भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यातून सुटका कधी होणार?

‘रोजचे जगणे जाते खड्डय़ांत..’ या मथळ्याखालील मान्यवरांच्या प्रतिक्रिया (‘रविवार विशेष’, २२ सप्टेंबर) वाचल्या. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्तोरस्ती पडलेले खड्डे बुजवल्याचे लाख दावे सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून केले जात असले, तरी आज बुजलेले खड्डे पुन्हा बिकट वाट करत आहेत. त्यामुळे का म्हणून संबंधित ठेकेदारास कालमर्यादा निश्चित करून देत नाहीत, सर्वत्र रस्त्यांची दुर्दशा असताना का म्हणून टोल भरायचा, असे प्रश्न वाहनधारकांच्या डोक्यात थैमान घालणे साहजिकच; प्रशासनाचा काणाडोळा बघता, यात नक्कीच काही गौडबंगाल आहे, याबद्दल शंका नाही.

रस्त्यांच्या या दुर्दशेत भर म्हणून सरकारने जाचक असा नवीन मोटार वाहन कायदा लागू केला. यात हेल्मेट, सीट बेल्ट, सिग्नल तोडणे यासाठी मोठय़ा प्रमाणात ई-चलन वसुली केली जात आहे. परंतु खराब सिग्नल, चुकीच्या पद्धतीने चलन वसुली, रस्त्यांची दुर्दशा, बंद दिवे यांसाठी प्रशासन दंड कधी ठोठावणार? की नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहेत? आपल्या हक्कांसह काही कर्तव्येही आहेत याचा प्रशासनाला पुरता विसर पडलेला दिसतोय. निकृष्ट काम, ढिसाळ नियोजन, भ्रष्टाचारी कंत्राटदार या सगळ्यांचा मनस्ताप सामान्य जनतेला होत आहे. खळखळणाऱ्या, उफाळणाऱ्या पाण्यात भोवरा निर्माण होतो आणि पट्टीचा पोहणाराही त्या भोवऱ्यात गुरफटला, की त्याची सुटका नसते. आज तसेच आपण सगळे या भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलो आहोत. त्यातून सुटका होणार तरी कधी?

– उन्मेष तायडे, जळगाव</p>

मजबूत व टिकाऊ रस्त्यांची ही उदाहरणे पाहा..

‘रोजचे जगणे जाते खड्डय़ांत..’ या ‘रविवार विशेष’मधील खड्डेमय रस्ते नि त्यावरील जाणकारांच्या प्रतिक्रिया वाचल्या. महाराष्ट्रात रस्त्यांची अवस्था अतिशय दारुण आहे नि आपले राजकीय नेते तसेच बाबू लोक यांची जी ठेकेदारांशी अभद्र युती आहे, त्यामुळे सद्य:स्थितीत रस्त्यांची दुर्दशा अटळ आहे, जनतेचे हाल संपणे अशक्य आहे.

यासंदर्भात दोन उदाहरणे मोठी उद्बोधक आहेत :

(१) आफ्रिका खंडात पश्चिम किनाऱ्यावर, विषुववृत्ताजवळ (म्हणजे आपल्या मुंबईप्रमाणे भरपूर पाऊस, कडक उन्हाळा, समुद्र जवळ त्यामुळे खारे हवामान आदी) लायबेरिया नावाचा एक गरीब, कंगाल देश आहे. पुण्याचा एक तरुण तेथे कामानिमित्त काही वर्षे वास्तव्याला होता. त्याचे अनुभव त्याने एका पुस्तकात ग्रथित केले आहेत. ‘तेथे लोकांची क्रयशक्ती शून्य व त्यात अन्नधान्य-तुटवडा यामुळे जनता जे मिळेल ते खाऊन जगते. त्यामुळे झाडावर पाने, फळे, पक्षी दिसतच नाहीत. छोटय़ा  गुन्हेगारांना तुरुंगात न ठेवता, पोलीस तिथल्या तेथे उठाबशा काढा,वगैरे शिक्षा देतात. पण २५ वर्षांपूर्वी वसाहतवादी सोडून गेले, तरी त्यांनी केलेले रस्ते आजही चांगले आहेत.’ याचा अर्थ जास्त पाऊस, उष्ण कटिबंध, समुद्रकिनाऱ्याची हवा असे घटक, मनापासून  नि योग्य तंत्रज्ञानाधारे चांगले रस्ते केले तर त्यांच्या मजबुती नि टिकाऊपणाच्या आड येत नाहीत.

(२) प्रतिक्रियेत जितेंद्र जोशी यांनी विजय जोशी यांचे उदाहरण दिले आहे. ते मुळचे डोंबिवलीचे नसून ठाणे येथील मूळ रहिवासी असून, सध्या आस्ट्रेलियातील सिडनी येथे राहतात. ग्रंथाली प्रकाशित ‘गर्जे मराठी’ या पुस्तकात त्यांचा परिचय दिलेला आहे. ते स्थापत्य अभियंते असून त्यांनी ‘पोलाद कारखान्यात लोखंडाच्या शुद्ध धातूपासून निघणारी मळी- जी टाकाऊ  असते- त्यावर संशोधन करून पीएच.डी. मिळविली आहे. त्यांनी या मळीचा उपयोग विमानतळावरील विमान-मार्ग/धावपट्टी मजबूत होण्यासाठी केला. त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले रस्ते टिकाऊ, मजबूत नि खड्डेरहित होतात, असा जगभरचा अनुभव आहे. त्यांना या तंत्राचा उपयोग, विनामोबदला महाराष्ट्राला करून द्यायचा होता. पण त्याचे पुढे काय झाले, समजत नाही.

– श्रीधर गांगल, ठाणे

नको त्या वेळी नको त्या गोष्टीला महत्ता

‘गणपतवाणी.. नव्या युगाचा’ हा अग्रलेख (१९ सप्टेंबर) वाचला. अर्थव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत असताना, ई-सिगारेटवरील बंदीच्या निर्णयाने अर्थमंत्री काय साध्य करू इच्छितात? परदेशीपणाचा मुद्दा घेऊन ही बंदी घातल्याचे सांगण्यात आले. मग आपल्याला परकीय चलन मिळवून देणारी विडीसुद्धा इतर देशांसाठी परकीयच ना? यानंतर त्यांनी विडीवर पूर्णत: बंदी घालणे आपल्याला परवडेल का? मुळात एखाद्या उत्पादनावर बंदी घालणे चुकीचे आहे असे नाही. परंतु बंदीसाठी परदेशीपणाचा निकष वापरणे विवेकबुद्धीला धरून नाही. ई-सिगारेटपेक्षा जास्त निकोटिन तर पारंपरिक सिगारेटमध्ये असते. याचा अर्थ असा नाही, की ई-सिगारेटला प्राधान्य द्यावे. परंतु पूर्णत: बंदीऐवजी इतर विकसित देशांप्रमाणे एका नियमनच्या चौकटीत तिला आणणे योग्य ठरले असते. तरी हा मुद्दा विवादास्पद ठरला, कारण हा निर्णय उन्हाळ्यात स्वेटर घालून लक्ष विचलित करण्याचा आणि नको त्या वेळी नको त्या गोष्टीला महत्ता देण्याचा भाग ठरला.

– शीतल जाधव, सोलापूर

हवामान खात्याचे वरातीमागून घोडे

हवामान विभागाकडून देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा आणि त्यावरून शाळांना सुट्टी देण्यावरून झालेला गोंधळ, याविषयीच्या बातम्या (२० सप्टेंबर) वाचल्या. हवामान खात्याने कोकण, पालघरसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्य़ांत १९ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शालेय शिक्षणमंत्र्यांनी या सर्व भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र या सर्व भागांत सकाळपासून कडकडीत ऊन पडले होते. दुपारनंतर पाऊस आला, तोही नावापुरता. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना एक दिवसाचे अभ्यासाचे नुकसान झाले. हवामान खात्याचे अंदाज चुकण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. सततच्या चुकणाऱ्या अंदाजांमुळे जनमानसात हवामान खात्याची प्रतिमा पुरती मलिन झाली आहे. ‘हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला म्हणजे आज पाऊस पडणार नाही’ असे काहीसे समीकरण जनतेमध्ये निर्माण झालेले पाहायला मिळते. जोराचा पाऊस सुरू होण्याअगोदर हवामान खाते काहीच पूर्वकल्पना देत नाही; मात्र पावसाने जोर धरल्यावर पुढील २४ तास, ७२ तास अतिवृष्टी होणार असल्याचे इशारे खात्याकडून दिले जातात. वरातीमागून घोडे चालण्याच्या या प्रकारामुळे हवामान खात्याचा कारभार चालतो तरी कसा, हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. दरवर्षी हवामान खात्यावर एवढा पसा खर्च करूनही खात्याचे अंदाज असे वारंवार चुकत असतील, तर त्यामध्ये सुधारणा होणार तरी केव्हा?

– जगन घाणेकर, घाटकोपर (जि. मुंबई)

‘हवामान शास्त्रज्ञां’ना जाब विचारणारे कुणी आहे?

१९, २० आणि २१ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीबद्दलच्या बातम्या वाचल्यावर मुंबईची पुन्हा तुंबई होणार आणि आपले हाल होणार या काळजीपोटी अनेकांनी घरीच राहणे पसंत केले होते. तर कामसू शिक्षणमंत्री आशीष शेलारांनी अर्ध्या रात्रीच ट्वीट करून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करून गोंधळ वाढवला. पण हवामान खात्याने धुवाधार पावसाच्या केलेल्या अंदाजाचे तीन तेरा वाजले, त्याबद्दल तेथील विश्लेषकांच्या अशास्त्रीय अभ्यासाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. गेले तीन दिवस पाऊस पडण्याऐवजी कोरडे आकाश आणि सूर्यप्रकाश!

अशा अशास्त्रीय पद्धतीने अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्यातील कारकुनांना ‘हवामान शास्त्रज्ञ’ म्हणून संबोधणे हा तर त्या शब्दाचा अपमानच होय. कारण त्यांच्या अंदाजावर विसंबून शाळा-महाविद्यालयांना सुट्टय़ा दिल्या गेल्या. परिणामी ते दिवस फुकट गेले, आणि जादा काम शिक्षकांच्या बोकांडी बसले ते वेगळेच. तेव्हा प्रश्न पडतो की, या हवामान खात्यातील तथाकथित शास्त्रज्ञांना जाब विचारणारे कुणी आहे की नाही? यंदाच्या पावसाळ्यात तर हवामानाचे अंदाज सातत्याने चुकीचेच देऊन हवामान खात्याच्या लोकांनी स्वत:चे हसे करून घेतले आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. अशा अर्धशिक्षित माणसांमुळेच विज्ञानालाच लोक दोष देऊ  लागतात आणि वैज्ञानिक अभ्यासाची खिल्ली उडवतात. अत्याधुनिक उपकरणे आणि उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहितीचेही योग्य विश्लेषण न करता आल्यामुळे चुकीच्या पद्धतीने हवामान खाते अंदाज व्यक्त करत असेल, तर या माणसांना निलंबित का करू नये, आणि त्या ठिकाणी अभ्यासू शास्त्रज्ञांची वर्णी का लावू नये, असा प्रश्न पडतो. या सूचनेची शासनदरबारी योग्य दखल घेतली जाईल काय?

– जगदीश काबरे, सीबीडी-बेलापूर (जि. नवी मुंबई)

पीएच.डी. प्रबंध गफलतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

‘रद्दी आणि सद्दी’ हे संपादकीय (२१ सप्टेंबर) अतिशय योग्य शब्दांत शिक्षणक्षेत्रातील घसरलेली प्रबंधांची गुणवत्ता व सर्वसंमत झालेल्या पीएच.डी. पदव्या यांवर कठोर भाष्य करणारे आहे. पूर्वी भरपूर वाचन करून, संशोधन करून स्वत: प्रबंध लिहिले जात. त्यास अनेक वर्षे लागत आणि तो प्रबंध संमत होऊन लगेच पीएच.डी. मिळेलच याची शाश्वती नसते. आज पदव्युत्तर पदवी घेतल्याबरोबर पीएच.डी.साठी नोंदणी केली जाते आणि कधी कधी किमान नऊ  महिन्यांचा कालावधी प्रबंध सादर करण्यासाठी असतो, त्याआधीच प्रबंध तयार असतो. हे सर्व अवाक् करणारे असून यातील गफलत लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करून पीएच.डी.वाटप चालू राहते. कारण ‘तेरी मी चूप, मेरी भी चूप’ हेच सूत्र अवलंबिले जाते.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (जि. मुंबई)

सद्दीची बीजे उच्च माध्यमिक शिक्षणातच रुजतात

‘रद्दी आणि सद्दी’ हा अग्रलेख वाचला. पण याची सुरुवात उच्च माध्यमिक शिक्षणापासूनच होते आहे, हे विसरून चालणार नाही. टंकलेखन परीक्षा असेल, दहावी आणि बारावीच्या परीक्षा असतील, या सद्दीचे बीज येथूनच रुजते आहे. उच्च पातळीवर त्याचा गाजावाजा झाल्यावर मग दखल घेऊन काय उपयोग होणार आहे ?

– सचिन देशपांडे, परभणी