सुहास नाईक-साटम
भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटचालीत काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत, ज्यांनी एका शतकाचा प्रवास आपल्या जीवनात सामावून घेतला आहे. प्राध्यापक एकनाथ व्ही. चिटणीस हे त्यांपैकीच एक. शंभर वर्षांच्या आयुष्यात त्यांनी भारतीय अवकाश संशोधनाच्या पहाटेपासून ते आधुनिक उपग्रहयुगापर्यंतचा संपूर्ण प्रवास केवळ पाहिला नाही, तर त्याला आकार देण्यातही मोलाचा वाटा उचलला. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी, वयाच्या शंभराव्या वर्षी पुण्यात त्यांचे निधन झाले आणि भारतीय विज्ञानाच्या इतिहासातील एक सुवर्णपान हरपले.

बालपण आणि शिक्षण

२५ जुलै १९२५ रोजी कोल्हापूर येथे जन्मलेल्या एकनाथ चिटणीस यांचे बालपण पुण्यात गेले. तिथेच त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि कॅम्प परिसरात हे कुटुंब राहत असे. त्यांचे शालेय शिक्षण आचार्य अत्रे मुख्याध्यापक असलेल्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले. आचार्य अत्र्यांचा एक धडा त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला. विज्ञानात कल्पकता आणि सामाजिक जबाबदारी या दोन्ही गोष्टींचे महत्त्व त्यांनी तेव्हाच जाणले.

पुण्याच्या एस. पी. कॉलेजमधून प्रा. एम. के. परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवी प्राप्त केली. एम.एस्सी. पूर्ण झाल्यानंतर ते अहमदाबादला गेले आणि फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणांवरील संशोधनाला त्यांनी प्रारंभ केला. पुढे ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) येथे उच्च शिक्षणासाठी गेले.

त्या काळात भारतात अवकाश संशोधनाची बीजे रोवली जात होती. डॉ. विक्रम साराभाई यांनी चिटणीसांना भारतात परत बोलावले आणि त्यांनी अमेरिकेतील सुवर्णसंधी सोडून निर्धाराने मातृभूमीत परत येण्याचा निर्णय घेतला ‘भारतासाठी काहीतरी करायचं आहे,’ हेच त्यांचे ध्येय होते.

अवकाश प्रवासाची पहाट

१९६०च्या दशकात इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (INCOSPAR) स्थापन झाली तेव्हा प्रा. चिटणीस तिचे संस्थापक सदस्य होते. भाभा आणि साराभाई यांच्यासोबत त्यांनी भारताच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपण केंद्रासाठी थुंबा येथील चर्चजवळील जागा निवडली. तेच पुढे भारताच्या अवकाश प्रवासाचे जन्मस्थळ ठरले.

१९६३ साली भारताचे पहिले साऊंडिंग रॉकेट नायके-अपाचे त्यांनी यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले आणि त्या क्षणी भारताचे अवकाशयुग औपचारिकपणे सुरू झाले. मर्यादित साधनसंपत्ती असूनही विज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी व्हावा हा त्यांचा ठाम विश्वास होता.

नेहरू आणि टेलिव्हिजनचा प्रवास

पंडित नेहरू हे सुरुवातीला भारतात टेलिव्हिजन आणण्याच्या विचाराला विरोध करीत होते. त्यांच्या मते, ते फक्त मनोरंजनाचे साधन होते. पण प्रा. चिटणीस यांनी त्यांना शिक्षण, शेती, आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी टेलिव्हिजनचा उपयोग कसा करता येईल, हे पटवून दिले.

या संवादातून पुढे इंदिरा गांधींच्या काळात १९७६ साली Satellite Instructional Television Experiment ( SITE) सुरू झाला. प्रा. चिटणीस यांच्यासह प्रा. यशपाल आणि किरण कर्णिक यांसारख्या शास्त्रज्ञांच्या सहभागाने मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतील शेकडो गावांमध्ये हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला. तो भारतातील विज्ञानाच्या लोकाभिमुख उपयोगाचा एक नवा अध्याय होता.

संशोधक आणि मार्गदर्शक

प्रा. चिटणीस हे केवळ वैज्ञानिक नव्हते, तर ते एक दूरदर्शी शिक्षक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक तरुण वैज्ञानिकांना दिशा दिली. एस.एल.व्ही. प्रकल्पासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची निवड करून, तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी शिफारस करून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कारकीर्दीत त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. कलाम यांच्या नेतृत्वगुणांची ओळख त्यांना सुरुवातीलाच पटली होती. त्यांच्या दृष्टीने विज्ञान म्हणजे केवळ ज्ञानाचा शोध नव्हे, तर जबाबदारीची जाणीवही होय.

विज्ञानाचे समाजाशी नाते

अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर (SAC) चे संचालक म्हणून प्रा. चिटणीस यांनी प्रयोगशाळेतील विज्ञान थेट समाजाच्या उपयोगासाठी नेले. त्यांच्या काळात उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी व्यवस्थापन, हवामान अंदाज, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासासाठी करण्यात आला.

विज्ञान माणसाच्या जीवनात बदल घडवते, तेव्हाच अर्थपूर्ण होते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

विनम्रता, नेतृत्व आणि सन्मान

त्यांचा स्वभाव अतिशय संयमी आणि विनम्र होता. त्यांन प्रसिद्धीचा अजिबात मोह नव्हता. त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिली. भारत सरकारने १९८५ साली त्यांना पद्माभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तरीही त्यांच्या मते, ‘कार्याची प्रामाणिकता आणि परिणामकारकता’ हेच खरे पारितोषिक होते.

एक शतक – एक प्रेरणा

प्रा. चिटणीस यांच्या आयुष्याचा शतकभराचा प्रवास हा भारतीय विज्ञानाची उत्क्रांती स्वत: चालत पाहण्यासारखा. त्यांनी घडवलेली पिढी आजही भारताच्या उपग्रह कार्यक्रमात, अवकाश संस्थांमध्ये आणि संशोधन केंद्रांमध्ये कार्यरत आहे.

त्यांच्या पश्चात पुत्र डॉ. चेतन चिटणीस, सून आमिका आणि नाती तारिनी व चांदनी असा परिवार आहे. पण त्यांच्या वारशाचा विस्तार हा त्यांच्या घरापलीकडे आहे. तो प्रत्येक वैज्ञानिकाच्या विचारात, प्रत्येक विद्यार्थ्याच्या जिज्ञासेत आणि प्रत्येक संशोधकाच्या प्रेरणेत आहे.

दीप अजूनही प्रज्वलित

प्रा. ई. व्ही. चिटणीस यांच्या जाण्याने देशाने एक महान शास्त्रज्ञ, शिक्षक आणि विचारवंत गमावला आहे. तथापि, भारताच्या नवसर्जनशील प्रवासात, नव्या कल्पनांमध्ये आणि विज्ञानातील भारतीय आत्म्यात त्यांनी प्रज्वलित केलेला वैज्ञानिक दीप अजूनही उजळत आहे. त्यांचे जीवन हेच विज्ञानाचा सर्वोच्च सन्मान आहे.

त्यांना सादर आदरांजली.
सुहास नाईक-साटम
मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स, मुंबई</strong>