अभिजित बेल्हेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग! …गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण…!”

छत्रपती शिवरायांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ या अद्वितीय ग्रंथातील ‘दुर्ग’विषयक प्रकरणातील हा उतारा! शिवकालीन दुर्गांविषयीचे हे आद्य साहित्य! महाराष्ट्रातील गडकोटांवरील आद्य, दुर्मीळ दुर्गसाहित्याचा शोध घेताना अगदी सतराव्या शतकातील या समकालीन ग्रंथापासूनच उत्खनन सुरू होते.

दुर्ग आणि महाराष्ट्राचे नाते सर्वश्रुत आहे. सह्याद्रीच्या रांगांनी या महाराष्ट्राला अगोदर दुर्गमता बहाल केली आणि मग या दुर्गम कड्या-कपारींवरच आमच्या दुर्गांची शेलापागोटी चढली. कधी सातवाहनांपासून इथल्या डोंगरांवर ही दुर्गसंस्कृती रुजली. पुढे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या झंझावातात तर या गडकोटांना एखाद्या जिवंत किल्लेदाराचे रूप आले. एकूणच महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलात या दुर्गांची मोठी भूमिका राहिली. यामुळे इथल्या मराठी माणसाच्या मनातही त्यांच्याविषयी आदराची-प्रेमाची भावना आहे. या भावनेतूनच कित्येक दशकांपासून एखाद्या पवित्र मंदिरी जावे त्याप्रमाणे ही मराठी पावले या धारातीर्थांवर भटकत आहेत. दुर्गांविषयीच्या या आदरातून आधी त्याचे भ्रमण आणि नंतर दुर्गसाहित्य तयार होऊ लागले.

दुर्गसाहित्याचा पहिल्या पर्वाचा मागोवा घेतला तर अगदी सुरुवातीला इंग्रजांच्या काळात आणि इंग्रजांकरवी काही लेखन झाले आहे. सन १८६० मध्ये इंग्रजांनी तयार केलेल्या ‘गव्हर्नमेंट लिस्ट ऑफ सिव्हिल फोर्ट्स’ या पुस्तकात कराची ते धारवाडपर्यंतच्या ४८५ किल्ल्यांची माहिती आली आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्रातील २८९ किल्ल्यांचा समावेश आहे. सिडने टॉय या विदेशी लेखकाने लिहिलेली ‘अ हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन’ आणि ‘द फोर्टिफाईड सिटी ऑफ इंडिया’ ही पुस्तकेही महाराष्ट्रातील आणि त्यातही शिवकालीन किल्ल्यांविषयी बोलतात. दुर्मीळ नकाशे, छायाचित्रे आणि माहितीने ही दोन्ही पुस्तके सजलेली आहेत. परंतु किल्लेविषयक आद्य साहित्यात मैलाचा दगड ठरतात ते या इंग्रजांनीच १८८५-८६ मध्ये लिहिलेली ‘जिल्हा गॅझेटिअर’! एकेका जिल्ह्याची सविस्तर माहिती देणाऱ्या ग्रंथांमध्ये आपल्या किल्ल्यांविषयीही बरीच माहिती मिळते.

ब्रिटिशांकडून आमच्या किल्ल्यांवर हे असे साहित्य तयार होत असतानाच विसाव्या शतकाच्या सुरुवातीस चिंतामण गंगाधर गोगटे या एका मराठी माणसाने प्रथमच ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ हे पुस्तक दोन भागांत लिहिले. कधी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकांतील वर्णन आजही अचंबित करते. या वर्णनामध्ये गडांना त्यांचे लाकडी दरवाजे अद्याप शाबूत होते. तट-बुरुज ताठ मानेने उभे होते. सदर किंवा किल्लेदाराच्या वाड्यावर अद्याप लोकांचा राबता सुरू होता. त्यामुळे आज ही माहिती वाचताना खूपच मजेशीर तर वाटतेच पण जोडीने वास्तूंचे संदर्भही पुरवते.

याच काळात अनेक संशोधकांनीही या गडांची वाट पकडली. यातूनच य. न. केळकर यांचे ‘चित्रमय शिवाजी’ (१९३५), कृ. वा. पुरंदरे यांचे ‘किल्ले पुरंदर’ (१९४०), शिवराम महादेव परांजपे यांचे ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’ (१९३४), ग. ह. खरे यांचे ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ अशी इतिहासाने भारलेली पुस्तके जन्माला आली. ‘चित्रमय शिवाजी’तील दुर्मीळ छायाचित्रे पाहिली, की आज थक्क व्हायला होते. ‘किल्ले पुरंदर’ हे तर त्या काळी केवळ एका गडावर लिहिलेले सविस्तर पुस्तक. ‘मराठ्यांच्या लढायांचा इतिहास’मधील माहिती आणि नकाशे तर धामधुमीचा सारा काळच उभा करतात. ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ हे पुस्तक तर एखादा संशोधन ग्रंथच म्हणावा अशा धाटणीचे आहे.

स्वातंत्र्यानंतर आमच्या या गडकोटांचा आणखी शास्त्रीय नजरेने अभ्यास सुरू झाला. यातून तयार झालेल्या दुर्गसाहित्याला संशोधन आणि व्यासंगाची जोड मिळाली. स. आ. जोगळेकर यांच्या ‘सह्याद्री’ या पुस्तकाची दखल यासाठी स्वतंत्ररीत्याच घ्यावी लागेल. जोगळेकरांनी या पुस्तकामध्ये सह्याद्रीतील फक्त किल्लेच नाही, तर अवघे सह्याद्री मंडळच आपल्यापुढे मांडले आहे. जे. एन. कमलापूर यांचे ‘द डेक्कन फोर्ट्स’ हे पुस्तक देखील असेच स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात आले. इंग्रजीतील या पुस्तकात शिवकाळातील ११७ किल्ल्यांची माहिती, नकाशे आणि रेखाचित्रे असा मोठा ऐवज दडलेला आहे. पुढे पं. महादेवशास्त्री जोशी यांचे ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ हे पुस्तक एक साहित्यकृती बनूनच आपल्यापुढे आले. त्यांच्या संवेदनशील लेखणीतून शिवरायांच्या दुर्गांच्या एका वेगळ्याच वैभवाचे दर्शन घडते.

स्वातंत्र्यानंतरच्या याच काळात मराठी साहित्य क्षेत्रात एक नाव आपल्या लेखणीने सर्वदूर गाजत होते, ते म्हणजे गोपाल नीलकंठ दांडेकर! उत्तम भाषा, संवादीशैली आणि त्याहीपेक्षा या साऱ्यापाठी एक संवेदनशील मन, यामुळे ‘गोनीदा’ एक साहित्यिक म्हणून मराठी मनावर अधिराज्य करतच होते. अशा या साहित्यिकाचे पाय आणि डोळे शिवरायांच्या या गडकोटांकडे कधी वळले हे बहुधा त्यांनाही ठाऊक नसावे. रायगड, राजगड, राजमाची असे एकेका गडावर ते शेकडो वेळा गेले आणि महिनोन्महिने राहिले. काही लोक त्यांना गमतीने म्हणायचे, ‘गो. नी. दांडेकर मुक्काम राजगड तिथे नच आढळले तर कदाचित तळेगावी सापडतील.’ असे किल्ल्यांशी अद्वैत झालेल्या या गडपुरुषाचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील दुर्गप्रेम, अभ्यास आणि दुर्गवारी सुरूच होऊ शकत नाही. ‘किल्ले’, ‘दुर्गदर्शन’, ‘दुर्गभ्रमणगाथा’, ‘शिवतीर्थ रायगड’ अशी त्यांची कितीतरी पुस्तके एकाहून एक आहेत. या पुस्तकातील कुठलेही प्रकरण, पान वाचायला घ्यावे आणि थेट त्या गडावर पोहोचावे इतकी ती या दुर्गप्रेमाने ओथंबलेली-भारावलेली आहेत.

कधी १८९६ मध्ये गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर यांनी लिहिलेले ‘रायगडाची माहिती’ हे पुस्तक तत्कालीन गडाची माहिती सांगते. याची किंमत आहे केवळ अर्धा आणा! यानंतर १९२४ मध्ये गोविंदराव बाबाजी जोशी यांचे ‘रायगड किल्ल्याचे वर्णन’, १९२९ साली विष्णू वासुदेव जोशी यांचे ‘राजधानी रायगड’, शां. वि. आवळसकर यांचे ‘रायगडची जीवनकथा’ अशी किती पुस्तके घ्यावीत आणि त्यातील दुर्मीळ-मौलिक साहित्यावर चर्चा करावी! कधी काळी लिहिलेल्या या पुस्तकांवरच आजची दुर्ग साहित्याची विस्तृत-विशाल परंपरा उभी राहिली आहे. इतिहासाबरोबरच भूगोल, निसर्ग, पर्यावरण, स्थापत्य, पुरातत्त्व, खगोलशास्त्र, गिर्यारोहण, पर्यटन, विविध कला, साहित्य, समाजजीवन असे असंख्य विषय तिने कवेत घेतले आहेत. अभ्यासक-भटक्यांपासून ते लेखकापर्यंत अशी एक मोठी साखळी तयार झाली आहे.

दुर्ग ! आमच्या पूर्वजांनी तयार केलेला एक स्थापत्याविष्कार आहे. त्याआधाराने छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा पराक्रम रचला. आज ही सारी स्थळे आमच्या गौरवशाली इतिहासाची धारातीर्थे बनली आहेत. आमची ही दुर्गसंस्कृती टिकवण्याचे, जगवण्याचे आणि पुढच्या पिढीकडे घेऊन जाण्याचे कामच या दुर्गसाहित्याने केले. मराठी वाङ्मयातील ही दुर्गगाथा आहे. म्हणूनच आजच्या दुर्गदिनाच्या निमित्ताने या आद्य दुर्गसाहित्याचे स्मरण करणेही एखाद्या गडाला वंदन करण्यासारखे ठरते!

abhijit.belhekar@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi literature gopal nilkanth dandekars memorial day celebrated as durg din review of rare literature on forts asj
First published on: 01-06-2023 at 11:02 IST