– लक्ष्मण संगेवार
जगभरात अन्न सुरक्षा आणि साठवणूकीमुले त्याच्या दर्जात होणारी घट यादृष्टीने अन्नपदार्थांवर ‘यूज बीफोर/ बेस्ट बीफोर’ या तारखा छापल्या जातात. या सूचना ग्राहकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असल्या तरी, अनेक वेळा या सूचनांमुळे गैरसमज निर्माण होतो परिणामी मोठ्या प्रमाणावर अन्न-खाद्यपदार्थ वाया जातात. विशेषतः नैसर्गिक स्वरूपातील टिकाऊ धान्य जसे की ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये ज्यांची अंगभूत साठवण क्षमता म्हणजेच ‘शेल्फ लाइफ’ अधिक असते, पण वरील सूचनांमुळे ते टाकाऊ ठरविले जाते.
धान्य व त्याची टिकण्याची नैसर्गिक क्षमता याबाबत परंपरिक ज्ञानाने समाजमनास त्याच्या उपयुक्ततेची खात्री असते. धान्य साठवण्याच्या पारंपरिक पध्दती जगभर आहेत. कोणतीही प्रक्रिया न केलेले, पण शेतीतील माती, खडे, काडी कचरा यांत्रिक पध्दतीने काढून पाकिटबंद केलेल्या स्वरूपातील धान्य, डाळी, कडधान्ये आणि मसाल्यांचे पदार्थ अलीकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि वापरलेही जातात. संयुक्त राष्ट्राच्या ‘जागतिक अन्न व शेती संघ’ तसेच ‘भारतीय शेती संशोधन संस्था’च्या मानकांनुसार, अशा धान्यांचे योग्य वातावरणात (कोरडी, हवेशीर जागा) ‘शेल्फ लाइफ’ सहा महिने ते तीन वर्षे इतके असू शकते. ‘यूज बिफोर’ या सूचनेचा मूळ उद्देश साठवणूकीतून खराब झालेले अन्न पदार्थ वापरले जाऊ नयेत हा आहे. ही बाब आपण रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरून समजून घेऊ या. ॲलोपॅथीत वापरली जाणारी बहुतांश औषधे रसायनांतून कृत्रिम पध्दतीने कारखान्यात उत्पादित केलेली असतात. पॅकिंग केलेल्या औषधांचा दर्जा साठवणूक तसेच त्या रसायनांच्या अंतर्गतच्या प्रक्रियांमुळे कालातरांने ती वापरण्यायोग्य राहत नाही म्हणून त्यावर ‘एक्सपायरी डेट’ / वापरण्याची मुदत लिहिलेली आढळते. पण अन्न धान्यास त्याच न्यायाने वापरण्याची मुदत ठरविणे हे पूर्णतः अशास्त्रीय आहे. अवाजवी व्यापारीकरणातून हे खाद्यान्न बाद ठरवताना मूळ धान्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन दर वाढावेत हा उद्देश असतो.
‘भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण’, ‘युरोपीय अन्न पदार्थ लेबलींग कायदा (११६९/२०११)’, व ‘अमेरीकन अन्न व औषधी नियत्रंक’ या संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार: ‘यूज बाय’ तारीख दूध, दही, मांस, बेकरी, शिजवलेले पदार्थ इ. नाशिवंत पदार्थांसाठी लागू आहे. ‘बेस्ट बीफोर’ ही तारीख पदार्थाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने मार्गदर्शक असते, पण त्यानंतरही ते अन्न पदार्थ वापरणे धोकादायक नसते. ग्राहक या दोन संज्ञांमध्ये गोंधळतात आणि ‘बेस्ट बीफोर’ लिहिलेले धान्यही तारखेनंतर टाकावू समजून फेकून देतात. याबाबत ग्राहकांचे शिक्षण, जनजागरणाबाबत ठोस उपायांचा अभाव आहे.
भारतासारख्या धान्य साठवण्याची पुरेशी सुविधा नसलेल्या देशांसह सर्वत्र होणाऱ्या धान्याच्या नासाडीबाबत जागतिक पातळीवरील सर्वेक्षण व आकडेवारीद्वारे आपण या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊ या. संयुक्त राष्ट्राची ‘अन्न आणि कृषी संघटना’ (२०२२) च्या अहवालानुसार, दरवर्षी १.३ अब्ज टन अन्नधान्य वाया जाते. यातील २० टक्के केवळ तारखाबाबत होणाऱ्या गैरसमजुतीतून फेकून दिले जाते. ‘भारतीय अन्न मानक संस्था’ व ‘केंद्रीय विज्ञान व पर्यावरण संस्था’ यांच्या अभ्यासानुसार, शहरी भागात पॅकिंग केलेल्या अन्नापैकी १०–१५% अन्न तारखेच्या गोंधळामुळे न वापरता फेकून दिले जाते. धान्य वितरण व्यवस्थेतही ‘एक्सपायरी डेट’ धान्य सर्रास नष्ट केल्याचे आढळते.
कायदेशीर व धोरणात्मक चौकटीत राहून युरोपीय संघात २०१८पासून ‘पहा, चाखा- वाया घालवू नका’ ही चळवळ राबवण्यात येत आहे. फ्रान्समध्ये २०१६पासून किराणा दुकानदारांनी, मॉल्सनी वापरायोग्य अन्न टाकून देणे बेकायदा ठरवले आहे. तर अमेरिकेत अन्न पदार्थ वेष्टन कायदा (२०२१) अंतर्गत ‘बेस्ट इफ युज बाय’ आणि ‘युजबाय’ यात स्पष्ट अंतर ठेवण्याचे धोरण अवलंबिले आहे. अशा पध्दतीने खाद्यान्य बाद ठरवण्यातून आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न उद्भवतात. एकीकडे शेतीतील उत्पादन, वाहतूक, साठवणूक यावर खर्च करून ते अन्नधान्य टाकून दिले जाते तर दुसरीकडे गरीबांना अन्नाभावी उपाशी राहावे लागते. पर्यावरणीयदृष्ट्या वाया गेलेले अन्न सडून त्यातून मिथेन वायू निर्माण होतो, जो कार्बनवायूपेक्षा २५ पट अधिक प्रभावी हरितगृह वायू आहे.
पारंपरिक भारतीय रोग उपचार पद्धतींत ‘जुने अन्नघटक’ यांना वेगळे महत्व आहे. आयुर्वेदात काही नैसर्गिक अन्नघटक जुने झाल्यावर अधिक गुणकारी ठरतात, असा स्पष्ट उल्लेख आढळतो. हे शास्त्र फक्त अन्नाची चव किंवा टिकवणे नव्हे, तर साठवणूकीतून होणार त्यांच्या गुणधर्मांतील बदल आणि त्याचा शरीरावर होणारा प्रभाव ध्यानात घेते. जुने तूप (पुराण घृत) बाबत आयुर्वेदातील संदर्भ पाहता ‘चरक संहिता’ आणि ‘भवप्रकाश निघंटु’ या ग्रंथांमध्ये १० वर्षांहून अधिक जुने साजूक तूप शोधन, स्मरणवर्धन, विषनाशक, मनोबलवर्धक मानले गेले आहे. हे पुराण घृत अपस्मार (epilepsy), मनोविकार, त्वचारोग, जखमा, व्रण यावरील उपचारांसाठी उपयुक्त औषधीगुणयुक्त मानले गेले आहे. मध्ययुगीन काळी युध्दातील तहात शत्रूपक्षाने द्यावयाच्या खंडणीबरोबर किती रांजणे जुने तूप दिले याचे उल्लेख आहेत. एक वर्षापेक्षा अधिक जुने नैसर्गिक मध वजन कमी करणे मेदहरण कफनाशक मानले गेले आहे. नव्या मधाचा उपयोग पौष्टिकतेसाठी, तर जुन्या मधाचा उपयोग औषधोपचारांसाठी केला जातो हे सर्वश्रूत आहे. आयुर्वेदात नवीन तांदूळ (जड) आम निर्माण करणारे मानले जातात. दोन-पाच वर्षे जुना तांदूळ हलका, पाचनीय आणि वात-पित्त-कफ संतुलक मानला जातो. पारंपरिक वैद्यकीय ज्ञान हे अनुभव, निरीक्षण आणि आंतरशारीरिक परिणामांवर आधारित आहे. दुसरीकडे, सध्याची ‘युज बीफोर’ प्रणाली मायक्रोबायोलॉजिकल सुरक्षा व प्रक्रियायुक्त अन्नाच्या गुणवत्तेच्या आधारावर ठरवली जाते. या दोघांमध्ये खालीलप्रमाणे मूलभूत फरक आहेत.
अधुनिक ‘युज बीफोर’ प्रणालीचा आधार गुणधर्मात्मक परिणाम व शरीरसंपर्क प्रभाव सूक्ष्मजैविक वाढ व टिकवणुकीचा अंदाज आहे तर पारंपरिक पध्दतीत काही अन्न पदार्थ जुने झाल्यावर अधिक उपयुक्त ठरतात, ही मूल्यांकन वास, चव, अनुभव, वैद्यकीय उपयोगांवर आधारित प्रणाली आहे. या दोन्हीत शास्त्रीय समन्वयाची गरज आहे. भारतीय परंपरागत ज्ञान व आधुनिक विज्ञान याचा समन्वय साधल्यास धोकादायक अन्न ओळखता येईल. टिकाऊ व औषधी अन्न दिर्घकाळ वापराता येईल. अन्नसाक्षरतेद्वारे अन्न नासाडी कमी होईल
‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’, ‘आयुष मंत्रालय’, ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद’ यांनी संयुक्तपणे अधुनिकशास्त्र व परंपरा यांची सांगड घालणारी पध्दती निर्माण करण्याची गरज आहे. शासकीय अन्न धोरणात पाश्चात्य नियमन व पारंपरिक दृष्टिकोनाचा आधार घेऊन नव्याने अन्नवस्तूंवरील सूचना तयार कराव्यात.
उपाय आणि शिफारशी
(१) ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ तर्फे ‘बेस्ट बीफोर’ , ‘अनसेफ’ यावर ग्राहक जनजागृती मोहीम हवी. शाळा व महाविद्यालयांत ‘अन्नसाक्षरता’ अभियान चालवले जावे.
(२) उत्पादकांनी डेटाबेस द्वारे ‘शेल्फ लाइफ ट्रॅकिंग सिस्टम’ विकसित करावी जेथे वापरकर्ता सॉफ्टवेअर/ क्यूआर कोड स्कॅन करून योग्य सूचना मिळवू शकेल.
(३) स्वंयसेवी संघटना आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत संस्थांनी ‘डेट एक्सपायर बट सेफ’ हे अन्न धान्य बँका आणि अन्न पुनर्वितरण यंत्रणा मार्फत गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी शृंखला उभारावी.
(४) पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे वापरण्याजोगे अन्न फेकून देण्यावर मर्यादा आणणारे कायदे भारतात लागू करता येतील का याचा अभ्यास व्हावा. किरकोळ विक्रेत्यांना अशा पद्धतीत बाद ठरलेले पण टिकाऊ अन्न गरजूंना वाटपाचे प्रावधान असावे.
अन्नसुरक्षा ही केवळ साठवणुकीपुरती मर्यादित नसून ती साक्षरतेची, विवेकाची व शाश्वततेची गोष्ट आहे. ग्राहक, उत्पादक, शासन व स्वयंसेवी संस्था यांनी सामूहिक जबाबदारीने कार्य केल्यास, अन्न नासाडी थांबवता येईल आणि ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे तत्त्व खरे ठरेल. भारतीय परंपरेत ‘जुने’ अन्नधान्य वाईट नसून अनेक वेळा ते गुणकारी मानले गेले आहे. अशा परिस्थितीत आधुनिक ‘यूज बीफोर’, ‘बेस्ट बीफोर’ पद्धती पारंपरिक ज्ञानाशी विसंगत ठरतो. अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी या दोन्ही पद्धतींचा समन्वय साधून, शास्त्रीय संशोधन व लोकशिक्षण,जनजागरण आवश्यक आहे.
laxman.sangewar@gmail.com