भाऊ दाजी लाड संग्रहालयातल्या १०१ वस्तूंबद्दलचं हे पुस्तक..

विबुधप्रिया दास

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

 ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान’ हे तर मुंबईत फिरायला जाणाऱ्यांचं आवडतं ठिकाण. राणीची बाग म्हणून पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या या प्राणिसंग्रहालयाचं तिकीट काढण्याआधी, त्याच आवारात एक देखणी वास्तू दिसते ती म्हणजे ‘भाऊ दाजी लाड संग्रहालय’ हे मात्र कुणाला फार माहीत नसतं. हे संग्रहालय मुंबईतलं १५० वर्ष जुनं मुंबई परिसराचा इतिहास, मुंबईचा भूगोल आणि एकोणिसाव्या शतकात मुंबईत राहणारे लोक, यांची  माहिती आबालवृद्धांसाठी साकार करणारं. आता ‘मुंबई – अ सिटी थ्रू ऑब्जेक्ट्स’ या जाडजूड पुस्तकामुळे, या अख्ख्या संग्रहालयातल्या परिचित आणि अपरिचित संग्रहाची माहिती आणि अभ्यासकांची त्याबद्दलची निरीक्षणं वाचण्याची संधी मिळते आहे. या वर्षीच्या मे महिन्यातच हे सचित्र पुस्तक प्रकाशित झालं. संग्रहालयाच्या संचालक तस्नीम मेहता याच पुस्तकाच्या संपादकही आहेत.

या संग्रहालयात अर्थातच भरपूर कलावस्तू आहेत  –  मूर्ती आहेत, शस्त्रं आहेत, हस्तिदंती/ लाकडी कोरीवकामाच्या पेटय़ा आहेत आणि हुक्का, चांदीची कपबशी अशाही वस्तू आहेत. पण त्या वस्तूंकडे या संग्रहालयाला भेट देताना आपलं लक्षच नीट जात नाही, इतकं इथे मुंबईबद्दल भरपूर जाणून घ्यायला मिळतं. मुंबईच्या लोकांचे ‘नमुना-पुतळे’ हे या संग्रहालयाचं मोठंच वैशिष्टय़ आहे. मुंबईचे ‘अठरापगड’ लोक म्हणजे काय, त्यांच्या पगडय़ा किंवा टोप्या कशा असायच्या हे इथं सहज कळतं आणि मुंबईची बेटं एकत्र कधी, कशी आणली गेली, कापडगिरण्या आणि चाळी कशा वाढत गेल्या हेही उठावाच्या नकाशांमुळे सहज पाहता येतं. या साऱ्यातच रंगून जाणारे या संग्रहालयाचे प्रेक्षक, पुस्तक हातात आल्यावर मात्र चकित होतील. कितीतरी वस्तू इथं होत्या, हे माहीतच कसं नव्हतं आपल्याला- असं इथं नेहमी जाणाऱ्यांनाही वाटेल. या संग्रहालयाचं तिकीट फक्त १० रुपये आहे, शिवाय इथं हल्लीच्या नवीन चित्रकारांची प्रदर्शनंही भरतात, त्यामुळे इथं नेहमी जाणारे असतात. त्यांनाही हे पुस्तक पाहात राहावं वाटेल, इतक्या अपरिचित वस्तू त्यात आहेत. उदाहरणार्थ, कोकणातल्या कारागिरांनी शिंगापासून घडवलेलं मेणबत्तीचं शामदान! शिंगाचा आकार इथं कळेल, पण खालची कोरीव नाजूक सजावटही शिंगं कोरूनच केलेली आहे. किंवा, बडोद्याचे थोरले खंडेराव महाराज गायकवाड यांचा अगदी सुबक छोटासा हस्तिदंती पुतळा एरवी विशिष्ट तापमानात जतन करून ठेवलेला असतो, त्याबद्दलही या पुस्तकात सचित्र टिपण आहे.

 भाऊ दाजी लाड यांचं नाव या संग्रहालयाला आहे, त्यांच्याविषयी त्यांच्या तैलचित्रासह दोन पानी टिपण आहे. अशा १०१ वस्तू आणि तेवढीच टिपणं, असं या पुस्तकाचं स्वरूप. पुस्तकाच्या आठ विभागांची मांडणी मुंबईच्या इतिहासापासूनच सुरू होते, पण पुढे मुंबई परिसरातला निसर्ग, इथे असलेली कारागिरी आणि मग कारखानदारी, मुंबईचे आाणि भारताचे लोक, राजा रविवर्मा यांचा प्रभाव, वस्तूंवरली कोरीव, शोभिवंत कला, १८६० ते १९५० या काळातची मुंबईतली चित्रकला आणि शेवटी या संग्रहालयानं गेल्या दहा वर्षांत प्रदर्शित केलेल्या  आजकालच्या कलाकृती. या समकालीन कलाकृती कधी अधल्यामधल्या पानावरही मुद्दाम योजल्या आहेत, पण त्यांबद्दल स्वतंत्र २० पानी विभागही आहे. ‘शोभिवंत कला’मध्ये देवादिकांच्या मूर्तीचाही समावेश आहे. पण पुस्तकातला सर्वात लक्ष वेधणारा भाग अर्थातच मुंबईबद्दलचा आहे.  आणि त्यातही, ‘मुंबई परिसरातली कारागिरी’ सचित्र सांगणं हे या पुस्तकाचं वैशिष्टय़ ठरलं आहे. कशिदाकाम करणाऱ्या महिलेपासून ते तांबं, लोखंड यांच्या कामापर्यंत अनेक परींच्या कारागिरी. त्यात लाकूड कोरण्याची कला आहे, तशीच शंखजिऱ्याचा ‘गोरापत्थर’ वापरून रोजच्या वापरातल्या कलावस्तू बनवण्याचीही  आहे. अशा कारागिरीतून तयार झालेल्या वस्तू तर ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’त आहेतच, पण त्या करणाऱ्या कारागिरांचे ते छोटे ‘नमुना-पुतळे’ .. बाहुल्यांसारखे!  मुंबईच्या लोकांना इतका मान तर फक्त याच संग्रहालयानं दिला आहे, याची साक्ष देणारे! तेही या पुस्तकात आवर्जून आहेत. वाडियांनी मुंबईत आगबोट बांधण्याच्या आधी ‘पीआयओ’ कंपनीच्या सियाम आगबोटीची हुबेहूब प्रतिकृती दयाल कानजी यांनी बनवली होती, त्याबद्दल हिमांशु कदम यांचं टिपण वाचनीय आहे. ऋ ता वाघमारे, रुचिका जैन, इशरत हकीम, लहरी मित्रा आदी अन्य लेखक आहेत. मुंबईवर प्रेम करणाऱ्यांनी स्वत:साठी घ्यावं किंवा भेट द्यावं, असं हे पुस्तक संग्रहालयात आणि इंटरनेटवरही, छापील किमतीपेक्षा बऱ्यापैकी कमी रकमेला उपलब्ध असू शकतं!