चैतन्य प्रेम

एका महानगरीतील सकाळची वेळ. गावी जाण्यासाठी गुरुजींबरोबर आम्ही काही जण रेल्वे स्थानकात आलो होतो. घडय़ाळाच्या काटय़ांवर धावणाऱ्या त्या महानगरातील लोकांसाठी ही वेळ म्हणजे कमालीच्या धावपळीची. गाडय़ा थांबून, धावत्या गर्दीनं ओसंडून वेगानं निघून जात होत्या. सगळीकडे एकच धावपळ, वेग आणि लगबग. त्या गर्दीकडे पाहून गुरुजी म्हणाले, ‘‘मी काय लिहिलंय ते वाचायला किंवा मी काय सांगतोय ते ऐकायला या लोकांना क्षणभराची उसंत तरी मिळेल का कधी?’’ त्यावर एक ज्येष्ठ गुरुबंधू म्हणाले, ‘‘धावून धावून दमतील ना तेव्हा थांबतील त्या वेळी केवळ तुमच्याच शब्दांनी खरी विश्रांती मिळेल!’’ आणि किती खरं आहे हे! जीवनाच्या अनिर्बंध गतीत आपली दमछाक होत असतेच आणि त्या वेळी थोडी उसंत मिळालीच, तर संतांचे शब्द आईच्या ममतेनं अंत:करणापर्यंत भिडत धीर देतात, नवी दृष्टी देतात, प्रकाशाची वाट दाखवतात, चालण्याचं बळ देतात आणि आत्मीयतेचा झराही प्रवाहित करतात. त्यासाठी मनाच्या धावत्या पावलांची गती मात्र अध्येमध्ये मंदावली पाहिजे. आपण का धावतो आहोत? कशामागे आणि कशासाठी धावतो आहोत? आणि ज्या गोष्टीसाठी धावतो त्या गोष्टीही आपल्याला गुंगारा देत आणखी पुढे धावत असतात का, या प्रश्नांचा विचार केला तरी थोडी अंतर्मुखता येऊ लागेल. आपण आयुष्यभर धावतच असतो आणि धावता धावताच देवाच्या दर्शनासाठी मंदिरांतही धाव घेत असतो. पण आपण देवाच्या त्या मूर्तीलाही नीट पाहातच नाही. आशीर्वाद मुद्रेत हात असलेली ती मूर्ती खरं तर आशीर्वादाच्या हमीपलीकडे आणखी वेगळी आणि फार मोलाची गोष्ट दाखवत असते, पण ती आपल्या लक्षातच येत नाही. हजारो वेळा आपण देवांचं दर्शन घेऊनही ती गोष्ट उमगत नाही. देवाचा कृपाहस्त जसा आशीर्वादाचा आहे तसाच तो त्यापलीकडे मूकपणे सांगत असतो की, ‘‘आता थांबा! मनाची निर्थक धाव थांबवा!!’’ आपण मात्र मानतो की अधिक वेगानं धावण्यासाठी देव आशीर्वादच देतोय! मग आपण अधिक दुप्पट वेगानं धावू लागतो. पण ही मनाची धाव कशी थांबेल? अवघं जगही आज मनाला प्रोत्साहन देत सांगतं की, पुढे धावा.. पुढे व्हा! पण पुडुचेरीच्या श्रीमाताजींनी एक मंत्र उच्चारला होता, ‘मागे सरका’! आता हे ‘मागे सरकणं’ म्हणजे थोडं थांबणं आणि अंतरंगात वळणं आहे. सुमारे नव्वद वर्षांपूर्वीच्या एका प्रवचनात माताजी म्हणाल्या होत्या की, ‘‘तुम्ही बहुतेक जण तुमच्या जाणिवेच्या पृष्ठभागावर राहता. जणू स्वत:च्या शरीराच्या बाहेर प्रक्षेपित होऊन वावरत असता. पण तुम्ही नेहमी अंतर्मुख व्हायला पाहिजे. अंतरंगामध्ये खोल जाण्यास शिकले पाहिजे.  जरा मागे सरकून अलिप्त व्हा म्हणजे तुम्हाला काही भय नाही. बाह्य़ जगामध्ये वावरणाऱ्या सामान्य शक्तींच्या आहारी जाऊ नका. एखादे काम करण्याची तुम्हाला घाई असली, तरी एक क्षणभर थांबा, मागे सरका. म्हणजे मग तुमचं ते काम किती तरी अधिक लवकर आणि अधिक चांगले होत आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. कोणी तुमच्यावर रागावले तर रागाच्या स्पंदनांमध्ये सापडू नका. फक्त जरा मागे सरका! म्हणजे रागाला तुमचा आधार वा प्रतिसाद न मिळाल्यानं तो नाहीसा होईल. नेहमी शांत राहा आणि ज्यामुळे शांती भंग होईल, अशी कोणतीही गोष्ट करण्याचा मोह टाळा. मागे सरकून थांबल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, शब्द उच्चारू नका की कृती करू नका!’’