विनायक मीराबाई सुभाष लष्कर
आत्महत्या ही केवळ वैयक्तिक मनोवस्था किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या नसून एक सामाजिक घटना आहे. व्यक्तीच्या विचारांवर, वर्तनावर आणि निर्णय प्रक्रियेवर समाजातील मूल्ये, अपेक्षा आणि दबावांचा मोठा प्रभाव असतो. समाजशास्त्रज्ञ एमिल डरखाईम यांनीही आत्महत्येचे विश्लेषण करताना सामाजिक घटकांवर भर दिला आहे.
वाढत्या अपेक्षा आणि भूमिकासंघर्ष
आजच्या औद्योगिक आणि भांडवलशाही समाजात प्रत्येक व्यक्तीला व्यामिश्र स्वरूपाच्या अनेकविध भूमिका निभावाव्या लागत आहेत.
कामाच्या ठिकाणी : बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि जागतिक स्पर्धेमुळे कामाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. वरिष्ठांची अपेक्षा, कार्यक्षमता मोजणारे निर्देशांक आणि सततचा ‘परफॉर्मन्स’चा दबाव हा मोठा मानसिक ताण निर्माण करतो.
कौटुंबिक जीवनात : नातेसंबंधातील तणाव, आर्थिक गरजा, मुलांचे शिक्षण आणि करिअर, सामाजिक प्रतिमा राखण्याच्या अपेक्षा या सर्व गोष्टी व्यक्तीला छिन्नविछिन्न करतात.
समाजात : प्रत्येकाकडून “यशस्वी” ठरण्याची, ठरावीक चौकटीत वागण्याची अपेक्षा समाज व्यक्तीवर लादतो.
या सर्वांमुळे निर्माण होणारा भूमिकासंघर्ष हा आत्महत्येच्या प्रवृत्तीला खतपाणी घालतो.
संवेदनशीलतेचा अभाव
भांडवली व्यवस्थेने व्यक्तीला ‘यंत्रवत’ केले आहे. नात्यांमध्ये उब, माणुसकी, जिव्हाळा कमी होत चालला आहे. ‘मी’च्या पलीकडे जाणारी भावना कमी होत असल्याने व्यक्तीमध्ये परात्मभाव (alienation) वाढतो. परिणामी निराशा, एकाकीपणा आणि असमाधान यांचा पगडा वाढतो.
समाजशास्त्रज्ञ एमिल डरखाईमचे विश्लेषण आजही महत्त्वाचे आहे. त्यांनी आत्महत्येचे चार प्रकार मांडले.
आत्मकेंद्री (Egoistic Suicide) : समाजाशी नाळ तुटल्याने होणारी आत्महत्या.
परार्थवादी (Altruistic Suicide) : समाजासाठी स्वतःचे जीवन अर्पण करण्याची प्रवृत्ती.
दैववादी (Fatalistic Suicide) : अतिरेकी बंधने, दडपशाही यामुळे होणारी आत्महत्या.
नियमहीनतेतून होणारी (Anomic Suicide) : मूल्ये ढासळल्यामुळे व समाजात नियमशून्यता आल्यामुळे होणारी आत्महत्या.
आजच्या गतिशील समाजात ‘अनॉमी’ म्हणजेच नियमहीनतेमुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. कारण समाज झपाट्याने बदलतो आहे, परंतु त्या बदलाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक आधारव्यवस्था, सामाजिक मूल्ये आणि भावनिक पाठबळ यांचा अभाव आहे.
चिंताजनक आकडेवारी
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात सुमारे ७ लाख लोक आत्महत्या करतात. भारतामध्ये नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या 2023 च्या अहवालानुसार १.७ लाखांहून अधिक आत्महत्या झाल्या. यामध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक असून, बेरोजगारी, शैक्षणिक दडपण, नातेसंबंधातील तणाव आणि आर्थिक ओझे ही महत्त्वाची कारणे ठरतात.
उपाययोजना : केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक
आत्महत्या रोखण्यासाठी फक्त वैयक्तिक समुपदेशन पुरेसे नाही, तर सामाजिक संरचनेत बदल आवश्यक आहे.
शिक्षणक्षेत्रात : मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणारे अभ्यासक्रम आणि समुपदेशनाची यंत्रणा असायला हवी.
कामाच्या ठिकाणी : आरोग्यदायी कामाचे वातावरण, ताणतणाव व्यवस्थापन आणि लवचिकता असायला हवी.
समाजात : संवाद, परस्परांना भावनिक आधार, यशापेक्षा मूल्याधिष्ठित जीवनाचा प्रचार हवा.
शासनाकडून : मानसिक आरोग्य सेवांचा विस्तार, आत्महत्या प्रतिबंध केंद्रांची निर्मिती, संकटग्रस्तांसाठी हेल्पलाईन्सचा प्रभावी वापर व्हायला हवा.
भारतीय समाजातील आत्महत्या
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक आत्महत्या करतात. या आत्महत्या विविध कारणांशी निगडित आहेत.
शेतकरी आत्महत्या: भारतामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा येथे कर्जबाजारीपणा, अपुरी पिक विमा योजना, हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करतात. हा प्रकार नियमहिनता (Anomic) या आत्महत्येच्या प्रकाराशी संबंधित आहे.
विद्यार्थी आत्महत्या: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक ताण, स्पर्धा, नापास होण्याची भीती, कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे या प्रमुख गोष्टींमुळे आत्महत्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. विशेषतः कोटा, पुणे, बंगळुरू, चेन्नईसारख्या महानगरांमध्ये हे प्रमाण आपल्याला अधिक आढळून येते. हा प्रकार अहंवादी किंवा आत्मकेंद्रित आत्महत्येत मोडतो.
महिला आत्महत्या: कौटुंबिक हिंसा, पती-पत्नीतील तणाव, हुंडाबळी, सामाजिक असमानता, लैंगिक शोषण, आर्थिक परावलंबन या सर्व कारणांमुळे भारतीय महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचे आढळते.
तरुण व बेरोजगारांच्या आत्महत्या: नोकरीची कमतरता, करिअरचा ताण, स्पर्धा व भविष्याबद्दलची असुरक्षितता या कारणांमुळे भारतीय युवकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत चालल्याचे आपल्याला दिसते आहे.
शहरातील एकाकीपणामुळे आत्महत्या: शहरीकरण, स्थलांतर, लहान कुटुंब व्यवस्था यामुळे एकटेपण व मानसिक ताण वाढतो. या वाढलेल्या एकाकीपणामुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नवीन आव्हानांना तोंड देणे दिवसेंदिवस कठीण होत आहे याच कारणामुळे शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आपल्याला आढळून येते.
थोडक्यात
आत्महत्या ही केवळ व्यक्तीची शोकांतिका नसून समाजाचे अपयश आहे. हे अपयश दूर करण्यासाठी संवाद असला पाहिजे, मदतीचा हात पुढे केला पाहिजे. व्यक्तीला जगण्याचा आधार देणारी, समजून घेणारी आणि स्वीकारणारी समाजरचना घडवली गेली पाहिजे. कोणाच्याही जीवनातील अंधारात आपण एक छोटीशी ज्योत पेटवू शकलो, तर ती व्यक्ती पुन्हा जगण्याची आशा धरू शकते.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा फक्त स्मरणाचा दिवस न ठरता, मानवी संवेदनशीलतेचा उत्सव ठरावा. प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे, त्याचे जीवन मौल्यवान आहे ही जाणीव समाजात रुजली, तर आत्महत्या थांबवणे नक्कीच शक्य आहे. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा सामाजिक जबाबदारीची नव्याने जाणीव करून देणारा दिवस व्हावा, हीच खरी अपेक्षा.
सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग, तुळजाराम चतुरचंद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती</p>
vinayak.lashkar@gmail.com