“मी विविक. सुनील गावस्कर घरात असतील तर त्यांना नमस्कार सांगा, नसतील तर आल्यावर सांगा” हे मनोहर गावस्कर यांस सांगून फोन ठेवून दिल्यावर तत्क्षणी सुनील गावस्कर यांना स्वत: उलटा फोन करावा लागेल इतका अधिकार ज्यांचा होता ते वि. वि. करमरकर गेले. ‘विविक’ यांचे मोठेपण अधोरेखित करण्यासाठी सुनील गावस्कर यांचे हे उदाहरण येथे दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तर-ऐंशीच्या दशकात सुनील गावस्कर यांचे महत्त्व कालच्या सचिन तेंडुलकरपेक्षा दहा पट अधिक होते. त्यावेळची वदंता (की सत्य?) अशी की गावस्कर हे पत्रकारांशी बोलण्यासाठीदेखील मोल आकारीत. कारण माझ्यामुळे तुमचे वृत्तमूल्य वाढते, असे त्यांचे (रास्त) मत. अशा काळात गावस्कर यांच्याशी संवाद साधणे अमेरिकी अध्यक्षास फोनवर बोलावण्याइतके दुष्प्राप्य होते. त्या काळात गावस्कर यांस उलट फोन करायला लागावा इतकी विविक यांच्या लेखणीत ताकद होती.

ज्या काळात इंटरनेट जन्मालाही आलेले नव्हते, क्रीडा सामन्यांचे रतीब दिवसरात्र दूरचित्रवाणीवर घातले जात नव्हते, क्रीडा क्षेत्राचे थिल्लरीकरण व्हायचे होते आणि मुख्य म्हणजे “खेळाकडे फक्त खेळाच्या नजरेतून पहा” असा बिनडोकी समज दृढ असलेला स्वांतसुखी मध्यमवर्ग उदयास यावयाचा होता त्या काळात विविक मराठी जनांस मैदानावरचे आणि मैदानाबाहेरचेही क्रीडा-भारत उलगडून दाखवत. म्हणून ज्येष्ठ क्रीडापत्रकार इतकीच उपाधी विविक यांची उंची कमी करते. आणि दुसरे असे की तसे केल्याने; जे क्रीडा मैदानात घडते ते आणि तितकेच मांडण्याची कुवत असणाऱ्या सध्याच्या क्रीडापत्रकारांची उंची उगाचच वाढते. म्हणून विविक हे कोण होते हे समजून घेण्यासाठी त्यांस ‘क्रीडा पत्रकार’ या दोन अक्षरी महिरपीबाहेर काढणे आवश्यक. याचे कारण असे की आशिष नंदी या समाजाभ्यासकाने ‘ताओ ऑफ क्रिकेट’ हा निबंध लिहिण्याच्या कित्येक वर्षे आधी विविक यांनी खेळास मैदानातून बाहेर काढून व्यापक सामाजिकतेशी जोडून दाखवले होते.

खेळ हे समाजपुरुषाचे केवळ एक अंग. ज्याप्रमाणे केवळ एखाद्या अवयवावरून व्यक्तीच्या आरोग्याचा अर्थ लावणे धोक्याचे असते त्याचप्रमाणे खेळाकडे केवळ खेळ म्हणून पाहणे अयोग्य असते. विविक यांच्या ठायी ही जाणीव तीव्र होती. याचे कारण ते पोटापाण्याचा उद्योग म्हणून फक्त खेळ पत्रकारितेकडे पाहात नसत. आधी ते उत्तम पत्रकार होते. खेळ पत्रकारिता हे त्यांचे विशेष गुणवत्ताक्षेत्र. स्पेशलायझेशन. ज्या प्रमाणे हृदरोग वा मेंदुविकारतज्ज्ञ आधी उत्तम वैद्यक असावा लागतो; त्याचे विशेष गुणवत्ताक्षेत्र नंतर. तसेच हे. मुदलात वैद्यकच जर सुमार बुद्धीचा असेल तर त्यातून ज्याप्रमाणे विशेष गुणवत्ताधारी उगवू शकत नाही, त्याप्रमाणे सुमार पत्रकारांतून उत्तम क्रीडा पत्रकारही निपजू शकत नाही. विविक यांचे मोठेपण हे आहे.

समाजकारण, अर्थकारण आणि मुख्य म्हणजे राजकारण अशा सर्वच विषयांत विविक यांना रुची होती आणि गतीही होती. या सगळ्या व्यामिश्रतेतून विविक यांची क्रीडा चिकित्सक बुद्धी विकसित झाली. गोविंदराव तळवलकर हे ज्याप्रमाणे राजकीय/सामाजिक/आंतरराष्ट्रीय विषयांवरील विश्लेषक लेखनाचे मापदंड होते, त्याप्रमाणे विविक हे क्रीडा विश्लेषणात महाराष्ट्रातील सर्वोच्च मानदंड होते. खरे तर क्रीडा लेखनातील ‘तळवलकर’ हे विविक यांचे वर्णन यथार्थ ठरावे. तसे ते तेव्हाही केले गेले. पण तेव्हाही त्यांना ते आवडले नव्हते. याचे कारण कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीप्रमाणे विविक स्वतंत्र विचारांचे होते आणि अशा काही स्वतंत्र विचारींप्रमाणे त्यांचे गोविंदरावांशी मतभेद होते. पण गोविंदरावांशी वैचारिक दोन हात करण्याइतकी बौद्धिकता क्रीडा पत्रकाराच्या ठायी होती हेच खरे तर अप्रुप. त्यामुळे गोविंदराव ज्यांच्या नादी फारसे लागले नाहीत त्यातील एक विविक होते.

मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचं निधन

विविक यांचे—आणि अर्थातच गोविंदरावांचेही—सुदैव असे की तळवलकरांस क्रीडाक्षेत्रात फार गती आणि रुची नव्हती. पण त्यामुळे महाराष्ट्र क्रीडा मैदानाबाहेरच्या उभयतांतील वैचारिक चकमकींस मुकला. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’च्या पहिल्या पर्वातील ते परीक्षक समितीमध्ये ते होते. त्यावेळी निव्वळ प्रज्ञावंतांची निवड करण्याबरोबरच भविष्यातही अशांच्या वाटचालीचा पाठपुरावा करत राहिला पाहिजे, अशा मौलिक सूचना त्यांच्या विलक्षण चिकित्सक आणि अभ्यासू वृत्तीची साक्ष पटवणाऱ्या ठरल्या होत्या. विविक पत्रकारिता करीत त्या काळी भारतीय क्रीडा क्षेत्र हे क्रिकेटने व्यापलेले होते. फुटबॉल विश्वचषकापुरता मर्यादित होता, ऑलिंपिकला महत्त्व होते, बॅडमिंटनच्या क्षेत्रात एखादा प्रकाश पदुकोण निपजत होता आणि टेनिस हे फार फार तर विंबल्डनपुरते मर्यादित होते. विविक यांचा संचार सर्व क्रीडाक्षेत्रांत होता. ज्या सहजपणे ते भारतीय खेळाडूंचे गुणदोष विश्लेषित करत त्याच अधिकारीवाणीने ते परदेशी खेळाडूंचे गुणदोषही दाखवीत. त्यामुळे त्यांच्यासमोर एखाद्याने एखाद्या खेळाडूचे अतिकौतुक केले की केळ्याची साल सोलावी तितक्या सहजपणे विविक त्या खेळाडूस आणि त्याच्या प्रेमात वाहून गेलेल्याच्या भावना सोलत. आणि हे करताना त्यांची भाषा, शरीरभाषा इतकी मुलायम असे की समोरच्यास वेदनांची जाणीवही होत नसे. त्या अर्थाने विविकंचे वागणे-बोलणे आदर्श इंग्लिश अभिजनी होते. अत्यंत कटु युक्तिवाद करतानाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माधुर्याने त्यांना कधी दगा दिला नाही. त्यामुळे विविकंकडून कोणाचेही वाहून जाणारे कौतुक असंभव असे.

अमुकतमुक क्रीडा प्रकार म्हणजे आपला धर्म आणि अमुकतमुक म्हणजे देव असला वावदुकपणा विविकंनी कधीही केला नाही. कारण तर्क विचारास कधीही सोडचिठ्ठी न देण्याचा बुद्धिनिष्ठ पत्रकारांस आवश्यक गुण त्यांच्याठायी मुबलक होता. परदेशी क्रीडाप्रकारांच्या जोडीने विविक भारतीय खेळांच्या प्रचारासाठी अथक प्रयत्न करीत. कबड्डी, खो-खो या भारतीय…आणि त्यातही मराठी…खेळांसाठी त्यांनी जिवाचे रान केले. कबड्डी संघटनांचे पाठिराखे असलेल्यांसाठी ते विस्तृत वृत्तांकन करीत. शरद पवार यांच्याकडे त्यासाठी जातीने प्रयत्न करीत. त्या अर्थाने ते क्रियाशील पत्रकार होते. वृत्तांकन, समालोचन या पलीकडे जाऊन प्रयत्न करण्यात त्यांना काही गैर वाटत नसे. किंबहुना ते आपले कर्तव्यच आहे असे ते मानत. गोविंदराव तळवलकरांच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मराठी वाचकांच्या पिढ्या घडवल्या. त्यात विविक यांचा वाटा केवळ शेवटच्या क्रीडा-पृष्ठापुरता नाही हे सत्य मान्य करायला हवे. मुंबईत राहून परदेशांतील क्रीडा उत्सवांची रोचक तरीही विश्लेषक माहिती देणारा पहिल्या पानावरून सुरू होणारा ‘दूरवरून दृष्टिक्षेप’सारखा त्यांचा स्तंभ वाचणे ही आनंदाची परमावधी होती. क्रीडा-भाष्य करताना आपण समग्र वाचकांचे प्रतिनिधी आहोत याविषयी त्यांचे भान सदैव जागरूक असे. ‘ब्रेबॉर्न स्टेडियमवरील जांभई’ अशा समर्पक शब्दप्रयोगांतून तेथे नक्की काय झाले याचे यथार्थ चित्रण विविक सहज उभे करीत.

मराठी वाचकांसाठी जगभरातल्या क्रीडा-भारताचे विविक हे दूरस्थ ‘संजय’ होते. महाभारतातील संजय केवळ समालोचक; पण विविक उच्च दर्जाचे विश्लेषक होते. त्यांच्या स्मृतीस ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे विनम्र आदरांजली.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran sports reporter v v karmarkar died in mumbai due to long illness pmw
First published on: 06-03-2023 at 10:34 IST