीत, ही वस्तुस्थिती स्वीकारलेली बरी. यातही मुलींपेक्षा मुलगे अधिक याच्या आहारी गेल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण असून, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारलेली बाजी याला पुष्टी देणारी ठरते. स्मार्टफोनमुळे जगण्याचा भाग झालेली समाजमाध्यमे आणि कोणत्याही समस्येला ‘तयार’ उत्तरे पुरवणारी साधने ही विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचाही भाग झाली आहेत. आयुष्यातील प्रश्नापासून परीक्षेतील प्रश्नापर्यंतची सगळी उत्तरे तेथेच शोधायची असतात, ही सवय मुलांना स्वतंत्र विचार करूच देत नाही. याचा परिणाम अभ्यासक्रमातील संकल्पनांच्या आकलनापासून परीक्षेत लिहायच्या दीर्घ उत्तरांच्या विस्तारापर्यंत सर्वत्र दिसतो. त्यात अलीकडे तर कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) वापराने कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत प्रकल्प, चाचण्या, प्रयोगवह्या लिहिण्याचे कष्ट अशा अनेक गोष्टी अगदीच सोप्या करून टाकल्या आहेत. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, तरी विद्यार्थ्यांची मजल एकापेक्षा अधिक ‘एआय’ साधनांचा वापर करून त्याचा लसावि असलेला मजकूर तयार करण्यापर्यंत गेलेली असल्याने अंतर्गत मूल्यमापनावेळी ही ‘कॉपी’ पकडणेही अनेकदा मुश्कील.

या सगळ्याकडे तटस्थपणे पाहता पुन:पुन्हा असे लक्षात येते, की या सर्व प्रचंड बदलांतही मूल्यमापनाची वर्षानुवर्षे बसलेली घडी जोवर बदलत नाही, तोवर निकालांची कितीही चर्चा केली, तरी ती उपयोगी पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या, संकल्पनांच्या आकलनाच्या ‘परीक्षे’साठी ‘ओपन बुक टेस्ट’पासून अनेक नवी तंत्रे सारे जग वापरत असताना आपण अजूनही प्रश्नोत्तरांच्या पारंपरिक परीक्षा पद्धतीत अडकलो आहोत. त्याचे एक कारण दहावी-बारावीच्या परीक्षांनंतर होणारे विविध शाखांतील प्रवेश आणि त्यासाठी एक समान ग्राह्यता म्हणून आवश्यक असलेले या परीक्षांतील गुण, हे असले तरी ते पुढे करून दर वेळी यातून पळ काढणे बरोबर नाही. एकदा प्रवेशांची पद्धतही आमूलाग्र बदलण्याचे धाडस करायला हवे. नपेक्षा आता केवळ बारावीचेच बारा वाजलेले दिसतात. ती स्थिती सगळ्या शिक्षण व्यवस्थेचीच होण्याचा क्षण वाटतो तितका दूर नाही.