‘मानव विजय’ या लेखमालेतील ‘अज्ञेयवाद आणि निरीश्वरवाद’(२नोव्हेंबर) या लेखाच्या अनुषंगाने लिहीत आहे.
ज्यांनी विज्ञानाचा सखोल अभ्यास केला आहे अशा शास्त्रज्ञांचा दृढ विश्वास आहे की, या विश्वात, अमूर्त स्वरूपात कोणताही घटक असणं शक्य नाही. विश्वाचे सर्व घटक, ऊर्जा आणि वस्तुमानाच्याच स्वरूपात होते, आहेत. आणि विश्व जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत असणार आहेत. ऊर्जा हीदेखील मूर्त स्वरूपातच समजली पाहिजे. कारण ती सर्व भौतिक नियमांचे तंतोतंत पालन करते.
विश्वाचे सर्व व्यवहार, गुरुत्वाकर्षण बल, वीजचुंबकीय बल आणि विश्वातील सर्व वस्तुमानात असलेल्या अणूतील शक्तिमान आणि दुबळे (स्ट्राँग आणि वीक) ही दोन बले.. अशा चार मूलभूत बलांमुळेच चालतात. यातील पहिली दोन बलं, सर्व विश्वव्यापी बलं आहेत तर दुसरी दोन बलं फक्त अणूतच असतात. पण अख्खे विश्व अणूंनी व्यापले असल्यामुळे ती बलेदेखील विश्वव्यापीच आहेत.
पारंपरिक अध्यात्मानुसार, ईश्वर सर्वव्यापी आहे, सदाकाळ त्याचं अस्तित्व असते, तो सर्वशक्तिमान असून सर्वज्ञानी आहे. आता हेच गुण, या चारही मूलभूत बलांना लागू पडतात. म्हणूनच ही बले म्हणजेच, विज्ञानीय ईश्वर आहे. तो कुणाच्याही इच्छेनुसार वागत नाही, कुणावरही प्रसन्न होत नाही की कोपित नाही. कुणाला काही देत नाही की कुणाकडून काही घेत नाही. भौतिक नियमांचे कुणीही उल्लंघन करू शकत नाही किंवा ते नियम बदलवू शकत नाही.
या विचारांना, अज्ञेयवाद म्हणा किंवा निरीश्वरवाद म्हणा.. अर्थबोध एकच.
– गजानन वामनाचार्य, घाटकोपर पूर्व (मुंबई)
एका आस्तिकाचा प्रवास..
देव मानण्याचे माझे तीन टप्पे मी अनुभवले.
पहिला टप्पा जगात जे काही चांगले आहे त्याच्या रक्षणासाठी, वाईट शक्तींचा नायनाट करण्यासाठी, साऱ्या जगाचे चक्र चालवण्यासाठी.. देव आहे.
दुसरा टप्पा जगात जे काही चांगले, वाईट घडतेय त्यास फक्त देव जबाबदार आहे, कारण या सृष्टीचा कर्ता-करविता तोच आहे.. आपण नाममात्र.. आनंद मिळाल्यास धन्यवाद त्यालाच द्यायचेत आणि दु:ख दिल्यास त्याचे खापर त्यावरच फोडायचे. तोच देणारा आहे, तोच घेणारा आहे. (याच टप्प्यात असताना मी अपेक्षांच्या लांबलचक लिस्ट वाचून दाखवी. न झालेल्या गोष्टींचे खापर देवांवर ठेवी).
तिसरा टप्पा, देव ही केवळ एक संकल्पना आहे..
या टप्प्यात मी तटस्थ आहे. देवळात जाणाऱ्या आणि न जाणाऱ्या, दोघांच्याही विचारांचा मला आदर आहे. मी काय करावे यावर मात्र अद्याप शिक्कामोर्तब करायचे आहे.
नतमस्तक तर, मी माझ्या डोळ्यांसमोर घडलेल्या आणि घडून गेलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीपुढे आहे, सकारात्मकता त्याच प्रत्येक गोष्टींमधून शोधत आहे.
मानसिक समाधान यातच आहे की, आजही माझ्याकडे बरेच काही नाही, पण निदान माझ्या अपयशांचे दोषारोप मी देवावर करीत नाही.
..आणि आता, काही मिळावे यासाठी मी देवळाची पायरी चढत नाही.
– निरंजन काणे
विचार महत्त्वाचा की अनुभव?
‘मानव विजय’ या सदराचा मी नियमित वाचक आहे. मी आस्तिक असूनही हे सदर वाचावेसे वाटते. ‘अज्ञेयवाद आणि निरीश्वरवाद’(२नोव्हेंबर) या लेखात असे लिहिले आहे की स्वतंत्र विचार करायला न घाबरणारी माणसे ईश्वर खरेच आहे का या शोधात उडी घेतात व काहीजण आपल्या विचाराने अज्ञेयवादी तर काहीजण निरीश्वरवादी बनतात.
एकतर वरील वाक्यात ‘विचाराने’ यापेक्षा ‘अनुभवाने’ असे लिहावयास हवे होते. कारण विचारांपेक्षा अनुभव हा महत्त्वाचा आहे भलेही तो एखाद्यालाच येवो. सर्वच स्वतंत्र विचार व साधना करणारांना केवळ ईश्वर नाही हाच साक्षात्कार होईल एवढेच संभवनीय आहे असे समजणेही ठीक नाही.
अखेर, जे लोक परमेश्वराविना आनंदात जीवन व्यतीत करत आहेत त्यांनी बिलकुल शोधात पडू नये, कारण आनंदी जीवन हेच खरे ध्येय!
– डॉ. अभय जोशी, लातूर</strong>
युक्तिवाद अतार्किक
‘समोरच्या बाकावरून’ सदरामधील (लोकसत्ता, ३ नोव्हेंबर) ‘न्यायिक नियुक्ती आयोगाचा तिढा’ या लेखातील पी. चिदम्बरम यांचे ‘न्यायाधीश नियुक्त्यांचा पर्यायी मार्ग शोधला जाणे आवश्यक’ असल्याचे म्हणणे न पटणारे आहे. कारण पर्यायी मार्ग तेव्हाच शोधला जातो जेव्हा सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गात सुधारणा करणे शक्य नसते. तसेच एखादी गोष्ट ‘याआधी घडली नाही म्हणून यापुढे घडणार नाही’ आणि ‘त्या देशात घडली नाही म्हणून आपल्या देशात घडणार नाही’ हे त्यांचे युक्तिवादही अताíकक वाटतात.
‘न्यायाधीशांच्या नेमणुकांमध्ये कार्यकारी संस्थेचीही निश्चित भूमिका असलीच पाहिजे,’ असे त्यांनी म्हटले आहे. पण असे म्हणताना न्यायसंस्थेशी संबंधित तरतुदींच्या विभागाचा मसुदा लिहिताना उभ्या राहणाऱ्या ‘न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपण काय करणार आहोत?’ या त्यांच्या पहिल्याच प्रश्नाचा त्यांना विसर पडलेला दिसतो.
न्यायसंस्थेप्रमाणेच कार्यकारी मंडळासंबंधीही विचार करायला लेखकाची हरकत नसावी असे गृहीत धरले तर ‘मंत्रिमंडळाची निवड आणि नेमणूक करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली जाईल?’ याचाही पुन्हा नव्याने विचार करून ‘राष्ट्रीय मंत्रिमंडळ नियुक्ती आयोग’ कायदा करणे आवश्यक ठरवण्यास काय हरकत?
– अविनाश ताडफळे, विले पाल्रे पूर्व (मुंबई)
प्रतिगामी माथी भडकतात, तेव्हा केवळ व्यक्तीवर रोख!
केंद्रातील सरकारच्या विरोधात असलेल्या मंडळींनी हा असहिष्णुतेचा मुद्दा सरकारविरोधी कारस्थान म्हणून आणला गेल्याचे आरोप-प्रत्यारोप यांच्या झडणाऱ्या फैरीदेखील रोज वाचकांपुढे येत आहेत. आरोप मतभिन्नता ,चर्चा ,वाद त्यातून निघणारे विचारमंथन समाजाच्या एकूण प्रगतीला आवश्यक असते यावर दुमत होण्याचे कारण नाही.
मात्र प्रत्यक्षात, केवळ आपल्या परंपरावादी विचारांपेक्षा, आपल्या धार्मिक समजुतीपेक्षा निराळे विचार मांडले म्हणून प्रतिगामी माथी भडकून असे वेगळे विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर निखालस चुकीचे आरोप, हेतूंविषयी शंका, िनदानालस्ती, बहिष्कार, दबाव अशी वेगवेगळी तंत्रे वापरून वेगळ्या म्हणजेच परंपरावादी विचारसरणीला न रुचणाऱ्या (न पेलणाऱ्या) विचारांना संकुचित विचारांची कुंपणे घालून मज्जाव घालत असतात. अशा प्रतिगामी मंडळींमुळे समाज हे साचलेले डबके होते. मात्र कोणत्याही वैचारिक चर्चा मंथनापेक्षा परंपरावादी झापडे लावून जगणे सोपे असल्याने प्रतिगामी मंडळी पुरोगामी विचारसरणीला विरोध करताना एकत्र होऊन धार्मिक भावना दुखावल्याचा सामुदायिक टाहो फोडतात. त्यातूनच पुरोगामी मंडळींवर चुकीच्या आरोपांच्या फैरी झडतात. दीडशे वर्षांपूर्वी पुण्यात समाजसुधारक आगरकरांची त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या घरासमोर प्रेतयात्रा काढली गेली होती ती त्यांचे पुरोगामी विचार दाबून टाकण्यासाठीच.
– रजनी अशोक देवधर, ठाणे</strong>
व्हॉट्सअॅपवर वैचारिक चर्चा.. कधी?
कोणत्याही धर्माध शक्तींचे तरुण हे ‘लक्ष्य’ असतात. कारण हा काळ विचार घडण्याचा असतो आणि हवे तसे ‘बौद्धिक’ देऊन त्याला आकार दिला जाऊ शकतो. आज समाजमाध्यमांमध्येसुद्धा धर्म (धर्माचा खरा अर्थ लावण्यासाठी विवेकानंदांचे कर्मयोग वाचावे) आणि कट्टरवाद याच गोष्टीची चर्चा जास्त चालू आहे. जिथे विज्ञान चíचले पाहिजे तिथे अशा भाकड गोष्टी कानावर पडत आहेत.
आधुनिक भारत हा विज्ञाननिष्ठ असावा असा विचार स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्यांनी मांडला आणि त्या दृष्टीने पावले उचलली. त्यात अर्थात पंडित नेहरू अग्रणी होते (कोणी कितीही खोटा प्रचार केला तरी हे सत्य आहे आणि मी कोणत्या पक्षाच्या वतीने बोलत नाही). अन्यथा, धर्मावर आधारित राष्ट्राची निर्मिती कोठे घेऊन जाते हे शेजारील राष्ट्राने दाखवून दिले आहे.
विज्ञानाचा विकास झाला म्हणजे समाज बुद्धिनिष्ठ होतो आणि भाकडकथांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. प्रत्येक कृतीला व विचाराला प्रश्न विचारला जातो. त्याची वैज्ञानिक चिकित्सा होते. एखादी गोष्ट कालसुसंगत असेल तरच आचरणात आणली जाते आणि ज्या टाकाऊ आहेत त्या मागे पडतात. केवळ अमुक धर्मग्रंथात अमुक सांगितले म्हणून तेच योग्य असे न मानता त्याची चिकित्सा केली जाते. पण अशी समाजव्यवस्था धर्माची दुकाने थाटणाऱ्यांना नको असते. म्हणून ते ज्या वयात विज्ञान-विचार विकसित होतो त्याच वयातील मुलाना टाग्रेट करून त्यांची डोके भडकवत आहे. त्यासाठी ते अगदी सत्ता वापरून पाठय़पुस्तकांतसुद्धा बदल घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
साहित्यिक आणि विचारवंतांचा आक्षेप आहे तो इथे. वातावरण बिघडते आहे हे असे. त्यासाठी राज्यव्यवस्थेला दोष द्यावाच लागेल आणि शक्य त्या प्रकारे त्याचा विरोध करावाच लागेल. तरुण जेव्हा व्हॉट्सअॅपवर कट्टर धार्मिक विचार पसरवणाऱ्या मेसेजऐवजी वैज्ञानिक आणि वैचारिक गोष्टीची चर्चा करू लागेल तेव्हाच सामाजिक स्थिती पूर्वपदावर येत आहे असे मानता येईल.
– हृषीकेश कुलकर्णी, राहुरी (जि. अहमदनर)
सारासार विचार न करता..
‘आरसा पाहा जरा’ या अग्रलेखाने (३१ ऑक्टो.) महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे.
दिवंगत व्यंगचित्रकार लक्ष्मण यांच्या गुणवत्तेबद्दल सर्वानाच आदर आहे आणि त्यांच्या व्यंगचित्रांचे कलादालन मुंबईत असणे आवश्यकच आहे. पण जे. जे. ही त्यासाठी जागा नव्हे. सारासारविचार न करता असे निर्णय घेतल्यामुळे लक्ष्मण यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तींचे नाव विनाकारण वादविषय होणे, हे धार्जिणे नाही.
– दीपक घारे (समीक्षक), डोंबिवली.
इथला खजिना मात्र धूळ खात!
जे.जे. कला महाविद्यालयाच्या आवारातील आर. के. लक्ष्मण यांच्या स्मारकाला अथवा दालनाला चित्रकारांचाच विरोध आहे, हे निर्विवाद. कै. आर. के. लक्ष्मण यांच्याबद्दल व्यंगचित्रकार म्हणून आदर आहेच; परंतु जे.जे.शी त्यांचा संबंध नव्हता. जे. जे.मध्ये आर. के. लक्ष्मण यांचे योगदान काय? जे. जे.तील एकाही विद्यार्थ्यांला वा कोणाला त्यांनी कधी मार्गदर्शन केलेले नाही. याउलट जे. जे.च्या १५० हून अधिक र्षांच्या कलापरंपरेत अनेक थोर, ज्येष्ठ कलावंत होऊन गेले, ज्यांनी जे. जे.साठीही मौलिक योगदान दिले आहे. त्यांच्या अभिजात चित्रांचा अमूल्य खजिना आजही धूळ खात पडला आहे. त्यांचे संग्रहालय करण्याची मोठी गरज आहे आणि तशी मागणीही अनेक वर्षांपासून आहे. म्हणून जे. जे.च्या प्रांगणात लक्ष्मण यांचे स्मारक करणे अगदी अयोग्य आहे. लक्ष्मण यांचे उचित स्मारक व्हावे हे ठीक, पण त्यासाठी जे. जे.ऐवजी, लक्ष्मण यांची कर्मभूमी असलेल्या जागादेखील याच भागात आहेत हे सरकारने लक्षात घ्यावे.
– दत्तात्रय पाडेकर, मुंबई.
खरा प्रश्न आहे, तो कलासंस्था वाचवण्याचा!
‘आरसा पाहा जरा..’ हे ‘शनिवारचे संपादकीय’ (३१ ऑक्टो.) वाचलं. निदान आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येईल अशी खात्री वाटते. काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’नंच जेजेच्या आवारातील ‘डीन बंगला’ तंत्रशिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या घशात जाण्यापासून वाचवला होता. ‘लोकसत्ता’तल्या बातमीमुळंच जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्ची रवानगी देवनारच्या कत्तलखान्याशेजारी होण्यापासून वाचली होती. आताही या अग्रलेखाची दखल घेऊन आपला निर्णय फिरवण्याखेरीज शिक्षणमंत्र्यांकडे दुसरा पर्याय नसेल. खरं तर नव्या शिक्षणमंत्र्यांनी ‘लोकसत्ता’ने जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् आणि कला संचालनालय या संदर्भात गेली २५ र्वष दिलेल्या सर्वच्या सर्व बातम्या आणि लेख जरी होमवर्क म्हणून नुसते नजरेखालून घातले असते तरी हे असले निर्णय घेण्याचं धाडस त्यांना झालं नसतं.
माधव सातवळेकर, प्रल्हाद अनंत धोंड, बाबूराव सडवेलकर यांच्यासारख्या दिग्गज कलावंत आणि कलाशिक्षणतज्ज्ञांनी भूषवलेलं महाराष्ट्राचं मानाचं कला संचालकपद गेली अनेक र्वष रिक्त आहे. सडवेलकरांनंतर जी काही नररत्नं तंत्रशिक्षण खात्यानं या पदावर आणून बसवली त्याला कलेच्या इतिहासात तोड नाही. या अशा कारभारामुळे महाराष्ट्राच्या थोर कलाशिक्षण परंपरेची अक्षरश: वाताहत झाली. सडवेलकर यांच्यानंतरच्या कला संचालकांनी जे काही पराक्रम गाजवले त्याच्या कथा काय सांगाव्यात? एकानं पसे खाऊन महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली सुमारे २०० कला महाविद्यालयं स्थापन केली. त्यातली आता किती चालू आहेत हा संशोधनाचा विषय ठरावा. आणखी एकानं ‘गायतोंडे’ यांचं एक भलं थोरलं भित्तिचित्रं फ्रेममध्ये बसवायच्या नादानं बेलगामपणे चक्क चारही बाजूंनी एक-एक फूट कापून टाकलं. कापताना ते मधोमध दुभंगलं तर ते तसंच ठेवून चालता झाला. काही कला संचालक तर असे नेमले गेले की, ज्यांना भारतातल्या पाच चित्रकारांची नावं विचारली असती तर जन्मात उत्तर देता आलं नसतं. जहांगीर आर्ट गॅलरी माहीत नसलेली माणसं इथं कला संचालक म्हणून नेमली गेली.
आता कार्यरत असलेल्या एका उच्च अधिकाऱ्याविषयी काय सांगावं? जिल्ह्य़ाच्या एका शिक्षण विभागात नोकरी करणारा हा इसम तिथून निलंबित झाला आणि नागपूरमार्गे मुंबईच्या कला संचालनालयात येऊन मोठय़ा पदावर रुजू झाला. संचालनालयात होणाऱ्या प्रत्येक ‘अर्थपूर्ण व्यवहारा’त याचा हात असतो. पण ‘जात दाखवली’ की त्याविरुद्ध बोलण्याची कोणाचीच टाप नसल्यानं अक्षरश: गेली अनेक र्वष तो भ्रष्टाचाराचे इमलेच्या इमले रचतो आहे. त्याचं साधं सव्र्हिस रेकॉर्डदेखील कोणी अद्याप तपासलेलं नाही. शासकीय नोकरीत असं एरवी होत नाही; पण इथे मात्र वर्षांनुर्वष कोणी त्याची चौकशीदेखील केली नाही! ही असली दिवटी नररत्नं मधल्या काळात नेमली गेल्याने जेजेतल्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत शिक्षक वर्गाचं फार मोठं आणि कायमचंच नुकसान झालं आहे. मंत्रालयातल्या गणंगांचं साहाय्य घेत या नीच अधिकाऱ्यानं सुजाण शिक्षकांचा अक्षरश: पिढय़ान्पिढय़ाच कापून टाकल्या आहेत. भविष्यात कोणीही सुजाण, सुसंस्कृत व्यक्ती प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, रजिस्ट्रार, कला संचालक या पदावर कदापिही येऊ शकणार नाही अशी कायमचीच व्यवस्था करून ठेवली आहे. याचा प्रत्यय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आला असेलच. तरीदेखील हे सगळं सुधारायचं सोडून आर. के. लक्ष्मण यांचं संग्रहालय कसलं काढताय? तुम्हाला काय जेजेचं पर्यटन स्थळ करायचंय? मग जेजेतल्या विद्यार्थ्यांनी कुठं शिकायचं? का तुम्हीदेखील ठरवलंय की ‘वळसे’ घेत घेत आधीच्या मंत्र्यासारखं जेजे पूर्णत: नेस्तनाबूतच करायचं आहे? म्हणजे आणखी काही वर्षांनी महाराष्ट्रातले भावी नागरिक आपले गळा काढायला मोकळे. नालंदासारखं इथंदेखील ‘एक जेजे स्कूल ऑफ आर्टस् नावाची कला संस्था होती’ वगरे!
– सतीश नाईक, संपादक ‘ चिन्ह ’
‘लक्ष्मण आपल्या कॉलेजचे नाहीत म्हणून नको’,
हे संकुचित मनाचे प्रदर्शन
‘आरसा पाहा जरा’ हा ( ३१ ऑक्टोबरचा) अग्रलेख वाचला. काही मुद्दे वस्तुस्थितीला/ परिस्थितीला अनुसरून नाहीत.
सर्वप्रथम जे.जे. ही वास्तू एक कलेचे महाविद्यालय आहे. म्युझियम नाही किंवा आर्ट गॅलरी नाही. त्यासाठी मुंबईत कित्येक आर्ट गॅलरीज् आहेत. यावर कोणाचे दुमत नसावे.
आजमितीला शिल्पकला, सिरॅमिक्स, टेक्स्टाइल डिझाइन, वास्तुशास्त्र, छपाई तंत्रज्ञान आणि जाहिरात कला अशा सात वेगवेगळ्या कलाप्रांतांत जे.जे. हे नाव अग्रेसर आहे. महाराष्ट्राच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यापैकी अनेक शाखा आज मरणपंथाला लागलेल्या आहेत. पक्षप्रमुख आणि त्यांची आप्त मंडळी कलाकार असलेल्यांचे सरकार काही काळ येऊनसुद्धा जे.जे. उपेक्षितच राहिले! पण तो विषय कलादालनापासून वेगळा आहे.
अशा या संकुलामध्ये एक कलादालन काय करील?
१) १२वी झाल्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना जे.जे.ची नेमकी कुठली शाखा घ्यावी, हा संभ्रम असतो. हे कलादालन त्यांना प्रत्येक शाखेची सखोल आणि स्तुत्य ओळख करून देईल.
२) जे.जे.त शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सतत ते प्रोत्साहित करील आणि त्या त्या शाखेचा इतिहास आणि पूर्वाश्रमीचं उत्तम काम दाखवून वाट दाखवील.
३) पर्यटकांना एक शैक्षणिक अन् आनंद देणारा अनुभव मिळेल.
आता थोडे विषयांतर. अनेक र्वष जवळजवळ कचऱ्यात पडलेली अनेक दिग्गजांची चित्रे काही कलाकारांनी वाचविली. खूप खूप मेहनत घेतली (सरकारी पातळीवर एक काडी हलवायची तरी नाकात दम येतो. इथे तर हजारो चित्र आहेत) त्याबद्दल त्यांना माझ्यातर्फे धन्यवाद.
जे.जे.मध्ये जे काही शिकवले गेले (इतिहास) किंवा काळाप्रमाणे पुढच्या १०-१५ वर्षांमध्ये जे शिकवले जाईल (भविष्य) ते ते या कलादालनात असावे, जेणेकरून जे.जे.ला एक ध्येय मिळेल आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, शिवाय त्यांना कलाविश्वातील भविष्यातल्या बदलांची चाहूल लागेल. हे व्हायला हवे असेल, तर त्यात व्यंगचित्राचे शिक्षण आणि दालन का नसावे? इतर कलाशाखांच्या मानाने त्या त्या शाखेला आपला हक्क मिळायला हवा. यात चूक काय आहे? चांगले रेखाटन अन् व्यंगचित्रकाराची दृष्टी असलेल्या कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांला त्याचा फायदाच होईल!
त्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आर. के. लक्ष्मण आपल्या कॉलेजचे नाहीत म्हणून नको, हे संकुचित मनाचे प्रदर्शन नाही काय?
अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे ‘आर. के. लक्ष्मण यांची पुस्तके आहेत. मग ते जे.जे.त कशाला?’ तसे पाहिले तर त्या तीन हजार चित्रांचे डिजिटायझेशन करून जे.जे.ची वेबसाइट केली, पुस्तके छापली तर हा कलादालनाचा प्रपंच पाहिजेच कशाला? बसा आपापल्या घरात अन् बघा-वाचा पुस्तकं.. असे झाले तर कदाचित जगातील सर्वच कलादालनांचा अवाढव्य खर्च अन् परिश्रम वाचतील.
या जबाबदार कलाकारांना या गोष्टी पटतील का? की फक्त फाइन आर्टच्या कोशामध्येच राहायचेय? फक्त भूतकाळात रमून, वर्तमान अन् भविष्याकडे सोयीस्कर पाठ फिरवायची आहे? तसे असेल तर यांना एका आरशाची गरज कधीच भासणार नाही.
– गोपी कुकडे, माजी विद्यार्थी जे. जे. कला महाविद्यालय