अमृता ढालकर
सन १९७० च्या सुमारास अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी.मधील स्मिथसोनियन संग्रहालयाचे तत्कालीन सचिव डिलन रिप्ले यांनी संग्रहालये लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी एक सर्वेक्षण हाती घेतले. त्यासाठी अनकॉस्टियाचा परिसर निवडण्यात आला. कुठल्याही तत्कालीन अमेरिकन उपनगराला भेडसावणाऱ्या समस्या त्या शहरात होत्या, स्वच्छता, राहणीमान, कामगारांच्या समस्या, वर्णभेद, स्त्री-पुरुष असमानता. या संग्रहालयाने पहिलेवहिले प्रदर्शन या रहिवाशांच्या रोजच्या समस्यांपैकी ‘उंदीर’ या विषयावर भरवले होते! यातून जनजागृती होऊन अनकॉस्टिया हळूहळू स्वच्छतेची कास धरू लागले. त्यानंतरचे प्रदर्शन हे कृष्णवर्णीय महिलांच्या योगदानाविषयीचे होते. अशा प्रदर्शनांतून संग्रहालयाच्या चमूमध्ये हळूहळू अनकॉस्टियावासीयांचे प्रमाण वाढून ८० टक्क्यांपर्यंत गेले. आता हे एक लोकाभिमुख आणि लोकांनी लोकांसाठी बनवेलेलं संग्रहालय झाले, अर्थात कम्युनिटी म्युझियम! ७० च्या दशकात उत्तर अमेरिका तसेच दक्षिण अमेरिकेत अशा कम्युनिटी म्युझियम्सची संख्या वाढू लागली.
त्याच सुमारास युरोपात इको-म्युझियम्स जन्माला येत होती. इको हा शब्द पर्यावरण या अर्थाने वापरला जात असला तरी या ठिकाणी त्यात संस्कृती, त्या भूभागाचा वारसा हे अभिप्रेत होत. औद्याोगिकीकरणाच्या पहिल्या लाटेत खूप उद्यामशील शहरांचा उदय झाला. पण या पहिल्या लाटेत उदयाला आलेल्या शहरांना एक प्रकारची दारिद्र्याची किनार येऊ लागली. काही शहरे ओस पडली आणि काही लुप्त झाली. पण महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याबरोबरच लुप्त होत होते ते तिथले कौशल्य. हा वारसा कसा जपावा, याला उत्तर होते इकोम्युझियम्स!
७० च्या दशकातील संग्रहालय शास्त्राच्या शाखेतील घडामोडींपासून भारतही फार लांब नव्हता. भारतातील संगहालयांच्या इतिहासाकडे एक नजर टाकली की मुख्यत्त्वे तीन कालखंड दिसतात. भारतातील संग्रहालयांचे मूळ ब्रिटिश वसाहतवादी काळाशी जोडलेले आहे. या काळातील भारतातील संग्रहालये ही ब्रिटिश राजवटीत बांधली गेलेली होती. १८१४ मध्ये कोलकात्यात स्थापन झालेले ‘इंडियन म्युझियम’ हे भारतातील पहिले संग्रहालय. परदेशी सत्तेच्या नजरेतून भारतीय संस्कृतीचा अभ्यास हा यामागचा मुख्य उद्देश होता. तेथूनच संग्रहालयांचा वापर ‘ज्ञानाचे केंद्रीकरण’ करण्यासाठी सुरू झाला. महाराष्ट्रातही अशाच विचारातून संग्रहालयांची पायाभरणी झाली. १८५५ मध्ये ‘गव्हर्नमेंट कलेक्शन’ या नावाने सुरू झालेल्या प्रारंभिक संग्रहालयांमध्ये ऐतिहासिक वस्तू, मूर्ती, शिलालेख यांचा संग्रह केला गेला असला, तरी त्यामागील दृष्टी वसाहतवादी होती. मार्कहॅम आणि हरग्रीव्हज यांच्या १९२७ च्या अहवालात याबाबत स्पष्टपणे लिहिलं आहे की, संग्रहालये सत्ता आणि उच्च वर्गासाठी नाही तर लोकांसाठी असायला हवीत.’
स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये संग्रहालय या घटकात राष्ट्रीय अस्मिता आणि त्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक संग्रहांचा खूप मोठा भाग होता. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या दृष्टिकोनापासून फारकत घेतली गेली खरी, पण संग्रहालयाचे प्रारूप तसेच राहिले. परंतु जमेची बाजू अशी की विविध प्रकारची, किंवा विविध विषयांना वाहिलेली संग्रहालये या काळात तयार होऊ लागली. इतिहास, कला, पुरातत्त्व, भूगोल, भूगर्भशास्त्र ,वस्त्र, नाणी आणि नानाविध स्वरूपाच्या गोष्टी असणारी एनसाइक्लोपेडिक संग्रहालये. उदा. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, कोलकात्याचे इंडियन म्युझियम ऑफ कलकत्ता, त्याचबरोबरीने राजा केळकर म्युझियम, बडोद्याचे बडोदा म्युझियम आणि पिक्चर गॅलरीसारखी काही संग्रहालये. काही विशेष संकल्पनांवर आधारित संग्रहालये या काळात जन्माला आली. त्याबरोबरीने भारतात इकोम्युझियम्सचा विचार होऊ लागला. संग्रहालय शास्त्रातले तज्ज्ञ, भारतातल्या आणि कदाचित आशियातील सगळ्यात जुन्या संग्रहालय शास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख प्रो. वसंत हरी बेडेकर एका बीजभाषणामध्ये म्हणाले होते, ‘गांधीवादी तत्त्वज्ञानात स्पष्ट केल्याप्रमाणे, विश्वस्ततेची भारतीय संकल्पना संग्रहालयांच्या क्षेत्रापर्यंत विस्तारित केली पाहिजे जी प्रत्येक समुदायाने स्वत: निवडलेल्या दिशेने मूल्यधारित संग्रहालय शास्त्राच्या कार्यासाठी संबंधित समुदायांच्या प्रतिनिधींच्या हातांनी स्थापित, देखभाल आणि संचालित केली पाहिजेत.’ नुसते विधान करून न थांबता त्यांनी आपले काम रेवदंड्याजवळ कोरलाई या गावी सुरू केले. कोरलाई येथे तत्कालीन पोर्तुगीज आणि मराठीच्या मिश्रणातून एक भाषा आणि संस्कृती जन्माला आली, असा संगम विरळाच. त्यांनी कोरलाईच्या लोकांना आपलेसे करून या संग्रहालयाची सुरुवात केली. आजही या गावातील लोक हे छोटेखानी संग्रहालय सांभाळतात.
त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सायन्स म्युझियम उभे राहिले. आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थांनी ७०-८० च्या दशकामध्ये भारतामध्ये फिरती आरोग्य संग्रहालये उभी करून आरोग्य विचाराचा प्रचार-प्रसार केला होता.
या नानाविध संग्रहालयांचा बहुतांशी अनुभव हा एकतर्फी असायचा, या आणि वस्तू पाहा, माहिती वाचा. तंत्रज्ञानाने नवे दरवाजे उघडले. ‘स्टोरी टेलिंग’च्या जमान्यात तंत्रज्ञानामुळे एकाच वस्तूचे विविध पैलू बघता येऊ लागले आणि हा अनुभव एका परस्पर-संवादात बदलला गेला.
भारतातल्या संग्रहालयाच्या प्रगतीचा साद्यांत विचार करता हे लक्षात येईल की बरीचशी संग्रहालये ही अजूनही शहरी भागांमध्ये किंवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी आहेत. अजूनही संग्रहालयाचे विकेंद्रीकरण झालेलं नाही. या इकोम्युझियम आणि कम्युनिटी म्युझियमच्या माध्यमातून ते विकेंद्रीकरण घडवून आणता येईल आणि त्या वेळी अशा माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणची संस्कृती, भाषा- बोली, त्या बोलीमध्ये असणारे विपुल साहित्य, मौखिक साहित्य त्याचबरोबर तिथलं पारंपरिक ज्ञानाच्या संवर्धनासाठी खूप मदत होईल. लोकसंस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी एक व्यासपीठ मिळेल.
संग्रहालयांच्या कलात्मक प्रयत्नांना एकत्र आणण्यासाठी जागतिक पातळीवरील लोकांचे लक्ष वेधण्यासाठी इंटरनॅशनल कमिटी ऑफ म्युझियम्सच्या माध्यमातून सन १९७७ पासून आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जातो! त्यासाठी दरवर्षी एक घोषवाक्य निवडले जाते. या दिवशी चर्चासत्रे, विविध विथिकांची (एक्झिबिशन हॉल) निर्मिती, संग्रहालयांच्या संग्रहावर संशोधन, त्या पुस्तकांचे प्रकाशन असा हा सोहळाच जगभर सुरू होतो. जगभरात तब्बल ३७ हजार छोटी-मोठी संग्रहालये उत्साहाने हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करतात. या वर्षी ‘जलद गतीने होणाऱ्या समाज स्थित्यंतरांमध्ये संग्रहालयांचे स्थान’ या विषयावर काम सुरू आहे. जसजशी अर्थव्यवस्था बदलते, तसतसे रोजगारही बदलतात. त्यासाठी नवी कौशल्येही आत्मसात करावी लागतात. अशा काळात जुन्या कौशल्यांची आठवण, आपली ओळख, आपल्या मुळाशी नाते जपणे फार गरजेचे आहे. आपण कोण आहोत, आपली मूळ ओळख काय आहे, हे विसरू नये म्हणून समाजाच्या सामूहिक स्मृती जपणे आवश्यक आहे. यामुळे समाजात शांतता, सलोखा आणि समजूतदारपणा वाढीस लागतो.
‘आमच्या वेळी’ असा सूर नेहमी ऐकू येतो. आजीच्या गोष्टी, जुन्याजाणत्या शेतकऱ्यांचे हवामानाचे अंदाज, भाषेतले विविध शब्द, बैलगाडीला बांधलेल्या घुंगरांचा नाद, या आणि अशा कित्येक गोष्टी काळाच्या पडद्याआड जाणार आहेत. बैलजोडीला पुढे हाकताना म्हटली जाणारी गाणी, जात्यावरच्या ओव्या – या सगळ्या गोष्टी हळूहळू लोकजीवनातून निघून फक्त पुस्तकांत उरू लागल्या आहेत. बदलाच्या वेगाला गवसणी घालणे अशक्य आहे, हे खरेच, परंतु हे पारंपरिक ज्ञान लुप्त होऊन चालणार नाही. आपल्या सामाजिक अस्मितांची पाळेमुळे या पारंपरिक ज्ञानात, कौशल्यात असतात. या सामूहिक स्मृती जपल्या तर ‘कोहम’चे उत्तर शोधणे सोपे जाईल आणि अस्मितेचे फुगे फुगणार नाहीत. संग्रहालयाच्या बळकटीकरणातून, इकोम्युझियम्स आणि कम्युनिटी म्युझियमसारख्या संकल्पनांच्या माध्यमातून हे शक्य आहे.
संग्रहालयाच्या भेटीतून दरवेळी काहीतरी नवीन सापडते. एखाद्या पुरातन स्थळाला भेट देताना, काही लोक तेथील शिल्पांची लय पाहतात, काहींना नक्षीकामाची भुरळ पडते, काहींना लक्षणशास्त्रात रस असतो. तसेच संग्रहालयाचे आहे. नानाविध पैलूंमुळे संग्रहालयाच्या दर भेटीत काहीतरी नवीन गवसते. संग्रहालयात प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार त्याचा आस्वाद घेतो. कुठलेही बंधन नाही, धर्म, पंथ, लिंग, वय या साऱ्यांना कवेत घेऊन घेत ही ज्ञानरंजनाची सफर चालू असते. ‘औपचारिक शिक्षणा’च्या पलीकडे जाऊन ज्ञानाची कवाडे उघणारी ही संग्रहालये म्हणजे एक प्रकारचे ‘जीवनशिक्षण’च! पारंपरिक कौशल्य आणि ज्ञान यांच्या संवर्धनाने कदाचित शाश्वत वाढीसाठी नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील मार्ग गवसतील. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात संग्रहालयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आज संग्रहालयांनाच त्यांच्या भिंतीबाहेर घेऊन जाण्याची गरज आहे. लोकसहभागातून संग्रहालयातील कथ्य (नरेटिव्ह्ज) नव्याने लिहिणे गरजेचे आहे. परिघाबाहेर असणाऱ्या लोकांच्या नजरेतून इतिहास सांगायचा असेल तर कम्युनिटी म्युझियमसारख्या लोकशाहीवादी विचाराची आज गरज आहे. अलीकडेच सरकारने ‘घर घर म्युझियम’ ही संकल्पना मांडली आहे. यातून आपल्या घरात असणाऱ्या वस्तू आणि आपल्या गावाचा इतिहास जपण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हे प्रयत्न अजून अपुरे असले तरी कुठेतरी एक सुरुवात झाली आहे आणि ती आशादायी आहे.
संग्रहालय आणि अभिलेखागार
amrutadhalkar@gmail.com