‘पर्यावरण परिषद महत्त्वाची असती तर मोदींनी परत बोलावलेच नसते,’ अशी हास्यास्पद पाठराखण (लोकमानस, ८ जुल ) वाचली. यानिमित्ताने आपल्या देशातील जनतेची यात काय विशेष? ही मानसिकताच समोर येते. राजकारणात फेरबदल, उलथापालथ झाली, की आपले प्रधान कर्तव्य बाजूला ठेवून मंत्री वागतात याबद्दल कुणालाच काही वाटेनासेच झाले आहे. शिवाय पर्यावरण परिषद महत्त्वाची नव्हती तर सरकारने याला उपस्थित राहण्यासाठी लाखो रुपये खर्च का केले, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. एकटय़ा व्यक्तीसाठी शपथविधी टाळावा, म्हणून हे योग्य केले, असा पत्राचा सूर दिसतो. मुळात घटनादत्त कर्तव्य मी निरपेक्षपणे पार पाडीन ही शपथ घेण्यासाठी समारंभ आणि विधी कशासाठी? राष्ट्रपतींसमोर कोणताही गाजावाजा न करता हे करता येणे सहज शक्य आहे; पण त्यासाठी आपली सरंजामशाही मानसिकता बदलावी लागेल.
– देवयानी पवार, पुणे</strong>
या घटनेतून काही शिकणार आहोत का?
‘अश्वांमधील संवेदनशीलता..’ ही बातमी (८ जुल) वाचली आणि खूप वाईट वाटले. सांगलीत एक दुचाकीस्वाराने घोडय़ाला धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आपला साथीदार मृत झालेला पाहून असलेल्या अन्य चार घोडय़ांच्या डोळ्यांत पाणी आल्याचे पाहून माणसांचे काळीजसुद्धा हेलावले असेल. माणसाचे मात्र उलट आहे. एखाद्या भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाखाली एखादा कुत्रे/मांजर येऊन ते जर मरण पावले तर माणूस हळहळ व्यक्त करत तिथून निघून जातो; पण इथे मात्र त्या मृत घोडय़ावर अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत त्याचे चार अन्य साथीदार त्याच्या मृतदेहाजवळ बसून होते. यावरून त्या घोडय़ांचे आपल्या साथीदारावर किती प्रेम होते हे त्यांनी आपल्या डोळ्यांतील अश्रूंद्वारा दाखवून दिले. आपण या घटनेतून काही शिकणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे.
– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)
‘सुल्तान’मुळे ‘एक अलबेला’वर अन्याय!
आपल्या अनोख्या नृत्यशैलीने चित्रपटसृष्टीवर आपली छाप उठवणारे भगवानदादा यांच्या जीवनावर आधारित ‘एक अलबेला’ हा चित्रपट एका आठवडय़ातच चित्रपटगृहातून हटवला गेला. मंगेश देसाई याने मेहनतीने साकारलेले मास्टर भगवान आणि िहदीतील अभिनेत्री विद्या बालन हिने साकारलेली गीता बाली ही जोडी रसिकांच्या पसंतीस उतरलीही होती. बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवडय़ातील कमाईही चार कोटी रुपयांपर्यंत होती. एवढय़ा सगळ्या जमेच्या बाजू असतानाही या चित्रपटाचे खेळ दुसऱ्या आठवडय़ातच रद्द केले जावे हे अनाकलनीय आहे. बिग बजेट ‘सुल्तान’ चित्रपटाचे प्रदर्शन याला कारणीभूत आहे का?
– दीपक काशीराम गुंडये, वरळी (मुंबई)
मान खाली घालायला लावणारे कलाकार
गायक सुरेश वाडकर यांनी पद्म पुरस्कारासाठी एका जाहीर कार्यक्रमात ‘शरद’ राग आळवला. निमित्त होते मखमली आवाजाचे गायक अरुण दाते यांना शरद पवार यांच्या हस्ते ‘राम कदम कलागौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचे! ‘‘अरुण दातेंप्रमाणे मीदेखील वयाने मोठा होत जाणार असून त्यांना आणि मला भविष्यात पद्म पुरस्कार मिळावेत यासाठी शरद पवारांच्या चरणी प्रार्थना करतो,’’ या शब्दांत सुरेश वाडकर यांनी शरद पवारांसमोर लोटांगण घातले! एखादी क्रिकेटची मॅच फिक्स असते असे आपण ऐकतो, तसे हे पद्म पुरस्कारदेखील फिक्स केले जातात या गोष्टीवर कालपर्यंत माझा विश्वास नव्हता; पण सुरेश वाडकरांच्या या वक्तव्याने आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे वाटले.
एरवी मुलाखतींमधून, ‘‘मा सरस्वती, सूर म्हणजेच ईश्वर, आमच्या गाण्याला रसिकांची मिळालेली दाद, हाच आमचा सर्वात मोठा पुरस्कार आहे,’’ असे तारे तोडून वाहवा मिळवायची आणि मनातून मात्र पद्म पुरस्कार मिळत नाही म्हणून निराशेचे सूर जाहीरपणे छेडायचे! हा विरोधाभास कलाकारांवर मनापासून प्रेम करणाऱ्या रसिकांची मान शरमेने मान खाली घालायला लावणारा नाही का?
– संजय वामन पाटील, बोरिवली (मुंबई)
फोटोला ‘क्षणचित्र’ का म्हणत नाही?
‘आठवणीतली दृश्यमाला’ हा लेख (लोकभ्रमंती, ६ जुलै) वाचला. त्यानिमित्ताने एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. फोटोग्राफ या इंग्रजी शब्दाला आपण ‘छायाचित्र’ हा प्रतिशब्द सर्रास वापरतो, पण हा शब्द बरोबर आहे का? फोटोग्राफी ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने निर्माण केलेली एक कलाकृती असते हे जरी खरे असले तरी आपण फोटो काढतो म्हणजे तो परत न येणारा धावत्या काळाचा एक क्षण चित्ररूपांत गोठवून ठेवतो. मग ते चित्र एखाद्या डोंगराचे असो अथवा वधू-वराच्या गळ्यांत माळ चालण्याचे असो. कॅमऱ्यांत पकडला जात असतो ‘तो’ एक असा न परतणारा ‘क्षण’! तो क्षण आठवणीत राहावा म्हणून त्या क्षणाचे एक कायमस्वरूपी चित्र बनवतो, त्याला सजवतो, जपून ठेवतो. मग अशा फोटोग्राफला आपण ‘क्षणचित्र’ का म्हणत नाही? पासपोर्ट वगैरे तद्दन कामासाठी लागणाऱ्या आपल्या छबीला नुसते ‘फोटो’ तर आपण म्हणतोच तिथे फक्त आपली ‘ओळख’ सिद्ध करणे एवढाच हेतू असतो पण जेव्हा एखादा महत्त्वाचा एक क्षण आपण कॅमेऱ्याच्या साहाय्याने पकडून ठेवतो ते वास्तविक असते एक ‘क्षणचित्र’! त्याला आपण छायाचित्र अथवा प्रकाशचित्र म्हणणे कितपत योग्य आहे?
– प्रदीप अधिकारी, दादर (मुंबई)
आकाशवाणी मुंबईचा पक्षपात
आकाशवाणी मुंबईच्या दोन वाहिन्या लोकप्रिय आहेत. १) अस्मिता वाहिनी : ही प्रमुख वाहिनी मराठीसाठी असली तरी आधुनिक काळात तिच्यावर ‘मराठी आणि हिंदी’ चित्रपटगीते प्रसारित होऊ लागली आहेत. २) संवादिता वाहिनी : ही दुसरी प्रमुख वाहिनी आहे हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी अशा काही अल्पसंख्याक वर्गासाठी. संवादिता वाहिनी अतिशय कमकुवत असून मुंबईतदेखील ती व्यवस्थित ऐकू येत नाही. बाकीच्या वाहिन्या मात्र नीट ऐकता येतात. असा पक्षपात आकाशवाणीने करावा याचा खेद वाटतो. आकाशवाणीने यात सत्वर सुधारणा केली तर बरे.
– चित्रलेखा जोशी, शिवडी (मुंबई)