scorecardresearch

आपला कोण, भारतीय शेतकरी की चिनी व्यापारी?

‘आपले सरकार आले आणि हिंदू सणांवरचे विघ्न टळले’ असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना चिनी व्यापाऱ्यांमुळे आपला फूल उत्पादक शेतकरी नाडला जातो आहे, ते दिसत नाही का?

आपला कोण, भारतीय शेतकरी की चिनी व्यापारी?
आपला कोण, भारतीय शेतकरी की चिनी व्यापारी?

तुषार गायकवाड

महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनानंतर अलीकडे उद्वेगजनक म्हणता येतील अशा काही जाहिराती मुंबईत बघायला मिळाल्या. ‘आपले सरकार आले आणि हिंदू सणांवरचे विघ्न टळले’ असे म्हणणाऱ्या या जाहिराती होत्या. अनेकांना ही ओळ वाचून ‘हिंदू सणांवर आजवर कोणते विघ्न आले होते?’ हे सत्ताधाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून विचारावेसे वाटले असेल, तर आश्चर्य नाही. करोनाकाळात सार्वजनिक सणांवर बंदी होती यामागचे विज्ञान लक्षात येण्याइतपत विवेक जागा असावा अशी आशा आहे. गणपती ही बुद्धीचीच देवता असल्याने अशी आशा करायला हरकत नाही. आणि त्याआधी अनेक वर्षे, सरकार कुणाचेही असले तरी सगळे सण आवाजाची मर्यादा न सांभाळता धूमधडाक्यात साजरे होतच होते.

हिंदुत्वाचा, म्हणजेच धर्मभावनेचा जयघोष करताना आपले जे बौद्धिक नुकसान होते आहे तिकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. आज धर्म आणि धार्मिकतेची प्रस्तुतता काय, तिचे अधिष्ठान असावे, नसावे हा वेगळ्या चर्चेचा विषय. पण धार्मिक उत्सव, सणवार यांची एक मानसिक-सामाजिक गरज असते हे मान्य करूनही, धार्मिकतेच्या पुढे ‘सदसद्विवेका’ची सर्रास बळी देण्याची आपल्याला जी सवय लागली आहे, ती आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी घातक आहे हे निक्षून सांगितले पाहिजे. हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्यांनी तर ‘धार्मिकता’ या हळव्या, एका अर्थी बुद्धिगम्य नसणाऱ्या, भावनेचा पुरेपूर वापर करून घेत जनमानसाला इतके अंध करून सोडले आहे की, धर्म हा अभ्यासाचा नसून फक्त अभिमानाचा आणि दुसऱ्या धर्मांकडे शत्रुभावाने पाहण्याचा विषय राहिलेला आहे. महाराष्ट्रात एकेकाळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे यांच्यासारखे विद्वान अभ्यासक वाईत ‘सर्वधर्म अध्ययन केंद्र’ चालवत होते. त्या काळी धर्म हा द्वेषयुक्त प्रचाराचा मुद्दा नव्हता, हे आजच्या मराठी जनांना कदाचित माहीतही नसेल. असो.

हिंदूंच्या हिताची राजकीय जपमाळ ओढताना काही हिंदू सोयीस्करपणे दुर्लक्षित राहतात. अशा वेळी बहुधा ते ‘हिंदू’मधून ‘नागरिका’त रूपांतरित होत असावेत. असेच काही हिंदू/नागरिक म्हणजे फूल उत्पादक शेतकरी. हिंदू सणांच्या निमित्ताने त्यांच्यावर प्रकाशझोत टाकायला हरकत नाही. सण साजरे करणारे हिंदू आहेत तर मग सणासुदीसाठी फुलांचे उत्पादन करणारे भूमिपुत्र अहिंदू आहेत का? भूमिपूत्रांचा रोजगार हिरावणे हे नव्या सरकारचे हिंदुत्व आहे का, हे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, वर उल्लेखलेल्या जाहिरातीतील मजकुराच्या नेमकं विरुद्ध डबल इंजिन (राज्य व केंद्र) सरकारचे वर्तन सुरू आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्र शेतकरी आधी अतिवृष्टी व आता परतीच्या पावसाने हैराण झाले आहेत. जोडधंदा असलेल्या पशुधनावर लम्पी रोगाचं संकट आलं आहे. रास्त आणि किफायतशीर भावाची, एफआरपीची (Fair and remunerative price) रक्कम अनेक साखर कारखान्यांनी थकवलेली आहे. अशा परिस्थितीत, फुलांचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना फूलशेती हा एक आधार आहे. मात्र डबल इंजिन सरकारच्या कारभारामुळे फूल उत्पादक हिंदू शेतकऱ्यांवरच विघ्न आले आहे. कारण, सरकार चालवणारे धर्माच्या व सण साजरे करण्याच्या नावाखाली जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. सण साजरे करणे म्हणजे, आवाजाची मर्यादा ओलांडून नाच-गाणी बजावणं म्हणजे हिंदुत्व असा समज करून देत आहेत.

दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र ते दिवाळी या सणांच्या दरम्यान झेंडू व इतर फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हाती चार पैसे पडतात. करोनामुळे दोन मोसम वाया गेले. करोनाच्या पहिल्या लाटेत तर फुलांची तोडणी करून ती बाजारात घेऊन जाणंही परवडणारं नसल्याने शेतकऱ्यांनी फुलांच्या पिकावर नांगर फिरविला. लागवडीचा खर्चही अंगावर पडला. फवारणी, खतं, औषधं यांचा मोठा खर्च होतो. सर्वसाधारणपणे हेक्टरी १.२५ लाखापर्यंत खर्च होतो. शेतमालाचा पडेल बाजारभाव, करोना, निसर्ग चक्रीवादाळाचे संकट, अतिवृष्टी या संकटांचा सामना करणाऱ्या फूलशेतकऱ्यांपुढे यंदा नवंच संकट उभं ठाकलं. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून प्लास्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात सुरू झाला आहे.

पर्यावरणाला घातक प्लास्टिकच्या कटफ्लॉवर्सपासून सुरुवात होऊन आता हे प्रकरण मोगरा, शेवंती, झेंडू, आंबा, आणि दारोदारी लावण्याच्या तोरणापर्यंत पोहोचलं आहे. मागील दोन वर्षांचा करोनाकाळ हे वैश्विक संकट होतं. ते संकट संपल्यावर सर्व मंदिरं खुली झाली. विविध सण उत्साहात साजरे होऊ लागले. त्यामुळे मोठ्या आशेने, फूलउत्पादक शेतकऱ्यांनी फुलांचं क्षेत्र वाढवलं. मात्र जागोजागी चिनी प्लास्टिक फुलांची विक्री वाढली आहे. हिंदू मंदिरातील सजावटीसाठीही कृत्रिम फुलांचा वापर होत आहे. नैसर्गिक फुलं नाशवंत असल्यामुळे त्यांची विक्री रोजच्या रोज झाली नाही, तर ती फेकून द्यावी लागतात.

शेतकऱ्यांनी फेकून दिलेली फुलं विघटनशील असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहण्यास मदत होते. पण पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकला झुकते माप देण्याचं सरकारी धोरण भूमिपुत्रांच्या मुळावर उठलं आहे. एका बाजूला हिंदूंचे सण नैसर्गिक-पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा, असं म्हणत गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ऐवजी शाडू मातीच्या, गोमय गणेशमूर्तींचा वापर वाढवण्यावर भर द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला चिनी प्लास्टिक फुले, तोरणमाळा यांच्या विक्री व वापराला खुली सूट द्यायची. हा दुटप्पीपणा कशासाठी? प्लास्टिक पर्यावरणास किती घातक आहे, याची सर्वांनाच जाण आहे. सरकारमधल्यांनाही असायला हवी.

प्लास्टिकबंदीच्या घोषणा राज्यात अनेक वेळा झाल्या, याबाबतचे निर्णयही झाले. परंतु हे सगळे निर्णय कागदावरच ठेवून, नव्या डबल इंजिन सरकारने चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांची विक्री सुरू ठेवत ‘आत्मनिर्भर भारत’च्या गप्पा मारणं, हे हिंदूहिताचं कसं? भारतीय पर्यावरणास घातक असलेली परदेशातील वस्तू वापरणं हे शिंदे-फडणवीस यांच्या हिंदुत्वात कसं काय बसतं? आपल्या देशात शेतीमालाचे भाव वाढत असताना तात्काळ निर्यातबंदी लादली जाते. आता चिनी प्लास्टिक फुलं तसंच इतर सजावटीच्या साहित्याने देशातील शेतकरी मातीत जात असताना त्यावर आयातबंदी लादण्याचं धाडस केंद्र सरकार का दाखवत नाही? प्लास्टिकच्या फुलांची देशांतर्गत निर्मिती आणि विक्री थांबायला हवी. त्याचप्रमाणे चीनकडून आयातही थांबवली गेली पाहिजे.

चीनसोबत डोळे लाल करून बोलणी केली पाहिजेत, असं म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारप्रमाणेच हिंदूंच्या तोट्याचं धोरण राबवले आहे. अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी २०१८ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार, २००७-०८ या आर्थिक वर्षात चीन आणि भारताचा व्यापार ३८ अरब डॉलरचा होता. २०१७-१८ मध्ये हा व्यापार वाढून ८९.६ अरब डॉलरचा झाला. भारताच्या चीनकडून आयातीमुळे चीनला ५० अरब डॉलरची वृध्दी झाली. तर याच दरम्यान भारताला चीनकडून निर्यातीत केवळ २.५ अरब डॉलरचे परकीय चलन मिळाले. याच अहवालात असंही म्हटलंय की, ‘नॅशनल सोलर मिशन’ उपक्रमाचं ८४% साहित्य चीनमधून आलं आहे. २०१८-१९ मध्ये ८५.५ अब्ज डॉलर्सचा व्यवहार झाला होता. तर २०२० मध्ये दोन्ही देशांमध्ये ७७.७ अब्ज डॉलर्सचा व्यवहार झाला. ही माहिती भारताच्या व्यापार मंत्रालयाने दिली आहे. २०२० मध्ये चीनबरोबरच्या द्विपक्षीय व्यापारातील अंतर तब्बल ४० अब्ज डॉलर्सचं आहे. एक प्रकारे हे भारताचं आणि हिंदूंचं नुकसानच आहे.

भारताने अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीकडून, मिळून जेवढी खरेदी केली, त्यापेक्षाही जास्त ५८.७ अब्ज डॉलर्सच्या सामानाची आयात चीनकडून केली. अमेरिका आणि यूएई हे भारताचे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचं संकट असताना भूमिपुत्रांना संकटातून बाहेर काढण्याऐवजी शत्रुराष्ट्र म्हणून गणल्या जाणाऱ्या चीनसोबत व्यापार वाढवून हिंदू भूमिपुत्रांना उपाशी ठेवणारं ‘ऐक’नाथी सरकार हिंदुत्ववादी कसं?

हिंदू सणांसाठी, हिंदू मंदिरांसाठी, दैवतासांठी फुलांचं उत्पादन करणारे भूमिपुत्र पाकिस्तानातून आले आहेत का? शेतीमध्ये नावीन्यपूर्ण काही करू पाहणाऱ्या युवा शेतकऱ्याच्या पदरी निराशा आणि आर्थिक नुकसान आलं आहे. स्वस्तात मस्त प्लास्टिक फुलांमुळे नैसर्गिक फुलांची बाजारातील मागणी धोक्यात आली आहे. उठाव नसल्यामुळे शेतातील फुलं जागेवर सडून जातायत. काही प्रमाणात फुलं विकली गेली, तरी म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. भूमिपुत्रांचा रोजगार हिरावणं, फूलशेतीचं क्षेत्र कमी करणं, पर्यावरणाचा ऱ्हास करणं, हे यांचं हिंदुत्व आहे का? मग राज्यात चिनी प्लास्टिक फुलांची सर्रास विक्री व वापर का सुरू आहे? माजी खासदार राजू शेट्टी यांनीही याबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना निवेदन दिलं आहे.

शेट्टींच्या मागणीच्या बातमीची लिंक:

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/floriculture-business-in-the-country-at-a-loss-due-to-import-of-chinese-made-plastic-flowers-raju-shetty-130221225.html

धर्माचं राजकारण करणाऱ्यांनी आणि त्या राजकारणामुळे आपला ‘धार्मिक विवेक’ गमावून बसणाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं. हे असलं राजकारण आपला सामाजिक बुद्ध्यांक कमी करते आहे, हे लक्षात घ्यावं. अन्यथा, येत्या काही वर्षांत श्रीगणेशालाच निवडणुकीचा उमेदवार म्हणून जाहीर केलं गेलं आणि त्याला लोकांनी मतंही दिली, तरी आश्चर्य वाटायला नको!

(लेखक ग्रामीण प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

tushargaikwad1312@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या