उन्नावमधील हजार टन सोन्याची भर पडली तर देशात सुवर्णबहारच येईल, यात शंका नाही. पण समजा ते सुवर्णस्वप्न नाही खरे ठरले तरी काळजीचे कारण नाही. कारण आता दुसरे स्वप्न निलगिरीच्या झाडाला लटकत उभे आहे. ते पाहावे.
थोडक्यात हुकले, अन्यथा यंदाच्या दसऱ्यास आपल्या सर्वाच्या आनंदास खरोखरच तोटा राहिला नसता. आपण सर्वानी विजयादशमीला आपटय़ाच्या पानांऐवजी निलगिरीची पाने लुटली असती आणि निलगिरीच्या तेलाच्या घमघमाटात सीमोल्लंघन केले असते. परंतु चांगल्या बातम्या नेहमी उशिरा येतात. तसेच झाले. ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांना निलगिरीच्या पानांत, फांद्यांत, खोडात सोन्याचे कण सापडल्याचे वृत्त अगदी परवाकडे आपणांस मिळाले. एका अर्थी ते बरेही झाले म्हणा. अन्यथा विजयादशमीला सोन्याच्या पेढय़ा ओस पडल्या असत्या आणि सुवर्णप्रेमींनी सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या निलगिरीबनांकडे धाव घेतली असती. पण तशी अजूनही वेळ गेलेली नाही. ऐन दीपोत्सवाच्या तोंडावर ही सोन्यासारखी बातमी आली आहे. तेव्हा काय सांगावे, यंदा अनेकांची पहिली अंघोळ निलगिरीच्या तेलाने होईल. मिठाईवर चांदीच्या वर्खाऐवजी निलगिरीची पाने लावलेली दिसतील. हल्ली घरात तशीही लक्ष्मी टिकत नाही. कंदर्पालाही सोन्याचा भाव आलेला आहे आणि हिराछाप डाळीचे पीठ घेणे हे हिरे घेण्यासारखे वाटू लागले आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘दिन दिन दिवाळी महागाई-म्हशी ओवाळी’ असे रडगाणे म्हणत या महर्गतेचीच लक्ष्मीस्वरूप झाडूने पूजा करावी की काय, असे अधार्मिक विचार आतापासूनच अनेकांच्या मनात येत असतील. त्यांचीही या बातमीने सोय केलेली आहे.
यातला अतिशयोक्तीचा हिणकस भाग बाजूला ठेवला, तरी हे मान्यच करावयास हवे की सोने या धातूमध्ये काहीतरी अजब गुरुत्वाकर्षण आहे. सगळे जग त्याकडे आपोआपच ओढले जाते. समर्थानी जगी सर्व सुखी असा कोण आहे, असा प्रश्न विचारी मनांना केला होता. त्याच धर्तीवर, या जगात कांचनाने मोहविले नाही असा कोण आहे, असा सवाल कोणी केला तर त्यास उत्तर देणे सगळ्याच मनासज्जनांना कठीण जाईल. सज्जनांचे सोडा, सोने आणि माती आम्हां समान हे चित्ती असे म्हणणारे साधू-संतही सोन्याच्या आकर्षणातून सुटलेले नाहीत. उत्तर प्रदेशातील शोभन सरकार या साधूलाही स्वप्न पडावे ते सोन्याच्या खजिन्याचे यातच सर्व काही आले.     
सोन्याची ही बावनकशी ओढ काही आजची नाही. माणसाला वेदकाळापूर्वीपासून हा धातू ज्ञात आहे. इजिप्तमध्ये इ. स. पूर्व २६०० मध्ये सोन्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात होता याचे पुरावे सापडले आहेत. त्याच्या पिवळ्या रंगात काय गूढ दडले आहे कोण जाणे, पण त्याच्या हव्यासापायी, त्याच्या प्राप्तीसाठी माणसे अक्षरश: वेडी बनत. प्रसंगी सोन्यासारखे प्राण देत-घेत. भूगर्भातील सोन्याचा शोध हे महाकठीण काम.
निलगिरीची मुळे जमिनीत खोल खोल जात सुवर्णकण प्राशन करतात आणि आत दडलेल्या सोनसाठय़ाची जाहिरात आपल्या पानांपानांतून करतात हे पूर्वी कोणालाच ज्ञात नव्हते, म्हणून बरे. अन्यथा मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून आजवर आपण जो सुमारे पावणेदोन लाख टन सोन्याचा उपसा केलेला आहे, त्यात पाच-पन्नास टनांची भर नक्कीच पडली असती. माणसाचा हा सुवर्णहव्यास कमी झालेला आहे असे मुळीच नाही. शतकारंभापासून गेल्या तेरा वर्षांत सोन्याच्या दराने तब्बल ४८२ टक्क्यांनी उसळी घेतलेली असताना, सोने खरेदीत खंड पडलेला आहे, असे मात्र दिसत नाही. उलट आज मुंबईतील झवेरी बाजारात अशी परिस्थिती आहे, की सोन्याला मागणी आहे, परंतु सरकारी आयातर्निबधांमुळे ठोक व्यापाऱ्यांकडे विकण्यासाठी सोने नाही.
तेव्हा मुद्दा असा, की सुवर्णमृगासाठी हट्ट धरणारी रामायणातील सीता असो, एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेमध्ये सोन्याच्या शोधात कॅलिफोíनयाकडे लागलेली लोकांची रीघ असो की स्वप्नातल्या सोन्याच्या शोधासाठी उन्नावमध्ये उत्खनन करीत असलेले यूपीएचे सरकार असो, त्यांच्या मनातील मोहाच्या धाग्यात गुंजभरही फरक नाही. आता आपल्याकडे मोह हा षड्रिपूंपकी एक मानण्याची परंपराच आहे आणि ‘मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश’ असे गीताईच सांगते म्हटल्यावर मोहास त्याज्यच मानले जाणे स्वाभाविक आहे. परंतु तो नेहमी वाईटच असतो असे म्हणता येणार नाही. निदान सोन्याच्या मोहातून तरी काही चांगल्या गोष्टीही निपजल्या आहेत. म्हणजे सीतेच्या मोहातून पुढचे रामायण घडले. रावणवध झाला, हे तर झालेच; पण अमेरिकेतील सॅक्रामेन्टोमध्ये २४ जानेवारी १८४८ ला सुरू झालेल्या ‘गोल्डरश’ नामक घटनेतून केवळ कॅलिफोíनयाचाच नव्हे, तर अमेरिकेचा इतिहास घडला. किंबहुना त्या गोल्डरशमधूनच पनामा रेल्वे हा जगातील पहिला आंतरखंडीय रेल-वे सुरू झाला. फार काय, मानवी जीवन पूर्णत: बदलून टाकणाऱ्या अल्केमीचा, रसायनशास्त्राचा उगम सोन्याच्या हव्यासातूनच झाला आहे. अल्केमिस्ट म्हणजे किमयागार. ‘अल् बेरूनीच्या भारता’मध्ये कापसापासून सोन्याची निर्मिती करणाऱ्या किमयेचा उल्लेख आहे. अल् बेरूनी मात्र त्याला चेटूक म्हणतो. मात्र भारतातील रसायनशास्त्राचा तो गौरवाने उल्लेख करतो आणि त्याचबरोबर हेही सांगतो की रसायन हा शब्द रस म्हणजे सुवर्ण या शब्दापासून सिद्ध झाला आहे. ही सोन्याची महती आहे.
भगवद्गीतेपासून मार्क्‍स-एंगल्सपर्यंत सगळेच जे अर्थस्य पुरुषो दास: असे सांगतात, त्या अर्थाचा पायाही अर्थातच सोने हाच आहे. पण या सोन्यानेच आज आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया डळमळीत केला आहे. युरो विभागातील ग्रीस आणि इटलीसारख्या देशांच्या तिजोऱ्यांतील खडखडाट, अमेरिकेची बिघडलेली अर्थव्यवस्था यांतून निर्माण झालेले जागतिक मंदीचे वातावरण याच्या परिणामी भारतीय रुपयाची प्रकृती नाजूक झाली आहे. ती ठीकठाक व्हावी, यासाठी सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. लोकांनी सोन्यावर तरी पसे खर्च करू नयेत हा यामागचा हेतू. गेल्या वर्षी ८६४ टन सोने खरेदी करून आपण सोने खरेदीत पहिला क्रमांक पटकावला होता. तो सुवर्णचषक यंदा चीनकडे गेला आहे. उन्नावमधील सोन्याच्या स्वप्नातील साठय़ाकडे सरकार आशाळभूतपणे पाहात आहे याचे कारण हे. जागतिक सुवर्ण परिषदेनुसार सध्या आपल्या तिजोरीत ५५७.६ टन एवढा सुवर्णसाठा आहे. त्यात उन्नावमधील हजार टन सोन्याची भर पडली तर देशात सुवर्णबहारच येईल, यात शंका नाही.
अर्थात हा अवघा जरतरचा जरतारी सवाल आहे. पण समजा ते सुवर्णस्वप्न नाही खरे ठरले तरी काळजीचे कारण नाही. कारण आपल्यासमोर आता दुसरे स्वप्न जय्यत तयारीने, निलगिरीच्या झाडाला लटकत उभे आहे. आपण मस्तपकी ते स्वप्न पाहावे. सगळ्याच निलगिरीला काही सोने लागलेले नसते हे तर आपल्यालाही माहीत आहे. पण तरीही पाहावे. काही लोकांकडे पशांचे झाड असते असे म्हणतात. ते काही आपल्या नशिबी नसते. तेव्हा निदान या सोन्याच्या झाडाकडे पाहून तरी आपण समाधानी व्हावे. अखेर गरिबी काय आणि श्रीमंती काय, ती केवळ मनोवस्था तर असते, असे  काँग्रेसी युवराजांचे वचनच आहे आणि एकदा विचारांचा हा परीस जवळ असला म्हणजे मग सोने काय आणि निलगिरीची पाने काय आपणांस समानच!

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..