– चैतन्य प्रेम
प्रपंचावर टीका करणाऱ्या, प्रपंचाला नाकारणाऱ्या परमार्थाबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात तीव्र प्रश्न उत्पन्न होत असतात. सामान्य माणूसच कशाला, अगदी साधना करीत असलेल्या आणि म्हणून स्वत:ला साधक मानत असलेल्या माणसाच्या मनातही हे प्रश्न अधेमधे येतच असतात. कामवासना आणि प्रपंच वाईटच, हा पवित्रा एकांगी नाही का? प्रपंच वाईट असेल, तर विवाहसंस्था का टिकून आहे, असे प्रश्न मुख्य आहेत. पण संतांनी प्रपंचावर जी टीका केली, त्या टीकेचा हेतू, रोख आणि व्याप्ती प्रथम नीट जाणून घेतली पाहिजे. आपला देह हा एक विलक्षण उपकरण आहे, यात शंका नाही. मात्र, या देहाच्या आधारे जगताना देहसुखाइतकाच, देहबुद्धीचा स्पर्श नसलेल्या देहातीत सुखाचाही माणसानं विचार करावा, या हेतूनं संतांनी माणसाच्या देहभोगासक्तीवर टोकाची टीका केली आहे. देहाचं मोल संत का जाणत नाहीत? समर्थ तर या नरदेहाचं स्तवनच ‘दासबोधा’त गाताना म्हणतात, ‘‘धन्य धन्य हा नरदेहो। येथील अपूर्वता पाहो। जो जो कीजे परमार्थलाहो। तो तो पावे सिद्धीतें।।’’ म्हणजे या मनुष्यदेहाची अपूर्वता काय वर्णावी? या देहाच्या बळावर जितका म्हणून परमार्थ करावा तितका तो फळास येतो! पण माणूस देहसुखाच्याच भोवऱ्यात अडकतो. त्वचेला लाभणारं स्पर्शसुख, नेत्रांना लाभणारं दृष्टीसुख, घ्राणेंद्रियांना लाभणारं गंधसुख, कानांना लाभणारं श्रवणसुख, जिव्हेला लाभणारं रुचीसुख या गोष्टी देहेंद्रियांद्वारे बाह्य़ जगात आसक्त होण्यास साह्य़च करतात. माणूस त्यामुळे सहज विषयाधीन होतो. आता संतांनी या विषयांच्या ओढीवर टीका केली असली, तरी विषयविकारांच्या पकडीतून स्वबळावर सुटणं माणसाला शक्य नाही, हेही खरं. एकदा सद्गुरू म्हणाले की, ‘‘विषयविकार नष्ट करण्याच्या मागे तू लागू नकोस. कारण आयुष्य संपेल, पण विकार संपणार नाहीत! तेव्हा तू साधनाभ्यासात झोकून दे; ते विकार वगैरे भगवंत नष्ट करील!’’ मग गुरुजींनी समर्थाचा श्लोक उद्धृत केला, ‘‘पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे। तया भक्तरीपूशिरी कांबि वाजे।।’’ म्हणजे ज्याच्या मुखी सदैव भगवंताचं नाम आहे, अशा भक्ताच्या शत्रूंकडे धनुष्यबाण हाती घेऊन प्रभूच लक्ष देतो! आता भक्ताचे शत्रू कोण? तर हे विकारच! तेव्हा देहाचा वापर देहसुखासाठी करत असतानाच देवसुखाचाही विचार करा, देहात गुरफटून काळ वाया जाऊ देऊ नका, असा संतांचा आग्रह आहे. देह हे काळाचं ‘भातुके’ म्हणजे खेळणं आहे, असं संत सांगतात. ‘जे उपजे ते नाशे’ म्हणजे ज्याची उत्पत्ती झाली आहे त्याचा नाशही होणार आहेच! हा देह नश्वर आहे, अशाश्वत आहे; पण तरीही याच देहाच्या आधारावर जे शाश्वत आहे, त्याची प्राप्ती करून घेता येते, याकडे संत लक्ष वेधतात. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात, ‘‘देह सांडावा ना मांडावा। येणें परमार्थ चि साधावा।।’’ देहसुखाचा त्यागही करू नका की देहसुखातच जखडूनही राहू नका! प्रपंचाचा त्यागही नको की प्रपंचाची आरासही नको! हा देह, हा प्रपंच केवळ परमार्थासाठीच आहे, हे सतत लक्षात ठेवा. मग, ‘‘जेणें देहीं वाढे भावो। देहीं दिसतसे देवो।।’’ या देहाच्या आधारावर साधना करीत जर शुद्ध भाव वाढत चालला, तर तुमच्यातील देवत्वच प्रकट होऊ लागेल! माणूस पशुवत् होऊन अधोगती करून घेऊ शकतो आणि देववत् होऊन ऊध्र्वगतीही साधून घेऊ शकतो. या निवाडय़ात माणसानं परमार्थाला अनुमोदन द्यावं, असा नाथांचाही आग्रह आहे.