ज्योत्स्ना पाटील
मातृभाषेतून शिकताना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात, याचे अनेक अनुभव सांगणारे हे टिपण- ‘मराठी प्रमाणभाषेची सक्ती’ वगैरे आक्षेपांनाही परस्पर उत्तर देणारे!
पहिली ते चौथीला तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवावी असा फतवा काढला; विरोध दिसल्यावर आता या फतव्याचे रूपांतर शिक्षणमंत्र्यांनी मौखिक भाषेवर सोडून जणूकाही आम्ही त्या गावचेच नाहीत असा आव आणला. मोर्चा भोवणार, हे स्पष्ट दिसल्यावर मुख्यमंत्र्यांनीच या निर्णयातून काढता पाय घेतला. यातून दिसणारा सरकारचा उद्दामपणा आणि बालिशपणा तूर्तास बाजूला ठेवून पालकांनी सजग होऊन, आपल्या पाल्याला मातृभाषेतून का शिकवायचे?  शिक्षक, भाषा संशोधक, विचारवंत व बालमानसशास्त्रज्ञ तिसऱ्या भाषेला लहानपणापासून शिकवण्यासाठी का विरोध करीत आहेत? – या प्रश्नांना मुळापासून भिडणे आवश्यक आहे. मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद निर्माण करून आपली सत्तेची पोळी शेकणाऱ्यांना चपराक देण्याचे काम खरे तर जनतेचे म्हणजेच पालकांचे आहे. ते का, यामागची कारणमीमांसा ढोबळपणे समजून घ्यावी. आपल्या पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीने आणि एक सुसंस्कृत जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यात मातृभाषेचे योगदान किती आहे ते एकदा का लक्षात घेतले तर मनमानी करणाऱ्या सरकारला लगाम घालण्यास पालक नक्कीच एकजूट होतील.

लहान मुलांची मातृभाषेवर पकड का असावी? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला वेळोवेळी मिळत असते. सातवाहनकालीन, मौर्यकालीन, यादवकालीन, मुघलकालीन, शिवकालीन, पेशवाई, स्वातंत्र्य लढा, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध असा संपूर्ण भारताचा इतिहास व जगाचा इतिहास मुलांच्या ज्ञानाचे उत्खनन करून इतिहासाला साक्षी ठेवून स्वतःचा इतिहास घडवत असतात ते केवळ मातृभाषेच्या दुधावर पोसल्यावरच. तरीदेखील आपण मातृभाषेचा हवा तसा उपयोग करण्यात कुठे कमी पडतो तेही पाहायला हवे. मातृभाषा जर चांगल्या प्रकारे येत असेल तर प्रत्येक विषय समजणे व त्याचे आकलन करणे सहज सोपे जात असते. मुलांना घोकंपट्टी करून रट्टा मारण्याची गरज नसते आणि जे विद्यार्थी घोकंपट्टी करतात त्यांच्या तार्किक बुद्धिमत्तेचा विकास फारसा होत नाही. पुढे दहावी-बारावीला जरी ९०-९५ टक्के गुण मिळवून हे विद्यार्थी यशस्वी झाले तरी पुढील स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडून नैराश्यात जाऊन जीवन संपवण्यापर्यंतही काहींची मजल जात असते. (अर्थात येथे दोन-तीन टक्के विद्यार्थी अपवाद असू शकतात, ज्यांनी दुसऱ्या भाषेतून शिक्षण घेतले असेल).

भाषेचा ‘दुवा’ जुळावा…

आता उदाहरण घेऊनच समजून घेतले तर अधिक चांगल्याप्रकारे लक्षात येऊ शकेल. एका खासगी क्लासमध्ये शिकवताना मला आलेले अनुभव पाहूया. नागरिकशास्त्र विषय शिकवताना“पंचायत समिती हा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा आहे’.  तेव्हा विद्यार्थ्यांनी मला विचारले, ‘मॅडम दुवा म्हणजे काय?’ मुलांनी हा प्रश्न विचारल्यावर माझ्या लक्षात आले की मुलांना बऱ्याचशा शब्दांचे अर्थ माहीत नसले तर विषय समजणे अवघड होऊन जाते आणि नंतर तो विषय अभ्यासणे कंटाळवाणे वाटते आणि येथेच मुलांची अधोगती सुरू होते. मुलांना ‘दुवा’ या शब्दाचा अर्थ आशीर्वाद, प्रार्थना असून त्याचा दुसरा अर्थ आहे जोडणारा, सांधणारा इंग्रजीत जॉईन, कनेक्ट असे त्याचे अर्थ आहेत. नागरिकशास्त्रात ‘दुवा’ हा शब्द ‘जोडणारा’ या अर्थाने आला आहे. वरील वाक्यात पंचायत समिती ही ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेला जोडण्याचे काम करीत असते आणि हिंदीत ‘दुवा’ हा शब्द ‘दुआ’ असा लिहितात. तो आशीर्वाद, प्रार्थना, इच्छा इत्यादींकरिता वापरतात.

संविधान, नागरिक, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये आणि जबाबदार नागरिक घडण्यासाठी अशा अनेक नागरिकशास्त्रातील संकल्पना मुलांच्या गळी उतरवण्याकरिता मातृभाषेचे अमृत पाजले की सुसंस्कृत नागरिक देशाला महान बनवत असतात.

तसेच १ ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधीजींचा इतिहासातील ‘असहकार चळवळ’ हा पाठ अभ्यासूया असे सांगताच विद्यार्थी ओरडले,  ‘अहो मॅडम, किती बोअर होतं. दुसरं काहीतरी शिकवा.’ मुलांनी असे म्हणतातच मी त्यांना विचारले, ‘असहकार’ या शब्दाचा अर्थ सांगा. इतिहास हा विषय नावडता का होतो आणि घोकंपट्टीने उत्तरे पाठ करून परीक्षा दिल्यामुळे काय परिणाम होतात? त्याचे माझ्यासमोर दृश्य स्वरूप होते. त्यानंतर मुलांना नावडत्या विषयात रुची निर्माण करायची तर मग मातृभाषेशिवाय दुसरा तरणोपाय नाही. हे माझ्या लक्षात आल्यावर मग मी मुलांना सांगितले, ‘ज्या सामासिक शब्दाला ‘अ’ हा उपसर्ग लागलेला असतो त्याचा अर्थ ‘नाही’ असा होतो. ‘अ’ म्हणजे ‘नाही’ हे कायमचे लक्षात ठेवा. ‘सहकार’ म्हणजे ‘सहकार्य’, ‘मदत करणे’ असा अर्थ होतो; तर ‘असहकार’ म्हणजे ‘सहकार्य न करणे’. तीच गोष्ट ‘मिठाचा सत्याग्रह’ यातही ‘सत्याग्रह’ म्हणजे ‘सत्याचा आग्रह धरणे’. ‘असहकार’ आणि ‘सत्याग्रह’ या दोन शब्दांचा अर्थ मुलांच्या मनात खोलवर रुजल्यानंतर, महात्मा गांधीजी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात येऊन पाठ केव्हा संपला ते मुलांना कळलेही नाही.

भूगोल विषय शिकवताना ‘पर्जन्यछायेचा प्रदेश’ लक्षात येण्यासाठी मातृभाषेचा योग्य वापर करून सांगणे सहज शक्य होते. ‘पर्जन्य’ म्हणजे ‘पाऊस’ परंतु येथे ‘पाऊसछाया’ असे लिहिणे योग्य नाही कारण प्रत्येक गोष्टीचे जागेनुसार, परिस्थितीनुसार संदर्भ बदलत असतात. साहित्यात वा काव्यात पाऊस, ढग बरसला, आकाश काळोखले, रिमझिम सरी आल्या, धारा कोसळल्या असे अनेक प्रकारे पावसाला संबोधू शकतो; परंतु भूगोल विषयात पावसाला अधिक करून ‘पर्जन्य’ म्हटले जाते. ‘पर्जन्यछाया’ चा शब्दश: अर्थ पावसाची सावली – मग उन्हाची सावली म्हणतो तशीच पावसाची सावली असते का, असा प्रश्न मुलामुलींना पडतो; तेव्हा त्याचे उत्तर देण्याऐवजी, ‘ढगाने अडवल्यामुळे ऊन पोहोचत नाही ती सावली; पण पावसाचे ढगच डोंगराने अडवले तर?’ असा प्रतिप्रश्न केल्यास मुलेच सांगतात : डोंगराच्या ज्या बाजूने ढग अडवले जातील तिथे पाऊस पडणार आणि डोंगराच्या दुसऱ्या बाजूला पाऊसच पडणार नाही किंवा अगदीच कमी प्रमाणात म्हणजेच ‘तुरळक सरी’ पडणार! 

भूगोल हे एक शास्त्र आहे. कोणत्याही भाषेत शास्त्रीय संज्ञा एरवीच्या वापरातील भाषेपेक्षा निराळ्या असतात, तसेच आपल्या मातृभाषेतही आहे. सूचीपर्णी वृक्ष, खारफुटी जंगल, द्वीपकल्प, खंड, भूखंड अशा अनेक भौगोलिक संकल्पना समजल्यावर मुलांना भूगोल विषयाचा संपूर्ण गोल व विश्व लक्षात येऊन भूगर्भशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ होण्याकडे मुलांची जडणघडण होत असते ती मातृभाषेच्या सखोल ज्ञानामुळेच!

मातृभाषेचा आधार घेऊन शिकविले तर गणितातही मुलांची रुची वाढत असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर समभुज त्रिकोण. ‘सम’ म्हणजे समान, सारखे. ‘भुज’ म्हणजे ‘बाजू’. त्रिकोण म्हणजे तीन कोन असणारी आकृती. तिन्ही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण  म्हणतात, हे एकदा उमजले की मग ‘समद्विभुज त्रिकोण’, ‘विषमभुज त्रिकोण’ याही संज्ञा मुलामुलींना समजण्यासाठी वेळ लागत नाही.  ‘चौरस’ आणि बाकीचे समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन; अपूर्णांक, पूर्णांक अशा णितीय संकल्पना मुलांना समजल्यावर गणित विषयात रुची निर्माण होते. गणितज्ञ घडविण्यात मातृभाषेचे योगदान मोलाचे आहेच. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येक विषयाची शैक्षणिक इमारत ही मातृभाषेच्या पायावरच भक्कमपणे उभी राहात असते. परंतु दुर्भाग्याने व खेदाने म्हणावे लागते की आमच्याकडे मातृभाषेतील महती न जाणणारे ठोकळेच अधिक आहेत. मातृभाषेतून नीतीकथा मुलांना सांगितल्या तर लहानपणीच मुलांमध्ये नैतिक मूल्ये चांगल्या प्रकारे रुजत असतात आणि मुले मोठेपणी सुसंस्कृत व जबाबदार नागरिक म्हणून घडत असतात.  जेव्हा मुलामुलींना मातृभाषेचे ज्ञान योग्य प्रकारे दिले जाते तेव्हाच ती इतर भाषाही सहजपणे अवगत करतात. मराठी व हिंदीची लिपी जरी देवनागरी असली तरी दोन्ही भाषांमध्ये खूपच फरक आहे. अनेकांना हिंदीतला ‘नुक्ता’च माहीत नसतो. तसेच या दोन्ही भाषांमध्ये शब्दांच्या लिंगातही फरक आहे. ‘पोलिस’ हा इंग्रजी शब्द मराठीत पुल्लिंगी (पोलीस) तर याउलट हिंदीत स्त्रीलिंगी (पुलीस) आहे.  भाषाभाषांमधले असे अनेक बदल लक्षात येण्यासाठी मुलांचे वय हे बारा-तेरा वर्षे असले तर मुले चांगल्या प्रकारे इतर भाषाही बोलू शकतात. भाषा लादण्यापेक्षा ती ‘का शिकायची?’ हे उमगण्याइतपत समज मुलांना येणे आवश्यक आहे.