१३३. अवघा

कांद्यापासून कोथिंबिरीपर्यंत प्रज्ञानं आहारशास्त्रानुसार जे काही सांगितलं, त्याचा सांधा ‘अवघी विठाबाई माझी’ किंवा ‘अवघा झाला माझा हरी’शी कसा जुळवावा, यावर बुवा बोलू लागले..

कांद्यापासून कोथिंबिरीपर्यंत प्रज्ञानं आहारशास्त्रानुसार जे काही सांगितलं, त्याचा सांधा ‘अवघी विठाबाई माझी’ किंवा ‘अवघा झाला माझा हरी’शी कसा जुळवावा, यावर बुवा बोलू लागले..
बुवा – या दोन बाजू आहेत बघा.. एकतर हे खाण्याचे पदार्थ आहेत म्हणजे आहाराचे आहेत.. हे प्रमाणात खाल्ले तर कसे फायदेशीर आहेत, हे सूनबाईंनं सांगितलं.. ते प्रमाणाबाहेर खाल्ले तर कसे धोकादायक आहेत, हेही सांगितलं.. तेव्हा जीवनात जिथे समतोल असतो ना तिथेच परमेश्वर असतो.. तोल गेला की अधोगती आलीच.. बरं सावता माळी महाराज मळ्यातला कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबीर पाहून त्यात अवघा विठ्ठलच पाहात होते, या अर्थानंच या दोन्ही ओळींकडे पाहायला पाहिजे.. आता नीट लक्षात घ्या.. या शेतीवर त्यांचा चरितार्थ अवलंबून आहे.. शेतात कष्ट करून ते पोट भरत होते आणि त्यामुळे या शेतात, या मळ्यात जे काही उगवत होतं तो त्यांचा जीवनाधार होता.. पण प्रत्यक्षात त्यांचा जीवनाधार पांडुरंगच होता.. हा पांडुरंगच त्यांना कांद्याच्या रूपानं, भाजीच्या रूपानं, लसण-मिरची अन् कोथिंबीरीच्या रूपानं शेतात डोलताना दिसत होता! आपलं कसं आहे? व्यावहारिक जीवन वेगळं आहे आणि उपासनेचं जीवन वेगळं आहे! त्यामुळे या दोन्ही जीवनात भेद आहे! अभेदस्थिती नाही! अवघेपण नाही! इथं सावता माळी महाराजांच्या दृष्ष्टीत ते अवघेपण आहे, ती अभेदस्थिती आहे..
हृदयेंद्र – खरंच..
बुवा – आणि हे अवघेपण चरितार्थापुरतं नाही ते सर्व जीवनाला कसं व्यापून आहे हे ते ‘मोट नाडा विहीर दोरी। अवघी व्यापिली पंढरी’ या चरणातून सांगतात!
हृदयेंद्र – (आश्चर्ययुक्त स्वरात) म्हणजे?
बुवा – अहो चरितार्थासाठी तुम्ही जो कामधंदा करता तो काय दिवस-रात्र असतो का? दिवसातले काही तास असतात ना? तसे पहिले दोन चरण हे मळ्याचे आहेत.. पुढचे दोन चरण हे जीवनाला उद्देशून आहेत..
ज्ञानेंद्र – पण मोट, नाडा, विहीर, दोरी यांचा संबंधही शेताशीच नाही का?
बुवा – म्हटलं तर आहेच आणि म्हटलं तर तो पुसट होत मुख्य जीवनप्रवाहात नेणारा आहे.. आता असं पाहा, तुम्ही नोकरी करता त्या कामाचा आणि तुमच्या जीवनाचा किती संबंध असतो? त्या फायली, त्या नोंदी, कामाचे दूरध्वनी यातलं घराशी काही संबंधित नसतं.. तरी त्यातून तुम्हाला जो पगार मिळतो त्या पगाराचा घर चालण्याशी मोठाच संबंध असतो.. आता जो शेतातली मोट, विहीर पाहातो आहे तो सावता माळी महाराजांसारखा अभेद स्थितीतला भक्त आहे, तर त्याला या गोष्टी कशा दिसतील? पहा बरं.. गाडगेमहाराज एकदा समुद्रावर गेले होते आणि हातातलं नाण एकदम पाण्यात पडलं.. खूप शोधलं, मिळालं नाही.. असा अनुभव आपल्यालाही आहे ना? पण त्यांना त्या साध्या गोष्टीतून जे दिसलं ते आपल्याला कधी दिसतं का?
योगेंद्र – काय दिसलं त्यांना?
बुवा – त्यांना वाटलं, हे नाणं या प्रवाहात पडलं आणि दिसेनासं झालं आयुष्यही तर असंच काळाच्या प्रवाहात सरकन निघून जात आहे.. ते नाणं जसं पुन्हा हाती लागायचं नाही तसाच हा जन्मही पुन्हा लाभायचा नाही! तेव्हा जे साधायचं ते आत्ताच साधून घेतलं पाहिजे! अहो एक नाण गमावून त्यांना किती मोठा बोध गवसला.. आपल्याला तसं काही कधी गवसतं का? नाही! कारण आपण दिसूनही आंधळे असतो, ऐकू येऊनही बहिरे असतो, चालूनही पंगू असतो.. जे खरं पाहिलं पाहिजे ते पाहाता येत नाही, जे खरं ऐकलं पाहिजे ते ऐकता येत नाही, जिथे पाय वळले पाहिजेत तिथं एक पाऊलही टाकवत नाही! तसं मोट, नाडा, विहीर अन् दोर यातून त्यांना जे जीवनदर्शन घडलं ते आपल्या कल्पनेतही येत नाही!
ज्ञानेंद्र – (उत्सुकतेनं) असं काय आहे यात?
बुवा – अहो शेत पिकण्यासाठीची ही महत्त्वाची साधनं आहेत.. विहीरीत पाणी नसेल तर शेत कसं जगेल? मोट नसेल तर विहिरीतून पाणी कसे बाहेर काढता येईल? दोरखंड नसेल तर मोटेतून तरी पाणी कसे आणता येईल? या विहीरीत जरा खोल उतरा.. मग याच शब्दांचे गूढ अर्थ प्रकाशित होतील!
चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Importance of relationships