scorecardresearch

Premium

कुलभूषण जाधव आणि ‘ते’ आठ अधिकारी कधी परत येणार?

केंद्र सरकार विधानसभा निवडणुकांचा प्रचार, विरोधकांची मुस्कटदाबी, विरोधी खासदारांचे निलंबन अशा महत्त्वाच्या विषयांमध्ये व्यग्र असल्याने या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाले असावे…

kulbhushan jadhav
गेल्या २०० दिवसांत अटकेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी आठ वेळा जामिनासाठी अर्ज केले, पण ते फेटाळण्यात आले. (फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

ॲड. प्रतीक राजूरकर

भारतीय नौदलातील निवृत्त अधिकाऱ्यांवरील आंतरराष्ट्रीय संकटांची मालिका संपत नाहीये. निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव गेली अनेक वर्षे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. गेल्या वर्षी ३० ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नौदलातील कतारस्थित आठ निवृत्त अधिकाऱ्यांना कतार प्रशासनाकडून रात्री अचानक अटक करण्यात आली. हे आठ निवृत्त नौदल अधिकारी कतार येथील दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी ॲण्ड कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपनीत गेली पाच-सहा वर्षे नोकरी करत होते. कतार नौदलाला प्रक्षिक्षण देणाऱ्या खासगी कंपनीत ते कार्यरत होते. कॅप्टन नवतेज सिंग, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणकार पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि रागेश यांना ३० ऑगस्टच्या रात्री काही काम असल्याचे सांगत कतार गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणा घरातून घेऊन गेल्या. त्यांना कतार प्रशासनाने अटक केल्याचे समजायला सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटून जावा लागला. त्यांच्या अटकेची कारणे, गुन्हे याबाबत कतार आणि भारतीय प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. आज २०० दिवस उलटून गेल्यावरही अटकेच्या कारणांबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या २०० दिवसांत अटकेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी आठ वेळा जामिनासाठी अर्ज केले, पण ते फेटाळण्यात आले.

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

कुलभूषण जाधव यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती मिळवल्यावर केंद्र सरकारचे कौतुक संपले असले तरी जाधव यांच्या पाकिस्तानच्या तुरुंगातील मरणयातना अद्याप संपलेल्या नाहीत हे कटू सत्य मान्य करावेच लागेल. या प्रकरणात कुठल्याही राजकीय पक्षाने नंतर केंद्र सरकारला जाब विचारलेला नाही. केंद्र सरकार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार, विरोधकांची मुस्कटदाबी, विरोधी खासदारांचे निलंबन यासारख्या देशांतर्गत महत्त्वाच्या विषयांमध्ये व्यग्र असल्याने त्यांच्याकडून कुलभूषण जाधव अथवा कतार येथील अटकेत असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेबाबत समाधानकारक निवेदन केले गेलेले नाही. विरोधक आपापल्या पक्षांवर ओढवलेल्या संकटांनी त्रस्त आहेत, तर केंद्र सरकार स्वतःच्या कौतुकातून अद्याप बाहेर पडलेले नाही. केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असूनही इस्लामी देशात भारतीय नौदल अधिकारी तुरुंगात बंदिस्त आहेत या बाबतीत कुठल्याही सरकार समर्थक हिंदूंचे रक्त अद्याप उसळलेले नाही. सावरकरांची माफी आणि सावरकरांचा गौरव यापेक्षा इस्लामी देशात बंदिस्त भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका ही सावरकरांना खरी आदरांजली ठरेल. अन्यथा बंदिस्त नौदल अधिकाऱ्यांवर तुरुंगातून माझी जन्मठेप लिहिण्याची परिस्थिती ओढवू नये ही अपेक्षा.

१५ मार्च २०२३ रोजी आठव्यांदा नौदल अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकेल. परंतु प्रकरण कतार न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने आता प्रशासकीय स्तरावरून शिष्टाई अथवा मुत्सद्देगिरीने अटकेतील निवृत्त भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या सुटकेची आशा मावळली आहे. थोडक्यात काय, तर न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करत सुटकेचे प्रयत्न करावे लागणार असून आता न्यायालय देईल तो निर्णय मान्य करावा लागणार आहे. या प्रकरणात अटकेतील निवृत्त नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पदरी प्रचंड नैराश्य आले आहे. कुलभूषण जाधव यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला स्थगिती (व्हिएन्ना कराराचे पालन झालेले नाही म्हणून ही स्थगिती देण्यात आली होती) ही दिलासादायक घटना घडूनही आता काळ उलटला आहे. मात्र पाकिस्तानी तुरुंगात ते मरणयातना सहन करत नसतील याची खात्री सरकार देऊ शकलेले नाही. कुटुंबीयांना तसेच भारतीय प्रशासनाला जाधव यांच्या भेटीची मिळालेली परवानगी (काऊन्सिलर ॲक्सेस) वगळता जाधव यांच्या बाबतीत सुटकेची शक्यता मावळली आहे की काय, अशी शंका येते. मार्च २०२२ मध्ये प्रकाशित बातमीनुसार भारताने जाधव यांना कायदेशीर प्रतिनिधित्व द्यावे यासाठी पाकिस्तानकडून १३ एप्रिल २०२२ ही मुदत दिलेली होती. मृत्युदंडाच्या शिक्षेला आव्हान देण्यासाठी भारत सरकारने विधिज्ञ हरीश साळवे यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीचा आणि जाधव यांच्या मृत्यूदंडाला मिळालेल्या स्थगितीचा सरकारने प्रचंड गाजावाजा केला होता. मात्र गेल्या वर्षी जाधव यांना एप्रिल २०२२ पर्यंत कायदेशीर प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत भारताने कोणती पावले उचलली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

कतारस्थित अटकेतील आठ निवृत्त नौदल अधिकाऱ्यांच्या बाबतीत अद्यापही कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे; परंतु कतारच्या न्यायालयांनी या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना जामीन दिला नाही तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हाच एकमेव पर्याय शिल्लक असेल. कतार प्रशासनाने या अधिकाऱ्यांना आपापल्या कुटुंबीयांना तसेच भारतीय प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी (काऊन्सिलर ॲक्सेस) दिलेला आहे. त्यामुळे व्हिएन्ना करारानुसार आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिलासा मिळण्याची भारताला फारच मर्यादित अपेक्षा असेल. आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची वेळच येऊ नये यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर पाच देशांचे वर्चस्व आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणेचा अभाव बघता आंतरराष्ट्रीय न्यायालय ही यंत्रणा तलवार नसलेले रिकामे म्यान आहे असे म्हणता येईल.

३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक झालेल्या कतारमधील भारतीय नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये भारतीय प्रशासनातील अधिकारी जाऊन भेटले. अटकेतील भारतीय अधिकारी हे निवृत्त झालेले आणि वयामुळे काही व्याधींनी ग्रस्त आहेत. काही अधिकारी हे दोहा येथील तुरुंगात असून काहींना इतरत्र ठेवण्यात आल्याचे प्रकाशित झाले आहे. अधूनमधून त्यांना फोनवरून कुटुंबीयांसमवेत बोलण्याची मुभा दिली गेली आहे. हे अधिकारी काम करत होते त्या कंपनीचे प्रमुख अटकेतील या अधिकाऱ्यांना भेटण्यास गेले असता त्यांना दोन महिने अटकेत ठेवण्यात आल्याची बातमी प्रकाशित झाली होती. अटकेतील भारतीय अधिकाऱ्यांना कतार तुरुंग प्रशासनाने एकांतवासात ठेवले असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

२०१५ साली कतार आणि भारत यांच्यात अनेक करार झाले आहेत. तुरुंगातील बंदिस्त कैद्यांचे प्रत्यार्पण हा त्यापैकी एक करार. परंतु त्यानुसार संबंधितांना उर्वरित शिक्षा भारतात काढावी लागेल अशी तरतूद आहे. या प्रकरणात अद्याप खटल्याचा निकाल लागला नसल्याने प्रत्यार्पणाचा करार सध्या तरी उपयोगाचा नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव आणि कतार येथील भारतीय नौदलातील आठ निवृत्त अधिकारी भारतात परत येऊ शकलेले नाहीत.

prateekrajurkar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When will kulbhushan jadhav and eight officers return mrj

First published on: 06-04-2023 at 11:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×