देवेंद्र गावंडे

सध्याच्या गढूळ वातावरणात समंजस नजरांना दिलासा देणारे प्रसंग तसे दोनच. त्यातला एक महिनाभरापूर्वीचा. मुस्लीम धर्मातील विचारवंतांशी सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेली चर्चा असे त्याचे स्वरूप तर दुसरा नुकताच घडलेला. तो म्हणजे भागवतांनी दिल्लीतील एका मशिदीत जाऊन इमामांची भेट घेणे. हे दोन्ही प्रसंग स्वधर्माची बाजू घेऊन निकराची लढाई लढण्यात मग्न असलेल्या दोन्ही बाजूच्या धर्मवेड्यांना बुचकळ्यात टाकणारे. त्यामुळेच अनेक नव्या प्रश्नांना जन्म देणारे. भागवतांच्या या कृतीची चर्चा सर्वत्र झडताना त्यातून उठणारे सूरही वेगवेगळे. याची गरज काय होती इथपासून तर ही कृती म्हणजे परिवाराकडून नेहमी खेळल्या जाणाऱ्या या विसंगती व भ्रम पसरवणे या खेळाचाच एक प्रकार इथपर्यंत. यावरच्या प्रतिक्रिया टोकाच्या असल्या तरी भागवतांच्या या कृतीचे वर्णन स्वागतार्ह पाऊल या शब्दात करायला हवे.

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
PM Narendra Modi Yavatmal Rally
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो, देणगीसाठी स्कॅनर कोडही दिला
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

देशातील मुस्लिमांशी संवाद हा तसा संघाचा जुनाच अजेंडा. परिवारात गेली अनेक वर्षे सक्रिय असलेल्या राष्ट्रीय मुस्लीम मंच या संघटनेकडून तो नेहमीच नियमितपणे राबवला जातो. याचाच एक भाग म्हणून दोन वर्षांपूर्वी रेशीमबागेत इफ्तार पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते. या मंचची सूत्रे संघाचेच एक धुरीण इंद्रेश कुमारांकडे. नेमून दिलेले काम संबंधिताने इमानेइतबारे करायचे आणि त्यात इतरांनी ढवळाढवळ करायची नाही ही संघाच्या कामकाजाची पद्धत. त्यातून थोडे पुढे जात आता थेट भागवतांनीच संवादाची सूत्रे हाती घेण्यामागचे नक्की कारण काय असेल?

गेल्या आठ वर्षांत वेगवेगळ्या व अनेकदा क्षुल्लक कारणावरून देशभरातील मुस्लिमांना करण्यात आलेले लक्ष्य, यातून देशाच्या बहुविधतेला गेलेला तडा, अनावश्यक वादाचे मुद्दे उकरून काढत देशभर अगदी ठरवून घडवली जात असलेली चर्चा व अनेकदा उद्भवणारा हिंसाचार, त्यातून वेगाने होत चाललेले धार्मिक ध्रुवीकरण, त्याचा जागतिक पटलावर झालेला परिणाम, त्यात नूपुर शर्माच्या वक्तव्याने पडलेली भर, त्याचे आखाती देशात उमटलेले पडसाद, त्यामुळे झालेली कोंडी फोडण्यासाठी भागवतांनी हा पुढाकार घेतला असेल की सत्ताधारी व त्यांच्या समर्थकांनी या मुद्द्यावरून मांडलेला उच्छाद आम्ही फार काळ शांतपणे सहन करू शकत नाही हे सुचवण्यासाठी संघाने हे पाऊल उचलले असेल? या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, संघ हीच संवादाची प्रक्रिया परिवाराचे म्हणवून घेणाऱ्या पण सातत्याने चिथावणीखोर भाषा वापरून एका विशिष्ट धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात धन्यता मानणाऱ्या समर्थकांसोबत का राबवत नाही? सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात सक्रिय असलेले अनेक नेते ‘गोली मारो’, ‘मुस्लिमांनो पाकिस्तानात जा’ अशी आक्रमक भाषा जाहीरपणे वापरतात. त्यांच्याशी संघ केव्हा संवाद साधणार? सामूहिक विवेक हेच हिंदू समाजाचे व्यवच्छेदक लक्षण असेल व याच समाजाच्या वर्तनावर जर देशाचे भवितव्य ठरणार असेल तर त्याने अधिक समंजसपणे वागावे हे अपेक्षित आहे. मात्र ‘चांगल्या गोष्टीची सुरुवात घरापासून’ या उक्तीचा आधार घेत संघ संवादाचा प्रारंभ यांच्यापासून सुरू का करत नाही? अशी सुरुवात झालेली दिसली असती तर संघ या मुद्द्यावर प्रामाणिक आहे हाच संदेश सर्वत्र गेला असता. तसे न करता थेट मुस्लिमांशी संवाद साधणे व धार्मिक सौहार्दासाठी उचललेले पाऊल अशा शब्दात त्याचे वर्णन करणे याचा अर्थ सध्याच्या गढूळ वातावरणनिर्मितीला हेच अल्पसंख्य जबाबदार आहेत असा होत नाही काय? याला चलाखी नाही तर आणखी काय म्हणायचे?

‘भारतात राहणाऱ्या विविध धर्मीयांचा डीएनए एकच आहे. केवळ उपासना करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे साऱ्यांनी एकमेकांचा आदर व सन्मान करायला हवा’ हे भागवतांचे अलीकडचेच प्रसिद्ध विधान. त्यावर देशभर चर्चा झाली. सध्याच्या वातावरणात सरसंघचालक समंजस भूमिका घेतात म्हणून त्याचे कौतुकही झाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी आता घेतलेला पुढाकार आश्वासक ठरतो पण विद्वेषाची बीजे पेरण्यात पारंगत झालेल्या परिवारातील लोकांचे काय? त्यांना हा डीएनएचा सिद्धांत कोण समजावून सांगणार? त्यासाठी संघाने गृहपातळीवर अशी संवादाची प्रक्रिया चालू केली आहे का? असेल तर त्याला जाहीर स्वरूप का दिले जात नाही? संवाद साधूनही परिवारातील लोक ऐकत नसतील तर संघ नेमकी कोणती भूमिका घेणार?

सत्ताधारी आणि संघ यांच्यात समन्वय साधण्यासाठी एक यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. दोन्ही वर्तुळातील लोक या यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे नेहमी कौतुक करत असतात. या यंत्रणेकडे ‘घरच्यांना’ समजावण्याची जबाबदारी दिली आहे का? असेल तर त्यात यश का येत नाही? अशा संवादाच्या कृतीतून संघाला या देशातील सर्वसमावेशकता टिकवायची आहे असे चित्र एकीकडे उभे करायचे व दुसरीकडे सत्ता व समर्थकांच्या वर्तुळातून मुस्लिमांवर होणाऱ्या शाब्दिक व शारीरिक हल्ल्याकडे दुर्लक्ष करायचे यातून संघाला नेमके काय साधायचे आहे? हे खरे की अलीकडे संघाची भाषा बदलू लागली आहे. अनेकदा ती सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेला छेद देणारी असल्याचेही दिसून आले आहे. मग तो काँग्रेसमुक्त भारताचा मुद्दा असो वा देशात एकच पक्ष शिल्लक राहील अशी सत्ताधाऱ्यांकडून झालेली वल्गना असो. लोकशाही व्यवस्थेसाठी घातक ठरणाऱ्या या भूमिकांचा संघाने अगदी संयत पण स्पष्ट शब्दात प्रतिवाद केला आहे.

एकच पक्ष या देशातील कोट्यवधी लोकांच्या आशा, आकांक्षा व स्वप्ने पूर्ण करू शकत नाही हे भागवतांचेच उद्गार अलीकडचे. यातून संघ व सत्ताधाऱ्यांमध्ये दिसणारा विसंवाद सूक्ष्म स्वरूपाचा असला तरी मवाळ भूमिकेची पाठराखण करणाऱ्या स्वयंसेवकाच्या वर्तुळात संघाच्या या संवादी भूमिकेचे स्वागतच झाले. संघाचा अजेंडा सरकार पूर्ण करते याचा अर्थ संघ चूप बसेल असा नाही, असाही अर्थ यातून काढला गेला. तीच भूमिका आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न म्हणजे भागवतांनी उचललेले हे पाऊल आहे असाही तर्क आता संघाच्या वर्तुळात व्यक्त केला जातो. संघ बाहेरच्यांबरोबरच परिवारातील कट्टरतावाद्यांशी संवाद सुरू करेल तेव्हाच हा तर्क खरा मानला जाऊ शकतो. तुम्ही अल्पसंख्यांच्या राष्ट्रप्रेमावर शंका उपस्थित करता तेव्हा तुमच्या लोकशाहीप्रति असलेल्या निष्ठेवरही आपसूकच शंका उपस्थित होते याची जाणीव किमान या संवादाच्या निमित्ताने तरी संघाला होणे गरजेचे आहे.

सत्तेची नशा मोठी विचित्र असते. त्यातून येणाऱ्या धुंदीतून विवेक हरवला जातो. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना ही बाधा झाली असेल व त्यातून हे सारे घडत असेल तर संघाने त्यात वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे ठरते. याचे एकमेव कारण म्हणजे आम्हाला सत्तेचा मोह नाही ही संघाने आरंभापासून घेतलेली भूमिका. विरोधक म्हणतात, संघ या भूमिकेपासून कधीचाच विलग झाला. परिवारातील संस्था असो वा संघटना, साऱ्यांना सत्तेचे फायदे मिळू लागले आहेत. हा आक्षेप संघाला खोडून काढायचा असेल तर संघाला या संवादप्रक्रियेला आणखी पुढे नेतानाच त्याला दुहेरी (आतले व बाहेरचे) स्वरूप प्राप्त कसे होईल हे बघावे लागणार आहे. तरच संघाचा हेतू प्रामाणिक आहे हे सिद्ध होईल. अन्यथा संघाला चिकटलेले कट्टरतावादाचे विशेषण कायम राहील.

भागवतांच्या भेटीनंतर मशिदीच्या इमामांनी हर्षोल्हासित होत त्यांना दिलेली ‘राष्ट्रपित्या’ची उपमा नेमके काय दर्शवते? नेमका याच काळात देशपातळीवर पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा राबवला जात आहे. त्यातले घोषवाक्य ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ असे आहे. इमामांनी दिलेली उपमा त्याला छेद देणारी समजायचे काय? शेवटी हा सारा राजकारणाचा खेळ तर नाही ना! या संवादातला राजकीय हेतू बाहेर काढला तरी या देशातील धार्मिक सलोखा कायम राहावा हीच अनेकांची इच्छा आहे. देशातले अल्पसंख्य पाकिस्तानच काय, कुठेच जाणार नाहीत. त्यांनाही भयमुक्त वातावरणात भारतातच राहायचे आहे. यासाठी आवश्यक असलेले सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी संघावर आहेच. निदान बहुसंख्याकांचे प्रतिनिधी म्हणवून घेण्यासाठी तरी!

devendra.gawande@expressindia.com