शरीराच्या आत अनंत गूढ गोष्टी भरून आहेत आणि त्यातच आहे कुंडलिनी शक्ती, या योगेंद्रच्या बोलण्यावर कर्मेद्र उद्गारला, ‘‘अरे देवा.. मला वाटलंच तू असं काहीतरी अगम्य बोलणार.. हे बघ, ज्या गोष्टी सायन्टिफिकली किंवा मेडिकली सिद्ध आहेत, त्याचाच आधार गप्पांत असला पाहिजे’’, कर्मेद्रला अडवत हृदयेंद्र म्हणाला की, ‘‘त्या सिद्ध आहेत म्हणूनच तर इतकी हजारो वर्षे लोक त्याही मार्गानं साधना करत आहेतच ना?’’ तोच तिकीट तपासनीसाच्या प्रवेशानं गप्पांत खंड पडला. कर्मेद्रनं बर्थखालून बॅग नीट खेचून बाहेर काढली. तिच्या खणात एका पाकिटात नीटनेटकेपणानं ठेवलेली तिकिटं काढून तपासनीसाच्या हातात ठेवली. तक्त्याशी ती ताडून पाहात, ‘‘मथुरातक जा रहे हो?’’ असं त्यानं पुटपुटल्यासारखं विचारलं. कर्मेद्रंही ‘‘हाँ’’ म्हणाला. तिकिटं हाती देत तपासनीस पुढे गेला. कर्मेद्रनं तिकिटं परत नीट ठेवली. चौघांच्या कक्षाचे पडदे बंद करून गाडीतल्या इतरांपासून आपल्या मित्रांना पुन्हा एकांतात आणलं. बैठक मारत तो म्हणाला..
कर्मेद्र – ती कुंडलिनी शक्ती वगैरे जाऊ दे..  आता थोडय़ा इतर गप्पा मारू.
हृदयेंद्र – ए नाही हं! बहुमतानं ठरलंय ते ठरलं.. अभंगधारेत खंड पडू द्यायचा नाही..  
कर्मेद्र – अरे त्या कावळ्याच्या कावकावपेक्षा तुमची कावकाव वरताण आहे. पुरता कावलोय मी! कावळा घरात असेल तर पोळीचा तुकडा टाका नाहीतर दगड मारून हाकला त्याला, किती ती चर्चा!
हृदयेंद्र – हे बरं आहे! एकतर भरभरून द्यायचं नाहीतर काठी मारून हाकलायचं?
कर्मेद्र – मग काय त्या कावळ्याला समजावू? की बाबा ख्यातिमॅडमचा स्वैपाक अजून झालेला नाही, नंतर ये.. तोही काय विचारणार आहे की मग साधारण कधीसा येऊ? त्याला दगडाचीच भाषा कळणार ना? तुकाराम महाराजही म्हणाले होते ना की, विंचवाच्या देवाची खेटरानं पूजा करा..
ज्ञानेंद्र – फायद्याचे तेवढे अभंग बरे लक्षात राहातात!
हृदयेंद्र – आणि मुळात कावळा ओरडतो म्हणजे काय, ती दहीभाताची उंडी काय, हे तूच विचारलं होतंस..
कर्मेद्र – अरे हो, पण चार-दोन वाक्यांत अर्थ सांगून मोकळं व्हाल, असं वाटलं मला.. जाऊ दे तुम्ही ‘पीके’ पाहिलात?
हृदयेंद्र – ए चित्रपटांसारख्या फालतू गोष्टी काढू नकोस..  
कर्मेद्र – अरे वा रे वा! तो परमात्मा कणाकणांत आहे, मग तो चित्रपटांत नाही का? उलट प्रत्येक चित्रपट किती तात्त्विक शिकवण देतो..
हृदयेंद्र – कसली कर्माची शिकवण..
कर्मेद्र – आता ‘गझनी’चंच उदाहरण घ्या.. शॉर्टमेमरी असलेला नायक, आपण का जगतो हेच विसरत असतो. म्हणून तो अंगभर गोंदवतो काय, फोटो काय लावतो.. तशी तुम्ही माणसं..
योगेंद्र – तू काय माणूस नाहीस?
कर्मेद्र – मी नॉर्मल माणूस आहे.. तुम्ही जी मोक्षासाठी जन्मलेली ‘विशेष’ माणसं असता ना त्यांची मेमरीही शॉर्टच असते.. म्हणून त्यांना फोटो-मूर्त्यां समोर ठेवून ठेवून, बोधाच्या पट्टय़ा लावून आणि पोथ्या वाचून वाचून देवाची सारखी आठवण ठेवावी लागते.. ‘गझनी’ हेच सांगत नाही?
हृदयेंद्र – अरे याला फसू नका रे.. आपल्याला डिवचून तो तात्त्विक चर्चेचं वाटोळं करू पाहातोय..
ज्ञानेंद्रनंही हसत, ‘‘बराच ज्ञानी झालास की रे!’’ असं म्हणत कर्मेद्रच्या पाठीत गुद्दा मारला. मग म्हणाला..
ज्ञानेंद्र – चल योगेंद्रा मूलाधाराशी परत जाऊ!
योगेंद्र – सांगू ना? नीट मनाचे कान करून ऐकाल तरच समजेल आणि मलाही थोडंफार सांगता येईल..
कर्मेद्र – हो सांगच.. ‘आलिया योग्यासी असावे सादर!’
योगेंद्र – मग जरा आनंदानं ‘सादर’ हो की!
योगेंद्रच्या या उद्गारांवर कर्मेद्रनंही गंभीर झाल्याचं भासवलं. बर्थवरचं ब्लँकेट गुंडाळून मांडीवर घेतलं. त्यावर दोन्ही हातांचे कोपरे रोवून हातांच्या पंज्यात हनुवटी अलगद टेकवत म्हणाला, सांग आता..
योगेंद्र – ही ब्लँकेटची गुंडाळी जशी आहे ना, तशीच पाठीच्या कण्याच्या टोकाशी सर्पिणीच्या आकाराची कुंडलिनी शक्ती साडेतीन वेटोळं घालून पडून आहे!
कर्मेद्र – अरे बापरे! सुतावरून स्वर्ग.. ब्लँकेटवरून कुंडलिनी!
चैतन्य प्रेम