अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री
आपल्या राष्ट्राच्या इतिहासाच्या या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी वाटचालीत, असे अनेक निर्णायक क्षण येऊन गेले आहेत, जेव्हा गीते आणि कला या चळवळीचा आत्मा बनल्या होत्या, त्यांनी त्या त्या वेळच्या सामूहिक भावनांना कृतिशील आयाम मिळवून दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची युद्धगीते असोत, वा स्वातंत्र्य लढ्यात गायली गेलेली देशभक्तिपर गीते, अथवा आणीबाणीच्या काळात युवा वर्गाने गायलेली विद्रोही गीते असोत, अशा असंख्य गीतांनी भारतीय समाजात कायमच सामूहिक चेतना आणि एकतेची भावना जागृत केली आहे.

अशा या सर्व गीतांमध्ये सर्वात ठळकपणे उठून दिसणारे गीत म्हणजे, भारताचे राष्ट्रगान ‘वंदे मातरम्’ या गीताच्या उदयामागची गाथा ही काही कोणत्याही युद्धभूमीवरून सुरू झाली नव्हती, तर ती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय या एका विद्वान व्यक्तीच्या शांत पण दृढनिश्चयी मनातून जन्माला आली होती. १८७५ साली, जगद्धात्री पूजेच्या (कार्तिक शुक्ल नवमी किंवा अक्षय नवमी) शुभदिनी, त्यांनी एका प्रार्थना गीताची रचना केली, हेच गीत नंतर देशाच्या स्वातंत्र्याचे चिरकालासाठीचे राष्ट्रगान बनले. या गीताच्या त्या पवित्र ओळींमागे प्रेरणा होती, ती भारताच्या खोलवर रुजलेल्या नागरी संस्कृतीच्या मुळांची, अथर्ववेदातील ‘माता भूमिः पुत्रो अहं पृथिव्याः’ (पृथ्वी माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे) या आवाहनापासून ते देवी महात्म्यातील ईश्वरासमान मातेच्या आवाहनाची.

‘वंदे मातरम्’ हे केवळ एक राष्ट्रीय गीत किंवा स्वातंत्र्य चळवळीचे जीवनरक्त नव्हते. तर हे गीत बंकिमचंद्र यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची केलेली पहिली घोषणाही होती. या गीतानेच आपल्याला, भारत हा केवळ भौगोलिक प्रदेश नाही, तर भारत म्हणजे एक भू सांस्कृतिक नागरी संस्कृती आहे, आणि ती नकाशावरील रेषांनी नाही, तर परस्पर सामायिक संस्कृती, स्मृती, त्याग, शौर्य आणि मातृत्वाच्या भावनेने एकसंध बांधली गेलेली आहे, ही केवळ भूमी नाही, तर ते भक्ती आणि कर्तव्य भानवेच्या मूल्यांनी पवित्र झालेले तीर्थक्षेत्र आहे, याचे स्मरण करून दिले.

महर्षी अरविंद यांनी वर्णन केल्याप्रमाणे, बंकिम हे आधुनिक भारताचे द्रष्टे नेतेच होते, त्यांनी आपल्या शब्दांमधून या राष्ट्राच्या आत्म्याला पुन्हा जागृत केले. आनंदमठ ही त्यांची साहित्यकृती म्हणजे केवळ एक कादंबरी नव्हती, तर तो गद्य स्वरूपातला मंत्रच होता. या मंत्रानेच एका निद्रिस्त अवस्थेत गेलेल्या आपल्या राष्ट्राला, स्वतःच्या दैवी शक्तीचा पुन्हा शोध घेण्यासाठी प्रेरित केले होते. आपल्या एका पत्रात बंकिम बाबू यांनी लिहिलेच आहे, “माझी सर्व कामे गंगा नदीत विसर्जित झाली तरी त्याला माझी कोणतीही हरकत नाही, पण हे प्रार्थना गीत मात्र चिरंतन जिवंत राहील. हे एक महान गीत ठरेल आणि ते लोकांची हृदये जिंकेल.” त्यांचे हे शब्द खरोखरच भविष्यवेधी होते. वसाहतवादी राजवटीच्या सर्वात अंधकारमय काळात त्यांनी लिहिलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत जागृतीचे प्रभातगीतच बनले.

१८९६ मध्ये, रवींद्रनाथ टागोर यांनी ‘वंदे मातरम्’ला चाल लावली आणि कलकत्ता (आत्ताचे कोलकाता) येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी ते गायलेही, आणि या प्रार्थना गीताला स्वतःची अभिव्यक्ती आणि अमरत्व प्राप्त झाले. पाहता पाहता या गीताने भाषा आणि प्रदेशांच्या सीमा ओलांडल्या आणि संपूर्ण भारतात त्याचा प्रतिध्वनी घुमू लागला. तमिळनाडूमध्ये सुब्रमण्यम भारती यांनी ते तमिळ भाषेत आणले, तर पंजाबमध्ये क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीचा प्रतिकार करण्यासाठी ते गायले.

वर्ष १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीच्या वेळी, जेव्हा संपूर्ण प्रांतात बंडखोरीचे वातावरण होते, तेव्हा ब्रिटिशांनी, ‘वंदे मातरम्’च्या सार्वजनिक उद्घोषावर बंदी घातली. तरीही, १४ एप्रिल १९०६ रोजी, बारीसालमध्ये हजारोंनी हा आदेश धुडकावून लावला. जेव्हा पोलिसांनी शांततामय जमावावर हल्ला केला तेव्हा पुरुष आणि स्त्रिया अशा सर्वांनीच रक्ताळलेल्या अवस्थेत रस्त्यावर उभे राहून एका आवाजात ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या.

येथूनच, हा पवित्र मंत्र गदर पार्टीच्या क्रांतिकारकांबरोबर कॅलिफोर्नियात पोहोचला. नेताजींच्या सैनिकांनी सिंगापूरहून कूच केले तेव्हा आझाद हिंद फौजेच्या तुकड्यांमध्ये हा मंत्र प्रतिध्वनित झाला. शाही भारतीय नौदलाने १९४६ मध्ये केलेल्या बंडाच्या वेळी जेव्हा भारतीय नाविकांनी ब्रिटिशांच्या युद्धनौकांवर तिरंगा फडकवला तेव्हादेखील तो आसमंतात दुमदुमला. खुदिराम बोस यांच्यापासून अश्फाकुल्ला खान यांच्यापर्यंत, चंद्रशेखर आझाद यांच्यापासून तिरुप्पूर कुमारन यांच्यापर्यंत ही घोषणा एकसारखी घुमली. हे केवळ एक गीत राहिले नव्हते; तर तो भारताच्या आत्म्याचा एक सामूहिक आवाज बनला होता. महात्मा गांधीजींनी स्वतःच कबूल केले आहे की ‘वंदे मातरम्’ या गीतामध्ये सर्वात निष्क्रिय रक्तातदेखील चेतना निर्माण करण्याची जादूई ताकद होती. या गीताने उदारमतवादी आणि क्रांतिकारी, विचारवंत आणि सैनिक अशा सर्वांनाच एकसमान पद्धतीने एकत्र आणले. महर्षी अरविंद यांनी घोषित केल्यानुसार, हे गीत म्हणजे “भारताच्या पुनर्जन्माचा मंत्र” ठरले. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात’ या कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’ या गीताच्या वैभवशाली वारशाची देशाला आठवण करून दिली.