२ ऑक्टोबर किंवा ३० जानेवारीलाच निघणारी महात्मा गांधींची आठवण सदासर्वदा जपणारे आणि इतरांनाही देणारे सात सेवा प्रकल्प विदर्भात आहेत, त्यांची ओळख करून देणारे हे पुस्तक प्रेरणेचा दिवा तेवता ठेवणारे..

देवेंद्र गावंडे

‘आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपल्या स्वत:मध्ये बदल होणे अत्यंत आवश्यक आहे.’ राष्ट्रपिता महात्मा गांधींचे हे प्रसिद्ध वाक्य. त्यापासून प्रेरणा घेत देशविदेशातील अनेकांनी सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. त्यातल्या काहींच्या वाटय़ाला भरपूर प्रसिद्धी आली तर काही उपेक्षितच राहिले. तरीही त्यांच्यातील बदल घडवून आणण्याची जिद्द तसूभरही कमी झाली नाही. काहींच्या कार्याची चर्चा झाली, पण ती प्रदेश, राज्यापुरती सीमित राहिली. अशांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकण्याचे काम ‘बीइंग द चेंज-  इन द फूटस्टेप्स ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकाने केले आहे. हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे लेखक आहेत आशुतोष सलील व बरखा माथुर. यातल्या बरखा पत्रकार, तर सलील सनदी अधिकारी. सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले सलील मूळचे बिहारचे. महाराष्ट्र कॅडर मिळाल्यावर त्यांचा प्रारंभीचा काळ विदर्भात गेला. उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व जिल्हाधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी विदर्भात काम केले. साधारणपणे परराज्यातून येणारे सनदी अधिकारी कर्तव्य बजावताना त्या त्या ठिकाणांच्या औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात फारसे स्वारस्य दाखवत नाहीत. ‘आपण भले व आपले काम भले’ अशीच त्यांची वृत्ती असते. सलील याला अपवाद ठरले. वर्धा, चंद्रपूर अशा ठिकाणी काम करत असताना त्यांना गांधींचे सेवाग्राममधील वास्तव्य सतत खुणावत राहिले. आजही अनेक जण गांधींच्या या ऐतिहासिक वास्तव्याच्या खुणा शोधत असतात. त्यांच्या कार्याला वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न फार थोडे करतात. सलील त्यातले एक.

 तसाही विदर्भाचा सेवेचा वारसा अतिशय समृद्ध. अनेक शतकांपासून चालत आलेला. त्यावर कळस चढवला तो गांधींनी. त्यांचे हे काम पुढे नेण्याचा प्रयत्न आज विदर्भात अनेक जण करत आहेत. त्यातल्या सातांची ओळख सलील यांचे हे पुस्तक करून देते. त्यामुळे केवळ काही काळासाठी विदर्भात आलेल्या व येथील सेवाकार्याने प्रभावित झालेल्या एका अधिकाऱ्याचे हे पुस्तक वेगळे व उल्लेखनीय ठरते.

चतु:सूत्र : गांधीजींच्या जनआंदोलनांमागील भूमिका

सैन्याऐवजी समाजसेवेत

यातले पहिले नाव आहे बंडू धोत्रे. साधा सर्पमित्र ते जंगल व वन्यप्राणी वाचवणारा हाडाचा कार्यकर्ता हा त्याचा प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला. घरी कमालीचे दारिद्रय़. वडील आठवडी बाजारात दुकान लावणारे. त्यामुळे फारसे शिक्षण न घेऊ शकलेल्या बंडूला सैन्यात जायचे होते. ते शक्य न झाल्याने त्याने नंतर अनेक उद्योग केले. पण जंगल व त्यातले प्राणी यावर त्याचा विशेष जीव. त्या प्रेमातून त्याच्यातला कार्यकर्ता हळूहळू घडत गेला. बंडू अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला तो अदानी समूहाच्या ताडोबालगतच्या प्रस्तावित खाणीला विरोध केल्याने. सलग तेरा दिवस केलेल्या त्याच्या आमरण उपोषणाची दखल देशभरात घेतली गेली. तेव्हाचे पर्यावरणमंत्री जयराम रमेश थेट चंद्रपूरला आले व त्यांनी खाणीचा प्रस्ताव रद्द केला. या यशाने हुरळून न जाता बंडूने त्याचे काम अतिशय निष्ठेने सुरूच ठेवले आहे. तलावांचे संवर्धन असो वा किल्ल्यांची डागडुजी असो, बंडू व त्याची फौज अगदी नेटाने हाती घेतलेले काम पूर्ण करते. त्याने तयार केलेले ‘नागरी सुरक्षा दल’ मानव-वन्यजीव संघर्षांवर अहोरात्र झटते. बिबटय़ाला पिंजऱ्यात पकडण्याचे काम असो वा वाघाला, बंडूची चमू वनखात्याच्या दिमतीला तत्परतेने हजर असते. या कामासाठी त्याला आजवर अनेक पुरस्कार मिळाले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये त्याचा गौरव केला. समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नावर काम करणे हाच गांधींचा विचार पुढे नेणे होय अशा शब्दांत लेखक त्याचा उल्लेख करतात.

दुसरे उदाहरण आहे रवींद्र व स्मिता कोल्हे या दाम्पत्याचे. मेळघाटातील आदिवासींना आरोग्यसेवा देणारे, त्यांचे जमिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे कोल्हे दाम्पत्य महाराष्ट्राला नवीन नाही. सलील यांच्या या पुस्तकामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळेल हे निश्चित. वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर शिवाजी पटवर्धन व प्रकाश तसेच मंदाकिनी आमटेंच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी मेळघाटचा मार्ग निवडला. त्याला आता तीन दशके लोटली. या काळात कोल्हे दाम्पत्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अंधश्रद्धा, भाऊबंदकी अशा मागास विचारात गुरफटलेल्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे सोपे नाही. त्यामुळे या प्रयत्नात त्यांच्यावर हल्ले झाले, आरोप झाले; पण न डगमगता ते धारणीजवळच्या बैरागडला काम करत राहिले. ‘व्हेअर देअर इज नो डॉक्टर’ या डेव्हिड वेर्नरच्या पुस्तकाचा प्रभाव अजूनही आपल्यावर आहे, सोबतीला गांधीजी आहेतच, असे ते लेखकाला सांगतात. मेळघाटमधील कुपोषण व आरोग्याचे प्रश्न आजही संपलेले नाहीत. त्यात अनेक अडचणी आहेत. सरकारी सेवा अपुरी आहे. त्याला दोष देत बसण्यापेक्षा स्वत: जमेल तशी सेवा देत राहायची हेच ध्येय या दाम्पत्याने अंगी बाळगले आहे. हा मार्ग आम्ही स्वत:हून शोधलेला, त्यामुळे आजही आम्ही खूश व आनंदी आहोत हे त्यांचे लेखकाला सांगणे गांधींच्या भूमिकेची आठवण करून देणारे.

लोकरंग विशेष : गांधी एक अपरिहार्य रहस्य

‘लेखामेंढा’चे ग्रामस्वराज्य

तिसरे नाव आहे मोहन हिराबाई हिरालाल व देवाजी तोफा या जोडीचे. सत्तरच्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने प्रेरित होऊन बाबा आमटेंसोबत समाजकार्याला सुरुवात करणारे मोहनभाई नंतर मध्य भारतातील जंगल प्रदेशात ठिकठिकाणी फिरले. त्यात राहणाऱ्या आदिवासींचे प्रश्न समजून घेतले. सरकारी योजनांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवायचे असतील तर आदिवासींनीच कृती कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. केवळ शाश्वत विकासाची कल्पना राबवूनच ते सुटू शकतात असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हाच त्यांची लेखामेंढाच्या देवाजी तोफांशी भेट झाली. या भेटीला निमित्त ठरले इंचमपल्ली धरणाविरुद्धचे आंदोलन. गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पना अमलात आणायची असेल तर एखादे तरी गाव आदर्श म्हणून उभे करायला हवे असे ठरल्यावर मोहनभाई व देवाजींचे काम सुरू झाले. जंगल, त्यातले प्राणी राखूनसुद्धा विकास होऊ शकतो हे या दोघांनी गेल्या २५ वर्षांत लेखामेंढात सिद्ध करून दाखवले. संयुक्त वन व्यवस्थापन असो वा वनाधिकार अथवा पेसा. गावांनीच प्रशासनाच्या मदतीने कायदा राबवण्याचा प्रयोग केला तर तो यशस्वी ठरू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून या गावाकडे बघता येईल असे लेखक नमूद करतो.

चौथे नाव आहे ते मतीन भोसलेचे. आधी ब्रिटिशांनी व आता व्यवस्थेने गुन्हेगार ठरवलेल्या फासेपारधी जमातीचा हा शिक्षित प्रतिनिधी. मेळघाटमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी एका नाल्यात लपून बसलेल्या जमातीतील दोन मुलांचा पाण्यात बुडून झालेला मृत्यू मतीनला हादरवून सोडतो. मग तो नोकरीचा त्याग करून अमरावतीजवळ याच फासेपारधी मुलांसाठी प्रश्नचिन्ह नावाची शाळा काढतो. आज त्याच्या शाळेत पाचशे मुले शिक्षण घेतात. हे खरे गांधींच्या मार्गावरून चालणे या शब्दांत लेखक मतीनचा गौरव करतात. हा समाज शिक्षित होणार नाही तोवर त्यांच्या कपाळी असलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसला जाणार नाही याची जाणीव मतीनला आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून त्याचा प्रवास सुरू आहे. तो इतर वंचित घटकांना प्रेरणा देणारा आहे असे मत लेखक नोंदवतात.

पाचवे नाव हेमलकसातील आमटे कुटुंबातील नव्या पिढीचे. दिगंत व अनिकेत ही प्रकाश व मंदा यांची मुले. अनघा व समीक्षा या सुना. या चौघांनी लोकबिरादरीचे काम पुढे नेण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यात त्यांना मिळालेले यश याची कथा लेखक अगदी खुलवून सांगतात. डॉक्टर असलेल्या दिगंत व अनघाने आरोग्यसेवेचे काम नुसते सांभाळलेच नाही तर त्याला आधुनिक रूप दिले. शस्त्रक्रियेसाठीच्या सोयी उभ्या केल्या. अनिकेत व समीक्षाने तेथील आश्रमशाळेचा कायापालट करून आणखी दर्जेदार स्वरूप दिले. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर भामरागडपासून तीस किलोमीटर दूर असलेल्या नेलगोंडाला चक्क इंग्रजी शाळा काढली. काळानुरूप सेवेचे स्वरूप कसे बदलायला हवे याचे हे उत्तम उदाहरण. याच नव्या पिढीने भामरागड परिसरात लोकसहभाग व मान्यवरांच्या देणगीतून अनेक तलाव बांधले व कृषी क्षेत्र मजबूत कसे होईल याकडे लक्ष दिले. ग्रामसक्षमीकरणाचा गांधींचा विचार तरुणसुद्धा पुढे नेत असल्याचे दुर्मीळ दृश्य विदर्भात दिसले, असे मत लेखक नोंदवतात.

पडद्यावरचा न नायक!

आरोग्यसेवेचे काम

सहावे नाव सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांचे. कुरखेडय़ातील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ हा त्यांचा प्रकल्प सर्वाना ठाऊक. हे दोघेही जेपींच्या आंदोलनातले पाईक. त्यातून उसंत मिळाल्यावर त्यांनी गडचिरोलीजवळ केले. सतीश डॉक्टर तर शुभदा समाजकार्याच्या पदवीधर. यातून आरोग्य व सामाजिक सेवेचे काम सुरू झाले. या दोघांनी वनऔषधी तयार करणे, नष्ट होत चाललेल्या धान्याच्या जाती जतन करणे, महिलांचे बचतगट, वनाधिकार व पेसाच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींना मदत करणे अशा अनेक क्षेत्रांत कार्याचा व्याप वाढवला. गडचिरोलीत काम करणे तसे सोपे नाही. जिथल्या हिंसेचीच चर्चा जास्त होते तिथे गांधींचा सेवाभाव रुजवणे व त्यापासून तसूभरही न ढळणे हे काम तसे कठीण. मात्र या सर्वानी प्रतिकूल परिस्थितीचा प्रभाव स्वत:वर पडू दिला नाही, असे लेखक म्हणतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटचे नाव आहे डॉ. आशीष व कविता सातव या दाम्पत्याचे. सेवा क्षेत्रातील नव्या पिढीचे हे प्रतिनिधी मेळघाटात ‘महान प्रकल्पा’च्या माध्यमातून आरोग्यसेवा देतात. आमटे कुटुंबापासून प्रेरणा घेत त्यांनी १९९७ पासून काम सुरू केले. आज त्यांचे सुसज्ज रुग्णालय या भागातील आदिवासींसाठी वरदान ठरले आहे. लहान मुलांवर वेळेत उपचार करणे ही या दोघांची खासियत. त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले. एखाद्या समस्येच्या संदर्भात केवळ सरकारला दूषणे देत न बसता स्वत: पुढाकार घेणे केव्हाही चांगले या भावनेतून या दोघांनी सुरू केलेल्या सेवेचा वृक्ष आता चांगलाच बहरला आहे. या दोघांनी ३७१ गावांचा कुपोषणाच्या मुद्दय़ावर केलेला अभ्यास प्रसिद्ध आहे. सरकारी यंत्रणा व सेवा क्षेत्राने हातात हात घालून काम केले तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात असा विश्वास लेखक या पुस्तकात व्यक्त करतात. आज सद्भावना, सहृदयता लोप पावत चाललेली आहे. गांधींच्या मुखातून नेहमी निघणारे हे शब्द सेवेच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे व समाजात एक चांगला संदेश देण्याचे काम या सातही जणांनी केले आहे. विदर्भाचा हा वैशिष्टय़पूर्ण वारसा इंग्रजी वाचकांना उपलब्ध करून देण्याचा सलील व माथुर यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळेच हे पुस्तक उल्लेखनीय ठरते.