दीपा भंडारे

समर्थ रामदास स्वामींच्या हस्ताक्षरातील ‘वाल्मीकी रामायणा’ची प्रत विसाव्या शतकातील संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी मिळवली. त्यांनीच स्थापन केलेल्या श्री समर्थ वाग्देवता मंदिर संस्थेने २०१० साली सुरू केलेल्या संशोधन प्रकल्पातील ‘वाल्मीकी रामायणा’च्या ७ कांडांवरचे ८ मोठे अभ्यासपूर्ण खंडात्मक ग्रंथ पूर्ण झाले आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा ५ जुलै रोजी पुण्यात होत आहे. त्यानिमित्त-

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..

दिसामाजी काहीतरी ते लिहावे

प्रसंगी अखंडित वाचीत जावे

असा उपदेश करणाऱ्या समर्थ रामदासांनी नाशिकजवळील टाकळी येथील तपश्चर्येच्या काळापासून ते देह ठेवेपर्यंत, लोकप्रबोधनासाठी विविधांगी उदंड लेखन केले. ‘दासबोध’, ‘मनाचे श्लोक’, ‘आत्मारामा’सह हजारो अभंग, पदे, स्फुट प्रकरणे, विविध वृत्तांचे श्लोक, करुणाष्टके, सवाया, आरत्या याद्वारे अध्यात्मज्ञानाबरोबरच मानवी जीवनव्यवहाराच्या अनेक अंगांचे सखोल मार्गदर्शन केले.

समर्थाच्या काळात छपाईचे तंत्रज्ञान अस्तित्वात नसल्यामुळे, अभ्यासासाठी ग्रंथांची हस्तलिखिते विद्वान शास्त्रीपंडितांकडून मिळवून त्यांची स्वहस्ते नक्कल करणे हा एकच मार्ग असे. त्यानुसार समर्थानी १६२० ते १६३२ या आपल्या टाकळी येथील तपश्चर्येच्या काळात, नाशिकमधल्या विद्वानांकडून संस्कृतमधील ‘वाल्मीकी रामायणा’ची प्रत मिळवून, आपले आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू रामचंद्रांचे चरित्र स्वहस्ते लिहून काढले. रामायणाच्या सात कांडांच्या संस्कृत श्लोकांची एकंदर १७२० पृष्ठे समर्थानी आपल्या अत्यंत सुबक एकसारख्या मोत्यासमान अक्षरांत लिहून काढली.

विसाव्या शतकात समर्थ संप्रदायातील थोर संशोधक लेखक कै. शंकर श्रीकृष्ण देव यांचे कार्य (१८७१ ते १९५८) महत्त्वाचे असून त्यांनी समर्थ ग्रंथ संपदा जतन करण्यासाठी १९३५ मध्ये धुळे येथे श्री समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थेची स्थापना केली. समर्थाची वास्तव्य स्थाने, तसेच त्यांची आणि त्यांच्या शिष्यांच्या अफाट ग्रंथसंपदेची सुमारे चार हजार हस्तलिखिते त्यांनी देशभर फिरून मोठय़ा कष्टाने मिळवून जतन केली. यामध्ये ही समर्थाच्या हस्ताक्षरातील ‘वाल्मीकी रामायणा’ची मिळालेली संपूर्ण प्रत धुळय़ाच्या श्री समर्थ वाग्देवता मंदिरात सध्या अत्यंत आधुनिक पद्धतीने जतन करण्यात आली असून, हा ग्रंथच या संस्थेच्या कार्याची अधिष्ठात्री देवता आहे.

कै. देवांना देशभर फिरून हस्तलिखिते मिळवताना समर्थाच्या या हस्ताक्षरातील ‘वाल्मीकी रामायणा’ची प्रत कशी सापडली याची कथाही अत्यंत रोचक आहे. श्रीसमर्थ अवतारकार्याच्या काळात अर्थात १७ व्या शतकातील सनातनी मध्ययुगीन काळात आध्यात्मिक क्षेत्रात मराठी भाषेत उत्तम दर्जाची आणि विपुल ग्रंथरचना करणाऱ्या महाराष्ट्रातील काही अगदी मोजक्या महिला संतांमध्ये समर्थ शिष्या वेणास्वामी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. वेणास्वामींनी ‘संकेत रामायण’ हा ग्रंथ लिहिला असून, त्यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून त्या वेळी श्री समर्थानी वेणाबाईंना ही आपल्याजवळील ‘वाल्मीकी रामायणा’ची हस्तलिखित प्रत दिली होती. वेणाबाईंचा हा ‘संकेत रामायण’ ग्रंथ त्यांच्या देहावसनामुळे दुर्दैवाने अपूर्ण राहिला. तो पुढे वेणास्वामींच्या परंपरेतील त्यांचेच शिष्य गिरीधरस्वामींनी लिहून पूर्ण केला. तेव्हा समर्थाची ही हस्तलिखित प्रत गिरीधरस्वामींकडे आली. पुढे बीडमध्ये गिरीधरस्वामींची मुलगी आणि बंधू अशा दोघा जणांच्या परंपरेचे रामदासी मठ तयार झाले. गंमत अशी की या दोघांना गिरीधरस्वामींकडून मिळालेल्या ग्रंथसंपत्तीच्या वाटण्यांमध्ये समर्थाच्या या ‘वाल्मीकी रामायणा’च्या हस्तलिखिताची अर्धी पाने एका मठाला तर अर्धी पाने दुसऱ्या मठाला मिळाली. पुढे सुमारे १५० वर्षांनी कै. देव यांना हस्तलिखिते जमा करताना बीडच्या एका मठात समर्थाच्या या रामायणाच्या हस्तलिखिताची अर्धीच पाने मिळाली. त्यांना प्रश्न पडला की अर्धी पोथी कुठे असेल? तेव्हा लगेच काही दिवसांतच त्यांना बीडमधल्या दुसऱ्या मठात या पोथीची अर्धी पाने सापडली आणि त्यामागील इतिहास ज्ञात झाला. समर्थाच्या हस्ताक्षरातील हा अमूल्य ठेवा सापडल्यामुळे देवांना अत्यानंद होणे स्वाभाविक होते! देवांचे हे मराठी सारस्वतावर मोठे उपकार असून, त्यांच्यामुळे गेली सुमारे १०० वर्षे हे हस्तलिखित धुळय़ातील समर्थ वाग्देवता मंदिराकडून अत्यंत काळजीपूर्वक जतन करण्यात आले. सध्याही ते अत्याधुनिक अग्निरोधक पेटीत सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे.         

सध्या जगात सुमारे ४४ देशांत ‘वाल्मीकी रामायणा’वर विविध विद्यापीठांत संशोधन आणि अभ्यास केला जात आहे. परंतु या संशोधनासाठी ज्या ‘वाल्मीकी  रामायणा’च्या हस्तलिखिताचा आधार घेतला जातो, ती प्रत समर्थाच्या कालखंडानंतरची आहे. या पार्श्वभूमीवर, सुमारे ४०० वर्षांपूर्वी समर्थानी एकहाती सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली ही प्रत जगात चालणाऱ्या यासंदर्भातील  संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण व  ऐतिहासिक मूलाधार ठरणारी आहे. म्हणूनच ही सर्वात जुनी प्रत संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री समर्थ वाग्देवता मंदिर संस्थेने २०१० सालापासून वाल्मीकी रामायण संशोधन प्रकल्प सुरू केला. गेली १३ वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पाची यशस्वी पूर्तता आता झाली असून, ‘वाल्मीकी रामायणा’च्या ७ कांडांवर ८ मोठे अभ्यासपूर्ण खंडात्मक ग्रंथ पूर्ण झाले आहेत. हे अत्यंत मूलभूत स्वरूपाचे अमूल्य कार्य झाले असून, त्याचा लोकार्पण सोहळा येत्या ५ जुलै रोजी पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि फुलगावचे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत होत आहे.

या संशोधन ग्रंथाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात समर्थाच्या हस्ताक्षरातील स्कॅिनग केलेले पान, त्यापुढे संस्कृत श्लोक, त्याचा मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनुवाद, समर्थाच्या लेखनशैलीवरील व्याकरणात्मक प्रबंध, इंग्रजी शब्दांची सूची, श्रीरामाच्या सुमारे २०० विशेषणांसह इतर शेकडो शब्दांवर निवडक टिपा यांचा या सर्व ग्रंथात समावेश आहे. विशेष म्हणजे समर्थानी हस्तलिखित लिहिताना रामायणातील निवडक प्रसंगांवर काढलेल्या अनेक सुबक चित्रांची स्कॅिनग केलेली पानेही यामध्ये छापली आहेत. प्रत्येक कांडानंतर समर्थानी आपली नाममुद्रा आणि तिथी लिहिल्यामुळे या प्रतीच्या अस्सलतेबद्दल शंका घेण्यास जागा उरत नाही.

या गेली १३ वर्षे चाललेल्या संशोधन प्रकल्पासाठी पुणे, मुंबई, सातारा, नागपूर, धुळे, दिल्ली आदी देशभरातील विविध शहरांतील २७ संशोधक, संस्कृततज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, व्याकरणकार, वैदिक यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. यामध्ये मुख्यत: पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील ज्येष्ठ संशोधक डॉ. ग. ऊ. थिटे, पुणे विद्यापीठाच्या प्रगत संस्कृत केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र मुळे, संस्कृततज्ज्ञ कै. राम वेळापुरे,  कै. डॉ. स. मु. आयाचित, डॉ. नीलेश जोशी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. श्री समर्थ वाग्देवता मंदिराचे माजी अध्यक्ष शरद कुबेर यांनी या संपूर्ण प्रकल्पासाठी निरपेक्षपणे अथक

परिश्रम घेतले. या संपूर्ण प्रकल्पासाठी

सुमारे ७० लाख रुपये खर्च आला असून,

हा निधी जमवण्याचे मोठे आव्हान त्यांनी पेलले.

आर्थिक अडचणीमुळे समर्थाचे ‘वाल्मीकी रामायण’ प्रकाशित करण्याची कै. शंकर श्रीकृष्ण देवांची तेव्हा अपूर्ण राहिलेली इच्छा आता सुमारे सात दशकांनंतर, त्यांनीच स्थापन केलेल्या संस्थेमार्फत भव्य स्वरूपात पूर्ण होते आहे! हा ऐतिहासिक अमूल्य वारसा पुढील अनेक पिढय़ांसाठी मार्गदर्शक ठरेल ही अत्यंत आनंदाची आणि समर्थ साहित्यप्रेमींसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ‘उत्कट भव्य तेची घ्यावे’ असा उपदेश करणाऱ्या समर्थाच्या अचूक प्रयत्नावर आधारित जीवनधारणेचे हे यथोचित अनुसरण आहे.

bhandareds07@gmail.com