विकास परांजपे
लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक या दोघांचे संबंध गुंतागुंतीचे होते. क्रांतिकारकांनी आपल्या कार्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती आणि टिळक तर ‘अखंड सावध’ होतेच. डॉ. य. दि. फडके म्हणतात की ‘अशा स्थितीत उपलब्ध पुरावे, गुप्तचरांचे गोपनीय अहवाल, समकालीन लोकांची चरित्रे हे सगळे पारखून काही अनुमान काढता येते.’ अर्थात तरी कपोलकल्पित कथांनाही वाव असतो, ते टाळायचे तर टिळकांच्या राजकीय कार्याची आणि विचारांची चौकट आधी आखून घ्यावी आणि त्या चौकटीत जे सामावू शकते ते आणि तेवढेच खरे मानावे.
टिळक राजकारणात सक्रिय झाले त्या काळात इंग्रजांनी कायद्याचे राज्य इथे प्रस्थापित केले होते. त्यांनी आणलेल्या शिक्षण, रेल्वे अशा सुधारणांमुळे इंग्रजांची सत्ता ही ‘ईश्वरी देणगी’ असे मानणारा एक वर्गही होता. १८५७च्या बंडानंतर सरकारने देश पूर्णपणे नि:शस्त्र केला होता. अशा स्थितीत सशस्त्र उठावासाठी जनता पेटून उठण्याचा संभव कमीच आणि शस्त्र मिळवणे अवघड होते. ते चालवण्याचे प्रशिक्षण मिळणे हे तर दुरापास्तच होते.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारणे हाच एकमेव व्यवहार्य मार्ग आहे हे टिळकांनी जाणले होते. निदान आपण त्याच मार्गात स्वत:ला झोकून द्यायचे असे त्यांनी ठरवले. इंग्रजांचा धूर्तपणा आणि त्यांची पाशवी शक्ती बघता केवळ नागरी उठावाने स्वातंत्र्य मिळणार नाही हेही ते जाणून होते. देशभक्ती ही एक भावना असून त्याची अभिव्यक्ती ज्याच्या त्याच्या अंत:प्रेरणेनुसार होणार हे त्यांना मान्य होते. आणि म्हणूनच सर्व समाजाला बरोबर घ्यायचे तर प्रत्येकाच्या स्वभाव आणि कुवतीनुसार कार्यक्रम देऊन चळवळीत होता होईल तो सर्व समाज घटकांना सामावून घ्यायचे असे त्यांचे धोरण होते. देशभक्तीचा एकसाची कार्यक्रम लोकांसमोर त्यांनी कधीही ठेवला नाही.

‘सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने यश मिळण्याची ५० टक्के शक्यता असली तरी आपण तो आचरायला तयार आहोत’ असे त्यांनी सेनापती बापट यांना सांगितले होते. अर्थात त्यांना तेव्हढीही शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे एकीकडे सशस्त्र उठावाची तयारी करायला पाठिंबा होता. पण योग्य वेळ येईपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष कृती करायला मात्र विरोध अशी त्यांची भूमिका होती. असा संयम आणि समज जहाल विचारांच्या तरुणांना दाखवता येत नसे. भावनाशील मन आणि हौतात्म्याचे आकर्षण यामुळे ते उतावीळ कृती करत.

देशभर विखुरलेल्या त्यांच्या असंघटित प्रयत्नांना फारसे यश येत नसे. सरकार अशा तरुणांचा सहज बंदोबस्त करे. शिवाय या मंडळीत आयत्यावेळी कच खाणारे, पोलिसांच्या अमानुष छळाला कंटाळून शरण येणारे, गाफील आणि फितूर लोकही असत. नेम चुकणे, वेळेवर शस्त्र हाती न येणे, भलत्याच व्यक्तीवर हल्ला होणे असेही प्रकार घडत. या मार्गाची अव्यवहार्यता लोकमान्यांना समजली होती.

मग सल्ला मागायला आलेल्या जहाल तरुणांना ते सबुरीचा सल्ला देत आणि सावध राहायला सांगत. मात्र एखाद्याने हिंसेच्या मार्गाने नि:स्वार्थ साहसी कृत्याचा निश्चय केला तर त्याला अशा मार्गापासून परावृत्त करणे ही आपली जबाबदारी नाही आणि नीती अनीतीच्या निकषावर इतरांनी त्यावर अनुकूल प्रतिकूल मत देणे अयोग्य आहे असे ते मानत. इतकेच नव्हे तर अशा तरुणांच्या साहस, त्याग, नि:स्वार्थ वृत्तीबद्दल त्यांना आदर वाटे. ते काही वेळा त्यांना मदत करीत, त्यांची जमेल तेवढी पाठराखण करीत.

ते नेहमीच दबावाचे राजकारण करत असत. पण लोकभावना चेतवून निव्वळ प्रक्षोभ निर्माण करण्यापेक्षा समाजाच्या सर्व घटकांना कृतिशील करणे यालाच त्यांचे प्राधान्य होते. ते उपक्रमशील राजकारणी होते. त्यांनी चतु:सूत्री, सार्वजनिक उत्सव, दुष्काळ निवारण, दारूबंदी, परदेशी वस्तूवरील बहिष्कार, स्वदेशी उद्याोग उभारणी, कामगार चळवळ असे अनेक उपक्रम राबवले. मात्र त्यांच्या आवाहनाला मिळणारा प्रतिसाद व्यक्तिसापेक्ष असणार होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या स्वभावधर्म, अंत:प्रेरणा आणि कुवतीनुसार जनता सक्रिय झाली. कोणी स्वदेशी आचरली, कोणी शाळा काढल्या. सशस्त्र क्रांतीचा जहाल मार्ग अर्थात सगळ्यांना झेपणारा नव्हता आणि त्यांनी तो अनुसरायला सांगितलाही नव्हता.

पण जहाल विचाराच्या तरुणांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तो आचरला. टिळकांना हे पक्के ठाऊक होते. म्हणूनच अशा तरुणांना त्यांनी कधी अव्हेरले नाही, ना कधी त्यांना नाउमेद केले. होता होईल तो या तरुणांच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे आणि त्यांच्या उत्कट देशभक्तीला संयमाचा बंध घालून त्यांना उपक्रमशील करावे असा त्यांचा प्रयत्न होता. नागरी उठावाला त्यांच्या साहसी कृत्यांची मदतच होते, हे तर ते जाणून होते. ‘एखादा चाफेकर हौतात्म्य पत्करतो तेव्हा तो समाजाच्या शंभर पावले पुढे असतो. त्या कमालीच्या भारलेल्या वातावरणात मला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन एक पाऊल पुढे टाकणे सोपे जाते’. असे ते एका स्नेह्याला म्हणाले होते. यातून त्यांचा अशा जहाल कृत्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसतो.

त्यांच्या विचारांनी भारून जाऊन कोणतेही साहस करायला देशात त्या काळात शेकडो तरुण तयार होते. पण अशा गोष्टीसाठी त्यांना प्रवृत्त करण्याचा बेजबाबदारपणा त्यांनी कधीही केला नाही. सर्व विचारांच्या लोकांना बरोबर घ्यावे आणि सनदशीर मार्गापासून सशस्त्र उठावापर्यंत सर्व चळवळींचे नियंत्रण आपण करावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी एकीकडे क्रांतिकारकांपासून अलिप्त राहण्याची काळजी घ्यायची पण त्यांना मुख्य चळवळीपासून पूर्णपणे अलग होऊ द्यायचे नाही असा आटोकाट प्रयत्न ते सदैव करत. इंग्रजांनी टिळकांचा हा व्यापक ‘व्यूह’ पुरता ओळखला होता. म्हणूनच रॅन्डचा खून (१८९७) असो की मुझ्झफरपूर येथील बॉम्बस्फोट (१९०८), या दहशतवादी घटनांशी त्यांचा थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नसताना त्यांनी प्रथम टिळकांना गजाआड केले.

दहशतवादी कृत्यांसंदर्भात टिळकांचे धोरणही विकसित होत गेलेले दिसते. १९०८ पूर्वी आपले सहकारी वासुकाका जोशी आणि खाडीलकर यांच्यामार्फत नेपाळमध्ये शस्त्रनिर्मितीचा प्रयोग त्यांनी करून पाहिला होता. तो फसला. मात्र १९१६ मधील पहिल्या महायुद्धामुळे इंग्रजांचे धोरण बदलले. त्यांना आता भारतीयांकडून सैन्यभरतीसाठी थोडे सहकार्य हवे होते. संबंधित आवाहनाला टिळकांनी जोरदार पाठिंबा दिला. तोही अशा अटींवर की भारतीय तरुणांना सैन्यात फुटकळ कामासाठी भरती न करता त्यांना सशस्त्र दलात घ्यावे आणि अधिकाराची पदेही मिळावीत. कारण सैन्य दलात भरती झालेल्या तरुणांच्या हातात आता शस्त्रे येणार होती आणि त्यांना त्याचे प्रशिक्षणही मिळणार होते. सहा वर्षांच्या कारवासानंतर ते परत आले तोपर्यंत (१९१४) जहाल तरुणांचा पुरता बीमोड सरकारने केला होता. जनआंदोलन पूर्ण थंडावले होते. ‘लाल आणि पाल’ देश सोडून गेले होते.

(तसेही लाल, बाल पाल हे एक काव्यच आहे!) त्यांची ज्यांच्यावर सर्वाधिक भिस्त होती ते अरविंद घोष राजकारण सोडून अध्यात्म मार्गाला लागले होते. आपल्या पश्चात आपल्या नजीकच्या सहकाऱ्यांपैकी कुणीही चळवळीचे नेतृत्व केलेले त्यांना दिसले नाही. सगळेच टिळक परत येण्याची वाट पाहात बसले होते. ‘राष्ट्र निपचित पडले होते’ असे श्री. म. माटे म्हणाले होतेच. साहजिकच आता आततायी मार्गापासून दूर राहणे त्यांना अधिकच गरजेचे वाटले. फुटकळ जहाल कृत्यात आपला सहभाग आढळला तर आपली रवानगी परत तुरुंगात होणार हे त्यांना पुरते लक्षात घ्यावे लागले. ते देहदंड सोसण्याला कचरत नव्हते पण जनआंदोलन आपणच पुढे नेऊ शकतो. आपली जागा घेऊ शकणारा दुसरा कोणीही नाही.

तेव्हा आपण यात अडकायचे नाही अशी खूणगाठ त्यांनी बांधली असावी. शिवाय ते मंडालेत असताना नेपाळ प्रकरणाचे धागेदोरे सरकारच्या हाती लागले होते. पण तेव्हा तेच शिक्षा भोगत असल्यामुळे त्यावर काही कारवाई करण्याची गरज सरकारला वाटली नाही. ते परत येतील तेव्हा त्यांची राजकीय ताकद कमी झालेली असेल आणि भारतीय जनता त्यांना विसरलेली असेल असाही सरकारचा अंदाज होता. अर्थात सरकारची ही ‘आशा’ प्रत्यक्षात साफ खोटी ठरली हा भाग वेगळा.

त्यांच्या राजकारणाची चौकट ही अशी व्यापक आणि सर्वसमावेशक होती. त्यात सगळ्यांना स्थान होते. त्यांचे सगळे जीवन हे सर्व देशवासीयांसाठी एक चैतन्याचा कधीही न आटणारा झरा होते. ते जेथे जात तेथे लोकांच्या, विशेषत: तरुणांच्या उत्साहाला उधाण येई. साहजिकच त्यांच्या पश्चात स्वातंत्र्यलढ्यात हिरिरीने भाग घेणाऱ्या अनेकांच्या राजकीय विचारात पुष्कळ भेद असले तरी सर्वांचा ‘आरंभबिंदू’ मात्र ‘लोकमान्य’ होता.

कोण कुठला रामप्रसाद बिस्मिल, पुढे काकोरी कटात फाशी गेला. पण लखनौ काँग्रेसमध्ये केवळ ‘त्यांच्या दर्शनाने’ जीवन सफल झाले असे म्हणतो, यातच सर्व आले. मग स्वातंत्र्यवीर सावरकर टिळकांना गुरू मानत होते हे अगदी स्वाभाविक आहे. पण टिळक सावरकरांना शिष्य मानत होते का याचे उत्तर दोन अधिक दोन बरोबर चार इतके सोपे नाही. हा प्रश्नसुद्धा ‘अप्रस्तुत’ वाटावा इतके हे ‘घटित’ गुंतागुंतीचे आहे. यामुळे या दोघांचीही थोरवी जराही कमी होत नाही आणि यात काही विसंगतीही नाही हेही येथे लक्षात घेतलेले बरे. गुरू शिष्य जोड्या लावणे हे तर इतिहासाचे सुलभीकरण झाले. ती हौस आपण थोडी कमी केली तर महापुरुषांचे मोठेपण आपल्याला अधिक उमगते, इतकेच!
विकास परांजपे, टिळक चरित्राचे अभ्यासक.