स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ५०व्या ओवीच्या विस्तृत अर्थाचं वर्तुळ आपण पूर्ण करीत आलो आहोत. ही ओवी – ‘‘मग अपेक्षित जें आपुलें। तेही सांगतील पुसिलें। जेणें अंत:करण बोधलें। संकल्पा न ये।।’’ सद्गुरू काय करतील? माझ्या जगण्यातील अज्ञानाचा प्रभाव दाखवतील. तो कसा दूर करायचा, याचा बोध करतील. ती प्रक्रिया करवून घेतील. भ्रमाच्या विळख्यातून कसं सुटायचं, ते शिकवतील. मी खरं कसं आणि कशासाठी जगलं पाहिजे, हे माझ्या अंत:करणात ठसवतील. हे सद्गुरूंशिवाय शक्यच नाही. अहो माती आहे, पाणी आहे; पण कुंभार नसेल तर मातीचा घडा बनेल का? दगड आहे, छिन्नी आहे; पण शिल्पकार नसेल तर दगडातून शिल्प साकारेल का? अनंत ग्रंथ आहेत, योगाचे अनंत प्रकारही ऐकून माहीत आहेत; पण कुशल योगशिक्षक नसेल तर त्या ऐकीव-वाचीव माहितीनं योग साधेल का? तसं ऐकीव, पढीव, वाचीव माहितीनं अध्यात्माच्या मार्गाकडे वळता येईल, पण अखेपर्यंत चालणं आणि मुक्कामाला पोहोचणं साधणार नाही. माझ्यातलं अज्ञान नष्ट करण्याचे आजवर मी अनंत प्रयत्न केले. प्रत्येक प्रयत्नाबरोबर अज्ञान अधिकच घट्ट झालं! भगवंतही सांगतात, ‘‘यालागी पांगुळा हेवा। नव्हे वायूसि पांडवा। तेवीं देहवंतां जीवां। अव्यक्तीं गति।।’’ (अ. १२, ओवी ७३). पांगळ्याला ज्याप्रमाणे वायूच्या गतीशी स्पर्धा करता येणार नाही त्याप्रमाणे देहात असलेल्या, देहबुद्धीच्या आधारावर जगत असलेल्या जिवाला अव्यक्ताशी अर्थात निर्गुण, निराकार परब्रह्माशी ऐक्यगति साधता येणार नाही. त्यासाठी देहधारीच, पण आत्मबुद्धी जागवणारा स्वरूपस्थित सद्गुरूच हवा! अठराव्या अध्यायात माउली सांगतात, ‘‘भुकेलियापासीं। वोगरिलें षड्रसीं। तो तृप्ति प्रतिग्रासीं। लाहे जेवीं।।’’ (ओ. १००७). भुकेलेला माणूस सहा रसांनी युक्त भोजन मिळाले तर प्रत्येक घासाबरोबर जसा तृप्त होतो, असा याचा प्रचलित अर्थ आहे. गूढार्थ असा की, भौतिकाची भूक लागली होती तेव्हा षट्विकारांनी जगणं सुरू होतं आणि अशा षट्विकारयुक्त आहारात मग्न इंद्रियांची प्रत्येक कृती ही तृप्तीची हाव वाढवीतच होती! आता सद्गुरू बोधानं खरी जाग आली आणि खरं चालणं सुरू झालं तर काय होतं? ‘‘तैसा वैराग्याचा वोलावा। विचाराचा (पाठभेद : विवेकाचा) तो दिवा। आंबुथितां (म्हणजे उजळता) आत्मठेवा। काढीचि तो।।’’ तर, शाश्वताबाबतचा विचार हाच खरा विवेक! त्या विवेकाच्या दिव्याला वैराग्याचं तेल मिळालं, तर आत्मठेवा, माझ्या अंतरंगात मूलत: होतं ते ज्ञान उजळू लागतं. मग जगण्यातलं अज्ञान नष्ट होऊन आत्मविचारानं जगणं सुरू होतं. आता हे विवेकाला वैराग्याचं तेल मिळणं म्हणजे काय? तर सद्गुरू बोधानुसार जगू लागलं की सार काय, शाश्वत काय आणि असार काय, अशाश्वत काय हे उमगू लागतं. मग षट्विकारयुक्त जगण्यात असार, अशाश्वताची जी ओढ होती, ती उरत नाही. त्यापासून मन उदासीन, विरक्त होऊ लागतं! या विरक्तीनं विवेकाचा दिवा उजळतो आणि आत्मठेवा गवसतो!