महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक आणि व्यावहारिक स्तरावर विशेष मैत्र होते. बाबासाहेबांचे गुरू गौतम बुद्ध शांती, करुणा आणि अहिंसेचे प्रतीक. महात्मा गांधींनी करुणा आणि अहिंसा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाचे अस्त्र जगाला दिले. बाबासाहेबांनी दलितांच्या न्याय्य हक्कांसाठी दिलेल्या लढ्यांना सत्याग्रह असेच संबोधले. कोणत्याही दोन महान व्यक्तिमत्त्वांमध्ये जसे वैचारिक मैत्र असते तसे काही विवादही असतात. दोघांमधील विवाद आठवताना त्यांच्यात झालेले वाद-संवाद, सहमती आणि परस्परांमधील आदराची भावना याकडे दुर्लक्ष होता नये.
इंग्रजांची हुकूमत असताना विसाव्या शतकात हे महापुरुष जे क्रांतीकार्य करीत होते ते नीट समजून घ्यायचे तर त्यांचे त्या वेळचे वय, अनुभव आणि वैचारिक आग्रह व अग्रक्रम या परिप्रेक्ष्यात ते समजून घ्यायला हवे. ‘आधी स्वातंत्र्य आणि सोबतच समता’ ही गांधीजींची भूमिका होती, तर ‘आधी समता’ हा बाबासाहेबांचा आग्रह होता. हे दोन्ही आग्रह स्वातंत्र्याच्या लढ्यात परस्परपूरक सिद्ध झाले.
गांधी-आंबेडकर भेट
मुंबईतील मणिभवनात १४ ऑगस्ट १९३१ रोजी दोघांची पहिली औपचारिक भेट झाली. ठरल्या वेळी बाबासाहेब मणिभवनला पोहोचले. आगरकर, भांडारकर तसे आंबेडकर आडनाव असलेले बाबासाहेब उच्च जातीचे असावेत. त्यांना दलितांचे दु:ख काय ठाऊक, असा गांधीजींचा समज होता. बाबासाहेब येऊन पोहोचल्यावरही गांधीजींनी जाणूनबुजून त्यांना भेटण्यास विलंब केला. वाट पाहून बाबासाहेब निघाले तसे गांधीजी त्यांना भेटले. बाबासाहेबांनी गांधीजींना प्रश्न केला, ‘‘मला मायभूमी कुठे आहे? आम्हा अस्पृश्यांना हिंदू धर्मात कसलेच अधिकार नाहीत!’’ तेव्हा गांधीजींना खरे बाबासाहेब समजले व गैरसमजाबद्दल गांधीजींना वाईट वाटले. आपले सहायक महादेवभाई देसाई यांच्याकडे त्यांनी चूक झाल्याची कबुली दिली.
भेटीनंतर काही दिवसांत गांधीजी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले तेव्हा १९३१च्या ऑक्टोबर महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे भाषण झाले. त्या वेळी गांधीजी म्हणाले, ‘‘मला बाबासाहेबांप्रति अतीव आदरभाव आहे. हिंदू धर्म आणि त्यातील जातीप्रथेविषयी बाबासाहेबांच्या मनात जी कटुता आहे ती योग्यच आहे. अन्याय सहन करूनही ते हिंसक झाले नाहीत, हे संयमाचे द्याोतक.’’ याआधी १९२७ साली चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी गांधीजी म्हणाले होते, ‘‘हिंदू धर्मात अस्पृश्यतेची परंपरा चालू ठेवण्यात स्पृश्य समाजाची मोठी चूक आहे. जे जे सवर्ण अस्पृश्यतेचा विरोध करतात त्या सर्वांनी आंबेडकरांच्या सत्याग्रहास पाठिंबा द्यायला हवा’’. पुढे १९३५ साली आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली तेव्हा गांधीजींनी लिहिले होते, ‘‘हिंदुत्वासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे आव्हान आहे. ज्या धर्मात ते राहिले त्याच धर्मातील सवर्णांनी त्यांच्याबरोबर इतका हीन व्यवहार केला आहे की केवळ त्या लोकांचाच नाही तर त्यांच्या धर्माचाही त्याग करण्यास आपण त्यांना भाग पाडले आहे!’’
गांधी- आंबेडकर तौलनिक आकलन
बाबासाहेबांनी सर्वसामान्यांचा ‘पाणी’ हा मुद्दा निवडला, तर गांधीजींनी सर्वांच्याच आहारात महत्त्वाचे असलेले ‘मीठ’! महाडला चवदार तळे सत्याग्रहावेळी मंडपामध्ये बाबासाहेबांनी एकमेव फोटो लावला होता- गांधीजींचा! बाबासाहेबांनी काळा‘राम’ मंदिर प्रवेशाचा लढा दिला, तर गांधीजींची श्रद्धा होती ‘रामा’वर! सुरुवातीस वर्णाश्रम व्यवस्थेवर विश्वास असलेले गांधीजी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणवून घेत असले तरी ते रूढार्थाने सनातनी नव्हते. त्यांची अंत्योदय संकल्पना बाबासाहेबांच्या विचारांच्या जवळची आहे.
जातीव्यवस्था नष्ट होण्यासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक आहेत, तेव्हा आपल्या आश्रमात फक्त आंतरजातीय विवाहच होतील, असा नियम गांधीजींनी लागू केला. स्वच्छतागृहांच्या सफाईचे काम आजही अस्पृश्य समाजातील लोकांना दिले जाते. गांधीजींच्या आश्रमात हे काम सर्वांसाठी अनिवार्य होते. अस्पृश्यांप्रति समाजात प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी त्यांनी अस्पृश्यांना हरीचे प्रियजन ‘हरिजन’ संबोधण्यास सुरुवात केली. गांधीजींच्या विचार- आचरणात जो बदल होत गेला त्यापाठी इतर कारणांबरोबरच बाबासाहेबांचा प्रभावही होता. स्वातंत्र्य लढ्यात ‘आधी राजकीय की आधी सामाजिक’, हा वाद अनेकदा झाला. एकाच उद्दिष्टाकडे पोहोचण्याची सुरुवात, दोघांनी रेषेच्या दोन भिन्न टोकांकडून केली. अर्थात ध्येय एकच असल्याने, त्यांच्यात संघर्ष होता तसाच संवादही, विरोधाभास होता व एकमेकांवर प्रभावही!
ऐतिहासिक पुणे करार
अस्पृश्य किंवा मागासवर्गीयांना निवडणुकीत आपला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावा, अशी मागणी आंबेडकरांनी इंग्रजांपुढे ठेवली होती. तर यामुळे भारतीय समाजात जातीआधारित विभाजन अधिक व्यापक होईल व इंग्रजांना आपले कामकाज चालवणे सोपे होईल, याची गांधीजींना खात्री होती. १९३२ च्या मार्च महिन्यात इंग्रजांनी गांधीजींना आश्वासन दिले की त्यांच्याशी विचारविनिमय केल्याशिवाय ते विभक्त मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय घेणार नाहीत. मात्र ऑगस्ट १९३२ मध्ये त्यांनी परस्पर ब्रिटिश संसदेत विभक्त मतदारसंघाची घोषणा केली. दुसऱ्याच दिवशी गांधीजींनी पत्र पाठवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि प्राणांतिक उपोषण जाहीर केले. इंग्रजांनी गांधीजींना अटक करून पुण्यातील येरवडा तुरुंगात टाकले. त्या वेळी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याची आवश्यकता असताना सामाजिक प्रश्नावर उपोषण करण्याचा गांधीजींचा निर्णय काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आवडला नव्हता. हिंदू महासभेच्या तेज बहादुर सप्रू यांनी असे सुचवले की, काही निवडक मतदारसंघांत फक्त दलित मतदार, दलित उमेदवारांना मते देऊन निवडणूक प्रक्रिया सुरू करतील. त्यात प्रथम दोन क्रमांकांची मते मिळवणाऱ्यांना सर्व समाजांतील मतदार मते देऊन अंतिम विजयी उमेदवार निवडतील. डॉ. आंबेडकर उपोषणस्थळी पोहोचले. गांधीजींचे म्हणणे होते की, ‘‘सप्रू योजनेत निर्धारित मतदारसंघातून दलितांपैकी फक्त दोन- तीन सहकाऱ्यांनाच प्रतिनिधित्वाची संधी मिळू शकते. हा अन्य इच्छुकांवर अन्याय आहे. सर्व दलित उमेदवारांना निवडून येण्याची समान संधी मिळाली पाहिजे’’. बाबासाहेबांना गांधीजींचे म्हणणे पटले. त्यांनी संयुक्त मतदारसंघाचा पर्याय मान्य केला. मात्र अशा मतदारसंघांची संख्या ९७ वरून १४७ इतकी वाढवून घेण्यात ते यशस्वी झाले. अर्थात इंग्रज सरकार हे मान्य करत नाही तोवर गांधीजी आपले उपोषण संपवण्यास तयार झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी ब्रिटिश संसदेत दिवसभर आणि रात्रभर चर्चा झाली आणि मग सकाळी गांधी-आंबेडकर प्रस्ताव स्वीकृतीची इंग्रजांनी घोषणा केली. गांधीजींचे उपोषण समाप्त झाले. डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘‘माझ्यात आणि गांधीजींमध्ये जे साम्य आहे ते मला आश्चर्यचकित करते. सुरुवातीला आमच्यात मतभेद होते. मात्र दरवेळी गांधीजी माझ्या बाजूनेच बोलत आणि उभे राहत गेले. फक्त एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की, ही भूमिका त्यांनी आधीच गोलमेज परिषदेत का नाही मांडली!’’ थोडक्यात बाबासाहेबांचा मुद्दा असा होता की, यासाठी प्राणांतिक उपोषणापर्यंत जाण्याची गांधीजींना काय गरज होती!
उपोषणाचे व्यापक परिणाम
गांधीजी केवळ राजकीय नेता नव्हते तर सांस्कृतिक, नैतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शकही होते. दलित समाजात बाबासाहेबांप्रति हीच भावना होती. येरवडा तुरुंगात गांधीजींचे प्राणांतिक उपोषण सुरू होते तेव्हा देशभर हिंदू समाजात क्रांतीची भावना जागृत झाली होती. कोलकाता येथील प्रसिद्ध काली घाट मंदिर आणि अयोध्येचे राम मंदिर उपोषणाच्या पहिल्या सप्ताहात दलितांसाठी खुले करण्यात आले. दिल्लीत दलित-सवर्ण एकजुटीच्या मिरवणुका निघाल्या. मुंबईत महिलांनी जनमत घेतले. यात २५,००० विरुद्ध केवळ ५०० मतांनी दलितांसाठी मंदिर खुले करण्याची घोषणा करण्यात आली. नेहरूंच्या कट्टर धार्मिक असलेल्या आई- स्वरूप राणी यांनी जीवनात प्रथमच, दलितांनी बनवलेले जेवण ग्रहण केले. बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी दलितांबरोबर सहभोजन केले. अनेक गावांत पाणवठे दलितांसाठी खुले झाले. दलित- सवर्ण विद्यार्थी एका बाकावर बसू लागले. सुधारणांची, प्रायश्चित्त आणि आत्मशुद्धीची लाट पसरली!
गांधी- आंबेडकर मैत्र प्रेरणादायी
घटना समितीतील काँग्रेसचे बहुमत, अन्य पुरोगामी पक्ष संघटनांची साथ आणि बाबासाहेबांची दलित समाजाशी असलेली बांधिलकी, विद्वत्ता, व्यवहार कौशल्य आणि समता व समाजवाद या मूल्यांवर असलेली निष्ठा यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे जणू गांधी- आंबेडकर मैत्रभावाचा पुढचा स्वाभाविक परिणाम होता! स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेब कायदा मंत्री होण्यात गांधीजींची भूमिका महत्त्वाची होती. दुर्दैवाने घटना तयार होत असतानाच गांधीजींची निर्मम हत्या झाली. हे वृत्त समजताच बाबासाहेबांनी घटनास्थळी धाव घेतली. गांधीजींच्या मृत्यूने माझे सुप्रीम कोर्ट गेले, ही भावना बाबासाहेबांनी व्यक्त केली. पुढे त्यांनी आंतरजातीय विवाह करण्याचे ठरवले तेव्हा गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांना आंबेडकर म्हणाले, ‘‘आज बापू हवे होते!’’ घटनेत लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवादी मूल्ये उदघोषित झाली. बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपुरात बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. मात्र बाबासाहेबांची कारकीर्द पुढे जाण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
समाजात वैर-द्वेष-हिंसा पसरवणाऱ्या व धर्माचा वापर अधार्मिक पद्धतीने करू पाहणाऱ्या शक्ती खोटेनाटे पसरवत आहेत. राजकीय वातावरण कलुषित करत लोकशाही, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे पायदळी तुडवण्यास सत्ताधारी जराही मागेपुढे पाहण्यास तयार नाहीत. अशा वेळी गांधी- आंबेडकर मैत्रभावातून अधोरेखित होणारी दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक एकजुटीची मशाल तेवत ठेवणे गरजेचे आहे. गांधीजी आणि बाबासाहेबांमधील वाद- संवाद- सहमती लक्षात घेऊन त्यांच्यातील मतभिन्नतेला महत्त्व देण्यापेक्षा, संविधानवादी, मध्यममार्गी व मानवतावादी विचार- आचार समन्वयाच्या वाटेने पुढे नेण्याचा निर्धार केला तर गांधी- आंबेडकर मैत्रभाव आजही दीपस्तंभ ठरू शकेल!
डॉ. संजय मंगला गोपाळ, समाजवादी व पर्यायी विकासवादी आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते.
sansahil@gmail.com