जाज्वल्य हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी उर्दू भाषेतून आणि लिपीतूनही आपल्या काव्यप्रतिभेला आविष्कृत करण्याचे स्वातंत्र्य घेतले तरी त्यातून उमटले ते त्यांचे अविचल राष्ट्रप्रेम! मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारे स्वातंत्र्यवीर हे भाषाभक्त होते. फारसी-उर्दूला त्यांनी केलेला विरोध हा त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग होता. हा विरोध त्यांनी कधीच राग अथवा तिटकाऱ्यात परावर्तित होऊ दिला नाही. त्यामुळेच अंदमानातील ११ वर्षांच्या वास्तव्याच्या अखेरच्या काळात जेव्हा त्यांच्या हाती वही, पेन्सिल आली, तेव्हा त्यांनी जे लेखन केले, त्यातील हिंदी आणि फारसीमधील गज़्‍ाल हा त्यांच्या साहित्यकृतींमध्ये कधीच समाविष्ट न झालेले एक साहित्यलेणे ठरला आहे. सावरकरांसारखा प्रखर बुद्धिमत्तेचा आणि जीवनाकडे अतिशय रसाळपणे पाहू शकणारा विद्वान त्यांच्या अनुयायांनाही फारसा समजला नाही. त्यांच्या बौद्धिक प्रखरतेमुळे त्यांचे हिंदुत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मानवले नाही. केवळ ‘गाय हा पशू आहे’, या विधानामुळे त्यांची विज्ञाननिष्ठा स्पष्ट होते, या समजातून बाहेर पडण्यासाठी हिंदुत्वापासून ते भाषाशुद्धीपर्यंतचे अक्षरश: आकाशाला गवसणी घालणारे त्यांचे तर्कशुद्ध विचार वाचायला हवेत. भाषेवरील प्रेम व्यक्त करताना त्या भाषेला अधिक समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आता कुठे लक्षात यायला लागला आहे. दूरध्वनी, दूरदर्शन, गणवेश, नगरपालिका, चित्रपट यांसारख्या असंख्य शब्दांना जन्म देणारे सावरकर हे केवळ भाषाभिमानी नव्हते. भाषेबद्दल त्यांच्या मनात कमालीचा जिव्हाळा होता.  कागदाचा कपटाही त्यांच्या हाती लागू नये, याची खबरदारी घेणाऱ्या ब्रिटिश सरकारला त्यांच्या बुद्धीचा कमालीचा धाक होता. अंदमानातील सुरुवातीच्या दहा वर्षांत भिंतींवर नखाने लिहिलेल्या कविता मुखोद्गत करण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता. त्या कारागृहाबाहेर पाठवण्यासाठी मुक्त होणाऱ्या बंद्यांनाही त्या पाठ कराव्या लागत. ज्या उर्दू गज़्‍ालमुळे सावरकरांचा एक नवाच पैलू उलगडला, ती गज़्‍ाल, तिच्या मूळ स्वभावापासून फारकत घेत एकदम राष्ट्रप्रेमाकडे वळली, याचे कारण त्यांच्या हृदयात आणि मनात फक्त देशाच्या स्वातंत्र्याचाच विचार होता. गज़्‍ालच्या मूळ वृत्तीमध्ये आशुक आणि माशुक यातील अतिशय हळव्या, तरल आणि नाजूक प्रेमसंबंधांच्या देखण्या दर्शनाचे महत्त्व अधिक. सावरकरांनी तिला राष्ट्रप्रेमाची डूब दिली. तुरुंगातील मुसलमान कैद्यांकडून उर्दू भाषा आणि लिपी शिकण्यामागे त्यांचा भाषेचा ध्यास होता. भाषेकडे निर्मम मनाने पाहण्याची उदात्तता त्यांच्याकडे होती. अंदमानातून सुटल्यानंतर त्यांनी मराठी भाषाशुद्धीची चळवळच सुरू केली. त्या वेळी अन्य भाषाभिमान्यांना त्यांनी दिलेले फटके जिव्हारी लागणारे होते. पण त्यामागे एक तात्त्विक वैचारिक बैठक होती. त्यांचा कटाक्ष आपली भाषा अधिक समृद्ध कशी होईल याकडे होता. भाषेत येणाऱ्या परकीय शब्दांना पर्यायी शब्द शोधून ते वापरात आणण्यासाठीची चिकाटी सावरकरांकडे होती. त्यामुळे हिंदी भाषेतील त्यांची कविता आणि उर्दूतील गज़्‍ाल त्यांच्या भाषेबद्दलचा दृष्टिकोन पुरेसा स्पष्ट करणारी आहे, असे म्हणता येईल. सावरकरांच्या चरित्रलेखकांनाही जी गोष्ट आजवर ठाऊक नव्हती, ती या कवितांच्या वहीने जगासमोर आली आहे. त्यामुळे सावरकर नावाची विद्वत्ता एकाच वेळी प्रखर आणि तेवढीच रसाळ कशी होती, याचे एक नवे दर्शन घडले आहे!