अभिनव चंद्रचूड
History Origin of Ganeshotsav लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या इंग्रजीतील The Mahratta या वृत्तपत्राने मे, १८९४ मध्ये एक गुप्त सरकारी परिपत्रक प्रसिद्ध केले. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज रॉबर्ट कॅनिंग हॅरिस – जे इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधारही होते – त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना या परिपत्रकाद्वारे निर्देश दिला होता की, हिंदूंनी आपली धार्मिक मिरवणूक मशिदीजवळून नेताना धार्मिक सौहार्द म्हणून वाद्य वाजवणे बंद करावे. मात्र मुस्लीम मिरवणुकीसाठी अशी कोणतीही अट नव्हती. हे खरेतर इंग्रजांनी पेरलेले धार्मिक विद्वेषाचे बीजच होते.
पालखीवर दगडफेक आणि जातीय तंटा
यानंतर त्याच वर्षी १८९४ साली आणखी एक महत्त्वाची घटना घडली. संत ज्ञानदेव आणि संत तुकोबांची पालखी पुण्यातील गणेश पेठेतील दर्ग्याजवळ पोहोचली असता त्यातील वादकाच्या दिशेने काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यावरून मोठाच जातीय तंटा उद्भवला. त्यावेळेस लोकमान्य टिळकांचे केसरी हे वर्तमानपत्र तत्कालीन मुंबई इलाख्यात लोकप्रिय होते. या घटनेच्या वार्तांकनामध्ये केसरीमध्ये म्हटले होते की, सुमारे ५० मुस्लिमांनी तुकोबांच्या पालखीवर हल्ला केला. या घटनेकडे त्यावेळेस मुस्लिमांनी हिंदूंवर केलेला हल्ला म्हणून पाहिले गेले.
घडले ते मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर…
हे सारे घडले ते मुस्लिमांमध्ये सर्वाधिक साजरा केल्या जाणाऱ्या मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर. ही घटना घडण्यापूर्वी अनेक वर्षे मुस्लिमांचे मोहर्रमचे ताबूत निघत त्यावेळेस हिंदूही त्या मिरवणुकीत सहभागी होत असत. (ताबूत याचा अर्थ शवपेटी) अमेरिकन कवी लुसिया सी. जी. ग्रीव्ह म्हणतात, ताबूत ही सांगितिक मिरवणूकच असते. ढोल-ताशे वाजवले जातात. अखेरच्या दिवशी ताबूत निघतात आणि नदी किंवा समुद्रकाठी त्यांचे विसर्जन केले जाते. मुंबईमध्ये शिया आणि सुन्नी या दोघांकडूनही ताबूत मिरवणूक काढली जाते.
असाच उत्सव सुरू करावा…
मात्र या पालखीच्या घटनेनंतर मुंबई इलाख्यातील कल्पतरू, मुंबई वैभव, इंदू प्रकाश, दीनबंधु आणि सुबोध पत्रिका या सारख्या स्थानिक मराठी वर्तमानपत्रांनी हिंदू वाचकांना आवाहन केले की, त्यांनी ताबूत काढू नयेत वा मोहर्रमच्या मिरवणुकीत सहभागीही होऊ नये. हा संदेश देणारी पत्रके मंदिरांच्या प्रवेशद्वारावर चिकटवण्यात आली. पुणे वैभवने तर एक पाऊल पुढे टाकत वाचकांना आवाहन केले की, “त्यांनीही असाच उत्सव सुरू करावा. त्यासाठी ते त्यांच्या देवतांची अशीच मोठी भव्य मिरवणूक सुरू करू शकतात”.
ताबुतांसारखीच मिरवणूक
त्यानंतर अनेक स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या की, आजवर केवळ घरगुती राहिलेला गणेशोत्सव यंदा पुण्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. २२ जुलै १८९४ रोजी ‘व्यापारी’ने प्रसिद्ध केले की, यंदाचा गणेशोत्सव भव्यदिव्य प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. सिंहासनाधिष्ठीत गणपतीच्या मूर्ती तयार होत असून ताबुतांसारखीच त्यांचीही मिरवणूक निघेल. ‘पुणे वैभव’मध्ये प्रसिद्ध झाले होते की, गणपती आणि शंकराची स्तुती करणारी गाणी रस्तोरस्ती गाणारी बँड पथकेही तयार आहेत.
मोहर्रमला हिंदू
थोडक्यात सांगायचे तर, आज आपण साजरा करत असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मूळ हे १८९४ साली पुण्यात घडलेल्या या घटनेमध्ये असून ‘मोहर्रमला हिंदू पर्याय’ म्हणून त्याची सुरुवात झाली. या साऱ्याचे पडसाद तत्कालीन वर्तमानपत्रातही उमटलेले दिसतात. १८९४ सालच्या ऑक्टोबर महिन्यात ‘The Mahratta’ ने नेमके काय घडले याचे वर्णन करताना होते की, “संत तुकाराम आणि संत ज्ञानदेव हे निम्न वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. पौराणिक देवतांपेक्षांही लोकमनामध्ये त्यांते अधिष्ठान अधिक आहे. पुण्यात तुकोबांच्या पालखीवर झालेला हल्ला पाहून निम्न वर्गाने यापुढे मोहर्रमच्या मिरवणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळेस त्यांना दरवर्षी सुमारे १० दिवस सुरू असलेली नाच- गाणी आणि धमालही हवी होती. त्यामुळेच त्यांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा सण काही नवीन नव्हता, तो त्याही पूर्वीपासून अनादी काळ साजरा होतच होता, फक्त त्याला मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर आधुनिक रूप प्राप्त झाले.”
ताबुतांप्रमाणेच, त्यावर्षी १३ सप्टेंबर १८९४ रोजी गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक निघाली. पुण्यात लहान गणपतींच्या ऐवजी मोठे गणपती पाहायला मिळाले, असे वर्णन करत दुसऱ्या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वार्तांकनामध्ये म्हटले की, यंदा विद्येच्या देवतेच्या भल्या मोठ्या मूर्ती पाहायला मिळाल्या. केवळ तेवढेच नव्हे तर त्यांची प्रतिष्ठापना रस्त्यांवर ताबुंताप्रमाणे सजवलेल्या मंडपात करण्यात आली होती.
गणेशोत्सवाचे मूळ आणि मिथके
सार्वजनिक गणेशोत्सवाचे मूळ कशात आहे, याबद्दल अनेक मिथके आहेत. इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य आंदोलनातील राष्ट्रीय भावना प्रखर करण्यासाठी तो सुरू करण्यात आला, असेही म्हटले जाते, मात्र ते खरे नसावे. एक मात्र खरे की, या सार्वजनिक गणेशोत्सवाने सर्व जातींच्या हिंदूंना एका छत्राखाली आणण्याचे काम केले.
१८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि त्यावेळेस स्वातंत्र्य आंदोलनात त्यांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची होती. शिवाय समाजातील विचारवंत, नेते मंडळींचे पाठबळही त्यांच्यामागे होते. १८९४ सालच्या या घटनेनंतर सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळीच राजकीय भूमिका त्यावेळेस आकारास येऊ लागली. टिळकांसारख्या नेत्यांनी समस्त समाजाला धार्मिकतेचे आवाहनही केले होते.
टिळकांना अपेक्षित राष्ट्रीयत्व
राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी गणेशोत्सव महत्त्वाचा आहे, असे टिळकांना वाटत होते. १८९५ साली सप्टेंबर महिन्यातील केसरीमध्ये त्यांनी म्हटले होते की, देशाला तीन गोष्टींची गरज आहे; समान धर्म, समान कायदा आणि समान भाषा. ब्रिटिशांनी आपल्याला कायदे आणि भाषा दिली. आपल्याला भविष्यात एकच एक राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर एकच धर्म हाही तेवढाच आवश्यक आहे, असे टिळकांना वाटत होते. टिळकांना अपेक्षित राष्ट्रीयत्वाकडे विद्यमान नवी दिल्ली पारंपरिक शहाणपण म्हणून पाहात आहे, असे म्हणणे अप्रस्तुत ठरणार नाही. आताच्या आधुनिक भारतातही १८९० सारखेच वातावरण सध्या समाजात दिसते आहे.
हॅरिस शिल्ड
मुंबईत प्रतिवर्षी आंतरशालेय हॅरिस शिल्ड ही स्पर्धा खेळवली जाते. १९८८ साली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने केलेल्या तब्बल ६४४ धावांच्या भागीदारीमुळे ती अनेकांच्या चांगलीच लक्षात आहे. या शिल्डला गव्हर्नर हॅरिस यांचे नाव देण्यात आले आहे, ज्यांचे हिंदू मिरवणुकीवर निर्बंध घालणारे ‘तोडा व फोडा’ धोरण सार्वजनिक गणेशोत्सवाचा ओनामा करणारे ठरले!
(अभिनव चंद्रचूड हे मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत.)