scorecardresearch

पापुआ न्यूगिनीला भेट…

न्यूगिनीला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. समुद्राने वेढलेल्या या भागाच्या वैशिष्ट्यांविषयी…

Indian Prime Minister Narendra Modi visited Papua New Guinea
न्यूगिनीला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले( फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस )

मिलिंद परांजपे

पापुआ-न्यूगिनी म्हणजे सॉमरसेट मॉम, जोसेफ कोनराड यांच्या गोष्टीत वाचलेला अथवा ‘ट्वेन्टी थाउजंड लीग्ज अंडर द सी’ चित्रपटात दाखवलेला प्रदेश. ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकात त्याबद्दल मनोरंजक चित्रं पाहायला मिळतात. जवळच्या ट्रोब्रायंड बेटांवर प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ (ॲन्थ्रोपोलोजिस्ट) मार्गारेट मीड तिथल्या लोकांच्या चालीरीतींचं निरीक्षण करायला जाऊन राहिल्या होत्या. परवाच न्यूगिनीला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान होते, म्हणून एक लहानसा अनुभव लिहावासा वाटला.

१९९१-९२ मध्ये ‘गोपाली’ या व्यापारी बोटीवर कॅप्टन असताना पापुआ-न्यूगिनी आणि सॉलोमन बेटावरील होनीआरा येथे जाण्याचा योग आला. दक्षिण गोलार्धात न्यूगिनी हे एक मोठे बेट ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस पूर्व-पश्चिम पसरले आहे. बेटाचा पश्चिमेकडील अर्धा भाग इंडोनेशियाच्या ताब्यात असून त्याला ते ‘इरियन जया’ या नावाने ओळखतात. पूर्वेकडील अर्ध्या भागाचा दक्षिणेचा अर्धा भाग म्हणजे इंग्लंडच्या ताब्यातील पापुआ; उत्तर भाग म्हणजे न्यूगिनी जो पहिल्या महायुद्धापर्यंत जर्मनीच्या ताब्यात होता. महायुद्धात तिथल्या स्थानिक इंग्रज आणि जर्मन लोकांनी एकमेकांत लढायाही केल्या. युद्धातील विजयानंतर इंग्रजांनी उत्तर-दक्षिण एक करून त्याला पापुआ-न्यूगिनी नाव दिलं. १९७५ साली इंग्लंडने त्यांना कॉमनवेल्थअंतर्गत स्वातंत्र्य दिलं तरी इंग्लंडचा राजाच (किंवा राणी) त्यांचा गव्हर्नर जनरल नेमतो. त्यांच्या नोटेवरही एलिझाबेथ राणीचं चित्र होतं. जेमतेम एक कोटीच्या आत लोकसंख्येच्या या देशात ८०० हून अधिक भाषा बोलल्या जातात. बहुतेक भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे काळ्या वर्णाची आणि लोकरीसारख्या केसांची आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाचा प्रभाव इतका आहे की त्याशिवाय त्यांच्या अर्थव्यवस्थेचं पानही हलू शकणार नाही. या देशात गहू अजिबात पिकत नाही. सर्व ऑस्ट्रेलियातून आयात केला जातो.

हा गहू आमच्या बोटीत भरून पोर्ट मोर्सबी बंदरात काही उतरवला. मोर्सबी दक्षिण किनाऱ्यावरचं राजधानीचं शहर आहे. गावात फेरफटका मारला तर लोक ‘फ्रेंडली’ वाटले, पण सूर्यास्तानंतर बाहेर पडायची सोय नाही. मवाली गुंडांच्या टोळ्या ज्यांना तिथे ‘रास्कल्स’ म्हणतात ते एकट्यादुकट्यास काहीही करू शकतात. मग बोट पूर्वेकडून वळसा घालून उत्तरेकडील लाए या बंदरात गेली. बोट बंदरात आणण्याचं, बाहेर काढण्याचं काम करणारे पायलट ब्रिटिश होते. एक स्थानिक अप्रेंटिस पायलट तयार होत होता. लाएला काही माल उतरवून उरलेला दोन हजार टन गहू सॉलोमन बेटांवरील होनीआरा बंदरात उतरवण्यासाठी बोट गेली. एक-दीड दिवसाचाच प्रवास होता.

न्यूगिनीपेक्षाही सॉलोमन बेटं जास्त अपरिचित म्हणून विलक्षण, अद्भुत असावीत; पुन्हा बघायला मिळतील की नाही म्हणून कुतूहल होतं. ब्रिटिश ॲडमिराल्टीची सॉलोमन बेटांची ‘सेलिंग डिरेक्शन्स’ मी बारकाईनी वाचून काढली. इंग्लिश नाविकांनी मागील तीनशे-चारशे वर्षांत गोळा केलेला जगाच्या सामुद्रिक माहितीचा तो एक अद्वितीय खजिनाच आहे. पृथ्वीवरील सातासमुद्राचा, त्याच्या किनारपट्टीचा, तिथल्या देशांचा, इतिहासाचा, लोकांचा थोडक्यात इतका अधिकृत दस्तावेज कुठेच मिळणार नाही. सॉलोमन बेटं दक्षिण पॅसिफिक महासागरात असली तरी ताहिती, मार्क्वेसास किंवा हवाई बेटांसारखी निसर्गसौंदर्याने नटलेली नाहीत अथवा स्त्रियांच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध नाहीत. येथील स्थानिक पापुआमधील लोकांप्रमाणेच मेलानेशियन वंशाचे, वर्णाचे आणि केसांचे आहेत.

सॉलोमन बेटं अल्वारो मेंडान्या नावाच्या स्पॅनिश कॅप्टननी सोळाव्या शतकातच शोधून काढली, पण त्यांनी शोध गुप्त ठेवला कारण त्यांना वाटलं नाही तर इंग्लिश त्यांचा फायदा घेतील. पण १८ व्या शतकात इंग्रजांनाही ती सापडलीच. होनिआरा राजधानी आहे आणि मुख्य बंदर ग्वादालकनाल बेटावर आहे. मेंडान्याच्या जहाजावरील चीफ ऑफिसरने स्पेनमधील आपल्या गावाचं ग्वादालकनाल हे नाव सर्वांत मोठ्या बेटाला दिलं. कॅनाल म्हणजे कालवा या शब्दाशी त्याचा काही संबंध नाही. शेजारच्या अरुंद समुद्रपट्टीत जपानी आणि अमेरिकी-ऑस्ट्रेलियन आरमारांच्या अटीतटीच्या लढाया दुसऱ्या महायुद्धात झाल्या. दोन्ही देशांच्या नाविकांनी ग्वादालकनाल बेटावर ताबा मिळवण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. त्या अरुंद समुद्रपट्टीत इतक्या युद्धनौका बुडवल्या गेल्या की त्या समुद्रपट्टीला ‘आयर्नबॉटम साउंड’ नाव मिळालं. मी बेटाची एक टूर घेतली. त्या वेळेस बेटावर अनेक ठिकाणी आता गंजत पडलेली विमानं, रणगाडे अथवा युद्धनौकांचे सांगाडे दिसले. त्यांचं एक उघड्या जागेवर लहानसं संग्रहालय आहे. युद्धानंतर इतर अनेक महत्त्वाची कामं असूनही आपल्या मेलेल्या खलाशी, सैनिकांना ते देश विसरले नाहीत. तिथे आपापले पुरोहित पाठवून त्यांच्या नावाने जमतील तसे अंत्यविधी केले गेले. आज जपानी, अमेरिकी आणि ऑस्ट्रेलियन स्मारकं एकाच ठिकाणी शेजारी शेजारी आहेत आणि एकच ज्योत सर्वांसाठी तेवत असते. युद्धकाळच्या शत्रुत्वाकडे आता केवळ इतिहास म्हणून पाहायचं.

होनीआराला बोट धक्क्याजवळ न्यायला टग नाहीत. स्थानिक पायलटने बोटींचंच इंजिन पुढेमागे (अहेड-आस्टर्न) करून बोट धक्क्याला लावली, पण त्यामुळे वेळ खूपच जास्त लागला. पायलट गमतीनं म्हणाला, ‘फिलिपाइन्समध्ये चक्रीवादळ आलं की आम्हाला आनंद होतो कारण आमच्या नारळाला मग चांगला भाव येतो.’ होनीआरातही ऑस्ट्रेलियाचाच अंमल असल्यासारखं आहे. पण चिनी दुकानदार, उपाहारगृहं दिसली. गहू उतरवण्यासाठी यांत्रिक सक्शन वापरले होते. तसल्या तांत्रिक बाबी ऑस्ट्रेलियनच करतात. बंदरात एकच धक्का होता. धक्क्याशेजारी यॉट क्लब होता. बोटीचा कॅप्टन म्हणून मला आत जाऊ दिलं. सर्व ऑस्ट्रेलियन दिसले. ब्रिटिश वंशाचे लोक हाडाचे समुद्रप्रेमी! ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडहून केवळ ‘स्पोर्ट’ म्हणून ते शिडाच्या नौकेतून येऊन जवळपासच्या बेटांना भेटी देऊन जातात. बोट रिकामी झाल्यावर तिथून नेण्यासारखं काहीच नसल्यामुळे बोट रिकामीच परत ऑस्ट्रेलियास गेली.

मिलिंद परांजपे

Captparanjpe@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 08:37 IST

संबंधित बातम्या