एक ऐतिहासिक वाद

ओपन सोर्स व्यवस्थेतली यशोगाथा म्हणून ओळखली जाऊ लागली होती.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| अमृतांशू नेरुरकर

विसाव्या शतकाच्या अखेपर्यंत लिनक्स ही ओपन सोर्स व्यवस्थेतली यशोगाथा म्हणून ओळखली जाऊ लागली होती. लिनक्स प्रकल्पात योगदान देणाऱ्या समुदायांमध्ये भरघोस वाढ होत होती. फक्त संगणकशास्त्राचे विद्यार्थी, तंत्रज्ञ आणि जगभरातील विद्यापीठेच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रातसुद्धा लिनक्सचा वापर सुरू झाला होता. लिनक्सभोवती विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्या उदयास येत होत्या. थोडक्यात सर्वसामान्यांपासून संगणक तंत्रज्ञांपर्यंत व वित्तीय विश्लेषकांपासून कंपन्यांच्या प्रमुख माहिती तंत्रज्ञान अधिकाऱ्यांपर्यंत ‘लिनक्स’ हा परवलीचा शब्द बनला होता; तर लिनस टॉरवल्ड्स ओपन सोर्स चळवळीचा ‘पोस्टर बॉय’ बनला होता.

एकीकडे या चळवळीचे यशोगान सर्वत्र चालू असताना, लिनक्स व्यवस्थापनामध्ये काही वाद, संघर्ष उफाळून आले होते. यातील बरीचशी पेल्यातली वादळं पेल्यातच शमली असली तरी विशेषकरून दोन वाद प्रामुख्याने चर्चिले गेले. पहिला म्हणजे, मागील एका लेखात चर्चिलेला लिनक्सच्या सुरुवातीच्या काळातला टॉरवल्ड्स – टॅननबॉम वाद! दुसरा महत्त्वाचा वाद मात्र पुष्कळ उशिरा १९९८ सालच्या अंताकडे घडला. यातही केंद्रस्थानी होता लिनक्सचा नायक लिनस टॉरवल्ड्स! या वादाची तीव्रता एवढी होती की लिनक्स प्रकल्पाचे व त्यात योगदान देणाऱ्या समुदायांचे विभाजन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लिनक्स प्रकल्प कंपनीमधल्या प्रकल्पांप्रमाणे चार भिंतींत सीमित नसल्यामुळे या वादाचे स्वरूप काहीसे वेगळे होते. त्यामुळेच प्रस्तुत वादविवादात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या संभाषण व वाटाघाटी करण्याच्या तसेच मतभेद हाताळण्याच्या कौशल्यांचा कस लागला. ओपन सोर्स प्रकल्पांचे व्यवस्थापन समजून घेण्याच्या दृष्टीनेही या ऐतिहासिक वादाचा ऊहापोह करणे उद्बोधक आहे.

१९९८ सालात जेव्हा लिनक्स ऐन बहरात होती, तेव्हा टॉरवल्ड्सच्या आयुष्यात दोन घटना घडल्या, ज्यामुळे लिनक्सच्या वेगाने विस्तारणाऱ्या निर्मितीप्रक्रियेकडे त्याचे काहीसे दुर्लक्ष व्हायला लागले. एक म्हणजे त्याच वर्षी त्याला दुसरे मूल झाले व त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याने ट्रान्समेटा या अमेरिकन कंपनीत नोकरी पत्करली. जरी टॉरवल्ड्सच्या दबदब्यामुळे कंपनीने त्याला समांतरपणे लिनक्सचं नेतृत्व करत राहण्याला परवानगी दिली असली तरीही शेवटी ती एक नोकरी होती व नोकरीबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या व ताण पेलणे टॉरवल्ड्सला भाग होते. इथेच हळूहळू जगभरात पसरलेल्या लिनक्स समुदायांच्या अपेक्षांना टॉरवल्ड्स अपुरा पडू लागला.

१९९८च्या मध्यावर लिनक्स समुदायांकडून लिनक्सची कार्यक्षमता वाढवणाऱ्या नवनवीन सुधारणांचा तसेच सूचनांचा ओघ टॉरवल्ड्सकडे येत होता, ज्यावर त्याचा प्रतिसाद अतिशय थंड होता. लिनक्स समुदायांमधली बेचैनी वाढत होती. आजवर ज्याचा अनुनय केला तो त्यांचा नेता त्यांना कसलीच दिशा दाखवत नव्हता. इतकंच काय त्यांच्या विनंत्यांनासुद्धा कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हता.

समुदायांमधल्या सुरुवातीच्या बेचैनीचे रूपांतर थोडय़ाच दिवसांत निराशेमध्ये झाले आणि लिनक्समध्ये ‘क्रायसिस’ उत्पन्न झाला. सप्टेंबर १९९८ मध्ये हा क्रायसिस पहिल्यांदा चव्हाटय़ावर आला. जेव्हा लिनक्सवर काम करणाऱ्या एका समुदायाला असे आढळून आले की, लिनक्सची टॉरवल्ड्सच्या फाइल सव्‍‌र्हरवर असलेली आवृत्ती व त्याचीच प्रतिकृती असलेल्या अमेरिकेतल्या रटगर्स विद्यापीठातल्या आवृत्तीमध्ये तफावत आहे.

लिनक्स व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही गंभीर बाब होती. या दोन्ही आवृत्त्या एकमेकींच्या हुबेहूब प्रतिकृती असणे गरजेचे होते, कारण रटगर्स विद्यापीठाचा फाइल सव्‍‌र्हर हा टॉरवल्ड्सच्या फाइल सव्‍‌र्हरचा ‘मिरर’ म्हणून काम करत होता. या मिरर सव्‍‌र्हरची सुरुवात १९९५ मध्ये डेव्हिड मिलर या रटगर्समधल्या संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांने खास लिनक्सची उपलब्धता वाढावी या उद्देशाने केली होती व तोच त्यावरच्या लिनक्सच्या आवृत्तीची देखभाल करत असे. १९९८च्या मध्यानंतर एका बाजूला टॉरवल्ड्स स्वत:जवळच्या लिनक्सच्या आवृत्तीमध्ये विविध समुदायांकडून आलेल्या सुधारणा वेळेअभावी स्वीकारत नव्हता, तर दुसऱ्या बाजूला मिलर त्याला मिळत असलेल्या सुधारणांवर योग्य ती कार्यवाही करून, त्याच्याजवळच्या लिनक्सच्या आवृत्तीमध्ये त्यांचा अंतर्भाव करत होता. अशा तऱ्हेने सप्टेंबर १९९८ मध्ये लिनक्सच्या दोन अधिकृत पण भिन्न आवृत्त्या (‘फोर्कस्’) एकाच वेळेला अस्तित्वात होत्या.

टॉरवल्ड्सच्या हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या थंडावलेल्या प्रतिसादाची जराही कबुली दिली नाही, उलट मिलरलाच त्याच्या अपरोक्ष लिनक्समध्ये बदल केल्याबद्दल फैलावर घेतले. लिनक्सच्या ऑनलाइन चर्चामंचावर टॉरवल्ड्सने या संदर्भात मिलरला लिहिलेल्या खरमरीत ई-मेलला लिनक्स समुदायातील अनेकांनी मिलरच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या. बहुतेकांनी टॉरवल्ड्सच्या सध्याच्या ढिम्म कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेवटी मिलरने टॉरवल्ड्सच्या ई-मेलला तेवढेच सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यात त्याने टॉरवल्ड्सला स्पष्ट  बजावले की, जर तो समुदायांकडून येणाऱ्या सूचना- सुधारणांची अशीच उपेक्षा करत राहणार असेल, तर लिनक्सच्या वाढीचा तोच प्रमुख अडथळा बनेल व लोक लिनक्स प्रकल्पापासून दुरावत जातील. पण टॉरवल्ड्सने आपला हेका सोडला नाही. उलट त्याने मिलरचा रटगर्स विद्यापीठाचा फाइल सव्‍‌र्हर बंद करावा अशी अजब मागणी लावून धरली. जेव्हा मिलरसकट लिनक्स समुदायातल्या इतर सहयोगींनी या मागणीला कडाडून विरोध केला तेव्हा मात्र टॉरवल्ड्स पिसाळला. त्याने मिलरकडून जाहीर माफीनाम्याची मागणी तर केलीच पण त्याउपर जाऊन त्याने लिनक्समधून स्वत:चे अंग काढून घेण्याची निर्वाणीची इशारावजा धमकीच दिली.  लिनक्सला विघटनापासून वाचवायला या वेळेला संकटमोचक म्हणून ओपन सोर्स व्यवस्थापन पद्धतीचा भाष्यकार एरिक रेमंडच धावून आला. त्याने मिलर व टॉरवल्ड्स दोघांनाही आपापल्या भावनातिरेकाला आवर घालण्याची विनंती केली व या समस्येचे वस्तुनिष्ठ मोजमाप करण्याचे आवाहन केले. रेमंडने हे स्पष्ट केले की, कोणताही प्रकल्प हा एखाद दुसऱ्या व्यक्तीवर अशा पद्धतीने अवलंबून राहू शकत नाही आणि म्हणूनच लिनक्सला व्यक्तिनिरपेक्ष करण्याची कार्यपद्धती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधणं हेच या समस्येचं उत्तर आहे.

१९९४ पासून लिनक्समध्ये भरघोस योगदान देणाऱ्या लॅरी मॅकव्हॉय या तंत्रज्ञाने या समस्येवर एक तंत्रज्ञानाधिष्ठित उत्तर शोधून काढलं. लिनक्सच्या अवाढव्य वाढलेल्या सोर्स कोडचं कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी त्याने ‘बिटकीपर’ नावाच्या प्रणालीची निर्मिती केली. याचं वैशिष्टय़ म्हणजे यात सुधारित सोर्स कोडचा लिनक्समध्ये अंतर्भाव करायचा की नाही हे केवळ टॉरवल्ड्स वा मिलरवर अवलंबून राहणार नव्हतं.

बिटकीपरच्या कल्पनेला लिनक्स समुदायाने उचलून धरले. रेमंडने त्यानंतर १९९८च्या अंताकडे लिनक्समधल्या प्रमुख सहयोगी तंत्रज्ञांची, ज्यात मिलर, मॅकव्हॉय, टेड त्सो वगैरे मंडळी होती, टॉरवल्ड्सबरोबर रात्रभोजनाच्या निमित्ताने भेट घडवून आणली. यात सर्वानीच टॉरवल्ड्सवर लिनक्सच्या व्यवस्थापनाचा पडणारा ताण कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी सकारात्मकता दर्शवली. तसेच टॉरवल्ड्सने स्वत: लिनक्सच्या प्रवक्त्याच्या भूमिकेतून बाहेर पडून ते काम एरिक रेमंडवर सोपवावे असे सर्वानुमते ठरले. बिटकीपरसारख्या सोर्स कोडचं व्यवस्थापन करणाऱ्या प्रणालीचा वापर लिनक्ससाठी करणं उचित राहील यावरही शिक्कामोर्तब झालं आणि अखेरीस या वादावर पडदा पडला.

या वादाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे हा वादसुद्धा खुल्या ऑनलाइन मंचावर झाला. या वादविवादात घडलेली विचारांची देवाणघेवाण, झालेल्या वाटाघाटी तसेच मतभेदांची हाताळणी सर्वासमक्ष मुक्तपणाने झाली. या वादामुळे लिनक्स प्रकल्पाला एक औपचारिक संस्थात्मक बैठक मिळण्यास मदत झाली, ज्यात विविध व्यक्तींनी आपापल्या जबाबदाऱ्या अधिकृतपणे वाटून घेतल्या. थोडक्यात कोणत्याही ओपन सोर्स प्रकल्पाचे व्यवस्थापन अधिक प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने या वादाने मोलाची भर घातली.

“Nothing succeeds like success” या न्यायाने जसजसे लिनक्स प्रकल्पाचे यश व लोकप्रियता वाढत होती, तसे इंटरनेट युगासाठी आवश्यक असणाऱ्या इतर प्रकारच्या प्रणालींची निर्मिती ओपन सोर्स पद्धतीने व्हायला सुरुवात झाली होती. यातलाच एक प्रमुख प्रकल्प होता अपॅची वेब सव्‍‌र्हरची निर्मिती! याच अपॅची वेब सव्‍‌र्हर व त्याचा प्रणेता ब्रायन बेलेनडॉर्फबद्दल आपण पुढील लेखात चर्चा करू.

amrutaunshu@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Open source software