उत्तम जोगदंड

नागपूर येथे येऊन गेलेले ‘बागेश्वर धाम’चे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या भजन-कीर्तनाच्या वेळी भक्तांना चमत्कार करून दाखवतात, त्यांच्या समस्या सोडवतात असा दावा केला जातो. महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार असे कृत्य हा गुन्हा ठरत असल्याने ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या नागपूर येथील कार्यकर्त्यांनी ४ जानेवारी २०२३ रोजी पोलिसांना दिलेल्या निवेदनामार्फत चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कार्य करणाऱ्या अन्य संघटनांनीही अशी आव्हाने दिली. परंतु, आव्हान न स्वीकारताच ते मध्य प्रदेशात निघून गेल्याने ते आव्हानांना घाबरून पळून गेले की काय असा समज पसरला.

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

हेही वाचा- घाऊक धर्मातराविरोधात कडक कायदा आवश्यक!

मध्य प्रदेश सारख्या सुरक्षित ठिकाणी (म्हणजे जिथे जादूटोणाविरोधी कायदाच नाही) पोहोचल्यावर ते तिथून अंनिसवाल्यांविरुद्ध शड्डू ठोकू लागल्याने या समजाला बळकटी येऊ लागली. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या नाशिक येथील ‘श्रीकाळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे रमेश शिंदे या धर्ममार्तंडांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या बचावासाठी धाव घेऊन प्रश्न उपस्थित केला की चमत्कारांच्या दिखाव्यातून हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या ख्रिस्ती पाद्र्यांना अंनिसवाल्यांचा विरोध का नाही? तसेच हा आरोपही केला की हे पंडित धीरेंद्र शास्त्री आणि हिंदू धर्माच्या बदनामीचे षड्‍यंत्र आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आणि आरोपांना उत्तरे देण्यापेक्षाही, वस्तुस्थिती आहे तशी सर्वांसमोर मांडणे आवश्यक ठरते.

हेही वाचा- गुजरातमधले दरबारी साहेब!

अंनिसवाल्यांवर केलेल्या आरोपाबाबत श्री महंत आणि श्री शिंदे यांनी कृपया हे लक्षात घ्यावे की महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आजचे नसून १९८०च्या दशकापासूनचे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आधी श्याम मानव यांच्यासोबत आणि नंतर १९८९ साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करून हे काम चालू ठेवले. सर्वच धर्मातील भोंदू बाबांच्या चमत्कारांचा भांडाफोड करून सामान्य लोकांचे त्यांच्यापासून होणारे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण संवैधानिक मार्गाने थांबवणे यासाठी महा. अंनिसचे काम चालते. हे काम संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार-प्रसार करण्याच्या मूलभूत कर्तव्याशी सुसंगतच आहे. डॉ. दाभोलकर यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आला. हा कायदा येण्याआधी महा. अंनिसने पकडून दिलेल्या आणि कायदा आल्यावर पकडल्या गेलेल्या शेकडो ढोंगी बाबांपैकी सुमारे ३०-३५ टक्के बाबा चक्क मुसलमान आहेत (त्यांची नावे देणे विस्तारभयास्तव टाळले आहे) हे दिसून येते. याविषयी बातम्या वेळोवेळी वृत्तपत्रांत आलेल्या आहेत.

हेही वाचा- धर्मातरबंदीचा आग्रह आपला ‘कळप’ टिकवण्यासाठी..

अगदी अलीकडे वसईच्या चमत्कारी मार्टिन (ख्रिस्ती धर्मीय) बाबाला महा. अंनिसने तुरुंगात कसे पाठवले होते हे विविध दूरदर्शन वाहिन्यांवरून, वृत्तपत्रांतून प्रसारित झालेले आहे. याची माहिती श्री महंत आणि शिंदे यांना असती तर त्यांनी असे प्रश्न/आरोप केलेच नसते. विशेष म्हणजे या बाबांचा उच्छाद थांबविण्यासाठी या धर्ममार्तंडांनी काही हालचाल केल्याचे ऐकिवात नाही. २०१३ पासून जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आल्याने अशा बाबांचा सुळसुळाट बर्‍यापैकी कमी झाला आहे. परंतु या कायद्याला देखील या धर्ममार्तंडांनी प्रखर विरोध केला होता हा इतिहास ताजा आहे. या बाबांच्या कथित चमत्कारांना आपले हिंदु बांधव कसे काय भुलतात, यावर या श्री महंत किंवा श्री शिंदे यांनी चिंतन करावे.

हेही वाचा- ‘नागा शांतता करारा’पेक्षा भाजपचे राजकारण वरचढ ठरेल?

बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांच्या बाबतीत आज एवढा गदारोळ होताना दिसत असला तरी सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांना एका खासगी वाहिनीवरून मी महा. अंनिस तर्फे आव्हान दिले होते, आव्हानाची प्रक्रिया देखील समजावून सांगितली होती. लाखो लोकांनी ते पहिले आणि धीरेंद्र शास्त्री यांचे ट्रोल्स माझ्यावर आणि त्या वाहिनीच्या संपादकांवर मोठ्या संख्येने तुटून पडले होते. खरे तर ते आव्हान त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखून केवळ चमत्कारांच्या दाव्यांबाबत दिले होते. त्यानंतर हे शास्त्री काहीसे नरमले आणि एका प्रवचनात, ‘आपण चमत्कारी बाबा नाही आहोत’ अशी कबुली त्यांनी दिली होती. आजही त्यांना जी आव्हाने ठिकठिकाणी दिली जात आहेत ती केवळ त्यांच्या चमत्कारांच्या दाव्यांच्या बाबतीत दिली जात आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनास सुसंगत असलेले आव्हान दिल्याने धीरेंद्र शास्त्रीजींची, हिंदू धर्माची प्रतिमा कशी काय डागाळते बरे? ते खरोखरच चमत्कारी असतील तर त्यांनी ते चमत्कार वैज्ञानिक पद्धतीने, संशय-विरहित वातावरणात सिद्ध करून दाखवावेत. त्यानंतर कसलाही वाद शिल्लक राहणार नाही. उलट ते आव्हान स्वीकारत नसल्याने त्यांची आणि हिंदू धर्माची प्रतिमा डागाळत नाही काय? पूर्वी इंग्रज लोक भारताला गारूड्यांचा देश म्हणत असत. आज हे असे चमत्कारी बाबा आधुनिक गारुडी बनून देशाचे आणि धर्माचे नाव बदनाम करीत नाहीत काय? त्यांनी ही चमत्कारांची नाटके बंद केल्यास त्यांच्या धार्मिक कार्यात कोणीही अडथळा आणणार नाही.

हेही वाचा- निःशुल्क पार्किंगसाठी जागा आहे, परवडणाऱ्या घरांसाठी नाही ?

वर्तमान प्रकरणाचा संबंध धर्मांतरासोबत जोडण्यापूर्वी नक्की कोणत्या जातीचे/वर्णाचे हिंदू धर्मीय लोक ख्रिस्ती किंवा अन्य धर्मात धर्मांतर करतात आणि का करतात याचा या श्री महंतांनी आणि त्यांच्या पूर्वसूरींनी मनापासून शोध घेतला असता, चिंतन केले असते आणि त्यावर उपाय शोधले असते तर हिंदूंवर धर्मांतर करण्याची आणि धिरेन्द्र शास्त्री यांच्यावर धर्मांतरित लोकांना पुन्हा धर्मात घ्यायची वेळच आली नसती. धर्मांतरे पाद्र्यांच्या चमत्कारामुळे नव्हे तर हिंदू धर्मातील अमानवी जातीप्रथा, ‘वरच्या’ जातीच्या लोकांकडून होणारे अन्याय, अत्याचार, बहिष्कार, गळचेपी, शोषण (ज्यामुळे खरे तर हिंदू धर्माची बदनामी होते.) यांपासून मुक्ति मिळवण्यासाठी ‘खालच्या’ पीडित जातीतल्या लोकांकडून होतात. या कारणाने या जातीतील लोक धर्मांतर करीत असतील तर हा धर्ममार्तंडांचा देखील पराभव आहे. ‘श्रीकाळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर असलेले श्री महंत हे विसरलेले दिसतात की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची जी प्रतिज्ञा केली (आणि नंतर ती पाळून दाखवली) होती, त्यास काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदीर्घ काळ केलेले आणि श्री महंतांच्या पूर्वजांनी दडपलेले आंदोलन सुद्धा कारणीभूत ठरले होते. त्यापासून धडा घेऊन, त्यावर आत्मचिंतन करायचे सोडून त्याचे खापर अंधश्रद्धा निर्मूॅलन समितीवर फोडून हे धर्ममार्तंड स्वतःचे हसे करून घेत आहेत.
लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्यकर्ते आहेत.