– श्रद्धा पांडे

नुकताच केंद्र लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. सालाबादप्रमाणे हे वर्षसुद्धा मुलींनीच गाजवलं. निकालात पहिल्या चार टॉपर्स मुलीच आहेत आणि एकूण ९३३ यशस्वी उमेदवारांपैकी ३२० मुली आहेत. आजवरच्या इतिहासात हे प्रमाण सर्वोच्च आहे ही कौतुकाची बाब आहे. स्त्रियांच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे याचा मात्र विसर पडायला नको.

समाज म्हणून आपण स्त्रियांना शिक्षणासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी किंवा एकंदरच स्वतंत्र होण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत. कामाच्या ठिकाणी त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं अशी अपेक्षा आपण करत आहोत. प्रत्यक्षात आपण त्यांना सगळ्याच आघाड्यांवर स्वीकारलेले नाही. इथे आपण सपशेल पराभूत झालो आहोत. घरांमध्ये स्त्री पुरुषांसाठी समान व्यवस्था असावी या विषयावर साधं बोलायलासुद्धा आपण तयार नाही. काही घरांमध्ये स्वयंपाक, झाडलोट, धुणीभांडी यांसारख्या बायकी मानल्या जाणाऱ्या कामांसाठी नोकर चाकर आहेत. तरीसुद्धा ‘नाश्त्याला काय करायचं ?’, ‘किचनमध्ये आवश्यक सामान आहे ना ?’, ‘बाळाचं लसीकरण बाकी आहे का?’ अशा असंख्य गोष्टींचं मानसिक ओझं फक्त बाईच्याच खांद्यावर असतं. एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असताना ‘मॅडम, कांदे-बटाटे संपलेत’, असा फोनकॉल आता मला सवयीचा झाला आहे. पुरुष अधिकाऱ्यांवर असा प्रसंग क्वचितच ओढवत असेल.

Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

हेही वाचा – आजच्या दुर्गदिनी दुर्गसाहित्याचे उत्खनन!

कामाच्या ठिकाणी स्वयंपाकासंबंधी फोन करणाऱ्या माणसाचं काही चुकत असतं असं माझं म्हणण नाही. चांगला स्वयंपाक करणं हे त्याचं काम आहे. ती जबाबदारी चोख पाडण्यासाठी त्याला काही अडलं तर तो मला फोन करतो. कारण त्याच्या दृष्टीने चूल आणि मुलाची जबाबदारी शेवटी माझी आहे. स्वयंपाकघर सांभाळणं, मूल वाढवणं आणि त्याचबरोबर काम सांभाळणं या सगळ्यात समतोल राखताना दमछाक होतेच. हे न पटणाऱ्या व्यक्तीविषयी न बोललेलंच बरं. पुढची वाटचाल करताना आपला समाज घरातील कामाचे लिंगनिरपेक्ष विभाजन करायला लागेल अशी अपेक्षा बाळगूया. अनेक पुरुषांना सक्षम आणि स्वतंत्र विचाराची पत्नी तर हवी असते पण अशा स्त्रीच्या वैयक्तिक निर्णयक्षमतेवर मात्र त्यांचा अजिबात विश्वास नसतो.

स्त्री म्हणून जगताना टोकाच्या विरोधाभासाचा अनुभव येतो. कामाच्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या स्त्रीला घरी पुरुष घेईल त्या निर्णयावर मान डोलवावी लागते. त्यात भर म्हणून घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रिया पुरुषांच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप न देता नवऱ्याला साथ द्यायला सांगत असतात. म्हणून, नागरी सेवेत पाऊल टाकणाऱ्या माझ्या प्रिय अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो खालील काही मुद्दे तुम्ही विचारात घ्या.

‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजे सक्तीच्याऐवजी प्रेमाने आणि नम्रतेने काम करून घेण्याची कला. ही आपल्याला मिळालेली देणगी आहे. तुमच्या पेशात सक्तीने काम करून घेण्यासाठी तुम्ही पुरुषी कठोरपणा आत्मसात करण्याची गरच नाही. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या नम्रतेने आणि चांगुलपणाने समजून घेता येतात. ज्या कर्मचाऱ्यांचे तुम्ही नेतृत्व करता त्यांच्याकडे अनुभवाचा खूप मोठा साठा असतो. त्यांच्यासोबत ठाम आणि प्रेमळ भूमिकेमुळे तुमची प्रगती होऊ शकते. तुमच्या सॉफ्ट पॉवरला तुमची ताकद बनवा. स्त्रिया तर नैसर्गिकरीत्या दयाळू आणि शांत वृत्तीच्या असतात. त्यामुळे व्यवस्थेत समावण्यासाठी त्यांना निष्ठुर होण्याची गरज नाही.

काही दिवसांपूर्वी एक ‘फॉरवर्ड मेसेज’ वाचण्यात आला. त्यात असं लिहिलं होतं की स्त्रियांनी कामाच्या ठिकाणी असं काम करायचं असतं की जणू त्यांना घरी मुलंबाळं नाहीत आणि घरी जाऊन असं काम करायचं की जणू त्या कुठे बाहेर जाऊन कामच करत नाहीत. ‘कर्मे ईश भजावा’ हे मला मान्यच आहे. मी आज जे काही आहे ते या पेशामुळे आहे आणि कामात चालढकल करायचा विचारसुद्धा माझ्या मनात कधी येत नाही. तरीही माझं कुठल्याही गोष्टींपेक्षा माझ्या मुलावर जास्त प्रेम आहे आणि असेल. आपण केलेला ओव्हरटाइम सगळ्यात जास्त आपलं मूल लक्षात ठेवतं. कुटुंब आणि काम यात समतोल राखणे ही तारेवरची कसरत आहे आणि हे साध्य करणे सर्वस्व आहे. त्यामुळे जोडीदार किंवा कुटुंबाकडून मूल वाढवताना मदत घेण्यात काही गैर नाही. आठवड्याचे काही तास मुलांच्या ॲक्टिविटीसाठीच देऊन टाकायचे. आनंदी कुटुंबच आपली यशस्वी कारकीर्द घडवू शकते.

स्त्रिया मोठ्या प्रमाणात नोकऱ्या करू लागल्या तेव्हापासूनच भविष्यात येणाऱ्या बाळंतपणामुळे त्यांना नोकरी देताना कमी प्राधान्य दिलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. एवढंच नाही तर बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या गरोदरपणाबद्दल वरिष्ठांना अपराधी भावनेने सांगतात. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करायची आहे ती ही की आपला सकल प्रजनन दर ग्रामीण आणि शहरी दोन्हींसाठी २.० आहे. त्यामुळे कोणत्याही नोकरदार महिलेच्या संपूर्ण करियरमध्ये हा प्रसंग जास्तीत जास्त दोन वेळा येणार आहे. मुळातच काही कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासन काही ठप्प होत नाही. त्यासाठी पर्यायी व्यवस्था असतात. कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातल्या एवढ्या महत्त्वाच्या क्षणापुढे या पर्यायांचा अवलंब बिलकूल गैर नाही. कोणाला असं वाटत असेल की गरोदरपणामुळे करियरमध्ये अडथळा येतो तर स्टडी लिव्ह, भलत्याच विभागातली प्रतिनियुक्ती किंवा एखादा अपघात या सगळ्यांना काय म्हणायचं? मातृत्व रजा काही पगारी हॉलिडे नाही किंवा त्यामुळे तुम्ही पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी अपात्र किंवा अयोग्य होत नाहीत. असंख्य वेडगळ कारणांसाठी गरोदरपणाची चिंता आता तरी सोडायला हवी. उलट अशा महत्त्वाच्या क्षणी आपणच स्त्रियांना बळ देऊ; त्यांना बहरू देऊ. बाळंतपणात फक्त बाळाचा जन्म होत नसतो तर तो त्या स्त्रीचापण पुनर्जन्म असतो. ते बाळ तर सर्वांनाच हवंसं वाटतं; पण आपण आईला उभं राहण्यासाठी हात देऊ या.

हेही वाचा – नैसर्गिक व वैचारिक पर्यावरणाचा समतोल हवा

पुढच्या काळात जास्तीत जास्त स्त्रिया नागरी सेवांमध्ये येतील तेव्हा या ‘सॉफ्ट पॉवर’सोबत देश पुढे जाण्याची शक्यता आणखी वाढेल. आपण जुन्यापुराण्या विचारांना तिलांजली देऊया आणि घरात दोघांसाठी समानतेचं वातावरण निर्माण करूया. बाळाच्या आगमनाकडे आणि मातृत्वाकडे चिंतेऐवजी आनंदाचा क्षण म्हणून पाहूया.

लेखिका आयपीएस अधिकारी आहेत

– अनुवाद : भक्ती काळे

(अनुवादक सहायक राज्यकर आयुक्त आहेत)