कबूतर… मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येणारा पक्षी. महानगरात तर चौका-चौकांत कबुतरखाने आढळतात. पण या कबुतरांमुळे आरोग्य धोक्यात येतं. कबुतरांपासून सामान्यांना होणारा संसर्ग वाढला आहे. लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढल्याचा इशारा डॉक्टर सातत्याने देत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कबुतरांचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. मुंबईत कबुतरांच्या विष्ठेची समस्या काही वर्षांपूर्वी राजकीय मुद्दा ठरला होता. म्हणून राज ठाकरेंच्या मनसेने दादर कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती. कबुतरांच्या वाढत्या त्रासामुळे खार परिसरातील रहिवाशांनी कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने खारचा कबुतरखाना बंद केला होता. आणि आता दादरचा कबुतरखानाही बंद करण्यात आला आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने कबुतरांच्या विष्ठमुळे मुंबईत दोन महिलांची फुफ्फुसं निकामी झाल्याची बातमी जानेवारी २०२०मध्ये दिली होती. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याची हानी होऊ शकते. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी सामान्यत: आढळून येते. त्यांची विष्ठा पडलेल्या मातीत ही बुरशी आढळते. याबाबत श्वसनविकार तज्ज्ञ सांगतात, ‘कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. बुरशीमुळे अलर्जी होऊ शकते, अस्थमादेखील होण्याची शक्यता असते.’
श्वसनविकार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील ही बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानंतर लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो. २०१९ मध्ये ग्लास्गो हॉस्पिटलमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामागच्या कारणांचा अभ्यास करताना तज्ज्ञांना कबुतरांच्या विष्ठेचे काही अंश त्याच्या खोलीत आढळले. स्कॉटलँडचे आरोग्य सचिव जेन फ्रीमन यांनी एकदा म्हटले होते, ‘हे कण डोळ्यांना दिसू शकत नाहीत. अनेकांना याचा त्रास होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना फुफ्फुसात संसर्ग होतो.’ ते पुढे स
मुंबईत हवेत आद्रता जास्त असते आणि कबुतरांची संख्या जास्त असल्याने कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण आढळतात. या विष्ठेमुळे लोकांना अस्थमाचा जास्त त्रास होतो. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांच्या लक्षणांत कफ, सर्दी, श्वास घेण्यात अडथळा इत्यादींचा समावेश असतो. बहुतेक डॉक्टर हे रुग्ण आल्यानंतर त्यांना ‘कबुतरांना अन्न देता का? त्यांच्या विष्ठेशी संपर्क येतो का,’ असे प्रश्न विचारतात. जेणेकरून याबाबतची माहिती मिळू शकेल. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारा हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया जीवघेणा आहे. याचं कारण, यात फुफ्फुसं निकामी होतात. त्यामुळे कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या साहाय्यानेही रुग्णाला वाचविणे कठीण होते.
कबुतरांची विष्ठा आणि पखांमुळे होणाऱ्या आजारांबाबत पुणे आणि आसपासच्या परिसरात पाच ते १२ वर्षे वयोगटातील १,१०० मुलांवर अभ्यास करण्यात आला. संशोधनातून असं आळून आलं की, ३७ टक्के मुलांना कबुतरांच्या विष्ठेतून पसरणाऱ्या बुरशीमुळे ॲलर्जी झाली. ३९ टक्के मुलांना पंखामुळे ॲलर्जी झाली. अशाप्रकारे कबुतरांच्या संपर्कात आल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. कबुतरांच्या पिसांमुळे श्वसनाचे विकार वाढत आहेत. विष्ठेमुळे बुरशी (फंगस) संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. विष्ठा आणि पिसांमधून बाहेर पडणाऱ्या जंतूमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनियाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कबुतरांना धान्य न टाकण्याचं आवाहन मुंबई–पुणे शहरातील नागरीकांना काही काळापूर्वी नगरपालिकांनी केलं होतं.
कबुतराच्या विष्ठेचे एवढे दुष्परिणाम नजरेस आल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतरखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य धोक्याचा विचार करत ही कारवाई करण्यात येत असून, या आदेशाचं उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दादरमधील कबुतरखानादेखील बंद करण्यात आला आहे. या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली असून जो कोणी इथे कबुतरांना खाण्यास देईल त्याला ५०० रुपये दंड ठोठावला जाईल आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
दरम्यान दादरमधील कबुतरखाना बंद झाल्यानंतर याला जैन समाजातील काही व्यक्तींनी विरोध केला आहे आणि त्यांना एका सत्ताधारी मंत्र्याचीही साथ आहे, असे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसते. आरोग्यविषयक एवढे सगळे दुष्परिणाम दिसत असूनही जैन समाज सरकारवर का दबाव आणू पाहत आहे? ते कबूतरखान्यामुळे कोणालाही श्वसनाचे आजार झालेले नाहीत, असे रेटून खोटे का बोलत आहेत? खरेतर एखादी व्यक्ती कबुतरांना खाद्य देत नसेल, पण त्या भागत राहत असेल अशाही लोकांना आजार होऊ शकतो. कारण हवेमध्ये विष्ठेचे घटक, पंखाच्या पिसांचे कण या भागात अधिक असणे स्वाभाविकच आहे. धुळीचे कणही या परिसरात अधिक पसरलेले असतात. यामुळे अशा भागातील लोकांनाही आजार होऊ शकतो, हे वैज्ञानिक सत्य आपण केव्हा लक्षात घेणार?
अलीकडे धर्मांधांच्या झुंडी विरोधकांवर धावून जाताना, त्यांचा आवाज बंद करताना दिसतात. झुंडबळीच्याही अनेक बातम्या येतात. परंतु यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. चुकीच्या पद्धतीने भूतदया दाखवणाऱ्या धर्मांधांना सार्वजनिक आरोग्यापेक्षा आपल्या अंधश्रद्धाच महत्त्वाच्या वाटतात, हेच यावरून लक्षात येते. माणसाच्या आरोग्याशी खेळणारे हे कृत्य पूर्णपणे निषेधार्ह नाही काय?