वृद्धमित्र प्रकल्पांतर्गत काम करताना नेहमीप्रमाणे मी वस्तीमध्ये आजीआजोबांच्या गृहभेटीसाठी गेलो होतो. तिथे शकूआजी भेटल्या. त्यांची विचारपूस केली. आजींना त्यांची प्राथमिक माहिती विचारली. साधारण ६५ वय वर्षे असणाऱ्या शकूआजी वस्तीमध्ये एक लहानशा घरात एकट्याच राहतात. त्यांना एक मुलगा आहे आणि तो डॉक्टर आहे. पण तो बाहेरगावी असतो. तो त्याच्या पत्नी मुलांसहित सुखाने राहतो आहे हे आजींकडून समजले. “तुम्ही का नाही राहात त्याच्यासोबत?” असे विचारले तेव्हा म्हणाल्या, “दहा वर्षांपूर्वी आम्ही त्याचे लग्न थाटामाटात लावून दिले. काही दिवस राहिला आमच्यासोबत आणि नंतर त्याच्या बायकोसहित गेला निघून आम्हाला इथे सोडून, सात आठ वर्षांपूर्वी माझ्या पतीचे निधन झाले, तेव्हापासून मी एकटीच इथे रहाते आहे. माझा मुलगा मात्र इतक्या वर्षांत कधीही मला भेटायला आला नाही. त्याने माझी साधी चौकशीदेखील कधी केली नाही. ज्या मुलाला स्वत:च्या आई-वडिलांना कधी भेटावंसं वाटत नाही, तो मला त्याच्याबरोबर घेऊन तरी कसा जाईल?” आजींचं ते बोलणं ऐकून त्यांना काय सांगावं हेच मला क्षणभर समजेनासं झालं. खरंतर मला काही बोलायची गरजच पडली नाही. कारण आजवर कोणाकडेही मन मोकळं करता न आल्याने आजींना आज माझ्याशी खूप काही बोलावंसं वाटत होतं. त्या न थांबता बोलू लागल्या.

पतीनिधनानंतर आजी खूप एकट्या पडल्या होत्या. वाढलेल्या वयामुळे कष्टाची कामं करणंही त्यांना जमेना. आजी त्यांच्या या सगळ्या परिस्थितीबद्दल घडघडा बोलत होत्या आणि मी ते सगळं शांतपणे ऐकत होतो. “एकुलता एक मुलगा म्हणून इतक जपलं, त्याला लाडात वाढवलं, त्याची सगळी काळजी घेतली, परिस्थिती फार चांगली नसतानाही त्याला चांगलं शिक्षण घेता येईल याची तजवीज केली. स्वत:च्या पोटाला पुरेसं नाही पण मुलाला मात्र पोटभर जेवण कसं मिळेल यासाठी दिवसरात्र धडपड करत होतो आम्ही. डॉक्टर झाला आमचा मुलगा! फार कौतुक वाटलं आम्हाला त्याचं. खूप स्वप्नं पाहिली होती आम्ही. आमचा मुलगा आम्हाला चांगले दिवस दाखवील, चांगलं सांभाळील, आमच्या कष्टाचं चीज करील, असं वाटत होतं. त्याचं शिक्षण पूर्ण झालं. स्वत:च्या पायावर उभा राहिला. काही वर्षांपूर्वी त्याचं लग्न करून दिलं. इतक सगळं करून आज हे दिवस मला पाहायला मिळाले. माझ्या पोटचा, हक्काचा मुलगा असूनही, तो चांगला डॉक्टर होऊनही आज माझ्यावर ही वेळ आली आहे.

सोबत राहणं तर दूरच पण इतक्या वर्षात आई जिवंत आहे का नाही हे सुद्धा त्याने कधी विचारलं नाही. माझ्या पतीच्या निधनानंतर माझा मुलगाच माझा आधार होता. पण तरीही मी आज निराधारासारखी जगत आहे. मुलगा बंगल्यात राहतो आहे आणि त्याची आई ही अशी कुठेतरी लहानशा घरात एकटीच पडून असते. मुलगा, सुन, नातवंडं असतानाही माझ्याशी आपुलकीने बोलणारं असं कुणीच नाही. मुलगा इतके पैसे कमवूनही त्याची आई मात्र रोजच्या दोन वेळच्या अन्नासाठी धडपड करते आहे. रोज काय काम करावं आणि कसे पैसे कमवावे जेणेकरून निदान एक वेळ तरी पोटभर जेवता येईल असे प्रश्न पडतात मला. हे असे दिवसही पहावे लागतील अशी कल्पना कधी केली नव्हती मी.” आजी बोलतच होत्या आणि मी त्यांना एकटक पाहत होतो. त्या अगदीच हतबल झाल्यासारख्या वाटत होत्या.

जोडीदाराचं असं जगातून निघून जाणं, पोटच्या मुलाने असं निराधार करणं, कोणाचीही साथ नाही, आधार नाही आणि स्वत:च्या या सगळ्या परिस्थितीबद्दल अनेक प्रश्न सोबत घेऊन रोजचा दिवस आला तसा जगण्याचा प्रयत्न करणं हेच आजींचं दैनदिन आयुष्य बनलं होतं. शकूआजींची ही सगळी परिस्थिती आमच्या वृध्दमित्रांना समजली होती आणि त्यांना शक्य ती सर्व मदत कशी मिळू शकेल यासाठी आमचे प्रयत्न सुरु झाले. वृद्धमित्र प्रकल्पांतर्गत त्यांना रेशन, आवश्यक औषधे दिली जातात. आमच्या डॉक्टरांकडून आजींची आरोग्य तपासणी केली जाते. वृद्धमित्र दर आठवड्याला आजींना भेटतात, त्यांचा रक्तदाब, आणि रक्तातील साखर इत्यादी तपासतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. वृद्ध मित्रांशी बोलून त्यांना इतके छान वाटते की त्या आता वृद्ध मित्रांची आतुरतेने वाट बघतात. त्यांना आता मुलगा लक्ष देत नसल्याची खंत त्यांना वाटत नाही. वृद्ध मित्र मात्र त्यांच्या मुलाचंही समुपदेशन करणार आहेत. त्याच्याशी बोलून त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणार आहेत.

पुण्यातील अशा २८ हजार वृद्धांचे जीवनामान गुणवत्ता सुधारण्याचा वसा वृद्धमित्रांनी घेतला आहे. यासाठी वेगवेगळ्या अनुषंगाने वृद्धांची माहिती गोळा केली आहे. वृद्धांना असलेले आजार, त्यांची मानसिक स्थिती, शासकीय योजना, विमा आणि त्याचबरोबर वृद्धांचे त्यांच्या परिवाराशी, त्यांच्या मित्रांशी आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसोबत कसे नातेसबंध आहेत, याची माहिती घेतली आहे. या माहितीतून असं दिसून आलं आहे की केवळ ९ टक्के वृद्धांचं त्यांच्या परिवाराशी नियमित बोलणं होतं आणि ३४% वृद्धांचा त्यांच्या परिवाराशी क्वचितच कधीतरी संवाद होतो. ५% वृध्दांचं त्यांच्या कुटुंबियांशी कधीही बोलणं होत नाही. कुटुंबियांशी होणाऱ्या संवादातून पुढं आलेल्या माहितीवरून दिसून येतं की घरातल्या वृद्ध लोकांशी नियमितपणे बोलणारी, त्यांची चौकशी करणारी कुटुंबं खूपच कमी आहेत. असंही म्हणता येईल की घरातल्या वृद्धांशी नियमित बोलणं बऱ्याच कुटुंबाना गरजेचं वाटत नाही, किंवा त्यांची ती प्राथमिकता नाही. याची कारणंही तितकीच वेगवेगळी होती. उदाहरणार्थ नोकरी, कामधंदा, व्यवसाय यात सतत व्यग्र असणं, घरातून लवकर बाहेर पडणं, उशिरापर्यंत घराबाहेर असणं, घरातल्या लहान मुलांचा अभ्यास आणि त्यांना योग्य व पुरेसा वेळ देणं इत्यादी.

यावरून लक्षात येतं की वृद्धांसोबत संवाद करण्यासाठी, त्यांचं ऐकून घेण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे. आपण लहान मुलांकडे जेवढं लक्ष देतो, तेवढंच घरातील वृद्धांकडे लक्ष देणंही गरचेचं आहे. म्हणूनच कुटुंबीय, आजूबाजूला राहणारे रहिवासी, मित्र या सर्वानी गरजू वृद्धांना आधार दिला पाहिजे.

वृद्धांना सांभाळणारं कोणी नसेल तर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी रोज अतोनात कष्ट करावे लागतात. यामध्ये होणाऱ्या त्यांच्या हालांचा आपण अंदाज लावू शकत नाही.

स्कूल संस्थेच्या ‘वृद्धमित्र’ या प्रकल्पाच्या माध्यमातून पुण्यातील सेवाधाम ट्रस्ट, दीपगृह सोसायटी, वंचित विकास, स्नेहदीप जनकल्याण फाऊंडेशन आणि मशाल या संस्थांच्या सहकार्याने, ११ वॉर्डमधील २८ हजार वृद्धांना आधार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात. या प्रकल्पात जवळपास १०० वृद्धमित्र काम करत आहेत. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, फिजिओथेरपी विद्यालय, शासकीय अधिकारी या प्रकल्पाच्या माध्यमातून वृद्धांना मदत करत आहेत. उदाहरणार्थ जेरियाट्रिक युनिटमध्ये फिजिओथेरपी, डॉक्टरांची व्हर्च्युअल ओपीडी, वेगवेगळ्या शासकीय योजनांना जोडून देणं याबरोबरच आवश्यक औषधं, डायपर, उपकरणं इत्यादी सेवा दिल्या जातात.

असं असलं तरी अजूनही वृद्धांना बऱ्याच वेगवेगळ्या सेवांची आणि आधाराची गरज आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी, संस्थांनी, आणि सीएसआर कंपन्यांनी वृद्धमित्र म्हणून जास्तीत जास्त सेवा आणि आधार देण्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून आणखी एखादी शकूआजी निर्माण होणार नाही किंवा तिला ज्या अडचणींना तोंड द्यावं लागलं तशी वेळ इतर आजीआजोबांवर येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nitin@vriddhamitra.org