अजित कवटकर
इराण – इस्रायल युद्ध, चीन – तैवान संघर्ष, भारत – पाकिस्तान तणाव, भारत – चीन सीमावाद, थायलंड – कंबोडिया धुसफूस,  दक्षिण-चीन समुद्रातील चीनच्या अतिक्रमणामुळे त्यांचे तेथील देशांबरोबर उडत असलेले खटके, उत्तर कोरिया – दक्षिण कोरिया तणाव… आशिया खंडावरील अनेक देश आज युद्धात गुंतले आहेत वा युद्धाची तयारी करत आहेत. हा खंड आज इतका अस्थिर, अस्वस्थ झाला आहे की कोणत्या दोघांमधील संघर्षाची ठिणगी ही जागतिक युद्धाचा वणवा पेटविण्यास कारणीभूत ठरेल हे सांगता येत नाही. निरंतर धगधगत असलेल्या रशिया – उक्रेन युद्धाने, तसेच रशियाच्या वाढणाऱ्या साम्राज्यवादी महत्वाकांक्षेने हीच भयावह अनिश्चितता युरोप खंडातही निर्माण केली आहे. महासत्ता होण्याच्या शर्यतीतून आकार घेत असलेले अमेरिका – चीन व्यापार युद्ध तर जागतिक ध्रुवीकरणास कारणीभूत ठरत आहे. आपण ‘बिग डँडी’ असल्याची जाणीव दुसऱ्यांना करून देण्यासाठी नेहमी इतरांच्या अंतर्गत प्रश्नांत हस्तक्षेप करून मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा अट्टहास हा काही ठिकाणी परिस्थिती तात्पुरती आटोक्यात आणत असला तरी, दुरदृष्ट्या मात्र ती गुंतागुंत अधिक जटील होत आहे.

काही राष्ट्रांमध्ये सत्तापालट घडवून आणण्याच्या उद्देशाने निर्माण केली गेलेली अनागोंदी ही त्या राष्ट्राला लष्करी राजवटीखाली आणू शकते किंवा त्यावर दहशतवादी संघटनांची हुकुमत प्रस्थापित करू शकते. काही देश / प्रदेश हे यापूर्वीच अतिरेकी अड्डे झाले आहेत. नवनवीन संहारक अस्त्र – शस्त्र निर्माण करण्याची राष्ट्राराष्ट्रांत दिसत असलेली घाई ही आता अधिक राक्षसी होत चालली आहे. जगात चाललेल्या या आक्रमकतेचे पर्यवसान तिसऱ्या जागतिक महायुद्धात होईल का ? आजचा स्वल्पविराम हा ‘वादळापूर्वीची शांतता’ तर नाही ना !

अमेरिका आणि सोव्हियत युनियन (रशिया) चे तेव्हा अर्ध्यावरच आटोपलेले शीतयुद्ध बहुदा आता या नव्या रूपात पुन्हा सुरू झाले असावे. रशियाला चीन, उत्तर कोरिया व अनेक इस्लामी राष्ट्रांचा उघडपणे मिळत असलेला पाठिंबा हा या पुनरुज्जीवनाला कारणीभूत असेल. त्यातच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अशा व्यक्तीची फेरनिवड झाली आहे की जी आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी काहीही करू शकते. रशिया आणि चीनमध्ये लोकशाही, संविधान वगैरे केवळ कागदावरच आहेत. या दोन देशांमध्ये आज पराकोटीची हुकुमशाही चालते हे कोणीही नाकारू शकत नाही आणि या दोन्ही देशांचे समर्थन करत त्यांच्या अतिरेकाला उघडपणे पाठिंबा देणाऱ्यांपैकी बहुतेक त्याच श्रेणीतले आहेत. युद्धातून विनाशाकडे घेऊन जाणार्‍या या जागतिक अस्थिरतेला जेवढे, न भरलेल्या ऐतिहासिक जखमा, नव्या श्रीमंतीने जागृत झालेल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा, धर्मांध होत चाललेला धर्माभिमान, संसाधनांसाठीची अपरिहार्यता इत्यादी गोष्टी कारणीभूत आहेत तेवढेच ‘कळीचा नारद’ बनलेल्या चीनची विघ्नसंतोषी भूमिका या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. आज दोन देशांमध्ये सुरू असलेली अनेक युद्धं स्थानिक असली तरी त्या दोघांना उघड वा छुपा पाठिंबा देणारे, रसद, युद्धसाहित्य, आर्थिक मदत पुरवणारे त्यांचे अनेक समर्थक देश आहेत, जे एक ठरावीक मर्यादा उलटल्यानंतर त्यात उघडपणे उडी घेतील. असे होईल तेव्हा ते युद्ध स्थानिक न राहता, व्यापक होत संपूर्ण जगाला यात हळूहळू खेचून घेणार. पहिले व दुसरे महायुद्ध हे या अशाच दोघांच्या भांडणातून महायुद्धात परिवर्तीत झाले. आज बहुतेक शेजारी राष्ट्रांमध्ये सुरू असलेली धुसफूस लक्षात घेता, कोणा दोघांचे भांडण तिसऱ्या महायुद्धाला विशेष कारणीभूत ठरू शकते, हेच बघणे आता बाकी आहे.

जागतिक महायुद्धच काय, पण दोन देशांमध्ये एक दिवसीय वा पाच दिवसीय युद्धही होऊ नये, हीच प्रार्थना मानवतावाद करतो. आज जिथे युद्धे सुरू आहेत, म्हणजे जिथे सतत आग ओकली जात आहे तिथे आता केवळ मानवी अस्तित्वाचे अवशेष उरलेले पहायला मिळतात. एखाद्या सुंदर – संपन्न – प्रगतीशील – प्राणीसृष्टीने बहरलेल्या वसतीस्थानाचे अक्षरश: एखाद्या वाळवंटातील स्मशानभूमी सारखे रूपांतर करण्याची क्षमता आजच्या अणुयुद्धात आहे. एक मेगाटन अणुबॉम्ब जवळपास ५० चौरस किलोमीटरच्या भूभागाची राख करू शकत असेल तर आज जगामध्ये असलेल्या एकूण अणुबॉम्बची संख्या लक्षात घेतल्यास, पृथ्वीचा एखाद दुसरा छोटा कोपरा देखील या दुर्दैवापासून सुरक्षित राहणार नाही. मानवाने आजपर्यंत कष्टाने जे काही उभारलं ते क्षणार्धात मातीमोल करण्याची ताकद युद्धात आहे. आशावादी विचार केला तर जागतिक महायुद्ध हे जगाचा विकास – प्रगती – जीवन एक शतक मागे लोटू शकतं. पण तर्कशुद्ध विचार केल्यास, सर्वव्यापक तिसरे जागतिक महायुद्ध हे या पृथ्वीवरील जीवनाचा सर्वनाश करू शकतं. डायनॉसोर जसा सर्वशक्तीशाली झाला आणि शेवटी स्वत:च्याच अस्तित्वावर उठला त्याच मार्गाने आजची मानवजात जात आहे. आज प्रत्येकाला जगावर निर्णायक नियंत्रण ठेवण्याची अभिलाषा आहे आणि त्यासाठीच चाललेले धाडसी प्रयत्न हे या अस्थिरतेला कारणीभूत आहेत.

आज अनेक देश हे लोकशाहीच्या मार्गाने हुकुमशाही प्रस्थापित करण्याच्या घाईत आहेत. शून्य विरोधी पक्षाची ही व्यवस्था लोकशाहीच्याच हत्येतून आकाराला आणली जात असली तरी, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ही असंवैधानिकच आहे. ज्यांनी अगोदरच अशी व्यवस्था भक्कमपणे उभारली आहे, ते आता विस्तारवादावर उतरले आहेत. कॅनडा व ग्रीनलॅण्डनंतर आता मेक्सिकोच्या आखाताकडे नजर लावून बसलेली अमेरिका आणि संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया खंडावर आपली ‘कनेक्टिव्हिटी’ लादू पाहणारा चीन हे दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. त्यातच रशिया व इस्रायलने धारण केलेली आक्रमकता ही या अस्थिरतेला अधिक अस्वस्थ करत आहे. ट्रम्प यांनी काही वादांमध्ये त्यांचे आवडते व प्रभावी ‘व्यापार निर्बंधां’चे हत्यार उगारून  झगडणार्‍यांना युद्धविरामासाठी मजबूर केले असले तरी, हा केवळ स्वल्पविराम आहे, ज्याचा टिकाव परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. आजची जागतिक असंवेदनशीलता, असहिष्णुता, असंयमीपणा लक्षात घेता कुणातरी एका विकृताचे अविवेकी पाऊल या संपूर्ण मानवजातीला युद्धाच्या वणव्यात ढकलू शकते. ही भीती आज ना उद्या राक्षसी रूपात प्रत्यक्ष समोर अवतारण्याची शक्यता मोठी आहे. प्रश्न एवढाच की, कधी ?

जीवनग्रह म्हणून ओळखली जाणारी आपली पृथ्वी, सौंदर्याने – संपन्नतेने – संसाधनांनी समृद्ध आहे. येथील संसाधनांच्याच जोरावर मानवाने आजची प्रगती आणि विकास साधला आहे. परंतु हे करत असताना त्याच्याकडून या संसाधनांचा झालेला अतिवापर, अपव्यय, प्रदूषण यांमुळे या संसाधनांचे, उर्जा स्तोत्रांचे साठे आजच्या मागणीसमोर कमी पडत असल्याचे दिसत आहे. यामुळेच महागाई भडकली आहे – जगणं महाग झालं आहे. पर्याप्त प्रमाणात संसाधनं नसतील तर प्रगतीला खीळ बसू शकते, आपल्या वर्चस्वाला धक्का लागू शकतो आणि याउलट  आपल्याकडे संसाधनांचा अमर्याद साठा असेल तर आपण जगावर श्रेष्ठत्व गाजवू शकतो, याची जाणीव जगातील मोठ्या राष्ट्रांना आहे. याचसाठी, संसाधनसंपन्न प्रदेश, महत्वाचे व्यापारमार्ग, श्रीमंत बाजारपेठा, कच्च्या मालाची केंद्रं वगैरेंवर ताबा मिळविण्यासाठी आजची सर्व आक्रमकता, अतिक्रमण होताना दिसत आहे. लोकसंख्येवर नियंत्रण, संसाधनांचा कार्यक्षम वापर, हरित व अक्षय उर्जेच्या निर्मितीत व वापरात वाढ, पुनर्वापर – पुनर्चक्रीकरण – दुरूस्तीला प्राधान्य देणारी जीवनपद्धती स्विकारली तर संसाधनांसाठी युद्ध करण्याची वेळच येणार नाही. पण आता यावर विचारमंथन करून काही फायदा होईल असे वाटत नाही ? कारण परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. प्रत्येक देश आज युद्धाच्या तयारीला लागला आहे. युद्धात आपल्या बाजूने इतरांनी उभे रहावे यासाठी परराष्ट्रांशी हितसंबंध घट्ट करण्यासाठी सर्वत्र राजकीय मुत्सद्देगिरी जोमात सुरू आहे. राष्ट्रवादाचे नॅरेटिव्ह तयार करून युद्धासाठीचे समर्थन देशवासीयांकडून मिळविले जात आहे. संभाव्य युद्धाचा अंदाज घेऊन रणनीती, राजनीती, आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन होत आहे परंतु युद्ध होऊच नये यासाठी तशी परिस्थिती, तसे संवाद वा व्यवहार होतानाचे प्रामाणिक प्रयत्न मात्र दिसत नाहीत. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ म्हणतात ते बहुदा यालाच.

  ajit.kavatkar@gmail.com