‘हा  फुले-आंबेडकरवाद नोहे..’ हा शुद्धोदन आहेर यांचा परखड विवेचन करणारा लेख (१३ एप्रिल) वाचला.  नजीकच्या इतिहासातसुद्धा प्रभुत्वशाली शेतकरी जातीतील काही मोठय़ा नेत्यांनी फुले-आंबेडकरी विचारांना ब्राह्मण ब्राह्मणेतर असे स्वरूप देऊन ब्राह्मणांना टार्गेट करताना शेती करणाऱ्या इतर लहानसहान गटांना बरोबर घेतले ते फक्त लढण्यापुरते. मात्र ते करताना आपलाच राजकीय व सामाजिक अजेंडा पुढे नेऊन यशस्वी केला. असे करताना शेती करणाऱ्या अन्य लहान गटांना हळूहळू मागे रेटायला त्यांनी हयगय केली नाही. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या सवलती इतर लहानांना देऊ केल्यानंतर त्यांचे खरे स्वरूप प्रकट झाले. ते त्यातही वाटा मागू लागले. आता हिंदुत्ववादी सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा ब्राह्मण ब्राह्मणेतरांचा प्रयोग सुरू झाला आहे. फुले आणि आंबेडकरांनासुद्धा अभिप्रेत होते जमीन कसणाऱ्या कष्टकऱ्यांचे, वंचितांचे उत्थान आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य. मग हा वर्ग ब्राह्मण असो वा अब्राह्मण. असल्या राजकीय स्वार्थातून निर्माण झालेला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद या महात्म्यांना नक्कीच अभिप्रेत नव्हता.

डॉ. कैलास कमोद, नाशिक

 

अशा शेतकऱ्यांचे लाड नकोच!

‘तेलंगण सरकार जेरीस’ ही बातमी (१३ एप्रिल) वाचली. कर्जमाफीमुळे तेलंगण सरकारची चांगलीच दमछाक होत आहे. आपल्या ‘महा’राष्ट्राची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता इतर राज्यांतील कर्जमाफीबाबतचे अनुकरण सरकारने करू नये, कारण त्यामुळे सरकारवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. याआधीच्या सरकारांनीही शेतकऱ्यांसाठी प्रचंड निधी मंजूर केला होता, पण सरकारमधील काही नेते  व अधिकाऱ्यांनी तो  स्वत:च्याच खिशात कोंबला. यापुढे केवळ गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी द्यावी. आलिशान गाडय़ांमधून फिरणाऱ्या शेतकऱ्यांचे लाड सरकारने करूच नयेत. तसेच शेतकऱ्यांनी काहीही झाले तरी फाशीसारखे मार्ग चोखाळू नयेत.

अक्षता क्षीरसागर, अंधोरी, ता. अहमदपूर (लातूर)

 

आंतरराष्ट्रीय संकेतांची पायमल्ली

‘अवघड जागेचे दुखणे’ हे संपादकीय (१२ एप्रिल) वाचले. भारताने पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पालथ्या घडय़ावर पाणी अशी परिस्थिती आहे. कुलभूषण जाधव यांची अटक आणि त्यांना झालेली शिक्षा हे एक निमित्त आहे. पाकिस्तानचे खरे दुखणे वेगळेच आहे. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याचे चांगले झालेले पाहवत नाही. अशा व्यक्तीला आपण म्हणतो, ‘त्याचे चांगले झाले तर तुझ्या का पोटात दुखते आहे?’ तीच गत पाकिस्तानची झाली आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणात वाढणारा दबदबा, सर्वच क्षेत्रांतील प्रगती ही पाकच्या दृष्टीने चिंतेची आणि असूयेची बाब आहे.    या प्रकरणाला एक दुसराही पदर आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकने अनेक वेळा काश्मीर प्रश्नाचे तुणतुणे वाजवले आहे. परंतु या मुद्दय़ावर पाकची सर्व कारस्थाने भारताने मुत्सद्दीपणाने हाणून पडली आहेत. या सगळ्या प्रकरणाचा फटका कुलभूषण जाधव यांना बसला आहे. स्वत: पाकच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी पाककडे  कुलभूषण जाधव यांच्या विरोधात काही पुरावे नाहीत, असे म्हटले आहे. तरीही पाकने कुलाभूषण यांना भारतीय वकिलांना भेटण्याची परवानगी नाकारून आंतरराष्ट्रीय संकेतांची पायमल्ली केली आहे.

विश्वास देशपांडे, चाळीसगाव

 

निकृष्ट सीसीटीव्हींमुळे पोलिसांपुढे अडचणी

गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मोठय़ा शहरांमध्ये सरकार वा पालिकेतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात आले. जनतेचे कोटय़वधी रुपये यात खर्च झाले, पण निकृष्ट सीसीटीव्हींमुळे पोलिसांना आरोपींची ओळख पटवताना अडचणी येत आहेत. सीसीटीव्हीमध्ये जी दृश्ये टिपली जातात ती अत्यंत धूसर असल्याने बऱ्याचदा गुन्हेगार सुटून जातात. परिणामी सीसीटीव्ही असूनही तो नसल्याप्रमाणेच होतो आणि पोलिसांच्या तपासातील गुंता वाढत जातो. शहरे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणताना त्या यंत्राची गुणवत्ताच महत्त्वाची असते. ठेकेदारांचे भले करणाऱ्या या योजनेकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.

ओमकार बेंद्रे, मीरा रोड (ठाणे)

 

प्रधानमंत्रीऐवजी पंतप्रधान म्हणा की!

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राज्यातील वृत्तपत्रांना वेळोवेळी जाहिराती दिल्या जातात. या खात्यात एकापेक्षा एक नग भरल्याचे दिसून येते. मागे मराठी दिनाच्या जाहिरातीत केशवसुतांचे मालगुंड हे गाव कोकणात असताना ते सातारा जिल्ह्य़ात असल्याचा शोध या खात्यातील अधिकाऱ्यांनी लावला होता. प्राइम मिनिस्टर या इंग्रजी शब्दाला मराठीत पंतप्रधान हा रूढ शब्द असताना माहिती खात्याच्या जाहिरातीत सातत्याने ‘पंतप्रधान’ शब्दाऐवजी प्रधानमंत्री असा उल्लेख केला जातो. सरकारी जाहिरातींमध्येच सरळ सरळ हिंदी शब्दांचा वापर केला जातो याला काय म्हणणार? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चालू असताना यापुढे सरकारी जाहिरातीत तरी शुद्ध मराठीचाच वापर व्हावा.

अभिजीत काळे, मुंबई

 

कुरुंदकरांचा मृत्यू औरंगाबादेत झाला!

‘अपवाद नरहर कुरुंदकर यांचा’ हे पत्र (लोकमानस, ११ एप्रिल) वाचले. तत्त्वज्ञ, विचारवंत, संशोधक यांची समाजाने कशी उपेक्षा केली हे कर्ते सुधारक आगरकरांच्या अंत्ययात्रेने पुणेकरांना चांगलेच माहीत आहे. सौंदर्यशास्त्र, संस्कृती, धर्म, इतिहास, अर्थकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य, संगीत यांसारख्या विषयांत अफाट व्यासंग असणारे नरहर कुरुंदकर हे नांदेड येथील पीपल्स कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांचा जन्म परभणी जिल्ह्य़ातील नांदापूर येथे १५ जुलै १९३२ रोजी आणि मृत्यू १० फेब्रुवारी १९८२ रोजी औरंगाबाद येथे सरस्वती भुवन प्रशालेच्या सभागृहात भाषणासाठी व्यासपीठावर चढताना झाला. त्यांची अन्त्ययात्रा नांदेड येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निघाली होती. सर्व शिक्षणसंस्था, व्यापारी आस्थापना स्वेच्छेने बंद राहिल्या होत्या. पत्रात ‘नरहर कुरुंदकरांचा मृत्यू नांदेड येथे’ झाल्याचे लिहिले आहे, ते चुकीचे आहे. नांदेडला गोदातटी गोवर्धन घाटावर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ११ फेब्रुवारी १९८२ रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.

प्रा. डॉ. बा. दा. जोशी, नांदेड