डॉ. केदार फाळके
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ग. ह. खरे यांच्यासारख्या विद्वानांची परंपरा पुढे नेणारे इतिहास संशोधक, शिवचरित्रकार तसेच युद्ध इतिहासाचे गाढे अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे नुकतेच निधन झाले. इतिहास हा घटक अतिशय संवेदनशील ठरत असण्याच्या काळात त्यांच्यासारख्या अभ्यासकाचे महत्व अधिकच अधोरेखित होते. त्यांच्या शिष्याने त्यांना वाहिलेली आदरांजली.
महाराष्ट्राला पट्टीच्या इतिहास संशोधकांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यांच्यापैकी एक महान इतिहास संशोधक म्हणजे गजानन भास्कर मेहेंदळे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजे १९६९ मध्ये शिवचरित्राच्या संशोधनाकरिता पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले. मेहेंदळे सरांनी प्रदीर्घ संशोधन करून साधारण २५०० पृष्ठांचे ‘श्री राजा शिवछत्रपती’ हे मराठी शिवचरित्र सिद्ध केले. या ग्रंथात अफजलखानाच्या वधापर्यंतचा इतिहास आला असून ६८ परिशिष्टे समाविष्ट आहेत. पुढे २०११ मध्ये त्यांनी ‘शिवाजी हिज लाइफ अॅण्ड टाइम्स’ हे इंग्रजी शिवचरित्र सिद्ध केले. ते पूर्ण असून, साधारण एक हजार पृष्ठांचे आहे.
शिवचरित्रविषयक साधने मराठी, संस्कृत, फार्सी, डिंगल, कन्नड, पोर्तुगीज, इंग्रजी, डच, फ्रेंच या भाषांमध्ये विखुरलेली आहेत. समकालीन विश्वसनीय साधनांवर चरित्र सिद्ध करावयाचे, तर या भाषा अवगत असावयास हव्यात, त्यांचे पुरेसे ज्ञान हवे, या जाणिवेतून मेहेंदळे सरांनी या भाषा आत्मसात केल्या. त्यांनी वेगवेगळ्या संशोधन केंद्रांना भेट देऊन जसे, की नटनागर शोध संस्थान, सीतामऊ, नॅशनल लायब्ररी, कोलकाता – तेथील साधने अभ्यासली. भरपूर टिपणे तयार झाल्यानंतर सरांनी लेखनास सुरुवात केली. त्यांच्या लेखनाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे प्रत्येक विधान हे समकालीन आणि त्यातही विश्वसनीय साधनांवर आधारलेले आहे. काही पृष्ठांवर तर मुख्य मजकूर केवळ दोनतीन ओळींचा असून, उरलेला भाग संदर्भांनी व्यापला आहे. एखाद्या विधानास एकापेक्षा अनेक संदर्भ दिले असून, काही ठिकाणी संदर्भाकरिता पुन्हा संदर्भ दिले आहेत. मेहेंदळे सरांच्या लेखनाचे एक साधेपण हे त्यांच्या लेखनाचे मोठेपण आहे, ते म्हणजे एखाद्या घटनेची, मुद्द्याची, विषयाची माहिती सांगत असताना ते सुसंगत घटनाक्रम सांगत जातात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ते अखेरीस सांगतात. त्यामुळे विषय कितीही क्लिष्ट असला, तरी वाचकांच्या मनात गोंधळ निर्माण होत नाही.
सर्व प्रकारच्या कागदपत्रांचा त्यांच्याएवढ्या सूक्ष्मतेने अभ्यास केलेली व्यक्ती भारतात क्वचित एखादी असेल. ते नेहमी सांगत, ‘तुम्ही जेवढ्या वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र वाचाल, प्रत्येक वेळी तुम्हाला काही तरी नवीन समजेल. म्हणून ते पुन:पुन्हा वाचा.’ कागदपत्रे अबोल असतात, त्यांना आपणास बोलके करावे लागते. ती संदर्भ देतात, इतिहास आपणाला सांगावा लागतो. अप्रसिद्ध कागदपत्रे आपली वाट पाहत असतात, कोणी तरी येईल आणि त्याची दृष्टी आपणावर पडून प्रकाश दाखवेल.
मेहेंदळे सरांनी परिशिष्टांच्या खंडात ‘ऐतिहासिक कागदपत्रांच्या खरे-खोटेपणाचे परीक्षण’ आणि ‘कालगणनेच्या शिवकालीन पद्धती’ ही दोन अत्यंत महत्त्वपूर्ण परिशिष्टे सिद्ध केली असून, ती साधारण १५० पृष्ठांमध्ये विखुरलेली आहेत. ही परिशिष्टे म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन संशोधनाचा परिपाक असून, कोणताही संशोधक या दोन परिशिष्टांचा आधार-संदर्भ घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. इथे दोन उदाहरणे देणे उचित होईल, ज्यामधून ते निरीक्षणे कशी नोंदवीत हे ध्यानात येईल. जसे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रात दादाजी कोंडदेवांचा उल्लेख नेहमी दादाजी कोंडदेउ असा येतो. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक शकानंतरची जी पत्रे आहेत, त्यांवर राज्याभिषेक शक नेहमी संख्येत घातलेला असतो, शब्दांत नाही.
शब्दांचा अभ्यास किती गरजेचा आहे, हे सरांनी वेगवेगळ्या प्रकारे दाखवून दिले आहे. वाङ्मयात शब्द कसे चालतात, हे त्यांच्या इंग्रजी शिवचरित्रातून ध्यानात येते. विरामचिन्हांमुळे अर्थ कसे बदलतात, याकरिता ते ‘पांडा : इट्स शूट्स अॅण्ड लिव्ह’ या ग्रंथाचे उदाहरण देत. त्यावरून जगभरात प्रचलित असणाऱ्या संशोधन पद्धती, मॅन्युअल गाइड सांगताना सर म्हणत, ‘वाचकांची सुविधा महत्त्वाची आणि यासाठी तुम्ही जी पद्धत अवलंबिता, तीच तुमची ‘रिसर्च मेथॉडॉलॉजी’. संशोधनाच्या या टप्प्यावर जाऊन पोहोचण्याकरिता तुमच्याकडे तेवढा प्रचंड आत्मविश्वास हवा.’
फार्सी आणि अरबी शब्दांची दहा-अकरा प्रकारे अनेकवचने होतात, हे सांगताना या भाषांतील शब्द मराठीत कसे आले आणि रुळले हेदेखील सरांनी समजाविले आहे. उदाहरणार्थ, वडील हा ‘वालिद’ या शब्दाचा मराठी अपभ्रंश असून, ‘हक्क’ हा अरबी शब्द हिंदीत ‘हक’ असा होतो, तर मराठीत मूळ रूपात – म्हणजे हक्क – असाच वापरला जातो. ‘कटुबाण’, ‘महालानिहाये’, ‘बदअमल’ आणि ‘महासिद्धी’ या शब्दांचे त्यांनी केलेले विवेचन बघण्यासारखे आहे. ते म्हणायचे, ‘एखाद्या शब्दाचा अर्थ लावण्यासाठी तो शब्द निदान दोनदा किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी यावयास पाहिजे.’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन वेगवेगळ्या पत्रांत येणाऱ्या ‘तोरतरंग’ आणि ‘वडऊपर’ या दोन शब्दांचा अर्थ अजूनही लागलेला नाही.
एखादी भाषा येणे किती गरजेचे आहे याचे उदाहरण देताना सर म्हणत, ‘मजकुरातील भाषा तुम्हाला उमगली, तर पूर्ण दालनच उघडेल. नाही तर मग दुसऱ्यांनी केलेल्या भाषांतरावर किंवा अन्य दुय्यम साधनांवर अवलंबून राहावे लागते. मग ती खोटी असोत, वा चुकीची त्यावरच अवलंबणे भाग पडते.’ जगातील उत्कृष्ट इतिहासविषयक वाङ्मय इंग्रजीत लिहिलेले असून, ते समजायचे असेल, तर इंग्रजी आली पाहिजे आणि त्या इतिहास संशोधकांच्या पंगतीत जाऊन बसावयाचे असेल, तर इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावयास हवे.’ सर या विषयाचे महत्त्व समजाविण्याकरिता दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या भूमिकेचे उदाहरण देत. दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास करण्यासाठी त्या त्या राष्ट्रांची कागदपत्रे उपलब्ध असून, ती इंग्रजीतही भाषांतरित झाली आहेत. मात्र, जपानची फारशी कागदपत्रे उजेडात आली नसून, ती इंग्रजीतही व्यवस्थित भाषांतरित झालेली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील जपानची भूमिका काय होती, ते समजत नाही.
इतिहास संशोधकास ऐतिहासिक साधनांचा उपयोगही प्रभावीपणे करता आला पाहिजे. उदाहरणार्थ, जदुनाथ सरकारांनी औरंगजेबाच्या चरित्राकरिता ‘बादशाहनामा’ आणि ‘आदाब-ए-आलमगिरी’ या साधनांचा उपयोग केला आहे. त्यांच्यानंतर या साधनांचा अधिक प्रभावीपणे उपयोग कोणी केला असेल, तर तो मेहेंदळे सरांनी. जसे, की ‘आदाब-ए-आलमगिरी’ या पत्रसंग्रहात साधारण ६०० पत्रे असून, त्यातील २७ शिवचरित्रविषयक आहेत. ही पत्रे पहिल्यांदा मेहेंदळे सरांनी संपादित करून लोकांसमोर आणली.
हिंदुस्थानात १७ व्या शतकाचा इतिहास लिहिताना बऱ्याच कळीच्या गोष्टींचा उघड उहापोह आणि विवेचन मेहेंदळे सरांनी केले आहे. असे अनेक तपशील आणि बारकाव्यांचे स्पष्ट विवेचन लिहिणारे ते बहुधा पहिलेच इतिहासकार असावेत. उदाहरणार्थ, १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या जुन्नर आणि अहमदनगर (आता अहिल्यानगर) या ठाण्यांवर हल्ले का चढविले? मुघल मनसबदारी व्यवस्था मराठीत समजावून सांगणारे सर पहिले. त्यांनीच ही गोष्ट ध्यानात आणून दिली, की आदिलशाहीत वजीर हे पद होते. असे अनेक वजीर होते आणि सरदार म्हणजे नोबल नव्हे, तर या वजिरांची जी पथके असत, त्यांच्या प्रमुखाला सरदार म्हणत.
मेहेंदळे सर हे युद्धशास्त्राचे (मिलिटरी सायन्सचे) अधिकृत पदव्युत्तर विद्यार्थी होते. त्यामुळे इतरांच्या विवेचनात न आलेल्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी इंग्रजी शिवचरित्रात त्यांनी समजावून सांगितल्या. उदाहरणार्थ : ‘वॉर ऑफ अॅनिहिलेशन’ आणि ‘वॉर ऑफ अॅट्रिशन’ म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘फॅबियन स्ट्रॅटेजी’ कशी वापरली? युद्ध काय आहे? क्लॉझविट्झच्या शब्दांत सांगायचे, तर युद्ध हे राजकारणासाठीचे शस्त्र आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून धोरणांची मालिका सुरू ठेवण्याचा तो मार्ग आहे. शत्रूला सर्वार्थाने नष्ट करणे, हे सर्व युद्धांचे सर्वस्वी ध्येय असते, असे नाही. खरे ध्येय काय, तर शत्रू आपल्याला हव्या त्या राजकीय संधीला मान्यता देईल. युद्ध कधी कधी शत्रूची शक्य तेवढी हानी करणे – परंतु नेहमी नव्हे – या उद्दिष्टासाठी उपयुक्त ठरू शकते.
युद्धाच्या तत्त्वांची (प्रिन्सिपल्स ऑफ वॉर) जगभर सातत्याने चर्चा झाली आहे. त्यांची साकल्याने व्यवस्थित मीमांसा केली, ती जे. एफ. सी. फुलर यांनी. त्यांनी युद्धाची सहा तत्त्वे प्रतिपादली आहेत. उद्दिष्टांची निवड आणि ती बाळगण्याचे सातत्य, निकडीची हालचाल आणि गतिमानता, आश्चर्यकारी धक्का, शत्रूचे लक्ष विचलित करणे, स्वयंसुरक्षितता आणि आघाती प्रत्ययाची आक्रमकता. ही सर्व सहा तत्त्वे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली. त्यांनी शत्रूच्या अंतर्गत फळीवर कसा आघात केला, केव्हा केला, याचा उलगडादेखील सरांनी केला.
इतिहासाचा नेमकेपणाने अभ्यास करण्यासाठी संख्याशास्त्राचा अभ्यास करावयास हवा, असे ते नेहमी सांगत. त्यांनी एक गोष्ट समजावली, की खोटे बोलण्यासाठी इतिहासकार संख्याशास्त्राचा आधार घेतात, हे तुम्हाला समजावयाचे असेल, तर संख्याशास्त्र उमगले पाहिजे. उदाहरणार्थ : औरंगजेबाच्या कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात (१६७८-१७०७) ज्यांना किमान ५०० किंवा त्यापेक्षा जास्त मनसब आहे अशा हिंदू मनसबदारांचे प्रमाण एकूण मनसबदारांच्या ३१ टक्के असून, यामधून मराठ्यांचे १८ टक्के हे प्रमाण वजा केले, तर तथाकथित हिंदूंचे प्रमाण १३ टक्क्यांवर येते. आणि हे मराठे औरंगजेबाकडे कायम नसावयाचे, तर येऊन-जाऊन असत. म्हणून या आकडेवारीवरून तो सहिष्णू होता, असे अनुमान काढले जाऊ शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण समजाविताना ते नेहमी सांगत, ‘धैर्य आणि निष्कलंक चारित्र्य.’ याशिवाय इतर असंख्य नेतृत्वगुण त्यांनी इंग्रजी शिवचरित्रात उलगडले आहेत. सतराव्या शतकात स्टेट्समनशिप आणि जनरलशिप ही एकाच व्यक्तीची कार्ये होती. ती ध्यानात घेऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवस्थांमध्ये ज्या सुधारणा घडवून आणल्या, त्याही स्पष्ट केल्या आहेत. सर सांगत, ‘इस्लामी शासकांनी हिंदूंची मंदिरे पाडून त्या जागेवर मशिदी उभारणे, त्या पाडून त्याच जागेवर मंदिरांची उभारणी करणे; मुसलमान झालेल्यांना पुन्हा हिंदू करून घेणे; आणि भाषाशुद्धी करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय धारणेतील सूत्रे सातत्याने दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीची ऐतिहासिक समर्पकता कोणती, तर तेव्हा हिंदू धर्म टिकला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि आज आपण हिंदू आहोत तेदेखील शिवाजी महाराजांमुळेच.’
तरुण इतिहास संशोधकांना आपली मते व्यक्त करू द्यावीत याबाबत सर आग्रही होते. ते म्हणत, मते चुकली, तर ती दुरुस्त करता येतील; अर्धी चूक-अर्धी बरोबर असतील, तर कारणमीमांसा करता येईल; आणि बरोबर असतील, तर इतिहासात भर पडेल.
पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाशी सरांचे ५० वर्षांहून अधिक काळ ऋणानुबंध राहिले. मंडळाशिवाय शिवचरित्र संशोधन पूर्ण होऊ शकत नाही. मंडळातील महान इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे (तात्या) हे सरांचे गुरू. त्यांचा सरांच्या संशोधनावर मोठा प्रभाव होता. असेच अजून एक महान इतिहास संशोधक रोमेशचंद्र ऊर्फ आर. सी. मुजुमदार यांचा सरांच्या संशोधनावर मोठा प्रभाव राहिला. इतिहास संशोधकाचे कार्य काय असावयास हवे, हे समजाविताना मेहेंदळे सर आर. सी. मुजुमदारांचा पुढील उतारा उद्धृत करीत.
‘इतिहासकाराने सत्य सांगण्यापासून परावृत्त होता कामा नये; उलट ते धैर्याने मांडणे हीच त्याची खरी जबाबदारी आहे. इतिहास हा कोणाच्याही मान-अपमानासाठी नसून विश्वसनीय संदर्भातून उलगडणाऱ्या सत्याचा प्रामाणिक शोध आहे. अज्ञान दीर्घ काळ टिकणारे नसते, म्हणून समस्यांचे निराकरण वास्तव घटनांचे संपूर्ण ज्ञान घेऊनच शक्य होते. इतिहासकाराने पक्षपात, राग-द्वेष वा राजकीय विचार बाजूला ठेवून, कालचक्राप्रमाणे नव्हे, तर सदैव सत्याच्या दिशेने निर्भीड वाटचाल करावी; कारण त्याचे एकमेव ध्येय म्हणजे सत्याचा शोध.’
डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी आपला संपादित ग्रंथ ‘फॉरिन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’च्या प्रस्तावनेत म्हटले आहे : ‘इतिहासलेखन व्यक्तीच्या किंवा पारंपरिक धारणांच्या आधारावर अवलंबून नसावे. ती व्यक्ती वा परंपरा कितीही बलाढ्य वा थोर असो. इतिहासलेखन त्याला आधारभूत असणाऱ्या संदर्भस्राोतावर विसंबले पाहिजे. हे तर इतिहासलेखानाचे गृहीत आधारभूत तत्त्व आहे.’ मेहेंदळे सरांचे इतिहासलेखन या तत्त्वाचा धगधगता जिवंत नमुना आहे. या तत्त्वाला प्रमाण मानून इतिहास संशोधनाची अखंड साधना करीत राहणे हीच मेहेंदळे सरांना खरी श्रद्धांजली ठरेल.
(लेखक शिवचरित्रकार आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे विद्यार्थी आहेत.)
kedarphalke.123@gmail.com