कोकणातल्या एका शेताच्या काठावर एक खड्डा होता. एकदा खूप मोठा पाऊस आला आणि चारही बाजूंनी वाहात आलेले पाणी या खड्डय़ात साचले. आपोआपच खड्डय़ाचे डबके झाले. लपलेल्या बेडकांना ते डबके पाहून मोठा आनंद झाला आणि त्यांनी त्या डबक्यावर कब्जा मिळविला. या डबक्याची मालकी आपली आहे आणि बाहेरच्या कुणालाही डबक्यात येऊ देऊ नका, असे फर्मानच त्यांच्या म्होरक्याने सोडले होते. त्यामुळे आपले डबके जपण्यासाठी तरण्याताठय़ा बेडकांनी आपले टोळके तयार केले. कायम डबक्याच्या काठावर बसून पहारा देणाऱ्या या बेडकांच्या डरकावण्याचा आवाज परिसरात चांगलाच घुमत असे. आसपासचे जगही त्या आवाजामुळे त्रस्त झाले होते. पण आपल्या जगात आपण मनाला येईल तसेच वागणार असा स्वाभिमानी बाणा त्यांच्या डबक्यातल्या जगात चांगलाच रुजू लागला होता. हा बाणा पाहून म्होरक्याचा ऊर भरून येत असे. डबक्याच्या काठावर पहारा देणारे बेडूक कधी कधी डबक्यातल्या घडल्या-बिघडल्याची खबर देण्यासाठी म्होरक्याची भेट घेत असत. मग पुन्हा स्वाभिमान जपण्याचा सल्ला म्होरक्या देत असे. ‘आमी आमच्या जगात ऱ्हवतव..कोनाच्या बापाशीक घाबारनंव नाय..’ असं तो नेहमी सांगायचा. मग तरण्याताठय़ा बेडकांची छाती स्वाभिमानानं आणखीनच फुलून यायची. या डबक्यात काही म्हातारे बेडूकही राहात होते. त्यांना टोळक्याची दांडगाई आणि स्वाभिमानी बाणा फारसा पसंत पडत नसे. एकदा एका म्हाताऱ्या बेडकानं काही तरण्याताठय़ा बेडकांना गप्पा मारायला बोलावलं, आणि त्याच डबक्यात घडलेली, स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेली एक घटना सांगू लागला. ‘एकदा येक प्राणी ह्य़ा डबक्यात इलो. आपल्या आवाठात भायेरचो प्राणी घुसलंलो बगून थयल्या सगळ्या तरण्या बेडकांनी धूमशान घातल्यानी. मगे, सगळे डरांव डरांव करत वरडाक लागले. डबक्याच्या आवाठात सगळ्यांचो आवाज घुमां होतो. पण त्या प्राण्याक मात्र त्येचा काय्येक नाय होतां. ज्येंका तान लागतां, त्येचो पाण्यार हक्कच आसां, असा समजान तो पाण्यात रिगलो आनि मगे मात्र, वराडणाऱ्या बेडकांची धांदल उडाली. थोडी बेडकां त्या प्राण्याच्या पायाखाली गावान् जखमी झाली, थोडय़ांनी कळवळान् पळ काढल्यानि.’ ..म्हातारा बेडूक ही गोष्ट सांगत असतानाच तरण्याताठय़ा बेडकांची चुळबुळ सुरू झाली. ते त्या म्हाताऱ्या बेडकाची खिल्ली उडवू लागले. म्हातारा बेडूक आपल्या परीनं समजावू लागला. मग समोरच्या टोळक्यातून एक तरणाबांड बेडूक उभा राहिला. त्यानं म्हाताऱ्याला विचारलं, ‘केदो हतो तो प्राणी?’.. म्हातारा बेडूक म्हणाला, ‘मोठो हतो..’ मग तरण्या बेडकानं मोठ्ठा श्वास घेतला, आणि तो चांगलाच फुगला. ‘एवढो मोठो?’ त्यानं विचारलं. म्हाताऱ्यानं नकारार्थी मान हलविली. ‘लय मोठो’.. तो म्हणाला. पुन्हा तरण्या बेडकानं आणखी मोठा श्वास घेतला, आणि तो खूप फुगला. आता त्याला बोलता येत नव्हतं. वटारलेल्या डोळ्यांनीच त्यानं म्हाताऱ्याला तोच प्रश्न केला. म्हातारा बेडूक मानेनंच नाही म्हणत होता. तरण्यानं आणखी मोठा श्वास घ्यायचा प्रयत्न केला, आणि अचानक फुगा फुटल्यासारखा आवाज झाला. तरण्या बेडकाच्या जागेवर काहीच दिसत नव्हते.. ही बातमी सगळीकडे पसरली. म्होरक्यानंही ती ऐकली. हे बाहेर समजलं तर, या विचारानं तो हैराण झाला. मग तो टोळक्यावरच वैतागला. ‘तरी मी सांगा होतंय.. उगाच बाहेरच्यांच्या नादाक लागा नुको.’ त्यानं दम भरला. आणि तरण्या बेडकांचा स्वाभिमान गळून पडला!
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
बेडूक आणि डबके..
कोकणातल्या एका शेताच्या काठावर एक खड्डा होता. एकदा खूप मोठा पाऊस आला आणि चारही बाजूंनी वाहात आलेले पाणी या खड्डय़ात साचले. आपोआपच खड्डय़ाचे डबके झाले. लपलेल्या बेडकांना ते डबके पाहून मोठा आनंद झाला आणि त्यांनी त्या डबक्यावर कब्जा मिळविला. या डबक्याची मालकी आपली आहे आणि बाहेरच्या कुणालाही डबक्यात येऊ देऊ नका, असे फर्मानच त्यांच्या म्होरक्याने सोडले होते.

First published on: 27-06-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frogs and pool