चैतन्य प्रेम
सर्व इंद्रियं परमतत्त्वाशी एकरूप करून जगायला कवि नारायण सांगत आहे. माणूस तत्त्वांनुसार जगतो, याचा अर्थ तरी काय असतो? तर त्या तत्त्वांना स्मरून आणि अनुसरून तो जगत असतो. आपलं जगणं त्या तत्त्वाशी विसंगत तर नाही ना, याची तो क्षणोक्षणी सूक्ष्म पडताळणी करीत असतो. मग ती तत्त्वं वरकरणी पाहता धार्मिक वा आध्यात्मिक नसतीलही. समाजहिताची कळकळ आणि समाजाचा विकास व्हावा, या भावनेनं उच्च मानवी मूल्य ज्यात अंतर्भूत आहेत, अशीही ती तत्त्वं असू शकतात. तर माणूस जर याप्रमाणे उच्च मानवी मूल्यांनुसार जगू शकतो, तर परमभावानं परमात्मस्मरणातही का नाही जगू शकणार? ते कसं जगायचं, हे कवि नारायणानं जनक राजाला सांगितलं. मन, श्रवण, जिव्हा, हात आणि पाय यांना भक्तीमार्गात कसं एकरूप होता येईल, हे सांगून झाल्यावर कवि म्हणतो, ‘घ्राणीं’ तुलसीआमोदग्रहण,जिंहीं हरिचरण पूजिले!! याचा शब्दश: अर्थ असा की, ज्या तुलसीदलांनी हरीच्या चरणांची पूजा केली त्यांचा गंध नाकानं ग्रहण करावा. नाक हे श्वसनासाठीचं महत्त्वाचं उपकरण आहे. या रूपकाचा एक सुरेख अर्थ असा की, आपला प्रत्येक श्वासोच्छ्वास हा ‘मी’पणानंच भरून असतो. जी जी र्कम अहंभावानं झाली असतात त्यांचंच स्मरण त्यात असतं. पण तुलसीदल जसं भगवंताच्या चरणीं अर्पण होतं, तसं आपलं कुठलं कर्म सद्गुरूंच्या बोधानुसार घडलं, याचं स्मरण झालं पाहिजे! भगवंताला समर्पित आणि सद्गुरूबोधानुगामी कर्माचं स्मरण हेच मनाला सार्थकतेचं समाधान देणारं असतं. तेच कर्म हुरूप वाढवतं आणि सद्गुरूबोधानुसारच आयुष्यातला प्रत्येक क्षण सरावा, प्रत्येक कृती घडावी, अशी तळमळ निर्माण करतं. मग कवि नारायण सांगतो, ‘‘नित्य निर्माल्य मिरवे शिरीं। चरणतीर्थे अभ्यंतरीं। हरिप्रसाद ज्याचे उदरीं। त्या देखोनि दुरी भवभय पळे।। ३०३।।’’ म्हणजे जो नित्य निर्माल्य शिरी धारण करतो, अंत:करणात चरणतीर्थ आणि पोटात हरिप्रसाद साठवतो, त्याला पाहून भवभय दूर पळून जातं. याचाही मनोरम अर्थ आहे. निर्माल्य म्हणजे भगवंताला वाहिली गेलेली फुलं. ही फुलं शिळी झाली असली, तरी त्यांच्याविषयीची मनातली दिव्यत्वाची भावना कायम असते. अध्यात्मातही वर्तमानालाच महत्त्व आहे. भूतकाळाचं स्मरण आणि भविष्याची चिंता, याला अध्यात्माचा विरोध आहे. पण तरीही भूतकाळातील जे जे प्रसंग सद्गुरूंना वाहिले गेले त्यांचं स्मरण हवं. ते मस्तकातच हवं! मस्तक म्हणजे देहातली सर्वोच्च जागा. मग त्या सद्गुरूचरणाचा आश्रय अंत:करणात दृढ हवा आणि त्यांच्या बोधाच्याच अन्नावर देह पोसला जायला हवा. हा देह म्हणजे नुसता हाडामांसाचा देह नव्हे, तर सूक्ष्मदेहही आहे. असा जो सद्गुरूबोधाशी एकरूप भक्त असेल, त्याच्यावर भवभय पगडा बसवूच शकत नाही. भवभय म्हणजे काय? माणसाच्या मनात देहभावनेतून ‘अमुक व्हावं आणि अमुक होऊ नये,’ या इच्छेसोबतच ‘जे व्हावंसं वाटतं ते होईल ना आणि जे होऊ नयेसं वाटतं ते होणार नाही ना,’ अशी अनिश्चितताही दाटून येते. त्यानं त्याचं मन अस्थिर होऊन जे भय साचतं तेच भवभय. सद्गुरूबोधानुरूप जगू लागल्यावर अमुक व्हावं आणि अमुक होऊ नये, या देहभावानुसारच्या इच्छाच ओसरतात आणि जिथे भ्रामक इच्छाच उरत नाहीत तिथं भवभयही उरत नाही.