डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ( जन्म २९ जून १८७१- मृत्यू १ जून १९३४ ) हे सुप्रसिद्ध नाटककार आणि विनोदी निबंधकार याच नावलौकिकाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत. परंतु त्यांनी कविताही लिहिलेल्या आहेत. कल्पनारम्य नाट्यसृष्टीचे आणि आधुनिक विनोदी निबंधाचे जनक म्हणून ते ओळखले जातात. साहित्याचा टीकाकार कादंबरीकार आणि आत्मचरित्रकार म्हणूनही त्यांचा मराठी साहित्यामध्ये लौकिक प्राप्त केला आहे. मराठीच्या पाचव्या आणि इंग्रजी चौथ्या इयत्तेत असतानाच, अगदी किशोरवयातच कोल्हटकरांनी नाटके लिहिली हे त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. त्यांनी अनेक स्फुट काव्येही लिहिली. ‘गीतोपायन’ या पुस्तकात कोल्हटकरांच्या या सर्व कवितांना समाविष्ट करण्यात आले आहे. कोल्हटकर यांचा कवी म्हणून जो लौकिक आहे तो त्यांच्या सुप्रसिद्ध महाराष्ट्र गीतामुळे!

मराठी राष्ट्रीय कवितेचे मूळ स्फूर्तिस्थान म्हणजे सोळाव्या शतकाचे महानायक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व! याला महाराष्ट्राबद्दलची अनेक गीते अपवाद नाहीत. गोविंदाग्रजांनी (राम गणेश गडकरी : जन्म २६ मे १८८५ – मृत्यू २३ जानेवारी १९१९) लिहिलेले ‘प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’ हे महाराष्ट्रगीत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे वर्णन करते, राजा बढे यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे शाहीर साबळे यांनी अजरामर केलेले महाराष्ट्र राज्य गीतही शिवकाळाची आठवण जागी करते, त्याआधी कोल्हटकरांनी मराठेशाहीच्या वीरश्रीची आणि संस्कृतीची पाठराखण महाराष्ट्र गीतातून केली. या महाराष्ट्र गीता सारखीच गीते अनेक कवींनी पुढे लिहिली आहेत. उदाहरणार्थ , ‘महाराष्ट्र लक्ष्मी’चे कवी विनायक, ‘महाराष्ट्र महोदय’ ल.रा. पांगारकर यांनी लिहिले; तर ‘महाराष्ट्र भूपाळी’ व ‘महाराष्ट्र गीत’ दत्तोपंत तुळजापूरकर यांनी लिहिली. मात्र आधुनिक कवितेचा प्रभाव न पडलेली शब्दरचना, राष्ट्रीय आशय आणि काव्याची नादमय गेयता यांमुळे कोल्हटकरांचे महाराष्ट्र गीत आगळे ठरते.

हेही वाचा : ३७० जागा मिळाव्यात, असे भाजपनेत्यांना तरी का वाटावे?

‘महाराष्ट्र गीत’ लिहून कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी राष्ट्रीय कवितेचा विशेषतः महाराष्ट्राचा, महाराष्ट्र गीतांचा नावलौकिक वाढविला. इंग्रजांच्या काळात या भूमीचे नावही ‘महाराष्ट्र’ असे नसताना कोल्हटकरांनी महाराष्ट्र, मराठी भाषा,मराठी संस्कृती मराठी अस्मिता जागृत करून लोकांच्यात स्वाभिमानाची परंपरा नव्याने रुजवली. शिववैभवाची आठवण देऊन त्यांनी महाराष्ट्राला राष्ट्र हिताचा विचार करण्यास सिद्ध केले. कोल्हटकर यांनी राष्ट्रीय कवितेत नवीन पायंडा पाडला. अशा राष्ट्रीय कविता ‘गीतोपायन’मध्ये अनेक आहेत. पण ‘महाराष्ट्र गीत’ या कवितेच्या संदर्भात या राष्ट्रीय कवितेचे गुणविशेष आकळतात. भुमिका समजून येते.

मराठीबाणा आणि महाराष्ट्र धर्माचे मर्म सांगणारे अत्यंत उत्स्फूर्त आणि ओजस्वी असे हे गीत आहे या गीताची सुरुवात

‘बहु असोत सुंदर संपन्न की महा।

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।’

हेही वाचा : विरोधी आघाडीचा ताळमेळ ‘वंचित’शी का जमला नाही?

ब्रिटिशांच्या काळात, स्वाभिमानी मनाने अहंकारी मनाला दिलेले आवाहन आहे. या आशयसंपन्न काव्याची सुरुवात आत्मविश्वासाने होते आहे! या आत्मविश्वासाला जोड आहे ती आध्यात्मिकतेची. आत्मभान येण्यासाठी केवळ शौर्य नव्हे तर चिंतनही हवे. ते महाराष्ट्राने केले. म्हणूनच महाराष्ट्र ही संतांची व वीरांची भूमी आहे. महाराष्ट्रधर्मानेच इथले राजकारण चालते…

‘विक्रम -वैराग्य एक जागि नांदती

जरिपटका भगवा झेंडाहि डोलती

धर्म-राजकारण समवेत चालती

शक्ती-युक्ति एकवटुनी कार्य साधिती

पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा!’

हेही वाचा : चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना शिवराय समजले आहेत का?

थोडक्यात हे मराठीचे महाराष्ट्राचे अमर स्तोत्र आहे. ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ असे वारंवार म्हणावे वाटते ; कारण इथे दिखाऊ वैभव नसेल, पण देशभक्तीने भारलेली आणि कुणाचेही वाईट न चिंतणारी मने, भारलेदिव्यत्वाची प्रचिती देणारी माणसं आहेत.

‘प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरें,

सद्भावांचीच भव्य दिव्य आगरें ,

रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे,

रमणीची कूस जिथे नृमणिखनि ठरे,

शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा गृहा।।’

हेही वाचा : विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..

यापुढल्या कडव्यात मराठ्यांच्या शौर्याचे वर्णन करताना, हातात नंग्या तलवारी घेतलेल्या मावळ्यांचा उल्लेख येतो, ‘ नग्न खड्ग करिं, उघडे बघुनि मावळे । चतुरंग चमूचेही शौर्य मावळे।।’ असा ‘मावळे’ या शब्दावरचा उत्तम श्लेष अलंकारही इथे दिसतो. पण कोल्हटकरांचा भर आहे तो महाराष्ट्रातल्या वैचारिक क्रांतीवर. संतांनी घडवलेल्या आणि छत्रपतींनी वाढवलेल्या या क्रांतीमुळेच मराठी भाषा आत्मतेजासह टिकून आहे. तिची आठवण कोल्हटकर शेवटच्या कडव्यात देतात…

‘गीत मराठ्यांचे श्रवणीं मुखीं असो

स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो

वचनिं लेखनींहि मराठी गिरा दिसो

सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनिं वसो

देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा।।’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रधर्माचा उद्घोष करताना, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी देहार्पणही करण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन कोल्हटकरांचे महाराष्ट्र गीत करते. अहंकाराला स्वाभिमानी प्रत्युत्तर देण्याच्या भावनेतून सुरू होणारे हे काव्य अखेर भाषा, विचार आणि प्रदेश यांच्याप्रती लीनतेचा भावही शिकवते!
लेखिका वडाळे (जि. सोलापूर) येथील महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख आहेत.