संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारण्यांची श्रीमंती हा सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचाच विषय असतो. लोकसभा काय, विधानसभा काय किंवा मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे अशा सर्वच महानगरपालिकांमध्ये ये-जा करणाऱ्या सदस्यांच्या आलिशान गाड्या बघितल्यावर या नेतेमंडळींच्या श्रीमंतीची कल्पना येते. निवडणूक अर्जासोबत मालमत्तेचा तपशील सादर करण्याचे सर्वच उमेदवारांवर बंधनकारक करण्यात आल्यानंतर राजकारण्यांच्या मालमत्तेचा काही प्रमाणात तरी अंदाज येऊ लागला, कारण मालमत्तेची खरी माहिती कोणीच सादर करीत नाही हे निर्विवाद सत्य आहे. हे निवडणूक आयोगालाही माहीत असते आणि सर्वसामान्य मतदारांनाही. पण आपला लोकप्रतिनिधी किती श्रीमंत आहे याची पुसटशी तरी कल्पना मतदारांना येते. जंगम मालमत्तेचा तपशील लपविता येतो, पण स्थावर मालमत्ता नावावर असल्यास त्याची माहिती सादर करावीच लागते. माहिती दडवल्यास सदस्यत्व रद्द होण्याची भीती असते. देशातील अनेक नेते असे आहेत की विमान किंवा हेलिकॉप्टरशिवाय ते फिरत नाहीत. तरीही त्यांच्या नावे साधे वाहन नसते. ‘असोसिएशन ऑफ डेमाॅक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेच्या संदर्भात जाहीर केलेल्या अहवालावरून राजकारण्यांची मालमत्ता आणि श्रीमंती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेच्या यादीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री असून, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या ३० जणांच्या यादीत तळाला आहेत. ३० पैकी २९ मुख्यमंत्री करोडपती आहेत. ममता बॅनर्जी यांची मालमत्ता फक्त १५ लाख दाखविण्यात आली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्र हा मालमत्तेच्या माहितीचा स्रोत असल्याचे एडीआर संस्थेने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेच्या आधारे त्यांची श्रीमंती ठरली आहे. या मुख्यमंत्र्यांची श्रीमंती यापेक्षा किती तरी अधिक असू शकते.

हेही वाचा… शिवसेनेचा नाशिकमध्ये महिला मेळावा, रश्मी ठाकरे यांना विनंती

पहिल्या तीन जणांच्या यादीत अग्रक्रमी आंध्रचे जगनमोहन रेड्डी (५१० कोटी), दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे पेमा खंडू (१६३ कोटी) तर तिसऱ्या स्थानावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (६३ कोटी) आहेत. तिन्ही राज्ये तशी छोटी आणि आर्थिकदृष्ट्या फारशी प्रगत नाहीत. कमी मालमत्ता असलेल्या किंवा तुलनेत गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत ममता बॅनर्जी (१५ लाख), पिनरायी विजयन (१ कोटी १८ लाख) तर तिसऱ्या स्थानावर हरयाणाचे मनोहरलाल खट्टर (१ कोटी २७ लाख) आहेत.

एकनाथ शिंदे ११व्या क्रमांकावर

मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीच्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ११ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची मालमत्ता ११ कोटी ५६ लाख रुपये दाखविण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या श्रीमंतीच्या यादीवर नजर टाकल्यास महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा या आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा देशाला अधिक कर मिळवून देणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री तेवढे ‘श्रीमंत’ दिसत नाहीत. २० वर्षे (१९९८ ते २०१८) त्रिपुराचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माणिक सरकार हे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री समजले जात असत. त्यांची मालमत्ता २७ लाख रुपये होती. ममता बॅनर्जी या त्यांच्यापेक्षा गरीब आहेत. गेली १२ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवूनही ममतादीदींची मालमत्ता फक्त १५ लाख रुपयेच आहे. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हे त्यांचे राजकीय वारसदार मानले जातात. २०१४ आणि २०१९ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्या मालमत्तेत २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये काही पट वाढ झाली होती. याबद्दल भाजप आणि डाव्या पक्षांनी ममतादीदींवर टीकेची झोड उठविली होती. ममता बॅनर्जी यांच्या भावाच्या बायकोने महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरताना कुटुंबाची पाच कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या संपत्तीबद्दल नेहमीच संशय व्यक्त केला जातो.

हेही वाचा… विरोधकांच्या ऐक्यासाठी राष्ट्रीय समन्वय समितीचा घाट

महाराष्ट्रात दादासाहेब कन्नमवार यांचा अपवाद वगळल्यास सारेच सधन मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे नेहमीच शक्तिमान पद मानले जाते. एके काळी अगदी पंतप्रधानपदानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्व असायचे. आता परिस्थिती बदलली असून अन्य राज्यांची याबाबत स्पर्धा सुरू झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांची स्थावर आणि जंगम अशी मालमत्ता ५०० कोटींपेक्षा अधिक दाखविण्यात आली आहे. आंध्रमधील बहुसंख्य खासदार-आमदार हे श्रीमंत मानले जातात. अनेकांची मालमत्ता ही १०० कोटींपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा… कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार

साम, दाम, दंड यांचा वापर करू शकणारा नेता वरिष्ठपदी पोहोचू शकतो. अलीकडच्या काळात विशेषत: प्रादेशिक पक्षांचे सारेच नेते हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. साधी राहणी असलेली, निवडणुकीसाठी लोकांसमोर पैशांसाठी हात पसरणारी नेतेमंडळींची पिढी आता कालबाह्य झाली आहे. एस. टी. स्थानकावर उभे असताना एका व्यापाऱ्याने आपली बॅग टपावर नेऊन ठेव असे दरडावताच स्वत: शिडीने बसच्या टपावर जाऊन बॅग ठेवणारे आमदार आता दुर्मीळच मानावे लागतील. गणपतराव देशमुख यांच्यानंतर एस.टी.ने प्रवास करणारा आमदार शोधून सापडणे कठीण. आंध्रचे जगनमोहन यांनी ५०० कोटींची अधिकृत मालमत्ता दाखविली आहे, मग त्यांची मूळ संपत्ती किती असेल? अशा वेळी मतदारांच्या अपेक्षा वाढतात आणि नेतेमंडळीही निवडणुका जिंकण्याकरिता हात सैल सोडतात. त्यातूनच दुष्टचक्र सुरू होते.

कोणत्या मुख्यमंत्र्यांची किती संपत्ती ?

जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) ५१० कोटी
पेमा खंडू (अरुणाचल प्रदेश) – १६३ कोटी
नवीन पटनायक (ओडिशा) – ६३ कोटी
निहूपिहू राय (नागालॅण्ड) – ४६ कोटी
एन. रंगास्वामी (पुड्डुचेरी) – ३८ कोटी
के. चंद्रशेखर राव (तेलंगणा ) – २३ कोटी
भूपेश बघेल (छत्तीसगड) – २३ कोटी
हेमंत बिश्व सरमा (आसाम) – १७ कोटी
कोर्नाड संगमा (मेघालय) – १५ कोटी
माणिक साहा (त्रिपुरा) – १३ कोटी
एकनाथ शिंदे (महाराष्ट्र) – ११ कोटी
प्रमोद सावंत (गोवा) – ९ कोटी
बसवराज बोम्मई (कर्नाटक) – ८ कोटी
एम. के. स्टॅलिन (तमिळनाडू ) – ८ कोटी
हेमंत सोरेन (झारखंड ) – ८ कोटी
भूपेंद्र पटेल (गुजरात) – ८ कोटी
सुखविंदरसिंह सुखू (हिमाचल प्रदेश ) – ७ कोटी
शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश) – ७ कोटी
अशोक गेहलोत (राजस्थान) – ६ कोटी
पुष्करसिंह धामी (उत्तराखंड) – ४ कोटी
प्रेमसिंह तमंग (सिक्कीम) – ३ कोटी
झोरमथंगा (मिझोराम) – ३ कोटी
अरविंद केजरीवाल (दिल्ली) – ३ कोटी
नितीशकुमार (बिहार) – ३ कोटी
भगतसिंग मान (पंजाब) – १ कोटी ९७ लाख
योगी आदित्यनाथ – (उत्तर प्रदेश) – १ कोटी ५४ लाख
बिरेनसिंह (मणिपूर) – १ कोटी ४७ लाख
मनोहरलाल खट्टर (हरयाणा) – १ कोटी २७ लाख
पेनीयारी विजयन (केरळ) – १ कोटी १८ लाख
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) – १५ लाख

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Richest and poorest chief ministers in india asj
First published on: 15-04-2023 at 09:57 IST