scorecardresearch

Premium

उर्दू पत्रकारितेनं इतिहास पाहावाच, आणि वर्तमानही..

भारताची फाळणी झाली तेव्हा एकूण ४१५ उर्दू दैनिकं, साप्ताहिकं प्रकाशित होत होती. स्वातंत्र्यलढ्यात आणि हिंदू-मुस्लीम एकतेत त्यांचं मोलाचं योगदान होतं. आज उर्दू वर्तमानपत्रांची स्थिती काय आहे?

History and present should be observed by Urdu Journalism ( photo courtesy - social media )
उर्दू पत्रकारितेनं इतिहास पाहावाच, आणि वर्तमानही.. ( छायाचित्र सौजन्य – सोशल मिडीया )

जतिन देसाई

उर्दू पत्रकारितेला २०० वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. भारतात पत्रकारितेची सुरुवात १७८० च्या जानेवारीत ‘हिकीज बेंगाल गॅझेट’पासून झाली होती. १८२२ ला उर्दू भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र ‘जाम-ए जहाँ नुमा’ सुरू झालं. त्यानंतर आजवर उर्दू पत्रकारितेनं अनेक चढ-उतार पाहिले. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा अत्याचार सहन केला. देशासाठी शहीद होणारा पहिला पत्रकारही उर्दू भाषेतला होता. आज उर्दू पत्रकारिता आणि उर्दू माध्यमं कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे समजून घेणंदेखील आवश्यक आहे.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

भारतातलं पहिलं वर्तमानपत्र कलकत्त्याहून (आजचं कोलकाता) सुरू झालं. दुसरं वर्तमानपत्र ‘इंडिया गॅझेट’ही तिथूनच १७८० च्या नोव्हेंबरमध्ये सुरू झालं. बंगाल गॅझेटमधून तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज आणि अन्य अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार, अत्याचाराच्या बातम्या येत. तर इंडिया गॅझेटमधून हेस्टिंग्जचा बचाव करण्यात येत असे. ईस्ट इंडिया कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी इंडिया गॅझेट सुरू केलं. आजच्या भाषेत, इंडिया गॅझेट हे तेव्हाचं ‘गोदी मीडिया’ होतं. याच कलकत्ता शहरातून ‘जाम-ए जहाँ नुमा’ नावाचं वर्तमानपत्र २७ मार्च १८२२ ला सुरू झालं. हरिहर दत्ता याने ते सुरू केलं आणि सदासुख लाल त्याचे संपादक होते. हरिहर यांचे वडील ताराचंद दत्ता बंगाली भाषेतील पत्रकार होते आणि ‘संवाद कौमुदी’ नावाच्या बंगाली साप्ताहिकाच्या संस्थापकांपैकी एक होते. ‘जाम-ए जहाँ नुमा’मार्फत लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करण्यात येत असे.

१८५७ मधील उर्दू संपादकीय

मौलवी मोहम्मद बकर हे विद्वान, पत्रकार, हिंदू-मुस्लीम एकतेचे आणि भारतीय स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक होते. त्यांनी १८३५ मध्ये ‘दिल्ली उर्दू अखबार’ नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. सुरुवातीची काही वर्षं त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. २१ वर्षं चाललेल्या या वर्तमानपत्रातून सामाजिक आणि राजकीय जनजागृती करण्याचा प्रयत्न होत असे. परकीय साम्राज्याच्या विरोधात लोकांनी एकत्र यावं हा त्यांचा उद्देश होता. १२ जुलै १८५७ला त्यांनी वर्तमानपत्राचं नाव बदलून ‘अखबार ऊझ झफर’ असं केलं. ४ जून १८५७ च्या अंकात पहिल्या स्वातंत्र्यसमराच्या संदर्भात त्यांनी लिहिलं, ‘ही संधी वाया जाऊ देऊ नका, जर आपण ही संधी जाऊ दिली तर कोणी मदत करायला येणार नाही. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांपासून स्वतंत्र होण्याची ही संधी आहे.’ १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न मौलवी बकर यांनी आपल्या लेखणीतून अतिशय प्रभावीपणे केला.

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यसमराचं समर्थन करण्याच्या व त्याला मदत करण्याच्या आरोपाखाली १४ सप्टेंबर १८५७ ला त्यांना पकडण्यात आलं. दोन दिवसांनंतर म्हणजे १६ सप्टेंबरला ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. स्वातंत्र्यासाठी शहीद होणारे ते पहिले भारतीय पत्रकार होते, मात्र त्यांचं कार्य अपरिचितच राहिलं. भारतातून १८५३ मध्ये ३५ उर्दू वर्तमानपत्र निघत, पण १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात उर्दू पत्रकार आणि उर्दू माध्यमांवर प्रचंड अत्याचार करण्यात आले, त्यामुळे १८५८ मध्ये ही संख्या कमी होऊन १२वर आली.

उर्दूतलं ‘वंदे मातरम’

लाला लजपत राय यांनी ‘वंदे मातरम’ नावाचं उर्दू वर्तमानपत्र लाहोरहून सुरू केलं होतं. शहीद भगतसिंग अनेकदा उर्दू भाषेतून लेखन करत. कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात उर्दू भाषेतून केली होती. लाहोरहून १९०३ मध्ये अल हिलाल मौलाना अबुल कलाम आझाद याने सुरू केलेलं ‘जमीनदार’ हे कट्टर राष्ट्रवादी वर्तमानपत्र होतं. त्याचा खप ३० हजारांहून अधिक होता. त्यातून मौलाना त्यांचे विचार मांडत. लोकांमध्ये राजकीय आणि धार्मिक बाबतीत जागृती करण्याचं काम अल हिलाल यांनी मोठ्या प्रमाणात केलं. १९१९ मध्ये एम. कृष्णन यांनी ‘प्रताप’ नावाचं वर्तमानपत्र लाहोरहून सुरू केलं. ‘प्रताप’ने गांधीजींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. ब्रिटिशांनी अनेकदा ते बंद पाडलं. पंजाब आणि दिल्लीतल्या हिंदू समाजावर ‘प्रताप’चा मोठा प्रभाव होता.

१९ व्या शतकातल्या बहुतेक उर्दू वर्तमानपत्रांचे संपादक आणि प्रकाशक हिंदू होते. उर्दूही सर्वसामान्यांची भाषा होती. उर्दू भाषेचा धर्माशी काही संबंध नव्हता. आर्य समाजने देखील १९२३ मध्ये ‘मिलाप’ नावाचं दैनिक लाहोरहून सुरू केलं होतं. राजस्थान, उत्तर भारत आणि दिल्लीत मिलाप अत्यंत लोकप्रिय होतं. ब्रिटिशांनी अनेकदा मिलापचे अंक जप्त केले होते. त्याच वर्षी स्वामी श्रद्धानंद आणि देशबंधू गुप्ता यांनी ‘रोजाना तेज’ नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. देशबंधू गुप्ता त्याचे संपादक होते. स्वातंत्र्यलढ्यात या सर्व उर्दू वर्तमानपत्रांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली. हिंदू-मुस्लिम समाजाने एकत्र असलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. भारताची १४-१५ ऑगस्ट १९४७ ला फाळणी झाली तेव्हा एकूण ४१५ उर्दू दैनिकं, साप्ताहिकं प्रकाशित होत होती. त्यापैकी ३४५ वर्तमानपत्रं, साप्ताहिकं भारतात राहिली. त्यातून देखील उर्दू पत्रकारितेचं स्वरूप, विचार स्पष्ट होतो. मोहम्मद अली जिना यांचा धर्माच्या आधारावर फाळणीचा विचार उर्दू पत्रकारितेने मोठ्या प्रमाणात नाकारला होता हे पण त्यातून स्पष्ट होतं.

धर्मापेक्षा भाषा मोठी

स्वातंत्र्यानंतर भारतात हळूहळू उर्दूचं महत्त्व कमी होत गेलं. पंजाब, उत्तर भारत आणि पूर्व भारतात उर्दूचा प्रभाव होता. साहजिकच हैदराबाद संस्थानात उर्दूला सर्वाधिक महत्त्व होतं. पाकिस्तानने इतर भाषांपेक्षा उर्दूला अधिक महत्त्व दिलं आणि उर्दू हीच राष्ट्रभाषा असल्याचं जाहीर केलं. पाकिस्तानची फाळणी आणि बांगलादेश मुक्ती हा त्याचाच परिणाम होता. पूर्व पाकिस्तानच्या लोकांची भाषा बंगाली होती. बंगाली भाषेलाही उर्दू एवढंच महत्त्व देण्याची त्यांची मागणी होती. पण पश्चिम पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्व पाकिस्तानच्या लोकांची ही रास्त मागणी नाकारली. हा नकार आणि १९७० च्या निवडणुकीनंतर अवामी लीगच्या मुजिबूर रहमान यांना सत्ता न देण्याच्या निर्णयामुळे १९७१ ला स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला. भाषेचं महत्त्व यातून स्पष्ट होतं.

उर्दू पत्रकारिता आणि माध्यमांसमोर आज अनेक आव्हानं आहेत. उर्दूच्या गौरवशाली इतिहासाला पुढे कसं न्यायचं, उर्दू पत्रकारितेला परत प्रतिष्ठा कशी मिळवून द्यायची ही त्यातली मोठी आणि महत्त्वाची आव्हानं! सर्वसमावेशक वस्तुनिष्ठ मांडणी ही काळाची गरज आहे. इतर भाषेतील वर्तमानपत्रांप्रमाणेच त्यांच्यासमोरही खप, जाहिराती आणि वाचकांचा प्रश्न आहे.

स्वातंत्र्यानंतर धर्म आणि उर्दू भाषा याचं मिश्रण झालं. खरंतर कुठलीही भाषा कुठल्याही धर्माची नसते. भाषा आणि धर्माचा संबंध नसतो. उर्दूचाही धर्माशी संबंध नव्हता. दुर्दैवाने नंतर उर्दूचा धर्माशी संबंध जोडला गेला. उर्दू भाषा मुस्लिमांची आहे अशी मानसिकता मुस्लिम नसलेल्या समाजात निर्माण झाली. दुसरीकडे मुस्लीम उर्दू ही त्यांचीच भाषा आहे, असं गृहीत धरू लागले. उर्दू वर्तमानपत्रांनी प्रामुख्याने, मुस्लीम समाजाशी संबंधित बातम्या द्यायला सुरुवात केली. जगातल्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्याच प्रमाणात मुस्लीम राष्ट्र केंद्रित होत गेला. मुस्लिमांशिवाय इतर समाजांतल्या घटनांना कमी महत्त्व मिळू लागलं. अनेकदा सत्य वाचकांसमोर मांडलं जात नसे. या साऱ्याचा परिणाम उर्दू वर्तमानपत्रांना मिळणाऱ्या जाहिरातींवर झाला. कमी जाहिरातींमुळे वर्तमानपत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झालं. उर्दू पत्रकारिता कमी वेतन आणि अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली. आजच्या ‘गोदी मीडिया’च्या काळात अनेक वर्तमानपत्रं, मग ती कोणत्याही भाषेतली का असेनात, वस्तुनिष्ठ मांडणी करताना दिसत नाहीत. भारतीय माध्यमांसमोर हा एक मोठा प्रश्न आहे. उर्दू भाषेचा प्रचार आणि प्रसार होणं व मुस्लीम नसलेला समाजही या भाषेकडे आकर्षित होणं गरजेचं आहे. उर्दू माध्यमांनीही स्वत:च्या स्वरूपात बदल केला पाहिजे.

लेखक ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-09-2022 at 10:40 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×