अलीकडेच येऊ घातलेला यशराज फिल्म्सचा ‘मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा सिनेमा चर्चेत आहे तो, त्याच्या विषयामुळे. देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनादेखील लक्ष घालावे लागले होते, असेच ते प्रकरण होते. आपल्या लहान बाळांना जवळ घेऊन झोपतात, हाताने भरवतात म्हणून सागरिका आणि अनुप भट्टाचार्य या जोडप्यावर नॉर्वे सरकारने कारवाई केली होती. या जोडप्याच्या दोन्ही मुलांचा ताबा सरकारने म्हणजेच नॉर्वेच्या बालकल्याण विभागाने स्वत:कडे घेतला होता आणि आता या जोडप्याला मुलांना ती सज्ञान झाल्यानंतर म्हणजे १८ वर्षांनंतर भेटता येईल, असे सांगितले होते. या सगळ्या विरोधात सागरिका भट्टाचार्य न्यायालयात गेल्या होत्या. आई आणि मूल हे जैविक नाते मानले जात असल्यामुळे आपल्याकडेही माध्यमांनी हा विषय लावून धरला होता. अखेर तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यात मध्यस्थी केली आणि ते प्रकरण मिटले.

असेच आणखी एक उदाहरण आयर्लंडमधल्या सविता हलपन्नवार या दंतरोगतज्ज्ञ असलेल्या, १७ आठवड्यांची गर्भवती असलेल्या तरुण भारतीय विवाहितेचे. तिच्या शारीरिक परिस्थितीमुळे तिचा गर्भपात करणे आवश्यक होते, पण आयर्लंडमधील कायद्यांमुळे तिचा गर्भपात होऊ शकला नाही आणि तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

हेही वाचा – नॅकमुळे भौतिक सुविधा वाढल्या, गुणवत्तेचे काय?

आता उदाहरण अमेरिकेमधले. रुबा आणि अकिला यांची मुलं आणि माझी मुलगी साधारण एकाच वयाची म्हणून आमची ओळख झालेली! दररोज आम्ही एकत्र जमायचो, गप्पा मारायचो आणि आमची मुलं एकमेकांबरोबर खेळायची. एके दिवशी आम्ही रुबाकडे जमलो होतो, तेव्हा लक्षात आले की तिचे काहीतरी बिनसलेले आहे. तिच्याशी बोलल्यावर लक्षात आले की प्रश्न गंभीर आणि अचानक उद्भवलेला होता! रुबा आणि अकिला दोघीजणी लग्नानंतर अमेरिकेत आलेल्या, त्यांची मुलेही इथेच जन्मलेली होती. मात्र आता त्यांना सीरियात जाऊन घरच्यांना भेटायची आस लागली होती. हा २०१३-१४ चा काळ, सीरियात युद्ध पेटलेले! घरच्यांशी काही सतत संपर्क होत नव्हता! काय करावे सुचत नव्हते! रुबाचे सासू सासरे आणि आई-वडील जिथे राहत होते, त्या वसाहतीजवळच मोठी चकमक झाल्याचे बातम्यांमध्ये येत होते, त्यांचा फोन गेले काही दिवस लागतच नव्हता, त्यामुळे ती अस्वस्थ होती! तिच्या नवऱ्याने त्या सगळ्यांची तिकिटे बुक करून इस्तंबूलला जायचा निर्णय घेतला होता, तिथून पुढे जमेल तसे सीरियात शिरायचे असा विचार होता! यात जोखीम होतीच, पण ती घ्यायची असे त्यांनी ठरवले होते. मात्र त्यांना एक अनपेक्षित धक्का तर त्याआधीच बसला! त्यांच्या मुलाचे तिकीट ते काढू शकत नव्हते! कारण तो अमेरिकेत जन्मलेला असल्याने अमेरिकन नागरिक होता आणि त्याचे पालक मात्र अजूनही सीरियन होते! आणि सीरियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथे अमेरिकन नागरिकांना प्रवास करण्यास बंदी होती! आता इतक्या छोट्या मुलाला इथे अमेरिकेत सोडून जाणे शक्य नव्हते आणि तिकडे आपल्या आई-वडिलांच्या विचाराने हे तरुण जोडपे अस्वस्थ होते! आपला मुलगा अमेरिकन आहे याचा काही वर्षांपूर्वी ते आनंद व्यक्त करत, मात्र त्या वेळी भविष्यात अशी परिस्थिती आपल्यासमोर उद्भवेल याचा अंदाज त्यांना अजिबात नव्हता! ते त्यांचेच मूल होते, मात्र आता ते निरनिराळ्या देशांचे नागरिक असल्याने त्यांच्यात एक अदृश्य भिंत होती!

हा प्रकार थोडा विचित्र वाटला मला! म्हणजे आपण जन्माला घातलेल्या मुलांवर आपला पूर्ण हक्क नको? आपण जिथे जातो तिथे मुलांना सोबत नेता यायला नको? मात्र हा गुंता सुरू होतो तो स्थलांतरानंतर! एका देशातून दुसऱ्या देशात गेलो की तिथले सगळे निराळे नियम, व्हिसा आणि रेसिडेन्शियल परमिट यातील बारकावे अलगद आपल्याभोवती येऊन बसतात. अर्थात रुबाचे उदाहरण तसे टोकाचे होते! प्रत्येक देशांत काही असे युद्ध सुरू नसते, मात्र अमेरिकेत अथवा जगभरात कुठेही राहिले आणि तिथे संसार थाटला की अनेकदा तिथले नियम आड येतात आणि मुळात गुंतागुंतीचे असलेले पालकत्व अधिक जटिल होते खरे!

आपण माणसाच्या मूलभूत गरजा रोटी, कपडा आणि मकान अशाच अर्थी हे फरक जाणून घेऊ या! आपल्याला आपल्याच देशात वाढताना काहीच वावगे वाटत नसते. म्हणजे शाळेचा डबा उघडला की सगळ्या मुलांच्या डब्यातले पदार्थ साधारण ओळखीचे आणि एकसारखे असतात, किंवा आपण जसा घरी मार खातो, तसेच इतर मुले खात असणार याची खात्री असते! आपण जी जाहिरात आनंदाने गाण्यासारखी म्हणत आहोत, ज्या गाण्यावर नाचत आहोत, ते सगळं साधारण आपल्या वर्गातील इतर मुलांना माहीत आहे, त्यांची ती भाषा असो वा नसो! आपल्या वर्गातल्या बाईंनादेखील आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची ओळख आहे आणि त्यादेखील वेळ पडल्यास आपल्या आईशी तिच्या भाषेत बोलू शकतात! हे सगळं आपण गृहीत धरतो! मात्र जेव्हा स्थलांतर करून आपण निराळ्या देशात येतो तेव्हा हा संपूर्ण अनुभव पालक आणि पाल्य म्हणून पूर्णतः बदलून गेलेला असतो!

हेही वाचा – ‘दहा हजारांत प्रश्नपत्रिका विक्री’ यापेक्षा आणखी काय पुरावा हवा?

अमेरिकेसारखा मेल्टिंग पॉट अशा अर्थी जगभरातील लोकांनी आपलासा केलेला देश. इथे एखाद्या महानगरांत कोणी राहत असेल, तर त्यांचे शेजारी इतर देशांतले असतात, त्यांच्या भाषा निराळ्या, संस्कृती निराळी, खानपान निराळे! त्यामुळे सकाळी उठल्यापासून मुलांशी होणारा सर्व व्यवहार निराळा!

रोटी! अर्थात जेवण! प्रत्येक प्रांताचे जेवण निराळे हे काही भारतीयांना नवे नाही, साधारण सगळे पदार्थ आता भारतभर मिळतात, अशा अर्थी ओळखीचे आहेत. मात्र जेव्हा मुले अमेरिकेत अथवा इतर देशांत वाढू लागतात तेव्हा गोष्टी निराळ्या असतात! म्हणजे अमेरिकन घरांत साधारण पुरुष मंडळी सकाळची न्याहरी करायला मदत करतात. म्हणजे गार दूध एका वाडग्यात काढून त्या शेजारी सिरियलचा बॉक्स ठेवून देतात, पुष्कळ वेळा मुले स्वतःदेखील असा नाश्ता करून शाळेत जातात. फार फार तर एखादे फळ खात खात बसस्टॉपपाशी जातात. आपण मात्र पोरांना सकाळी जरा काही गरम पोटात जाईल म्हणून धडपडून नाश्ता बनवू लागतो! इथे शाळेत सगळ्यांना जेवण मिळते, तरी भारतीय वंशाच्या आया धडपडून मुलांसाठी काही डबा बनवून देतात. काही आया तर शाळेत जाऊन मुलांना भरवण्याचादेखील घाट घालतात. मात्र हे सगळे इथल्या लोकांना अतिशय निराळे वाटते! इथे मुलांना जमेल तेवढ्या लवकर स्वतंत्र केले जाते. म्हणजे काही महिन्यांच्या मुलांना एका हाय चेअरमध्ये बसवून जेवण स्वतःच्या हाताने करायची सवय लावली जाते. मुलांना भूक असेल तसे आणि तेवढेच ती खातील, आपण त्यांना भरवायचे कारण नाही, असा इथे शिरस्ता आहे. तसेच इथे रोज स्वयंपाक करायचा, रोज सर्व पदार्थ निगुतीने करायचे असा प्रकार नसल्याने सगळेच लोक आठवड्यातील पाच ते सहा दिवस बाहेरचे जेवण करतात. आई-वडील ऑफिसमध्ये खातात तर मुले शाळेत. घरात काही खास कारण असेल तरच काही बनवले जाते. अर्थात यातील प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेत.

आपण मुलांना जेवणाचा अपमान करू नये, पानात अन्न टाकू नये असे शिकवतो, मात्र इथे शाळेत जाऊन मुले पूर्ण विरुद्ध गोष्ट शिकतात, कारण शाळेत मिळणारे जेवण जर, अगदी तीन आणि चार वर्षांच्या मुलांनी वीसएक मिनिटात संपवले नाही, तर ती प्लेट, त्यातील अन्न सगळे एकत्र गोळा करून त्यांच्या शिक्षिका मुलांसमोरच सगळे कचऱ्यात फेकून देतात. अमेरिकेत एकूण अन्न फेकून देणे याला वावगे मानत नाहीत, त्यामुळे पूर्वेकडून आलेल्या देशांतील मुले आणि त्यांचे पालक कायम गोंधळतात, शाळा भलतेच काही शिकवत असेल तर मुलांना अन्नाची नासाडी करू नये हे शिकवायचे कसे, हा त्यांच्यापुढचा प्रश्न असतो!

कपडा अर्थात पोशाख. जी गत जेवणाची, तीच पोशाखाची! आपल्याकडे इतके विविधरंगी पोशाख आहेत, निरनिराळ्या पोतांचे कपडे आहेत आणि कोणीही कोणताही रंग वापरू शकतो! इथे मात्र लहान मुलांच्या बाबतीत पुष्कळदा असे आढळून येते की, लहान मुलींसाठी केवळ गुलाबी, लाल आणि जांभळ्या रंगातील पोशाख आणि खेळणी आहेत, तर मुलांसाठी निळ्या, नारिंगी आणि हिरव्या! मला मुलींसाठी नारंगी टीशर्ट घ्यायचा असेल तर तो मिळणे मुश्कील! म्हणजे मुलगा मुलगी हा भेद अगदी कॉलेजवयीन मुलांच्या वस्तूंपर्यंत किंवा त्याही पुढे जाणवतो! इतकेच नाही, तर सायकल, बॉल अशा खेळण्यांचे रंगदेखील निळा किंवा गुलाबी असतील तर ते मुलांसाठी किंवा मुलींसाठी आहेत असा संकेत असतो! तान्ह्या बाळाला घातलेले थंडीचे जॅकेट बघून लोक मुलगा की मुलगी ते ओळखतात, कारण त्यातदेखील रंगांचे वर्गीकरण स्पष्ट आहे. अर्थात पाश्चिमात्य लोक मोठे झाल्यावर रंगांपासून तसे लांबच असतात. काळा, पांढरा, करडा आणि गेला बाजार निळा हे सोडल्यास ते इतर रंग फारसे वापरत नाहीत, आपल्या भारतीयांसारखे सर्व रंग मनापासून स्वीकारत नाहीत, म्हणजे पुरुषांनी गुलाबी अथवा तत्सम रंग परिधान केला तर ते पुरुष समलैंगिक असावेत असा एक संकेत आहे, त्यामुळे ऑफिसात पुरुष सहसा असे रंग घालणार नाहीत, आणि अर्थात याची सुरुवात लहानपणापासूनच होते!

हेही वाचा – जगणं, पाहणं, नोंदवणं, लिहिणं..

दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे, शाळेत गणवेश नसतो! भारतीय मानसिकतेत शाळा म्हणजे गणवेश असे समीकरण पुष्कळ रूढ असते, मात्र इथे शाळेत हवे ते कपडे घालून येण्याचे स्वातंत्र्य आहे, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र शिक्षक आणि मुले काय काय घालू शकतात याबाबत पुष्कळ नियम असतात. उदा. पुष्कळ राज्यांत शिक्षिका वर्गात जीन्स पॅन्ट घालून येऊ शकत नाहीत. तसेच मुले इतर देशातील पारंपरिक पोशाख रोज घालून येऊ शकत नाहीत. फार छोटे स्कर्ट घालण्यास मनाई असली तरी छोट्या पॅन्ट घातल्या तर आक्षेप नसतो.

मकान म्हणजेच घर, अर्थात अमेरिकेत इतर देशांच्या तुलनेत मोठी असतात, जागा जास्त असल्याने पुष्कळदा प्रत्येक सदस्याला निराळी खोली आणि त्याला लागून टॉयलेट असते. मुलांना जन्मापासूनच वेगळ्या खोलीत झोपवले जाते, त्यांच्या खोलीतील बेड जवळ एक कॅमेरा ठेवलेला असतो. बाळ खूप रडते आहे, असे त्यातून दिसत असेल तरच आई-वडील रात्री जाऊन त्याला उचलून घेऊन शांत करतात आणि पुन्हा त्या बेडवर/क्रिबमध्ये ठेवून देतात!

हा प्रकारच मुळात इतका वेगळा आहे की आपल्या भारतीय पालकत्वाच्या सगळ्या व्याख्या इथे डळमळू लागतात! रात्री मुलं आई-वडिलांजवळ झोपत नाहीत, हे आपल्याला सहज पचनी पडणारी गोष्ट नाही, इथे मात्र ते सर्रास घडते. तसेच मुले जवळजवळ पाच वर्षांची होईपर्यंत त्यांना गरजेनुसार डायपर घातला जातो. आपल्या भारतीय पालकत्वाच्या परिभाषेत तेही फारसे रुचणारे नाही. तसेच मुलांची स्वतंत्र खोली असल्याने वयात येणारी मुलं स्वतःचे जेवण घेऊन एकटी बसून जेवतात, हीदेखील भारतीय पालकांना न पटणारी गोष्ट!

हे आणि असे इतर अनेक बदल खरेतर वरवरचे आणि उथळ वाटू शकतात, जागतिकीकरणामुळे खरेतर अवघे जग अमेरिकनाइज होते आहे, त्यामुळे यातील अनेक गोष्टी प्रमाण मानून सर्वत्र स्वीकारल्या जात आहेत. त्याचे मूळ कशात आहे, का आहे, हे जाणून घेणे तितकेच रंजक आहे. यातील बऱ्याच सवयींचे मूळ हे विसाव्या शतकातील औद्योगिकीकरणाच्या काळात आहे. स्त्रिया बाहेर पडून नोकरी करू लागल्या, मुलांचा सांभाळ हा एक व्यवसाय म्हणून रुजू लागला आणि त्यातून आई मुलाचे दुरावलेपण वाढीस लागले. अमेरिकेत याला पूरक असे संशोधन, पुस्तके आणि एक विज्ञानदेखील जोडले गेले, म्हणजे त्या काळातील विचारवंत हा विचार रुजवू पाहत होते, की पालकांनी मुलांपासून लांब राहावे, त्यात मुलांचे हित आहे, मुलांना अंगावर दूध पाजणे कसे गरजेचे नाही, त्याकरिता कृत्रिम फॉर्मुला आहे इत्यादी! अर्थात आता एक निराळे भान इथेदेखील रुजते आहे, स्त्रिया विशेषकरून या विचारसरणीला प्रश्न करत आहेत, यात मोठ्या कंपन्यांचा फायदा असला तरी माणसांचे नुकसान आहे, हे स्पष्ट होत चालले आहे.

हेही वाचा – म्हणे ‘ॐ आणि अल्लाह’ एक.. पण का?

भारतातून किंवा इतर देशांतून अमेरिकेत अथवा इतर कोणत्याही देशांत जाणाऱ्या तरुण जोडप्यांनी हा सर्व विचार जरूर करावा, की नव्या देशातले हे लिखित अलिखित नियम आपण कितपत स्वीकारायचे आहेत. त्याचा आपल्या मुलांच्या आणि आपल्या जीवनावर कसा आणि किती परिणाम होणार आहे?

पालक म्हणून आपण दुसऱ्या देशांत आपली मुले वाढवतो तेव्हा आपलीच जबाबदारी दुपटीने वाढते, आपल्या देशांतील चांगल्या गोष्टी, सवयी मुलांना शिकवणे, सभोवताली तशी परिस्थिती नसताना, एक सर्वांगीण सांस्कृतिक पाया मुलांना देणे, कोणत्याही एका देशाचे, त्यातील रुढींचे स्तोम न माजवता, सारासार विचार करून एक संतुलित पाया मुलांना घालून देणे, जेणेकरून ते सर्वार्थाने वैश्विक नागरिक होऊ शकतील!

(praj.padgaonkar@gmail.com)